घरफिचर्स# uddhavresign : भाजप भक्तांचा जीव कासावीस!

# uddhavresign : भाजप भक्तांचा जीव कासावीस!

Subscribe

मी पुन्हा येईन, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना उद्धव ठाकरे सरकारमुळे ते उद्ध्वस्त झाल्याने भाजप भक्तांचा रात्रीचा डोळा लागत नाही, अशी परिस्थिती आहे. डोळा लागतोय असे वाटत असताना सकाळी पुन्हा उद्धव ठाकरे सरकार सत्तेत असल्याचा सामना करावा लागत असल्याने करायचे काय? या प्रश्नाने डोके सैरभैर होत आहे. यामुळेच करोनाचे निमित्त करून पाच दहा नव्हे तब्बल 40 हजार अधिक लोकांनी # udhavresign हा हॅशटॅग वापरून राजीनाम्याची मागणी केली आहे. आता हे मागणी करणारे भाजप भक्त कशावरून, असा दावाही केला जाईल. पण, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची एवढी घाई कोणाला होऊ शकते, याचा सारासार विचार केला तर भाजप भक्त आणि सर्वसामान्य माणसे यातील फरक कळू शकतो.

करोनाचे प्रचंड मोठे संकट देशभर पसरले असून त्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने मुकाबला करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार समन्वय साधून देश यामधून लवकर सावरावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, असे असताना करोनाशी दोन हात करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येण्याऐवजी भाजप भक्तांचा जीव कासावीस झाला आहे. त्यांना म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हवा आहे. उद्धव ठाकरे म्हणे करोनाशी मुकाबला करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी तात्काळ खुर्ची खाली करायला हवी. यासाठी भाजप भक्त म्हणा मोदी प्रेमी म्हणा सोशल मीडियाचा वापर करून उद्धव यांना टार्गेट करत आहेत. यासाठी त्यांची मोठी टीम कामाला लागली आहे. 2014 च्या आधीपासूनच ही टीम काम करत आहे. सत्ता आल्यानंतर तर त्यांना विरोधक डोळ्यासमोर नको आहेत. मी पुन्हा येईन, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना उद्धव ठाकरे सरकारमुळे ते उद्ध्वस्त झाल्याने भक्तांचा रात्रीचा डोळा लागत नाही, अशी परिस्थिती आहे. डोळा लागतोय असे दिसत असताना सकाळी पुन्हा उद्धव ठाकरे सरकार सत्तेत असल्याचा सामना करावा लागत असल्याने करायचे काय? या प्रश्नाने डोके सैरभैर होत आहे. यामुळेच करोनाचे निमित्त करून पाच दहा नव्हे तब्बल 40 हजार अधिक लोकांनी # uddhavresign हा हॅशटॅग वापरून राजीनाम्याची मागणी केली आहे. आता हे मागणी करणारे भाजप भक्त कशावरून, असा दावाही केला जाईल. पण, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची एवढी घाई कोणाला होऊ शकते, याचा सारासार विचार केला तर भाजप भक्त आणि सर्वसामान्य माणसे यातील फरक कळू शकतो.

आज देशात महाराष्ट्र हा करोनाबाधित असलेले सर्वात मोठे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात आजही मोठ्या संख्येने देशाच्या कानाकोपर्‍यातून पोट भरण्यासाठी माणसे येतात. आपल्याला हे राज्यच जगवेल, असा त्यांचा आशावाद कायम आहे.

- Advertisement -

खरेतर महाराष्ट्रावरील परप्रांतीयांचा बोजा कमी करण्यासाठी 2014 पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करून उत्तर प्रदेश आणि बिहार या बिमारू राज्यांची ताकद वाढवायला हवी होती. पण, तसे होताना दिसत नाही. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात भाजपची सरकारे आहेत. बिहारमध्ये जनता दल संयुक्तच्या साथीने भाजप सत्तेत असून नितीश कुमार यांनी या राज्यातील गुन्हेगारी कमी केली असली तरी उद्योग व्यवसायामध्ये अजून बिहारला मोठी मजल गाठायची आहे. तिच परिस्थिती उत्तर प्रदेशची आहे. या सार्‍याचा मोठा बोजा महाराष्ट्रावर पडत असून त्याचा परिणाम करोनाच्या निमित्ताने दिसून आला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, भिवंडी, मालेगाव, ठाणे, दिवा, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, भाईंदर, वसई, नालासोपारा, विरार, नागपूर अशा शहरांमध्ये मोठ्या संख्येने झोपडपट्ट्यांमध्ये किड्या मुंग्यांसारख्या राहणार्‍या लोकांना करोनासारख्या आपत्तीत सावरणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.

जेथे माणूस मेला तर प्रेत उचलून घेऊन जाण्यासाठी चार माणसे नीट चालू शकत नाहीत, आग विझवण्यासाठी जेथे अग्निशमनच्या गाड्या पोहचू शकत नाही, जेथे श्वास घ्यायलाही जागा नाही, पुरेसा प्रकाश नाही, एका झोपडीवर चार झोपड्या चढवून एका झोपडीत आठ दहा माणसे गुरे कोंबल्यासारखी राहणार असतील तर अशा वस्त्यांमधून करोनाला आळा घालणे हे सोपे काम नाही. खरेतर केंद्राने तातडीने सर्वात आधी मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. पण, त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून देणार असाल तर मग भाजप भक्तांचा उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासाठी जीव कासावीस का होतो? फडणवीस सरकार असते तर आज आहे त्यापेक्षा मोठा उजेड नक्की पाडला नसता. फरक इतका असता की उद्धव ठाकरे सरकार मदतीसाठी याचना करत असताना फडणवीस सरकारला केंद्राने तातडीने मदत केली असती… करोनाचे संकट हे राजकारण करण्याचे नाही, हे बोलणे सोपे आहे, पण ते भाजपच्या नेत्यांना आणि भक्तांना पचले तर पाहिजे.

- Advertisement -

भारत हा देशच मुळी रामभरोसे हिंदू हॉटेल आहे, असे कायम वाटत आलेले आहे. कारण कोणाचा पायपोस कोणाला नाही. प्रचंड लोकसंख्या, अपुर्‍या सोयीसुविधा, ठोस रोजगाराचा अभाव, बेभरवशाची शेती आणि त्यावर अवलंबून असणारी अनेक तोंडे अशा परिस्थितीत संशोधन आणि आरोग्य या गोष्टी दुय्यम ठरतात. साथीच्या आजारात माणसे हकनाक मरतात. त्यांच्या हाका ना बोंब अशी परिस्थिती असताना करोनासारखा भयानक आजार माणसे अक्षरशः गिळत असताना त्याला रोखणे कठीण नाही तर महाकठीण काम आहे. जेथे अमेरिका आणि युरोपियन देशांचा या आजाराला रोखताना जीव मेटाकुटीला आला आहे तेथे भारताची परिस्थिती बरी म्हणायची वेळ आली आहे. कारण ज्या देशात अजून मोठ्या लोकसंख्येला दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत आहे तेथे तो तोंडावर न चुकता मास्क लावेल, वेळोवेळी साबणाने हात धुवेल, हे म्हणजे दात कोरून पोट भरल्यासारखे आहे. मात्र, जगण्याची चिवट वृत्ती, उपजत अशी प्रतिकारशक्ती आणि रामभरोसे जीवन असा त्रिवेणी खेळ गरीब सरीबाला जगवत आहे, असे वाटते. ज्या वेगाने अमेरिका आणि स्पेनमध्ये करोनामुळे माणसे मेली आहेत तो वेग पाहता भारत वाचला कसा, हा जेव्हा विचार येतो तेव्हा जीवाची घालमेल होते. देशात टाळेबंदी असताना हातावर पोट असणारे जीवाच्या आकांताने ओरडत असताना त्यांना धीर देण्याऐवजी भाजप भक्तांना यावेळी ठाकरे यांच्यापेक्षा फडणवीस सरकार असते तर मोठा उजेड पडला असता असा भास होत असेल तर ते उलट्या काळजाचे आहेत, असेच म्हणावे लागेल.

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टींपुढे आजही आपल्या देशात आरोग्य हे दुय्यम समजले जाते. माणसे जगली काय आणि मेली काय, याचा जेथे विचार होत नाही तेथे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुरेशा सोयीसुविधा तसेच डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी दिले जात नाहीत, तेथे एका महिन्यात करोनासारख्या संकटाचा मुकाबला करणे मोठे कठीण काम आहे. आज सर्व महापालिका आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण असून तेथील डॉक्टर आणि नर्स मोठ्या ताकदीने काम करत आहेत. महापालिका आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रणा पुरवल्या तर खासगी आणि हायटेक हॉस्पिटलनाही सरकारी दवाखाने मागे टाकू शकतील, कारण तेथील निष्णात डॉक्टर, सेवाभावी नर्स यांचे मोठे योगदान होय. आजही जेजे आणि केईएममध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोक उपचाराला येतात आणि अगदी कमी पैशात ते बरे होऊन आपल्या गावाला जातात तेव्हा या सरकारी सेवेचे महत्त्व लक्षात येते. खाजगी हॉस्पिटलप्रमाणे त्यांच्या कामाचीही कधी प्रसिद्धी होत नाही. मात्र, एखादी चूक झाली की, त्यांना ठोकून काढायचे काम मात्र केले जाते. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांचे राजकीय पाठीराखे यांना कसलेच धरबंद राहत नाही. परिस्थितीचे भान उरत नाही, तसाच भाजप भक्तांचा प्रकार आहे.

ठाकरे सरकार सत्तेत येऊन आज चारेक महिनेही झालेले नाहीत आणि करोनाचे संकट उभे राहिले. फडणवीस सरकारच्या काळात होत्या तेवढ्याच आरोग्य व्यवस्था ठाकरे सरकारच्या काळात आहेत. काम करणारी माणसेही तितकीच आहेत, यामुळे चमत्कार झाल्यासारखे काम कसे होणार? उलट आहे त्या माणसांनी खूप चांगले काम केले आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी मरण पावणार्‍यांचा आकडा भयानक नाही. उलट, रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी जात आहेत. अशा बरे होऊन घरी परत येणार्‍यांचे परिसरात टाळ्या वाजवून स्वागत केले जात आहे. आज भारतात 97 टक्के करोना रुग्ण बरे होत असून मृत्यूचे प्रमाण फक्त 3 टक्के आहे. त्यात महाराष्ट्रही येतो. मरण पावणारे 3 टक्के रुग्ण हे बरेचसे कोणत्या तरी आजाराने आधीच ग्रस्त असलेले आहेत किंवा वृद्ध आहेत किंवा एकदम प्रतिकारशक्ती कमी असलेले आहेत. अशावेळी भाजप भक्तांनी तारतम्य बाळगायला हवे. टीका करण्याची ही वेळ नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या भक्तांचा वेळ जात नसेल त्यांनी या काळात जरा तोंडाला मास्क लावून, हातमोजे घालून महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन यावे, मग खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल. राजकारण करायला पुढची साडे चार वर्षे अजून बाकी आहेत. कारण तोपर्यंत ठाकरे सरकार काही सत्तेवरून जात नाही. कारण भाजप भक्तांची जेवढी संख्या उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागत आहे, त्यापेक्षा जास्त संख्येने उद्धव ठाकरे हे चांगले काम करत आहेत, असे सांगणारे आहेत.

मागील लेख
पुढील लेख
Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -