घरमनोरंजनसिनेमात ‘शिमगा’ दिसणार

सिनेमात ‘शिमगा’ दिसणार

Subscribe

कोकणात वर्षभर जरी वेगवेगळे उत्सव साजरे केले जात असले तरी शिमगा आणि गणेशोत्सव हे त्यांचे जिव्हाळ्याचे सण. कोकणातला माणूस इतरवेळी महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात असो पण या दोन सणांच्या निमित्ताने गावाकडे कुटुंबासह येतोच. चाकरमानीसुद्धा इतरवेळी आढेवेढे घेतील; पण यादरम्यान गावाला जायलाच पाहिजे हा तगादा मालकापुढे लावत असतात. एकंदरीत काय तर यादरम्यान कोकणात माणसांची वर्दळही वाढत असते. मोठ्या श्रद्धेने आपले गार्‍हाणे तो इथे मांडत असतो. कोकणवासीयांचे राहणीमान बदलेल परंतु परंपरेने आलेल्या रितीरिवाजांपासून तो काही अलिप्त रहात नाही. मनासारखी पूजा करत असताना इथल्या लोकसंस्कृतीचा आनंद घेणे कोकणवासीयांना महत्त्वाचे वाटते. दशावतार, जाखडी नृत्य, पालखी नाचवणे या सगळ्या गोष्टींसाठी या काळात गावकरी एकत्र येतात. इतरवेळी माणसामाणसात, गावागावात मतभेद असू शकतील. परंतु शिमग्याच्या निमित्ताने दिसणारा एकोपा बरेच काही सांगणारा असतो. ज्यांचा कोकणाशी संबंध नाही त्यांच्यासाठीसुद्धा इथले लोकजीवन मोहक आणि मनोरंजन करणारे वाटावे असे इथले वातावरण असते जे ‘शिमगा’ या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. होळीच्याच दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

निलेश कृष्णाजीराव पालांडे हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. स्वत: कोकणवासी आहेत. पूर्वापारची परंपरा आजही नव्या पिढीने तेवढीच जपलेली आहे. त्याचे अप्रूप वाटून त्यांनी ‘शिमगा’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केलेले आहे. या शिमगा सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे देवळातले देव या निमित्ताने दर्शनासाठी देवळाबाहेर काढले जातात. त्यांच्यासाठी पालखी सजवली जाते. जिथे वस्ती तिथे ही पालखी नेली जाते. रागरुसवे, मतभेद, वाईट विचार याला थारा देऊ नये हा या शिमग्याचा मुख्य हेतू आहे. निलेशने आपल्या दिग्दर्शनात या गोष्टीला प्राधान्य दिलेले आहे. भूषण प्रधान, राजेश शृंगारपुरे हे दोन अभिनेते यात मुख्य भूमिका निभावणार आहेत. निलेशला या चित्रपटासाठी ज्या चार-पाच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्यातील संगीत हा आत्मा आहे. गुरु ठाकूर यांच्याकडून गाणी लिहून घेतलेली आहेत. पंकज पडघम याने त्याला संगीत दिलेले आहे.‘श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन’च्या वतीने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमुळे कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -