घरफिचर्सघरखरेदीसाठी मध्यमवर्गीयांचा अंबरनाथकडे ओढा

घरखरेदीसाठी मध्यमवर्गीयांचा अंबरनाथकडे ओढा

Subscribe

लोकसंख्येच्या निकषावर अंबरनाथ, बदलापूर ही महापालिकाही अस्तित्वात येऊ शकते. बरेच छोटे टाऊनशिप प्रोजेक्ट साकारले जात आहेत. अनेक सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. मालमत्ता बाजारपेठेत वेगाने विकसित होणारे आणि नवीन घरांचा पर्याय उपलब्ध करून देणारे महानगर म्हणून अंबरनाथकडे ओढा वाढतोय.

निवारा ही खरं तर माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक. मुंबई ठाण्यातील जागांचे दिवसेंदिवस वाढणारे भाव पाहता, त्यामुळे ही गरज कशी भागवायची असाही प्रश्न आहे. महानगरांतल्या घरांच्या चढ्या किमतीमुळे त्यांच्याजवळच्या छोट्या शहरांचं महत्त्व वाढत आहे. त्यामुळे कल्याणपुढील अंबरनाथमध्ये पसंती मिळू लागली आहे. शिवाय अशा ठिकाणी गुुंतवणूक केल्याने भविष्यात चांगला परतावादेखील मिळू शकतो. मुंबई शहर, उपनगरांपाठोपाठ, ठाणे, कल्याणसारखी शहरंही आता घरे घेण्यासाठी परवडू लागली नाहीत. मोकळ्या जागेचा अभाव, जागेच्या वाढलेल्या भरमसाठ किमती तसेच अफोर्डेेबल घरांची कमतरता यामुळे या भागातील गृहखरेदी- विक्रीत ठराविक वर्गातील लोकांचीच मक्तेदारी जास्त प्रमाणात दिसून येतेय. त्यामुळे घरखरेदीत मध्यमवर्गीयांचा अंबरनाथकडे ओढा वाढू लागला आहे.

अंबरनाथ शहरांमध्ये वेगाने विकसित होणारे गृहप्रकल्प, त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यात होऊ घातलेले जाळे या शहरांना राज्याच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळत आहेत. त्यामुळे चारही बाजूने या दोन्ही शहरांमध्ये विकासकामांनी वेग घेतला आहे. त्यात शहरांतर्गत आणि बाह्य भागातील महत्त्वाचे रस्ते, त्यांचे रुंदीकरण, नवीन प्रस्तावित उड्डाणपूल, चिखलोली रेल्वे स्थानकासारख्या वाहतूक पर्यायांमुळे तिसर्‍या मुंबईचे केंद्रबिंदू असलेले अंबरनाथ, खर्‍या अर्थाने विकासाच्या दिशेने प्रवास करत आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीत शहराला जोडणारे आणि शहरातून बाहेर पडणार्‍या पाच महत्त्वाच्या रस्त्यांसाठी एमएमआरडीएकडून ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातंर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याने यात नवीन रस्त्यांचीही भर पडत आहे. अंबरनाथ शहराचा विस्तार होत असल्याने शहराच्या आतील भागातही अनेक गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे या नवीन गृहप्रकल्पांपर्यंत नागरिकांना जाण्यायेण्याची सोय व्हावी यासाठी विकास आराखड्यानुसार आणि शहरातील उर्वरित डांबरी रस्त्यांवर ४२ कोटी रुपयांच्या निधीतून १७ किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. यातील अनेक रस्ते हे पूर्ण करण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत या सर्व रस्त्यांची कामे झाल्यास शहर डांबरी रस्ते मुक्त झालेले असेल.

- Advertisement -

अंबरनाथ येथील मटका चौक ते हुतात्मा चौक या पूर्व पश्चिम भागांना जोडणारा एकमेव उड्डाणपूल अस्तित्वात आहे. मात्र शहरात वाहनांची संख्या आणि वाहतूककोंडी वाढत असताना नवीन उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीचे विभाजन करण्यासाठी पश्चिमेतील लादी नाका ते पूर्व भागातील मोरिवली पाडा येथे अंबरनाथ शहराच्या मंजूर विकास आराखड्यात प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी नगरपालिका आग्रही आहे. २०११मध्ये नगरपालिकेकडून सर्वेक्षणही करण्यात आले असून त्यासाठी २२ कोटींचे नियोजन करून एमएमआरडीएकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. यासाठी नगरपालिकेच्या सभागृहात ठरावही झाले आहेत. तसेच वर्षभरापूर्वी या उड्डाणपुलासाठी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेने संयुक्त पाहणी केली. मात्र एमएमआरडीएकडून प्रतिसाद नसला तरी नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी याबाबत पाठपुरावा करत आहेत. सह्याद्रीच्या रांगेतील हाजीमलंग या धार्मिक पर्यटनस्थळी उभारण्यात येत असलेली देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प साकारला जात आहे. अंबरनाथ,बदलापूर दोन्ही शहरे जवळ आली असली तरी शहरांतर्गत, एमआयडीसी आणि लांबचे अंतर गाठण्यासाठी रिक्षा हा एकमेव वाहतुकीचा पर्याय आहे. त्यामुळे परिवहन सेवा या दोन्ही शहरांतर्गत सुरू करण्याची गरज आहे.

भविष्यात रस्ते आणि रेल्वे कनेक्टीव्हिटी वाढणार

कल्याण ते बदलापूर हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रूंदीकरणाचे काम होणार आहे त्यामुळे भविष्यात रस्त्याची कनेक्टिव्हिटी होणार आहे. तसेच रेल्वे मार्गिकाही वाढण्याचे प्रस्तवित आहे. कल्याण ते बदलापूर दरम्यानच्या तिसर्‍या व चौथ्या मार्गिकांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. या बदलांचा विचार करता, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कल्याण ते बदलापूरपर्यंतच्या तिसर्‍या व चौथ्या मार्गिकांना स्थान देण्यात आले. सध्या कल्याण ते खोपोली मार्गावर उपनगरी सेवेच्या सुमारे २१४ फेर्‍या दररोज होतात. बदलापूर फेर्‍यांची संख्या त्यापेक्षा आणखी जास्त आहे. कल्याणपासून बदलापूरपर्यंतचे अंतर सुमारे १५ किलोमीटर असून या मार्गिकांसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या अतिरिक्त मार्गिकांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जात आहे. मध्य रेल्वेने या मार्गिकांसाठी सन २०२२-२३चे उद्दिष्ट ठेवले आहे.

- Advertisement -

टाऊनशिप प्रोजेक्ट …

कल्याणमध्ये गेल्या काही वर्षांच्या कालावधीत बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबं स्थलांतरित झाली आहेत. कल्याणध्ये गुंतवणूक करायची झाल्यास ५५० ते ६५० चौ. फुटाचा वन बीएचकेची किंमत साधारणत: ३५ लाखांपर्यंत आहे. यापेक्षा कमी किमतीतल्या घरांचे पर्यायदेखील तयार झाले आहेत, पण ते शहरातल्या आतल्या भागात आहेत. परंतु रस्ते आणि इतर सुविधा चांगल्या विकसित होत असल्यामुळे या भागांतदेखील गुंतवणुकीचा विचार होऊ लागला आहे. मात्र कल्याणपुढील अंबरनाथ शहरात ग्राहकांची पसंती वाढू लागली आहे. लोकसंख्येच्या निकषावर अंबरनाथ, बदलापूर ही महापालिकाही अस्तित्वात येऊ शकते. बरेच छोटे टाऊनशिप प्रोजेक्ट साकारले जात आहेत. अनेक सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. मालमत्ता बाजारपेठेत वेगाने विकसित होणारे आणि नवीन घरांचा पर्याय उपलब्ध करून देणारे महानगर म्हणून अंबरनाथकडे ओढा वाढतोय. मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतील विकासित झालेल्या भागातील जागेचे दरही झपाट्याने वाढताहेत. त्यामुळे बदलापूरप्रमाणेच अंबरनाथला गुंतवणुकीला प्राधान्य मिळत आहे. नोकरदार वर्ग अंबरनाथ बदलापूर वांगणी नेरळपर्यंत स्थलांतरीत होत आहे. अंबरनाथमधील बी केबीन रोड, आनंदनगर भाग येथे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट सुरू आहे. मोहन ग्रुप, पनवेलकर, ग्रीन सिटी असे नामांकित बिल्डरांचे प्रेाजेक्ट अंबरनाथमध्ये सुरू असून मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. अंबरनाथ हा औद्योगिक परिसर म्हणूनच ओळखला जायचा. शहराच्या पश्चिमेला अनेक कंपन्या होत्या, मात्र कालांतराने हा बंद झाल्या. त्यामुळे त्या ठिकाणी आता निवासी वसाहती उभ्या राहत आहेत. अंबरनाथ पश्चिमेला हा स्लम एरिया मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वेकडील भागात अगोदरपासूनच बंगलो होते. त्यामुळे पूर्वेचा परिसर हा विकसितच होता. अंबरनाथमध्ये ३ हजारपासून ते पाच हजार रूपयांपर्यत प्रति चौरस फूट दर आहे. अंबरनाथचे शेवटचे टोक असलेले जावसई या गावात साधारण तीन हजार रूपये प्रति चौरस फूट दर आहे. म्हणजे १५ ते १८ लाखापर्यंत घरे मिळू शकतात. पालेगाव येथेही हाच दर आहे. मध्यवर्ती ठिकाणी पाच ते सहा हजार रूपये प्रति चौरस फूट दर आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये कल्याण ठाण्यापेक्षा स्वस्त व परवडणारी घरे उपलब्ध होत आहेत.

—————–

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -