घरफिचर्सऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा

ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा

Subscribe

शहरातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊन पुढे जातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यापासून वंचित राहिल्यास शिक्षणाच्या प्रवाहात ग्रामीण व शहरी अशी मोठी दरी निर्माण होऊ शकते. लाखो रुपये घेणार्‍या शहरातील शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास अनुकूल असतील. परंतु, ग्रामीण भागात अशी परिस्थिती मुळीच नाही. येथील पालक व विद्यार्थ्यांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. शिक्षणाचे महत्व सर्वांनाच ज्ञात आहे. त्याविषयी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. पण, सर्वांना एकाच चष्म्यातून बघणे उचित ठरणारे नाही. ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरला जात असल्याने शिक्षकांनी आपल्या शाळेतील वर्गातच शिकवत असल्याचा व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. पण अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना रेंजमध्ये येण्यासाठी डोंगरावर चढावे लागते.

शाळा, फळा आणि शिक्षक ही संकल्पनाच कालबाह्य ठरवत करोनाने सर्वांना ऑनलाईन या एकाच व्यासपीठावर उभे केले आहे. मार्च महिन्यात देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढला म्हणून लॉकडाऊनची घोषणा झाली आणि पुढे त्याची मर्यादा वाढवणे अपरिहार्य ठरले. पहिल्या, दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊनपर्यंत शाळा किंवा शिक्षणाचा प्रश्न फारसा चर्चेत आला नाही. परंतु, जून महिना उजाडला अन् प्रत्येक पालकाला मुलांच्या शिक्षणाची आणि पर्यायाने भविष्याची चिंता वाटू लागली. पालकांची चिंता वाटणे स्वाभाविक वाटत असली तरी शाळेत जावून प्रत्यक्ष शिक्षण घेणे अशक्य बनले आहे. परंतु, याच काळात त्याला पूरक असलेल्या ऑनलाईनचा पर्याय सर्वात पुढे आला. यात अमेरिकन कंपनीचे झूम, गुगल मीट यांसारखे अ‍ॅप्लिकेशन वापरले जात आहेत. प्रारंभी काही दिवसांसाठी हे शिक्षण असेल म्हणून त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले गेले नाही. शहरातील निवडक शाळांनीच याला सक्षम पर्याय संबोधले आणि त्याचा सातत्याने वापर केला. परंतु, करोना रुग्णांची स्थिती बघता शाळा सुरु करणे अशक्य वाटू लागल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ऑनलाईन शिक्षणाला पूरक अशी भूमिका जाहीर केली.

विशेष म्हणजे त्यांनी शिक्षणाविषयी अत्यंत लवचिक भूमिका घेत स्थानिक व्यवस्थापन समितीच्या हाती सर्व निर्णय सोपवला. त्यामुळे गावात, शहरात शाळा सुरु करायची की नाही याची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकारी व तेथील शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली. परंतु,राज्यातील करोना रुग्णांचा आकडा आपण जर लक्षात घेतला तर प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यास अजून बराच अवधी लागणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा आग्रह संस्था चालकांनी लावून धरला. त्यामुळे इंग्रजी, मराठी, हिंदी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवले. ऑनलाईन शिक्षण हे शहरी भागात शक्य असले तरी त्यासाठी पालकांना अगोदर खर्च सहन करावा लागतो. कोणताही अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल घ्यायचा म्हटले तर किमान सात ते 10 हजार रुपये आणि इंटरनेट कनेक्शन घ्यावेच लागणार. त्याच्या दुष्परिणांमाकडे सध्या दुर्लक्षच करावे लागणार आहे. टीव्हीचा शोध लागला आणि तो घराघरांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे दुष्परिणाम कालांतराने समोर आले.

- Advertisement -

काळासोबत टेक्नॉलॉजी बदलत गेली व मुलांसमोरील आव्हाने त्या स्वरुपात बदलत आहेत. टीव्हीनंतर व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर गेमच्या रुपाने टेक्नॉलॉजीने विद्यार्थ्यांना विळख्यात घेतले. आता पालकांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा. कारण एका क्षणात विद्यार्थ्यांना वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची किमया या यंत्रात सामावली आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढवत होते. मुले शाळेत जात असल्यामुळे तेवढा वेळ त्यांना या आभासी जगापासून दूर ठेवत होते. परंतु, आता ऑनलाईन शिक्षण सुरु केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल द्यावाच लागतो. त्याच्यासोबत पालकांनाही बसावे लागते. विद्यार्थी बराच वेळ ऑनलाईन असल्यामुळे त्या लेक्चर दरम्यान येणार्‍या ‘पॉर्न व्हिडीओ’च्या लिंक्सवर क्लिक झाले तर मुले वेगळ्याच भावविश्वात निघून जातात. ‘अशा’ वेबसाईटचा प्रसार करण्यासाठी खूप मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याची या विद्यार्थ्यांना कल्पनाही नसते आणि बघणारी व्यक्ती ही अल्पवयीन आहे, याचेही भान ही यंत्रणा ठेवत नाही. त्यामुळे अनेक किशोरवयीन मुले या काळात भरकटल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

मानोविकार तज्ज्ञांची मदतही अनेक पालकांनी घेतली. केटीएचएमसारख्या महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाने तर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्रच सुरू केले होते. विद्यार्थी व पालकांसाठी त्यांनी मोबाईलद्वारे मार्गदर्शन केले. ऑनलाईन शिक्षणाचे हे तोटेच म्हणावे लागतील. याशिवाय ज्या भागात आजही वीज पोहोचलेली नाही, मोबाईलला रेंज मिळत नसेल अशा दुर्गम भागात ऑनलाईन शिक्षण पोहोचवणार कसे? विशेष म्हणजे आजही असंख्य लोकांना दोन वेळ जेवणाची चिंता आहे. रेशनच्या धान्यावर घर चालते. या घरांतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाचे ओझेही जड जाते. तेथे हे ऑनलाईन शिक्षण कसे पेलवणार? हाच प्रश्न आहे.

- Advertisement -

शहरातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊन पुढे जातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यापासून वंचित राहिल्यास शिक्षणाच्या प्रवाहात ग्रामीण व शहरी अशी मोठी दरी निर्माण होऊ शकते. लाखो रुपये घेणार्‍या शहरातील शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास अनुकूल असतील. परंतु, ग्रामीण भागात अशी परिस्थिती मुळीच नाही. येथील पालक व विद्यार्थ्यांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. शिक्षणाचे महत्व सर्वांनाच ज्ञात आहे. त्याविषयी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. पण, सर्वांना एकाच चष्म्यातून बघणे उचित ठरणारे नाही. ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरला जात असल्याने शिक्षकांनी आपल्या शाळेतील वर्गातच शिकवत असल्याचा व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. पण अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना रेंजमध्ये येण्यासाठी डोंगरावर चढावे लागते. दुर्गम भागात रेंजसह विजेचाही मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना घडवणार्‍या शिक्षकांची ही खरी परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहिले तर त्यांना पुढील वर्षी निश्चितपणे चांगले शिक्षण देता येईल.

परंतु, केवळ एककल्ली दृष्टिकोन ठेवून ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरणे चुकीचे होईल. ज्यांना शक्य आहे, त्यांनी या तंत्रज्ञानाचा निश्चितच स्वीकार केला पाहिजे. कारण आपण कितीही नाही म्हटलो तरी येणारे जग हे तंत्रज्ञानावर आधारित आणि त्यात पारंगतच असेल. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना याविषयी ज्ञान मिळाले नाही तर, ती येणार्‍या काळात कालबाह्य ठरतील. प्रत्येक दहा वर्षांनी शिक्षणाची परिभाषा बदलते आहे. आपले पूर्वज पाटी, फळा व पुस्तक या साधनसूचितेचा वापर करुन शिकले. पाढे पाठ असणे, हस्ताक्षर सुंदर असणे व नियमित शाळेत येणे हे एका हुशार विद्यार्थ्याचे गुण समजले जात. आता हस्ताक्षरापेक्षा तंत्रज्ञानात किती पारंगत आहे याला महत्व प्राप्त झाले. पाढ्यांपेक्षा रट्टा मारण्यात हुशारी समजली जाते. विद्यार्थ्यांचे ‘स्टेटस’ वेळोवेळी चेक करुन त्याची जाणीवही त्यांना करुन दिली जाते. त्यामुळे एकाच वर्गातील मित्र एकमेकांशी आर्थिक तुलना करतात. यातूनच न्यूनगंड तयार व्हायला लागतो, भेदभाव वाढत जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शहरातील कॉलेज, शाळांचे आकर्षन दिसून येते.

ऑनलाईन शिक्षणाला पूर्णत: विरोध करणे संयुक्तिक ठरणारे नसले तरी परिस्थितीनुरुप त्याचा विचार व्हायला हवा. एखाद्या गावात रेंजच नसेल तर तेथे ‘टॅब’ वाटप करुन काय उपयोग? डिजीटल शिक्षणाचा आपण कितीही पुरस्कार केला तरी त्याला आवश्यक ठरणार्‍या मूलभूत बाबीच उपलब्ध नसतील तर शिक्षणाचा प्रसार होणार तरी कसा? प्रत्येक वेळी शिक्षकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून उपयोग नाही. पालकांनीच यादृष्टीने आता विचार करायला हवा. आपले गाव, आपली शाळा सुधारली पाहिजे, याचा विचार मनात आणल्याशिवाय बदल घडणार नाही. याउलट शहरातील शाळांनी पालकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाची परिस्थिती तुम्हाला अनुकूलच असेल असेही नाही. करोनामुळे सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे. सर्वांनाच अनाकलनीय स्थितीचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्याकडे फीसाठी तगादा लावणे, एकरकमी फी भरण्याचा आग्रह करणे चुकीचे आहे.

शाळा सुरुच झालेल्या नाहीत तर बसभाडे कशासाठी? ऑनलाईन लेक्चर घेताय तर ग्रंथालय, मैदान, इमारत शुल्क का आकारता? त्यात काही प्रमाणात सवलत दिलीच पाहिजे. पालकही अडचणीत आहेत. त्यांचीही मानसिकता समजून घेतली पाहिजे. शाळा व पालक यांनी एकत्रित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचे उद्दिष्ट ठरवले तर ऑनलाईन असो किंवा प्रत्यक्ष शिक्षण याची फलनिष्पत्ती निश्चितच उत्तमप्रकारे दिसेल. येणार्‍या काळाला सुसंगत शिक्षण हेच प्रभावी ठरेल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली तर शिक्षणाच्या प्रवाहातील अडचणी कमी होत जातील. ऑनलाईन असो की ऑफलाईन विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुच महत्वाची भूमिका निभावतात. या भावनेतून शाळांनी पालकांची व विद्यार्थ्यांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -