घरफिचर्सखेड्यामधले घर कौलारू...

खेड्यामधले घर कौलारू…

Subscribe

निसर्ग, भक्ती, प्रीती याचा संगम कोकणातल्या कौलारू घरातून दिसतो. विलियम वर्डस्वर्थच्या कितीतरी कविता इथल्या मातीशी आपलं नातं सांगतात का ? असा भास या कौलारू घरातून होतो. हे कौलारू घर म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. कोकणातल्या पाऊलवाटा नष्ट झाल्या. दिव्याचे कंदील इतिहासात जमा झाले, लालमातीची धूळ खाली बसून त्यावर डांबरीकरण झाले, पण कौलारू घराची सय जात नाही.

आज यांत्रिकीकरणाच्या कोलाहलात खेड्यांचं शहरीकरण होत आहे अशी नेहमीच बोंब उठवली जाते. खेड्याचं शहरीकरण होत आहे म्हणजे नक्की काय होतं? रस्त्यांची लालमाती जाऊन तिथे डांबरीकरण झाले आहे. विहिरीवर पंप बसून घरात पाणी आलं. आज कोकणातल्या घराघरात मोबाईलवर संभाषण होताना दिसते. हा झालेला भौतिक बदल म्हणजे वरपांगी असावा. शहरीकरणाच्या कोलाहलातदेखील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कोकणातली घरे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असतानादेखील किंवा कोकणरेल्वेने प्रवास करताना एक गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे रायगडच्या आधी अगदी पनवेलच्या पुढे छोटी छोटी कौलारू घरं दिसू लागतात. शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे – कोकणातील घरे उतरत्या छपराची कौलारू का असतात. या भौगोलिक प्रश्नांचे उत्तर कोकणातल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे.

- Advertisement -

कोकणात मुख्यतः तळकोकणात, सिंधुदुर्गात जून-जुलै महिन्यात ढोल-ताशांच्या गजरात पाऊस पडतो. कवी वसंत सावंत या पावसाचं वर्णन करताना म्हणायचे, शब्दात पकडता येत नाही इतका पाऊस आणि तुझ्या आठवणी……. .असाच काहीसा पाऊस कोकणात पडतो म्हणूनच बहुतेक कोकणातली घरं ही उतरत्या छपराची असतात आणि उतरत्या छपराची म्हणजे कौलारूच होय. कित्येक आधीची वर्षे कोकणातली घरं मातीच्या भिंतीची आणि नळ्यांच्या छपरांची होती, पण गेल्या कित्येक वर्षांपासून तळकोकणातली बहुतेक घरं ही जांभ्या दगडाच्या भिंतीची आणि कौलारू छपराची दिसू लागलीत.

माझ्या गावातील घर हे असंच जांभ्या दगडांच्या भिंतीचं आणि कौलारू छपराचं आहे. या घराला अनेक नावं – इनामदारांचा घर, चक्कीवाल्यांचा घर, पोस्टमास्तरांचा घर. पण लौकिकार्थाने घराची ओळख म्हणजे माणसांनी भरलेले घर अशीच. नांदगाव-शिरगाव हमरस्त्याने जाताना असलदे. ओटव, कोळोशी ही गावं लागतात. त्या कोळोशी बाजाराच्या आधी डावीकडे एक रस्ता जातो तोच रस्ता माझ्या गावाची वाट सांगतो. लालमातीचा रस्ता, थोडंफार डांबरीकरण आणि खडीकरण केलेला असाच गावच्या शाळेपर्यंत जातो. तिथून उजवीकडे वळून वडाच्या झाडाकडे वळलं की, हे कौलारू घर लागतं.

- Advertisement -

जुनं घर कोसळून तिथे हे नवीन घर बांधलं गेलं. जुन्या घराची परिमाणं आजही डोळ्यासमोरून जातात. खेड्यातल्या शाळा असाव्यात तसं हे घर होतं. म्हणजे थेट डाव्या कोपर्‍यापासून उजव्या बाजूला पसरलेलं. बाजूला निदान सात-आठ फणसाची झाडं, एखादा शेगुल उभा आहे. त्या शेगलाच्या झाडाच्या खोडाला गावातल्या माणसांनी ठिकठिकाणी खोचे पाडलेले, हे पडलेले खोचे कशासाठी तर या झाडाच्या खोडाला असे खोचे पाडले की, त्यातून निघणारा चिक हा वस्तू किंवा कागदपत्रे चिटकवण्यासाठी वापरायचे. हळूहळू मातीचं ते घर आउटडेटेड झालं. पावसाळ्यात ठिकठिकाणी गळायला लागलं तेव्हा हे घर कोसळून आता नवीन घर या ठिकाणी बांधण्यासाठी तयारी सुरू झाली आणि पस्तीस वर्षापूर्वी भलं मोठं घर या जागेवर बांधलं गेलं.

या कौलारू घराच्या साक्षीने आमच्या आधीची आणि आमची पिढी वाढत होती. जांभ्या दगडाच्या भिंती आणि वर कौलारू छप्पर घातलेल्या या घराच्या बाजूने संपूर्ण दगडाचे कुंपण टाकून आपली मर्यादा आखून घेतली आहे. माझे चुलते पूर्वी गावाचं पोस्ट सांभाळायचे, त्यामुळे आमच्या घराला पोस्टमास्तरांचं घर असेच म्हणायचे. या पोस्टात यायच्या निमित्ताने गावातली आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातील अनेक माणसं येथे यायची. त्यामुळे अनेक माणसांचे नमुने इथे बघयला मिळायचे. माझे चुलते राजकारणातदेखील सक्रीय होते. लोकल बोर्डाच्या कामात सक्रीय होते. माझे गाव आयनल, हे तसे आडगाव, सकाळी एक एसटी आणि संध्याकाळी एक एसटी एवढीच काय ही वाहतुकीची सोय. तेव्हा एसटीच्या जादा फेर्‍या व्हाव्या म्हणून माझे चुलत्यांना भेटायला कणकवली-देवगडमधील अनेक राजकीय पुढारी भेटायला यायचे. त्यापैकी अमृतराव राणे, रामभाऊ मुंज, आप्पासाहेब गोगटे ही नावे ठळकपणे आठवतात, ही मंडळी घरासमोरच्या खळ्यात असलेल्या चौपाळ्यावर बसून ग्रामविकासाच्या योजना आखताना मी बघितले आहे.

आमचं घर म्हणजे गावातल्या लोकांना मुक्त. घरात एखादा माणूस तरी नेहमी असायचा. घराला कधी कुलूप लागले असेल तर शप्पथ! घराचा मुख्य भाग म्हणजे सदर किंवा आमच्या गावात त्याला लोटा म्हणतात. लोट्यावर विशेष म्हणजे एखाद्या भिंतीवर पूर्वजांचे फोटो, त्याच्या खालच्या बाजूला भिंतीत खुट ठोकले असून त्यांचा मुख्य उपयोग अंगातले कपडे काढले की, त्याला लटकवून ठेवायचे. एखाद्या खुटीला कोयता किंवा तत्सम वस्तू ठेवण्याची आकडी ठेवलेली असते. एखाद्या खुटाला अशी आकडी टांगलेली असली की, समजायचे या घरातली शेती अजून जिवंत आहे. उजव्या बाजूला बसायला मोठा माच ठेवलेला आहे. कुठल्यातरी खुटीला आलेली पत्रं, इलेक्ट्रिकची बिलं लावलेली आहेत. या लोट्यावरून घरासमोरचा रस्ता थेट दिसतो. लोट्याच्या आजुबाजूला दोन तीन खोल्या अशी ही पुढच्या बाजूची रचना. लोकांचा तसा घरात राबता कमीच. लोट्यापेक्षा खळ्यात वावर जास्त. तरी देखील लोट्याचं महत्व आबाधीतच !

आमच्या जुन्या घराला लोटा असा लांब होता. आमच्या घराचं वळण तसं बाळबोध. म्हणजे पहाटेच्या अंधुक प्रकाशात या घराच्या लोट्यावर तुकोबाचे अभंग म्हणत आजोबा फेर्‍या मारायचे, कधीतरी घाल घाल पिंगा वार्‍या … ही कविता ऐकू यायची. वर्डस्वर्थच्या कविता या लोट्याला नवीन नव्हत्या. लोट्याच्या आत आल्यावर वळई लागते, या वळईत कोणीतरी पेज पीत बसलेलं असायचं किंवा न्याहरी खात बसलेलं असायचं, दुपारच्या आणि रात्री पाच-पंचवीस लोकांची पंगत उठू शकेल एवढी मोठी वळई, तिचा थोडा भाग आता टीव्हीने व्यापला आहे. या वळईत पहाटे किंवा दुपारी आई आणि काकी दळण दळत बसलेली असायची. त्या दळणाचा वास नाकात भरून राहायचा. मध्येच कोणी गावातली वयस्क स्त्री यायची आणि जात्यावरच्या ओव्या म्हणायची.

वळईच्या एका बाजूची खोली स्वयंपाकघराची तर दुसरी बाजू कोठाराची. घरातलं सर्व धान्य या खोलीत साठवलेलं असायचं . पूर्वी तांदळाचे बिवळे, मुडी एकावर एक रचून ठेवलेले असायचे, बाजूला धान्य भरून कणगी ठेवलेल्या असायच्या. आता बिवळे, मुडी जाऊन त्यांची जागा प्लास्टिकच्या पिंपाने घेतली आहे. आणि सर्वात शेवटी मागच्या बाजूला पडवी, जी लांबच्या लांब पसरलेली आहे. त्या पडवीच्या एका बाजूला पावसाळ्यात घरात लागेल तो लाकूडफाटा भरून ठेवला आहे. तिथे कुठे तरी पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी उतव टांगला आहे. त्याच्या बाजूला सात-आठ कोंबड्यांची झापं. सकाळी जाग यायची तिच मुळात या कोंबड्यांच्या कलकलण्याने. एकदा कोंबड्यांचे झाप उघडले की, फरफर करत कोंबडी संपूर्ण घरभर फिरायची.

या पडवीतून बाहेर पडलं की, मागीलदार. मागीलदाराला सर्वचजण पाटल्यादार म्हणतात. या पाटल्यादारी उभं राहिलं की, सुकवण्याचं खळ दृष्टीला पडतं, त्या खळ्यात कोकम, खारावलेले आंबे, फणसाची साटं असं काहीतरी सुकत घातलेलं असतं. त्या खळ्याच्या बाजूला गुरांसाठी गवताची तनस उभी केलेली आहे, त्या तनसीच्या बाजूलाच गुरांसाठी कावण घातले आहे. याखेरीज पाटल्यादारी उभं राहिलं की, नारळ-केळींची बाग नजरेला पडते. कुठेतरी चिंच उभी आहे. काजूची सात-आठ झाडं दिमाखात उभी आहेत. फणसाच्या आणि आंब्याच्या झाडावर कुठेतरी चानी (खारुताई) नजरेस पडते. माडाच्या आणि केळीच्या बागेला पाणी देण्यासाठी पंप चालू आहे आणि ते पाणी पाटातून खळाळत वाहते आहे.

निसर्ग, भक्ती, प्रीती याचा संगम कोकणातल्या कौलारू घरातून दिसतो. विलियम वर्डस्वर्थच्या कितीतरी कविता इथल्या मातीशी आपलं नातं सांगतात का ? असा भास या कौलारू घरातून होतो. हे कौलारू घर म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. कोकणातल्या पाऊलवाटा नष्ट झाल्या. दिव्याचे कंदील इतिहासात जमा झाले, लालमातीची धूळ खाली बसून त्यावर डांबरीकरण झाले, पण कौलारू घराची सय जात नाही. भौगोलिक परिस्थितीला अनुसरून घरांची रचना जरी केली गेली तरी ही कौलारू घरं ही कोकणातली ओळख आहे.

माझ्या गावच्या कौलारू घरात अनेक राजकारणी, समाजकारणी येऊन गेले. या घराने गावातले समाजकारण आपल्या अंगावर खेळवले. राजकारणी लोकांना सन्मान दिला, पण फुटाफूटीचे राजकारण कधी केले नाही. गावातल्या अनेक विकासकामांची सुरुवात इथून झाली. अनेक सुखाचे-दुःखाचे प्रसंग बघितले तरी प्रत्येक प्रसंगात कणखरपणे कसं उभं रहायचे ते या घराने शिकवले. या घराची परिमाणे मनात घरं करून आहे ते यासाठीच !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -