घरफिचर्सपहिले संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोकर

पहिले संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोकर

Subscribe

अण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार. संपूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांची आवड निर्माण झाली व ते नाटक मंडळ्यांस पदे रचून देऊ लागले. स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहोसूर येथे येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्तांच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकर्‍या त्यांनी केल्या. अण्णासाहेबांनी प्रारंभी ‘अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी’ हे नाटक लिहावयास घेतले होते ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य नाटक त्यांनी लिहिले (१८७३).

पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८०). या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८० मध्ये ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ ची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले (१८८२). प्रणयभावनेचे मनोहर चित्रण त्यांनी ह्या नाटकात केले आहे. त्यांच्या सर्व नाटकांत हेच नाटक अधिक लोकप्रिय आहे. सुसंघटिक कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्योपरोधावर आधारलेल्या विनोदाचा अखंडपणे वाहणारा अंतःप्रवाह या वैशिष्ठ्यांमुळे या नाटकाचे आकर्षण मराठी प्रेक्षकांच्या मनात आजही टिकून आहे. अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते.

- Advertisement -

जुन्या विष्णुदासी नाटकांतील सूत्रधार, विदूषक, गणपती व सरस्वती यांच्या अनुक्रमाने होणार्‍या प्रवेशाची परंपरा सोडून देऊन संस्कृत नाटकातील सूत्रधार, परिपार्श्वक व नटी यांच्या संवादांनी नाटकांची प्रस्तावना करण्याची त्यांनी प्रथा पाडली. नाटक मंडळ्या व नट यांच्याविषयी समाजात असलेली अनुदारपणाची भावना त्यांनी रसिकांना उदात्त करमणुकीचे नवे माध्यम उपलब्ध करून दिले. परिणामी समाजातील उच्च वर्गात मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले. अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली आहे. पौराणिक नाटक मंडळ्या व कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. त्यांना कानडी, उत्तर हिंदुस्थानी आणि मराठी (लावणी इ.) गाण्यांच्या अनेक चाली अवगत होत्या व ते शीघ्रपणे कवने रचू शकत असत. त्यांनी ॠदक्षिणा प्राइझ कमिटी’ने बक्षीस लावल्यावरून स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे एक दीर्घकाव्य रचिले होते. अशा या महान संगीत नाटककाराचे २ नोव्हेंबर १८८५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -