कार्यक्षम राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर

सासर्‍यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली, लवकरच त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर अहिल्याबाई राज्यकर्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.

अहिल्याबाई होळकर या एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी बीड जिल्ह्याताील चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशीलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला. अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी खंडेरावांशी झाले. अहिल्याबाईंनी सासर्‍यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासर्‍यांचा मोठा विश्वास होता. महत्वाचा पत्रव्यवहार त्या सांभाळत. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासर्‍यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. आपल्या सासर्‍यांच्या इच्छेचा अहिल्याबाईंनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.

सासर्‍यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना सुभेदारीची वस्त्रे मिळाली, लवकरच त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर अहिल्याबाई राज्यकर्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली.

बाई काय राज्यकारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणार्‍यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी. शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. अशा या कार्यक्षम राज्यकर्तीचे १३ ऑगस्ट १७९५ रोजी निधन झाले.