घरफिचर्स१९९३ ची पुनरावृत्ती नको

१९९३ ची पुनरावृत्ती नको

Subscribe

नवरात्रोत्सव, रामलीला आणि दीपावलीच्या काळात देशात घातपात घडवण्याचा कट रचणार्‍या सहा दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी अटक केली. या सहा दहशतवाद्यांमध्ये मुंबईच्या टॅक्सी चालकाचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे नेहमी अवतीभोवती वावरणार्‍या व्यक्तींना अचानकपणे अटक होते तेव्हा मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. १९९३ साली घडविण्यात आलेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही असाच काहीसा प्रकार घडला होता. स्थानिक युवकांना विश्वासात घेऊन त्यांना या दृष्कृत्यांमध्ये सहभागी करुन घेतले जाते. आता पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैंकी दोन जणांनी पाकिस्तानात ट्रेनिंगही घेतलं आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी या दहशतवाद्यांना अटक केली. यामुळे महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशामध्ये नवरात्र आणि रामलीला उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी एक मुंबईत सायन येथे राहत असल्याची माहिती समोर आली. दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्यांना अटक झाल्यावर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचं तिकीट काढून देणार्‍यालाही एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांकडून दिल्लीसह मेट्रो शहरात बॉम्बस्फोट करण्यात येणार होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. ओसामा व झिशान बॉम्ब बनवण्याची तयारी करत होते. या दोघांनी दोन आयडीही बनवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आधी दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशाततून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेतलं. या सहापैकी एक जण महाराष्ट्रातील आहे. सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यावर काहींच्या हत्या व विशिष्ट ठिकाणी स्फोट करण्याचा यांचा कट होता.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (47) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून तो टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची एटीएस तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील एम जी रोडवरील कालाबखर परिसरातील खोली क्रमांक 185 मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे. दहशतवादी कारवाया आणि मुंबई यांचे नेहमीच स्फोटक संबंध राहिलेले आहेत. 1993 चे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी मुंबईतील स्थानिक स्लीपर सेलची मदत पाकिस्तानातील सूत्रधारांकडून घेण्यात आली होती. तपासात हे उघडकीस आले होते. त्यानंतर 26/11 च्या मुंबई हल्ल्यातही कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जो उच्छाद मांडला होता, त्याला येथील स्थानिक घटकांचे पाठबळ होते की नाही, हे अद्याप उघडकीस आलेले नाही.

- Advertisement -

परंतु, पाकिस्तानातून दहशतवादी थेट मुंबईपर्यंत पोहोचतात यामागे कुणाचा तरी निश्चितच हात असतो. मुंबई हे कधीही न झोपणारे शहर आहे. यात एकमेकांविषयी फारसं कधी देणंघणं नसतं. त्यामुळे आपल्या शेजारी राहणारा व्यक्ती काय करतो, हे आपल्यालाही माहीत नसतं. अशा एखाद्या कारवाईनंतर त्याचं नाव अचानकपणे समोर आल्यानंतर तपास यंत्रणा अधिक खडबडून जागी होते. सहा दहशतवाद्यांमध्ये झीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके 47 रायफल कशी चालवावी, हेही शिकवले होते. हे प्रशिक्षण 15 दिवसांचे होते. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्युलचं मुंबई कनेक्शन समोर आलं आहे. हे दहशतवादी उत्तर प्रदेशातील निवडणुका आणि मुंबईत घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दहशतवाद्यांना मुंबईतून पैसा पुरवला गेला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांना मुंबईतून फंडिंग करण्यात आलं होतं. हा पैसा हवालामार्फत पुरवला गेला होता. जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगाडीयांच्या संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे, दहशतवादी कृत्याकरता लागणार्‍या सामुग्री करता पैसे देणे याकरता हा या पैशांचा वापर केला जायचा. यामुळे आता मुंबई आणि दिल्ली येथील अंगाडीया दहशतवादविरोधी पथकाच्या रडारवर आहेत.

टेरर फंडिगकरिता दाऊद गँगने अंगडियांना अ‍ॅक्टिव्हेट केले आहे. जान शेख याच्यामार्फत पैशांचा व्यवहार केले जात होता. मुंबईतील गर्दीच्या आणि व्हीआयपी ठिकाणांची माहिती गोळा करण्याकरीता माणसे कामाला लावली होती. दिल्ली ते मस्कत विमानाने आणि मस्कत ते पाकिस्तान जहाजाने दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी नेण्याची सोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ अनिसने केली होती. आयएसआय आणि पाक सैन्य यांच्या सहकार्याने दहशतवाद्यांना ट्रेनिंगची सोय केली. तसेच दहशतवाद्यांची दिल्ली ते पाकिस्तान आणि पाकिस्तान ते दिल्ली जाण्याची व्यवस्था केली होती. जान शेख मुंबई ते दिल्ली गेला होता. ट्रेनने जान दिल्लीला जात असे. जान याच्यासाठी रेल्वे तिकिट बूक करणार्‍याला ताब्यात घेतले आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशाच्या आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यासोबत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता.

- Advertisement -

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये मुंबईचे नाव येण्यामागील कारणे लक्षात घेतली तर येथील जीवनशैली. शेजारी राहत असलेल्या व्यक्तीविषयी प्राथमिक माहितीही ठेवण्याचा त्रास येथील लोक घेत नाहीत. आपल्याच विश्वात वावरणार्‍या या शहरातील लोकांना नेहमीच जीव मुठीत धरुन जगावे लागते. कधी पावसासारखी नैसर्गिक आपत्ती तर कधी दहशतवादी कारवायांसारखे भूत कायम मानगुटीवर असते. पण एखादी घटना घडली म्हणून त्यातून काहीच धडा न घेता केवळ प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून राहण्याची जणू सवयच घडाळाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांना जडली आहे. मुंबईतील सर्वसामान्य व्यक्ती अचानकपणे दहशतवादी कारवायांमागे असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची संपूर्ण ‘हिसट्री’ शोधली जाते. हेच अगोदर घडले तर शहर सुरक्षित राहील. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यांना रसद पुरवणार्‍या संघटनांची पाळेमुळे उखडायला हवीत. केवळ राजकारण करत बसण्यापेक्षा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी आपली वज्रमूठ आवळली पाहिजे. अन्यथा आपल्या शेजारील देश पाकिस्तान, अफगानिस्तान यांच्यासारखी अवस्था व्हायला फारसा वेळ लागणार नाही. जिवंत राहिलो तर राजकारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालता येईल. सध्या केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार यांच्यात पाडापाडीचे युद्ध पेटलेले आहे. एकमेकांवर आरोपांचे डाव टाकून पेचात पकडण्याची पराकाष्टा सुरू आहे. पण अशावेळी राजकारण बाजूला ठेवून आपण सावध राहिलो नाही, तर १९९३ सालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -