घरफिचर्सभेटी लागी जीवा....

भेटी लागी जीवा….

Subscribe

पंढरपूरची आषाढवारी म्हणजे वारकर्‍यांना वर्षानुवर्षे लागलेली सवय आहे. ज्येष्ठ व आषाढ महिन्यात पायी वारीशिवाय आणखी काही वेगळे सुख असते याची ते कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र, यंदा करोना विषाणू वैश्विक महामारीमुळे पंढरपूरचा आषाढी सोहळाही अगदी मर्यादित प्रमाणात होणार असून राज्यातील सर्व संतांच्या पालख्या यावर्षी काढण्यात आल्या नाहीत. तसेच दिंड्यांनाही परवानगी दिली नाही. एवढेच नाही तर आषाढ शुद्ध एकादशीस पंढरपूरमध्ये परवानगीशिवाय कुणालाही येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे आषाढवारी करणार्‍या वारकर्‍यांच्या मनाची स्थिती काय असेल याची कल्पना करण्यासाठी आपल्याला संत तुकाराम महाराज यांच्या 36 अभंगांचा आधार घेता येऊ शकतो.

वारकरी हरिपाठ असो, कीर्तन असो वा काकडा असो, प्रत्येक वेळी पांडुरंगाकडे पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, अशी विनवणी करीत असतो. वारी म्हणजे वारकर्‍याचे पॉवर हाउस (शक्तीकेंद्र) आहे. वर्षभर आपल्या कामाच्या व्यवधानातून काही वेळ काढून तो पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतो. वाटेत ऊन, वारा, पाऊस यांची त्याला तमा नसते. चंद्रभागेच्या तिरावर 28 युगांपासून भक्तांची वाट पाहत कमरेवर हात ठेवून उभा असलेल्या या विठूरायाच्या दर्शनाने तो कृतकृत्य होतो आणि वर्षभर त्याचे दु:ख, कष्ट झेलण्यासाठी शक्ती घेऊन परतत असतो. वारकरी पंढरपूरला त्यांचे माहेर म्हणतात. संत एकनाथांनीही त्यांच्या माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, या अभंगातून माहेराच्या नातेवाईकांची यादीच सादर केली आहे. सासूरवाशीन स्त्री आयुष्यभर सासरी नांदत असते, पण तेथे तिला कष्ट, दु:ख, वेदना, विरह सहन करण्याची ताकद माहेरहून मिळत असते. त्याचप्रमाणे वारकरी रोजच्या जगण्याच्या धबडग्यात संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्या आषाढवारीतून मिळवत असतो. त्यामुळेच तो नित्योपचार करताना पांडुरंगाला माझी वारी कधीही चुकवू देऊ नकोस ही विनंती करीत असतो.

वर्षभर दररोज किमान दोनवेळा हा अभंग म्हणणार्‍या वारकर्‍याची वारी करोना वैश्विक महामारीच्या कारणामुळे चुकणार आहे. यंदा पायी वारीवर बंदी घालून राज्य सरकारने महाराष्ट्रातील नऊ संतांच्या पालख्या आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे 30 जून रोजी पंढरपूर येथे वाहनाद्वारे आणण्यास परवानगी दिली आहे. यामुळे या प्रमुख संतांच्या समाधी मंदिर देवस्थानचे विश्वस्त व काही निवडक वारकर्‍यांच्या उपस्थितीत यंदाचा आषाढवारीचा सोहळा होणार आहे. करोना महामारीमुळे हा सोहळा मर्यादित प्रमाणात होणार आहे व त्याला कुणा वारकर्‍याचा आक्षेपही नाही. मात्र, यावर्षी रद्द करण्यात आलेल्या या आषाढवारीमुळे वारकर्‍यांच्या भावना काय असतील त्या संत तुकाराम महाराज यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला पाठवलेल्या पत्रातील अभंगांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. या अभंगांमधून आपण युगानुयुगे कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत असलेला श्री विठ्ठल व त्याच्या भक्तांमधील नाते उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- Advertisement -

जगभरात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वेगळेपण असणारी आषाढीवारी म्हणजे जगभरातील श्रद्धाळू आणि जिज्ञासूंसाठी एक कुतूहल आहे. आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी किमान महिनाभर आधी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व रस्ते जणू पंढरपूरच्या दिशेनेच जातात, असा भास व्हावा, अशी परिस्थिती असते. हा काळ नेमका महाराष्टृात नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या आगमनाचा असतो. त्यामुळे वादळी पाऊस, ऊन, वारा यांची तमा न बाळगता टाळ चिपळ्याच्या साथीने आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीसाठी मजल दरमजल करीत जात असतात. वारकर्‍यांच्या या भावनेचे वर्णन करताना संत तुकाराम, भेटी लागी जिवा लागलीसे आस, या अभंगातून सार्थ वर्णन करीत असतात. दिवाळ सणासाठी माहेरहून येणार्‍या मुळासाठी सासुरवाशीन आसुसलेली असते, किंवा चंद्रप्रकाश मिळवण्यासाठी चकोराचे मन वेडे झालेले असते, त्याप्रमाणे वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी आसुसलेला असतो.

पंढरपूरची आषाढवारी म्हणजे वारकर्‍यांना वर्षानुवर्षे लागलेली सवय आहे. ज्येष्ठ व आषाढ महिन्यात पायी वारीशिवाय आणखी काही वेगळे सुख असते याची ते कल्पनाही करू शकत नाहीत. मात्र, यंदा करोना विषाणू वैश्विक महामारीमुळे पंढरपूरचा आषाढी सोहळाही अगदी मर्यादित प्रमाणात होणार असून राज्यातील सर्व संतांच्या पालख्या यावर्षी काढण्यात आल्या नाहीत. तसेच दिंड्यांनाही परवानगी दिली नाही. एवढेच नाही तर आषाढ शुद्ध एकादशीस पंढरपूरमध्ये परवानगीशिवाय कुणालाही येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षे आषाढवारी करणार्‍या वारकर्‍यांच्या मनाची स्थिती काय असेल याची कल्पना करण्यासाठी आपल्याला संत तुकाराम महाराज यांच्या 36 अभंगांचा आधार घेता येऊ शकतो. तसे संत तुकाराम महाराज यांचे सर्वच अभंग देव आणि भक्त यांच्यातील नाते उलगडून दाखवणारे आहेत. तसेच त्यांचे अभंग म्हणजे त्यांच्या अनुभवाचे रोकडे बोल आहेत. मात्र, संत तुकाराम गाथेमध्ये स्वामींनी पंढरीनाथास पंढरपूरला पाठवलेले पत्र म्हणून लिहिलेले 36 अभंग म्हणजे देव आणि भक्तामधील नात्यांची उकल समजावून सांगणारे मनोगत आहे. या अभंगांमधून संत तुकाराम महाराज यांची पंढरपूरच्या वारीविषयी असलेली ओढ, श्री विठ्ठलाप्रति असलेली भक्ती आणि या देवाकडे वारीसाठी बोलावण्यासाठीची आर्तता आपल्याला दिसून येते.

- Advertisement -

संत तुकाराम महाराज यांना एकदा वारीला जाणे जमले नाही. त्यामुळे त्यांनी देवासाठी 36 अभंगांचे पत्र इतर वारकर्‍यांसोबत दिले आहे. या पत्रातील अभंग समजून घेतान पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांमधील नाते समजणे फार महत्वाचे आहे. पंढरपूर येथे भक्तांचे माहेेर आहे. या माहेराची प्रत्येक भक्ताला माहेरवाशिनीसारखी जिवापाड ओढ लागलेली असते. माहेरवाशिनीला माहेराची कितीही ओढ असली तरी मूळ आल्याशिवाय ती कधीही जात नाही. तसेच वारकर्‍यांना पांडुरंगाच्या दर्शनाची कितीही ओढ असली तरी त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी पांडुरंगाने बोलवावे लागते, असे हे या दोघांमधील एक जगावेगळे नाते आहे. असेच एकदा काही कारणावश पांडुरंगाने मूळ न लावल्यानेच आपल्याला नेमके वारीला जाता येणार नाही, यामुळे व्यथित झालेल्या तुकोबांनी पांडुरंगासाठी 36 अभंग लिहिले. त्या अभगांमध्ये देव आणि भक्तामधील नात्याचे अनेक पदर आपणास बघारला मिळतात. देवावरील भक्ताचा हक्क, त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य असलेला परमेश्वर आपल्याला का अंतर देत असेल याबाबत केलेले आत्मावलोकन या सर्वांचीच उकल या अभगांमधून तुकोबांनी केली आहे.

एवढेच नाही तर श्री विठ्ठल आणि त्याचे भक्त यांच्यातील एक वेगळे नाते या अभगांमधून समोर आले आहे. तुकोबांनी पाठवलेल्या पत्रातील सुरुवातीच्या अभंगामध्ये ते मी कुणाकडून तर अशी बातमी ऐकण्यासाठी आतुर झालो आहे की, पंढरीनाथाने तुला बोलावले आहे. एकदा तो निरोप ऐकला की मी सरळ पंढरीची वाट धरणार आहे. मी पंढरपूरला जाण्यासाठी प्रचंड आतूर झालेलो आहे, पण देवा मला पंढरपूरला बोलावण्यासाठी कधी मूळ पाठवतो हे पाहण्यासाठी माझ्या डोळ्यांना ओढ लागली आहे. कारण त्यानंतरच पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभणार आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम देवाच्या मुळाची वाट पाहत आहेत, म्हणजेच स्वाभिमानी सासुरवाशिनीप्रमाणे मूळ आल्याशिवाय जाणार नाही, हा बाणा ठेवून पांडुरंगाला मूळ पाठवण्याची विनवणी करीत आहेत. हे करतानाच हे माझ्या मायबापा तुला मूळ पाठवण्याचा विसर का पडला, असा प्रश्नही ते विचारतात. माझ्यावरची तुझी कृपा कोणत्या कारणाने कमी झाली, अशीही विचारणा करतात. त्याचबरोबर माझ्यातील काही गुणदोष तुला आवडले नाहीत, म्हणून तू मला अंतर देत आहेस का? माझे काही चुकले असेल तर ते माझ्या मनाला समजल्यास बरे वाटेल. तू मला का अव्हेरले आहे, याचे कारण कळवण्याचीही ते विनंती करीत आहेत. देवाने आपल्याला अंतर दिल्याचे समजल्यानेच अव्हेरण्याचे कारण कळावे म्हणून हे अभंग लिहून पाठवत आहे. देवा मी थोडा रागावत आहे, कारण त्यानिमित्ताने तरी तू मला उत्तर देशील या आशेने मी प्रश्न विचारत आहे.

देवा तुला अनेक पोरं आहेत, पण मला तू सोडून दुसरे कुठलेही माहेर नाही, यामुळे देवा मला अंतर देऊ नकोस, असे तुकोबा विनवत आहेत. देवाला अशी मूळ का पाठवले नाही, अशी अगदी आर्ततेने विनवणी करतानाच त्याला पाठवण्याचा धीटपणा केवळ तुझ्याप्रेमापोटीच केल्याचेही ते सांगतात. यासाठी ते म्हणतात, देवा तुझे व्यापकपण, अस्तित्व आणि स्वरूप याविषयी वेदांनाही काही सांगता आले नाही, तेथे माझी मती मला माहीत असल्याने मी पामर तुला काय ओळखू शकणार आहे, असे विनम्रतेने सांगतात. याच कारणामुळे मी तुझ्या पायाशी सलगी करून तुझ्या विटेवरील पावलांवर मस्तक ठेवल्याचे सांगतात. तुकोबा या पत्रांमधून पांडुरंगाची स्तुती करतात, त्याच्याविषयीचे आपले प्रेम व्यक्त करतात, पण त्याचवेळी देवाने मूळ का पाठवले नाही, या प्रश्नाचा पाठपुरावा सोडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली चीडही तितक्याच बिनदिक्कतपणे व्यक्त करतात. ते विचारतात, देवा तुला आम्हा भक्तांविषयी एवढाच संकोच वाटत असेल, तर आम्हाला व्यालाच का? तूच आम्हाला विसरला असशील तर आम्ही तोंड घेऊन कुणाकडे जावे? तूच जर मला मोकलले तर कुणाकडे जाऊ, असे प्रश्न विचारतानाच देवा तू सोडून माझे जिवाचे जीवलग असे कोण आहे की ते संकटातून माझी सोडवणूक करील. माझ्या चित्तात काय आहे, याची तुला जाणीव आहे.

यामुळे कुठलाही संकोच न बाळगात, आढेवेढे न घेता देवा मला तुजी भेट घडू दे. देवा आम्ही तुझी बालके असल्याने आम्हाला तुझी खूप खंत वाटत आहे. कारण देवा तुझा नुसता मुळाचा निरोप आला तरी शिणभाग हटून जातो आणि तुझे रूप बघताच इंद्रियांची विषयाकडील धाव कुंठीत होऊन चित्त समाधानाने भरून पावते. एकीकडे देवाने मूळ धाडले नाही म्हणून त्याला खडे बोल सुनावायचे आणि दुसरीकडे देवाने विन्मुख केल्याने त्याच्याकडे आर्ततेने मूळ धाडण्याची विनवणीही करायची असे हे देवासोबतचे नाते त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होत असतानाच ते देवाने मूळ का धाडले नसेल, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना असे वाटते की, देवा तुझ्या दर्शनाची मी वासना धरली आहे, पण त्या वासनेला अद्याप फळ मिळाले नाही. कदाचित तुझ्या दर्शनाची प्राप्ती होण्याचा काळ अद्याप आला नसेल, असे सांगून ते स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. याबरोबरच आपल्या जीवाचा जीवलग असलेला पांडुरंग यावर्षी आपल्याला पंढरपूरला बोलावत नाही, याचा अर्थ आपल्या काही चुका झाल्या असाव्यात का, याचाही ते विचार करू लागतात आणि त्याचवेळी ते देवालाही दुषणे देतात. या ठिकाणी ते देव आणि भक्तामधील पिता आणि अपत्य यांच्यातील नाते संबंधाच्या नजरेतून मांडणी करतात. ते म्हणतात देवा तू अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा आहेस.

क्षणभरही तू विश्रांती घेत नाहीस. एवढ्या मोठ्या काळात तू किती मापे दिली घेतली आहेस. म्हणजे किती मोठा व्यवहार केला असेल, असा प्रश्न विचारतात. देवा या व्यवहारातून तू कोणासाठी हे धन जोडत आहेस, असा प्रश्नही ते विचारतात. म्हणजे कुणीही व्यक्ती संपत्ती जमा करतो तेव्हा ती आपल्या मुलाबाळांसाठीच करत असतो. त्याचा संदर्भ देत संत तुकोबा म्हणतात, देवा तू एवढा संपन्न, श्रीमंत आहेस, पण तुझी पोरेच जर उपाशी असतील ते काय कामाचे? हे धन तू कोणाला देणार आहेस? आम्हाला म्हणजे भक्तांना असे तळमळत ठेवल्याने तुझे वाटोळे होईल, अशा कठोर शब्दात तुकोबा देवाला श्राप देतात. देवाने मूळ न लावल्याने चिडलेले तुकोबा एवढ्यावरच थांबत नाहीत, तर देवा तू माझी आस बुडवली तर त्याचे संपूर्ण कूळ बुडवण्याची धमकी देतात. देवाला दुषणे देणे सुरू ठेवताना ते देवाला भावनिकदृष्ठ्याही गुंतवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, देवा आम्ही म्हणजे श्रीमंताच्या घरी जन्माला आलेली करंटी पोरे आहोत, असे जगजाहीर झाल्यानंतर तुझ्याच नामाची फजिती होणार आहे. येथे आम्हाला खायला नाही आणि तूही मूळ पाठवत नाहीस, यामुळे आम्ही जीवंतपणीच मेलो असल्याची भावना ते व्यक्त करतात.

या अभंगांमधून संत तुकाराम महाराज यांच्या मनाची देवाच्या भेटीसाठी झालेली तगमग दिसून येत आहे. ते कधी चिडतात, कधी देवाची स्तुती करतात, कधी प्रेमाने हक्क सांगतात तर कधी स्वत:च्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनाच्या या अस्थिर अवस्थेची त्यांना जाणीव असल्यानेच ते म्हणतात, देवा तुझे मूळ न आल्याने माझी बुद्धी स्थिर कशी राहणार? मी मनाला आवरू शकत नाही, यामुळे माझी अशी दशा झाल्याचीही ते प्रांजळपणे कबुली देतात. आणि देवाला सांगतात या वारकर्‍यांकडे माझे पत्र देत आहे. ते तुझ्याकडून काय निरोप घेऊन येतात, त्याचीच मी आस ठेवून असून तुझ्याकडून जो काही निरोप येईल त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. वारकर्‍यांच्या हातात 36 अभंगांचे पत्र दिल्यानंतर ते वारकर्‍यांना सांगतात, संतमंडळी पांडुरंगाच्या महाद्वारात पायाखालील पायरी म्हणजे मी आहे. देवाला माझा दंडवत सांगा. बाळाला उचलून घेतले नाही तर ते लोळण घेते, अशी माझी अवस्था झाली आहे. यामुळे संतजनानो माझ्या वतीने देवाला विनवणी करा की देवा या तुकोबाकडून काय चूक घडली आहे की त्यामुळे तू त्याला अंतर दिले आहेस. माझ्या वतीने देवाकडे अगदी काकुळतीला येऊन करूणा भाका कारण देवाने अंतर दिल्याने मी पंढरी व विटेवरील ते चरण बघू शकत नाही.

देवाने माझ्यावर कृपा केल्यानंतर ती धावत पंढरपूरला जाईन. लहान बाळ जसे आईकडे धाव घेऊन स्तनपान करते तसे हरीला पाहून माझ्या सर्व दु:खाचे निवारण होणार आहे. त्यामुळे देवा या संतांजवळ माझ्यासाठी उत्तर पाठव. तू कृपावंत झाल्यानंतर या जगात कशाची कमतरता पडणार आहे? देवा मी आणखी किती शोक करू. शोक केल्याने दु:ख आणखी वाढत जाते. तुला माहीत आहे काय करायचे ते त्यामुळे माझे पुण्य कदाचित आटले असेल. पण आता माझ्याकडे केवळ तळमळ उरली आहे. देवा आता तू मला अंतर दिले असले तरी दुरुनच मला आशीर्वाद दे व तेथूनच माझी बाळे कशी आहेत, एवढी विचारपूस केली तरी माझी लाज राखल्यासारखे होईल, असेही कळवळ्याने ते पांडुरंगाला सांगतात. त्याचवेळी ते देवाला म्हणतात, देवा आता तुला शेवटची गोष्ट सांगतो. या संतांजवळ तू जे उत्तर देशील ते मी मान्य करीन. माझ्याकडून जाणते-अजाणतेपणाने जे काही शब्द उच्चारले गेले असतील ते माझी माय म्हणून पांडुरंगा तू मला क्षमा कर.

पांडुरंगाने पंढरपूरला येण्यासाठी मूळ न पाठवल्यामुळे दु:खी आणि व्यथित झालेल्या तुकोबांचे हे अभंग म्हणजे भावनाविवश झालेल्या मनाची उत्कट अवस्था आहे. भक्तीच्या उच्चतम पातळीवर पोहोचलेल्या भक्ताचे आणि देवाचे ते नाते आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञान, कर्म आणि भक्ती ही तीन प्रमुख साधने सांगितले आहेत. त्यातील परमेश्वर प्राप्तीचा भक्ती हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. अर्थात तो सरळ आणि सोपा आहे, म्हणजे तो योगमार्गापेक्षा सोपा आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भक्तीच्या मार्गावरून चालताना लहानगे मूल जसे आईच्या कडेवर असल्यानंतर त्याला कुठल्याही संकटातही ते आनंदाने वावरत असते. तसेच देवाचे आणि भक्ताचे नाते आहे. हे नाते संत तुकाराम महाराज यांनी उलगडून दाखवतानाच पंढरपूरच्या वारीविषयी पांडुरंगाच्या भक्तांमधील ओढही त्यातून दिसून येते. या पत्रानंतर त्यांच्या मनाची तगमग तेथेच थांबत नाही. त्यांच्या या मनातील ही आर्त भावना ते पुढील काही अभंगांमधून व्यक्त करतात.

त्यात पंढरपूरला गेलेले वारकरी तेथे काय करीत असतील. त्यांना माझे पत्र देवाकडे सोपवण्याचा विसर तर पडला नसेल ना,आता ते वारकरी परतत असतील अशा पद्धतीच्या कल्पना करीत त्यांनी अभंगांंमधून मांडल्या आहेत. म्हणजे काही कारणामुळे म्हणजे देवाचे बोलावणे न आल्यामुळे वारीला न जाऊ शकणारा वारकरी देहाने त्याच्या घरी असतो पण मनाने तो पंढरपूरमध्ये असतो. कधी तो चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतो. महाद्वारी जाऊन पायरीवर दर्शन घेतो. गरूड खांबाजवळ कान धरून माफी मागतो आणि निर्गुण निराकार परमेश्वराच्या सगुण साकार श्री विठ्ठलाचे दर्शन घेत असतो. त्या पद्धतीने वारकर्‍यांजवळ हे अभंगांचे पत्र दिल्यानंतर संत तुकाराम त्यांच्या मनाची तळमळ व्यक्त करणारे आणखी काही अभंग लिहितात. त्यात ते म्हणतात, माझ्या माहेरून माझ्यासाठी काय निरोप येणार आहे, या विचाराने मला झोप येत नाही. कदाचित या वारकर्‍यांना देवाकडे पत्र देण्याचा विसर तर पडणार नाही ना, तेथे म्हणजे मंदिरात प्रचंड गर्दी होईल, त्या गर्दीत कोणाला माझी आठवण येणार, या विचारानेही त्यांना काळजी वाटत आहे. त्याचवेळी ते मनाची समजूतही घालण्याचा प्रयत्न करतात की, देव हा कृपेचा सागर असून तो मला अंतर पडू देणार नाही.

तो सांगितल्याशिवायही अंतरीचे गूज जाणत असतो, अशी त्याची किर्ती अनेकांकडून ऐकली असून त्याच्यावर माझा विश्वास असल्याचेही ते मनाला बजावतात. आता संत तुकाराम सतत पंढरपूरला गेलेल्या त्या वारकर्‍यांचाच विचार करीत असतात. ते आता मंदिरात गेले असतील. गरूड खांबाजवळ उभे असतील. देवाचे दर्शन घेतले असेल. आता पंढरपूरहून निघाले असतील. मागे फिरून फिरून मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत असतील. सगळेच वारकरी माघारी फिरल्याने वियोग होणार म्हणून एकमेकांच्या गळाभेटी घेत असतील. आता पंढरपूर सोडून वारकरी रस्त्याला लागले असतील. पंढरपूरमधील या सोहळ्याच्या आठवणी एकमेकांना सांगून ते परतत असतील. त्यामुळे ते येताच पहिल्यांदा मी त्यांना आलिंगन देऊन त्यांचे क्षेम कुशल विरारेन. त्यानंतर पंढरपूरच्या माझ्या मायबापांचे क्षेम विचारेन. माझ्या सुख दु:खाची गोष्ट मी मध्येच न घालता त्यांच्याकडून मी पंढरपूरमधील त्यांचे अनुभव ऐकेन.

हे वारकरीच माझ्या मनाची तगमग जाणून घेऊन मला देवाचा निरोप सांगतील. मी या संतांच्या चरणावर माथा ठेवून मी माझा जीव त्यांच्यावर ओवाळून टाकेल. त्यामुळे संत तुकाराम महाराज वारकरी आल्यानंतर ते काय निरोप सांगतील याचा विचार करतानाच ते असाही विचार करतात की या संतांनी माझी बोबडे बोल अधिक विस्ताराने व चांगल्या शब्दात म्हणजे शृंगारून देवाला सांगितले असतील. त्यामुळे या संतांचे बोल ऐकून कदाचित देवाने या संत मंडळीसोबतच मुर्‍हाळीही पाठवला असेल. वारकरी आल्यानंतर ते काय म्हणतील, काय सांगतील याबाबत अनेक कल्पना करून ते हे संतमंडळी गावी येतील तेव्हा त्यांची भेट कशी घ्यायची याचेही विवेचन करतात. ते संतमंडळी गावी येण्याची वेळ समीप आली तसतसे तुकोबांच्या मनाची हुरहुर वाढत चालली आहे. अखेर ती संत मंडळी भेटली आणि त्यांनी माहेरून आणलेला निरोप तुकोबांना दिला. त्या नंतर संत तुकाराम लिहितात

आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार त्या भाग्यासी नाही आता ॥1॥
काय सांगो सुख जाले आलिंगन । निवाले दर्शन कांति माझी॥2॥
तुका म्हणे यांच्या उपकारासाठी । नाही माझे गाठी काही एक॥3॥

संत तुकाराम महाराजांना माहेरहून आलेल्या निरोपानंतर त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी त्यासाठी त्या वारकरी संचांचे आभार मानले तसेच पंढरपूरला जाण्यासाठी त्यांनी देवाला दोन्ही हात जोडून देवाला विनवणी करून माहेराची वाट धरीन असे आनंदाने जाहीर केले.

वर्षानुवर्षे वारी करणार्‍या वारकर्‍यांच्या मनाचीही अशीच तगमग झालेली असेल. ती तगमग आपण संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमधून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदा वारीला जायला मिळाले नाही, यावर्षी पंढरीनाथाला डोळाभरून पाहण्याचे भाग्य मिळाले नाही, विटेवरील समचरणांवर माथा ठेवता आला नाही, याला कारणही आपणच असावे. या माध्यमातून पांडुरंग परमात्मा आपल्याला काही बदल करण्याचे संकेत देत आहे. जीवनातील तीव्र स्पर्धा कमी करून शाश्वत जीवमूल्यांचा अंगिकार करण्याबाबत आपण सर्वांनीच आत्मचिंतन करावे, प्रगती, विकास करताना निसर्गाची हानी होणार नाही, मानवी मूल्यांचा बळी जाणार नाही, भूतदयेचा विचार मागे पडणार नाही, याची काळजी घेऊन जगल्यास जीवन अधिक सुसह्य होईल आणि आपल्याला हव्या असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल, असाच संदेश पांडुरंगाला द्यायचा असेल, या पद्धतीने विचारमंथन, आत्मचिंतन झाल्यास तो सच्चिदानंद निश्चित भेट देईल आणि मोक्ष हा मृत्यूनंतर नाही तर आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सामावलेला आहे, याचा बोध झाल्याशिवाय राहणार नाही, असेच तुकोबांना आपल्याला सांगायचे असावे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -