घरमनोरंजनप्रसिद्धीला आधार ‘व्हॅलेंटाईन डे’ चा

प्रसिद्धीला आधार ‘व्हॅलेंटाईन डे’ चा

Subscribe

साधारण वीस वर्षांपूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ नावाचा प्रेम व्यक्त करणारा दिवस असतो हे बहुदा कोणाला माहिती नव्हते. परदेशात मोठ्या उत्साहाने हा डे साजरा केला जातो. सान्निध्यात येणार्‍या आणि आपुलकी वाटणार्‍या कोणत्याही व्यक्तीबद्दल आपुलकी व्यक्त करणारा हा दिवस; पण का कसे भारतात, विशेषत: शहरामध्ये प्रेम व्यक्त करायचे म्हणजे प्रियकर-प्रेयसीने आपल्या खर्‍या प्रेमाची साक्ष द्यावी असे काहीसे झपाट्याने पसरले. इतकेच काय तर युवा वर्गात त्याचे चांगले वाईट परिणाम दिसायला लागले. भेटवस्तूंनी दुकाने सजली गेली. यातून विपरितच परिणाम होत आहे म्हटल्यानंतर अनेक संघटना, संस्थांनी त्याला विरोध केला. परिणामी उघडपणे व्यक्त केले जाणारे प्रेम आता छुप्या मार्गाने होऊ लागलेले आहे. पण हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीने मात्र याचा पुरेपूर फायदा घेणे आजही चालू ठेवलेले आहे. प्रसिद्धीला आधार ‘व्हॅलेंटाईन डे’चा असे काहीसे चित्र आज पहायला मिळते.

हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल लक्षात घेतली तर प्रेमपटावर खर्‍या अर्थाने चित्रपटसृष्टीही तरली गेलेली आहे. प्रत्येक दशकाचा मागोवा घेतला तर एकातरी प्रेमपटाने कायमस्वरुपी स्मरणात राहील असे चित्रपट दिलेले आहेत. चित्रपटात प्रेम आलेले आहे परंतु प्रेमासाठी चित्रपट ओळखला जावा ही किमया फक्त राज कपूर यांनी केलेली आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘बॉबी’, ‘राम तेरी गंगा मैली’ असे अनेक चित्रपट प्रेमपट म्हणूनच ओळखले गेलेले आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी राज कपूर यांनी काही प्रसंग ओढून ताणून आणले असले तरी प्रेक्षकांना लक्षात राहिले आहे ते त्यातले प्रेम. या प्रेमपटाचे वेगळेपणही तसेच होते. या चित्रपटामुळे नायक-नायिकासुद्धा कायम स्मरणात राहिलेले आहेत. मराठी चित्रपटाचा मागोवा घेतला तर हिंदीतल्या प्रेमपटांनी प्रेक्षकांत जे आकर्षण निर्माण केले ते मराठी चित्रपटाला फारसे काही निर्माण करता आलेले नाही. याचा अर्थ मराठीत प्रेमपट आलेच नाहीत असे नाही. पण अलिकडे मराठी चित्रपटात दाखवल्या गेलेल्या प्रेमप्रकरणांची कुजबूज फक्त वाढलेलीच नाही तर मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारी आहे. ‘सैराट’ हा त्यापैकी एक चित्रपट सांगता येईल.

मराठी चित्रपटाचे एक वैशिष्ठ्य सातत्याने पहायला मिळते ते म्हणजे प्रेक्षकांना ज्या गोष्टी आवडतात त्यांचे अनुकरण करणे बर्‍याचशा निर्माता, दिग्दर्शकांनी क्रमप्राप्त मानलेले आहे. ‘सैराट’पासून हा सिलसिला सुरू झालेला आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत प्रेम व्यक्त करायचे, त्यात जीवाची बाजी लावायची, नको ते धाडस करायचे आणि अखेरीस कोणीतरी एकाने मृत्यूला सामोरे जायचे हे कथाबीज अलिकडच्या बर्‍याचशा चित्रपटामध्ये थोड्याफार फरकाने पहायला मिळते. प्रसिद्धीला आधार ‘व्हॅलेंटाईन डे’ चा असे म्हणण्याचे कारण म्हणजे १४ फेब्रुवारी हा दिवस जरी ‘व्हॅलेंटाईन डे’ असला तरी निर्मात्याने पुढचे मागचे काही आठवडे पकडून आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी कशी होईल हे पाहिलेले आहे. काही निर्मात्यांनी तर चित्रपट प्रदर्शित पुढच्या महिन्यात होणार असला तरी त्यातल्या गाण्यांच्या प्रमोशनाला ‘व्हॅलेंटाईन डे’ची जोड दिलेली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले आणि होणारे ‘व्हॉट्सअ‍ॅप लव’, ‘शिवा’, ‘रेडीमिक्स’, ‘लकी’, ‘भेद’, ‘फेसबुकवाला प्यार’ या चित्रपटांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. ‘वेडींगचा सिनेमा’ हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे; पण व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ‘बोल बोल पक्क्या’ हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतलेली आहे.

- Advertisement -

चित्रपट प्रदर्शित करण्याला तसं काही निमित्त लागत नाही. पण वर्षाला एकंदरीत येणारे चित्रपट लक्षात घेतले तर बर्‍याचशा निर्मात्यांनी याच कालावधीत प्रसिद्धी मिळवण्याच्यादृष्टीने ‘व्हॅलेंटाईन डे’चा आधार घेतलेला आहे. त्याला कारण म्हणजे असे केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये त्या चित्रपटाविषयी चर्चा रंगते. इतरवेळी मराठी चित्रपटाला हे विद्यार्थी वेळ देतीलच असे नाही; पण निमित्ताने केलेल्या चित्रपटाला आवर्जून गर्दी करीत असल्याचे पहायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -