घरफिचर्सअन्ननलिकेचा कॅन्सर

अन्ननलिकेचा कॅन्सर

Subscribe

समन्वयात्मक चिकित्सा उपयुक्त

अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये रुग्णास पचण्यास हलका परंतु पोषक आहार द्यावा. आहारात तांदूळ भाजून मऊ भात, भाताची पेज, मूगाचे वरण, भाज्यांचे सूप, गोड व ताज्या फळांचे रस, गोड ताजे ताक, दूध, तूप, लोणी यांचा समावेश करावा. अन्ननलिकेच्या कॅन्सरवर समन्वयात्मक चिकित्सा उपयुक्त ठरते.

५९ वर्षांच्या नलिनीताईंना १९९९ मध्ये अन्न गिळण्यास त्रास होऊ लागला. वैद्यकीय उपचारांनीही आराम न पडल्याने सी.टी स्कॅन, बायॉप्सी तपासण्याअंती अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान झाले. शस्त्रक्रियेने कॅन्सरग्रस्त असलेला अन्ननलिकेचा भाग काढून टाकण्यात आला. प्रयोगशाळेत या भागाची तपासणी केली असता अन्ननलिकेच्या आसमंतातील लिंफ नोड्समध्येही कॅन्सरचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाल्यावर त्यांना केमोथेरेपी घेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु केमोथेरेपी घेण्यास नलिनीताईंनी नकार दिला व आमच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली केंद्रात केवळ आयुर्वेदिक चिकित्सा १० वर्षे नियमितपणे घेतली. ५ वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत याची खात्री करून आम्ही त्यांची आयुर्वेदिक औषधेही थांबविण्याचा सल्ला दिला. आज ७८ व्या वर्षी नलिनीताई स्वतंत्रपणे आपली नित्यकर्मे करत आहेत व स्वस्थ आयुष्य जगत आहेत.

- Advertisement -

२००९ मध्ये जाधव काकांना पोळी, भाकरी असे घन अन्नपदार्थ गिळण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर वजनही झपाट्याने कमी होऊ लागले व चालताना धाप लागू लागली. वैद्यकीय तपासण्यांमध्ये अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान निश्चित झाले. कॅन्सर आजूबाजूच्या गाठींमध्ये (लिंफ नोड्समध्ये) पसरला होता. शस्त्रकर्मानंतर आमच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली केंद्रात त्यांनी आयुर्वेदिक औषधे सुरू केली व त्यानंतर केमोथेरेपी व रेडिओथेरेपीही घेतली. आधुनिक वैद्यक व आयुर्वेद अशा समन्वयात्मक चिकित्सेने जाधव काकांना केमोथेरेपी व रेडिओथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी जाणवली. गेली १० वर्षे जाधव काकांना कॅन्सरचा पुनरुद्भव झालेला नाही व वजन, भूक, काम करण्याची क्षमता यांतही लक्षणीय सुधारणा झाली आहे.

आयुर्वेद शास्त्राच्या द़ृष्टीने अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये प्राधान्याने वात-पित्त व कफ या तीन दोषांची, रस व मांस या धातूंची व पचनशक्तीची विकृती आढळते. आयुर्वेदीय चिकित्सेत ज्येष्ठमध, अडुळसा इ. औषधी द्रव्यांनी सिद्ध तूप (घृत), बलवर्धन करणारी आवळ्यासारखी औषधे, भूक वाढविणारी, पचन सुधारणारी तसेच वातानुलोमक व पित्ताचे शमन करणारी औषधे उपयुक्त ठरतात.

- Advertisement -

अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये रुग्णास पचण्यास हलका परंतु पोषक आहार द्यावा. आहारात तांदूळ भाजून मऊ भात, भाताची पेज, मूगाचे वरण, भाज्यांचे सूप, गोड व ताज्या फळांचे रस, गोड ताजे ताक, दूध, तूप, लोणी यांचा समावेश करावा. तसेच गाईच्या दुधातील रवा, शिंगाडा, आरारुट अशा विविध प्रकारच्या खिरी पचण्यास सुलभ व पोषकही ठरतात. विशेषत: रेडिओथेरेपी व केमोथेरेपी काळात व नंतरही अशाच प्रकारच्या आहार योजनेने रुग्णाची प्रतिकारशक्ती सुधारुन व्याधीचा पुनरुद्भव होण्याची शक्यता कमी होते.

अन्ननलिकेच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांत शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचा विचार अनिवार्य ठरतो. समुपदेशनाने कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या मनातील कॅन्सरची भीती दूर करून त्याचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. अशारीतीने अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यक व आयुर्वेद अशा समन्वयात्मक चिकित्सेस पथ्यकर आहार व सकारात्मक दृष्टीकोनाची जोड देणे आवश्यक ठरते.

वैद्य स. प्र. सरदेशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -