घरफिचर्सओम स्पर्धाय नम: अर्थात एक अखंड उंदीर दौड

ओम स्पर्धाय नम: अर्थात एक अखंड उंदीर दौड

Subscribe

आपण आयुष्याची पार स्पर्धा करून टाकलीय. ही स्पर्धा आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्याला दिली आहे. स्पर्धा स्वार्थाला जन्म देते, हे साधे तत्व. त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीतून सालोसाल फक्त आपली प्रगती साधणारे, त्यासाठी समोरच्याला कोणत्याही प्रकारे नेस्तनाबूत करणारे स्वार्थी सुशिक्षित आपण कसे निर्माण करू शकलो, याचे उत्तर मिळते. प्रश्नाला केवळ एकच उत्तर असते आणि ते फक्त आपल्यालाच आले पाहिजे. म्हणजे आपली हुशारी सिद्ध होईल- या स्वार्थी मानसिकतेतून आजचा विद्यार्थी घडतो. अशी स्वार्थाची सार्वत्रिक लागण झालेली पिढी घेऊन आपण कोणत्या क्षेत्रात आणि किती प्रगती करू, हा एक प्रश्नच आहे.

स्पर्धेची ही लागण कलाक्षेत्राला म्हणजे जिथे भिन्न अभिव्यक्ती आहेत, प्रकटने आहेत, त्याला खरं तर होऊ नये. पण आपण त्याचीही पार स्पर्धा करून टाकली आहे. मालिका, चित्रपट, नृत्य, गायन, चित्रकला सार्‍याची स्पर्धा, तो एक खेळ आहे आणि त्यात हार-जीत झाल्याखेरीज निर्णय होऊ शकत नाही. अशा प्रकारे सुरू आहेत. या पद्धतीत एक दोष आहे. जो कोणत्याही क्षेत्राचे भले करू शकत नाही आणि समूह म्हणून आपल्यात एक सामाजिक भान आणू शकत नाही. मोठे सामाजिक भान दाखवणारी कलाकृती सादर करून त्या योगे इतरांना हरवून उन्मादात पारितोषके घेताना दिसणे. यात एक विसंगती आहेच. स्पर्धेचा दुसरा दुष्परिणाम केवळ स्वत:ची कृती श्रेष्ठ समजणारा. इतरांची कला पाहण्याची तसदीही न घेणारा रंगकर्मी.

परवाच त्यांच्या गौरव एकांकिका महोत्सवात बोलताना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, पत्रकार-लेखक जयंत पवार म्हणाले, स्पर्धा करणे हा माझा पिंड कधीच नव्हता. मी माझ्या अस्वस्थतेला लिखाणातून वाट देणारा लेखक. मला स्पर्धा करावी लागली ती माझ्या सहकार्‍यांमुळे. नाट्य संस्थेमुळे, अनेक स्पर्धा सहज जिंकणार्‍या कृती एकांकिका ते थेट साहित्य अकादमी या रेंजमध्ये निर्माण केल्यानंतर जयंत पवार हे विधान करत आहेत आणि म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहे. कला आणि अभिव्यक्ती या क्षेत्रात कसली स्पर्धा? तिथे तर अभिव्यक्त होणारा प्रत्येक जण कलाकार. पण आज त्यातील स्पर्धा नसलेला असा एक उपक्रम दाखवा.

- Advertisement -

महाराष्ट्राखेरीज जिथे नाटक चालते अशा, बंगाल, कर्नाटक राज्यांत स्पर्धा नाही. नाटकांचे महोत्सव होतात. मी श्रेष्ठ असा कोणताही गंड नसलेले रंगकर्मी तिथून मुंबईत येऊन, भाषिक अडचण असताना, हिंदीमध्ये मोठी मजल मारतात.परवाच एका दिग्दर्शक मित्राला कुणीतरी तू अजून स्पर्धा का करतोस? अजून किती वर्षे स्पर्धा करणार आहेस? तू बक्षिसांसाठी स्पर्धा करतोस का? असा प्रश्न केला. प्रश्न करणारा गेली काही वर्षे स्पर्धेतच आहे. या विसंगतीला नाट्य क्षेत्रात फारसे मनावर घ्यायचे नसते. पूर्वी भारतीय विद्या भवन नंतर आय. एन. टी., पुरुषोत्तम, राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा इतकी आणि हौशी कलाकारांसाठी मर्यादित असलेली स्पर्धा आता राजमान्य झाली आहे.

सरकार देखील कलाकारांना उत्तेजन म्हणून स्पर्धाच भरवते. यात आता त्यांनी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाट्य स्पर्धा, बालनाट्यालाही सोडलेले नाही. दरवर्षी एक-दोन संस्थांना-नाटकांना उत्तेजन देणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. अशा अविर्भावात, सांस्कृतिक कला संचलनालयाचे काम चालले आहे. स्पर्धेच्या फोलपणाची गंमत अशी की, तीत नाकारलेली, ‘शांतता कोर्ट चालू आहे’ किंवा दुसरी आलेली ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’ सारखी नाटके आज जागतिक मराठी क्लासिक्स मानली जातात. आय, एन, टी. स्पर्धेत तिसरे येणारे ‘ऑल द बेस्ट’ आज जास्तीत जास्त भाषांत सर्वाधिक प्रयोग, असा विक्रम करणारे एकमेव भारतीय नाटक होते. तरीही सालाबाद स्पर्धा आली की, मंदिरात जाण्याच्या श्रद्धेने कुठल्याही स्तरावरचा रंगकर्मी हा स्पर्धेकडेच वळतो. कारण स्पर्धा अपरिहार्य आहे. तिला पर्याय ठरेल असा प्लॅटफॉर्मच मराठीत नाही. एखादी स्पर्धा जिंकल्यावर रंगकर्मीचा बदललेला सूर ऐकून आपल्याला स्पर्धेचे धोके कळतात. मी श्रेष्ठ, ही कलेची अंतिम परिणती नव्हे, पण अहंकाराची ती आहेच आहे.

- Advertisement -

-आभास आनंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -