घरफिचर्सबर्ट लँकेस्टर ः ध्यास वैविध्याचा

बर्ट लँकेस्टर ः ध्यास वैविध्याचा

Subscribe

बर्ट लँकेस्टरनं मात्र वेगळ्या भूमिकांचा शोध सुरूच ठेवला होता. त्याला नवी आव्हानं हवी होती. त्यानं डार्क सिटी, जिम थॉर्प-ऑल अमेरिकन, कम असे चित्रपट केले. नंतर पुन्हा क्रिम्झन पायरट हा व्यंगपट वॉर्नरच्या साथीनंच बनवला. त्यालाही चांंगलं यश मिळालं. पण म्हणून अनेक प्रस्ताव येऊनही त्यानं त्या प्रकारचे चित्रपट केले नाहीत. उलट फ्रॉम हिअर टु इटर्निटी, अपाचे, व्हेरा क्रूझ, ट्रॅपीझ, गन फाइट अ‍ॅट द ओकश कॉरल, रन सायलेंट रन डीप, डेव्हिल्स टिसायपल, द अनफरगिव्हन, जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग, बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ, द ट्रेन, द स्वीमर, एअरपोर्ट, वाल्डेझ ईज कमिंग, द मिडनाइट मॅन, मोझेस-द लॉ गिव्हर 1900, अशा अनेक चित्रपटांत भूमिका केल्या.

वैविध्याचा ध्यास असलेले काही लोक असतात. एकसुरीपणाचा त्यांना कंटाळाच येतो, त्यामुळे ते कायम नाविन्याच्या शोधात असतात. प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. त्यामुळंच ज्यांना ते जमतं त्यांना नशीबवानच म्हणायला हवं. गेल्या शतकातला हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता बर्ट लँकेस्टर हा असाच एक नशीबवान कलाकार. त्यानं अनेकविध प्रकारच्या भूमिका केल्या, कारण त्याला स्वतःवर अमुक एक प्रकारचा अभिनेता असा शिक्का बसायला नको होता. वेगवेगळ्या प्रकारच्या, छटांच्या भूमिका रंगवण्यात त्यानं यश मिळवलं. तरीही त्याची तगडी शरीरशष्टी, देखणा चेहरा आणि त्याची दंतपंक्ती यामुळं तो ही-मॅन म्हणून प्रसिद्ध झाला. गँगस्टर, वेस्टर्नस्चा हीरो असंही त्याला म्हटलं जात असे. असं होतं कधी कधी. जे नको असतं, नेमकं तेच वाट्याला येतं. अर्थात बर्टला त्याबाबत वाईट वाटण्याचं कारण नव्हतं. कारण आपण जे काही करतो, ते अगदी मनापासून करतो, त्यात कसलीही उणीव राहू नये म्हणून प्रयत्न करतो हे त्याला माहीत होतं.

- Advertisement -

खरं तर तेहेतीस हे काही रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याचं वय समजलं जात नाही. त्यापेक्षाही त्यानंतर त्यात यश मिळवायचं ही गोष्ट अधिकच अवघड समजली जाते. पण बर्ट लँकेस्टरनं ते साध्य केलं. आणि नंतर जवळपास चार दशकं त्यानं आपलं हॉलीवूडमधलं स्थान टिकवलं. त्याचं लहानपण तसं अवघडच होतं. खाण्याची आबाळ नव्हती तरी बाकी चैन नव्हती. सिनेमाची आवड लहानपणापासूनच होती. डग्लस फेअरबँक्स हा त्याचा हिरो होता. बर्टच्या वडलांनी फोटोप्लेमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं की, एकदा फेअरबँक्सचा मार्क ऑफ झोरो हा चित्रपट पाहण्यासाठी तो सकाळी 11 वाजता सिनेमागृहात गेला होता तो थेट रात्री 11 वाजेपर्यंत तेथून हललाच नाही. त्याला जेवणाखाणाचं भानच राहिलं नव्हतं. फेअरबँक्सची नक्कल करत तो घरभर उड्या मारत धावत असायचा. वस्तू मध्ये असली तर तिच्यावरून उडी जाण्याचाच त्याचा प्रयत्न असे. या सार्‍यामुळं तो चांगला खेळाडू बनल्याचं मला जाणवलं. तेराव्या वर्षी त्याची उंची वाढायला लागली आणि पाहता पाहता तो सर्व मुलांपेक्षा उंच झाला. त्याला खेळांमध्ये गती होती. त्याच्या भावाचं म्हणणं होतं, की तो बास्केटबॉलमध्ये नाव काढू शकला असता.

त्याचं नाव बर्टन लँकेस्टर असं होतं. तो बर्ट म्हणूनच ओळखला जाई. त्याला सर्वच गोष्टी करून पाहाण्याचा ध्यास होता. त्याला मैदानी खेळ खेळायचे होते, जिमनॅस्ट-कसरतपटू-बनायचं होतं, संगीत शिकायचं होतं. सोळाव्या वर्षी आवाज फुटेपर्यंत तो चांगला गात असते आणि चर्चमधल्या गाण्यार्‍यांत असे. तो एकदा म्हणाला होता, सोळाव्या वर्षी माझा आवाज गेला-फुटला… आणि नंतर जन्मभर मी तो शोधत राहिलो! नाटकातल्या त्याच्या भूमिकाही चांगल्या होत. त्याला अभिनयाच्या शिष्यवृत्तीवर शिकायला परवानगी द्या, अशी विनंतीही गुणवत्ता शोधणार्‍या दोन स्वयंसेवकांनी त्याच्या आईकडं मागण्यासाठी आले, तेव्हा तो लपून बसला आणि त्याच्या आईनेही त्याच्याबाबत काही सांगितले नाही.

- Advertisement -

आई ही एखाद्या हुकूमशहासारखीच होती असे सांगून तो त्याबाबत विचारलं असता म्हणाला होता. पण तिच्याकडूनच मी प्रामाणिकपणा, खरं बोलणं आणि एकनिष्ठ राहण्यास शिकलो. आपले वचन पाळावं, हे तिनं मला बजावलं होतं. त्यामुळंच अनेक वेळा लोकांना मी एवढा आग्रही का आहे, याचं आश्चर्य वाटे. लहानपणी आमची टोळी असे व आम्ही मारामार्‍याही करायचो, पण मी लवकरच त्यातून बाहेर पडलो. मला वाचनाची गोडी लागली होती असेही तो म्हणाला होता.

निक क्रॅव्हेटमुळं त्याला जिम्नॅस्टिक्सची गोडी लागली आणि त्यात तो सफाई दाखवू लागला. नंतर या दोघांना कर्ली ब्रेंट हा ऑस्ट्रेलियन जिम्नॅस्ट भेटला. तो बारवर अप्रतिम कसरती करायचा. बर्ट आणि निकवर त्याची छाप पडली होती. त्यामुळं त्यानं त्या दोघांना झुल्यावरील अवघड काम शिकवलं आणि अवघड समरसॉल्टचं तंत्रही. काही काळ त्यांनी सर्कसमध्ये, तसंच कसरतपटू म्हणून लँग अँड क्रॅव्हेट नावानं स्वतंत्र खेळ केले. सर्कसमध्ये कामं करत असतानाच इतर प्रकारची कामंही तो करत होता. अशातच त्याला एका नाटकासाठी बोलावणं आलं, चाचणीत तो यशस्वी झाला. कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टिमच्या कॉन्सर्ट ब्यूरोकडं काम करण्यासाठी तो न्यूयॉर्कला आला. पण काम सुरू होण्याआधीच त्याला सक्तीच्या लष्करी कामासाठी आमंत्रित करण्यात आले. लष्करातही त्याला प्रत्यक्ष लढाईवर न जाता सैनिकांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमांत सहभागी करण्यात आलं. तिथं त्यानं एका नाटकातही काम केलं होतं.

लष्करी सेवेतून बाहेर आल्यावर त्यानं काही काळ नाटकांत भूमिका केल्या. त्यानं हॅरॉल्ड हेक्टला आपला एजंट नेमलं. त्याच्या साउंड ऑफ हंटिंग या नाटकात वालिसनं त्याला पाहिलं आणि त्याच्याकडं चित्रपटांत काम करण्याच्या कराराचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यानं इतर कुणापेक्षा हाल वालिसकडं काम करणंच पसंत केलं आणि वालिसनं त्याला सात वर्षांसाठी करारबद्ध केलं. त्याच्याकडं वर्षाला दोन चित्रपट करायचे आणि मग कुठंही काम करायला तो मोकळा राहील, हे कलम करारात होतं. त्यामुळंच बर्टनं तो करार मान्य केला. साउंड ऑफ हंटिंग हे नाटकदेखील नंतर हॉलिवूडला चित्रपट रूपात आलं, 1952 मध्ये. त्यात बर्टनं केलेली भूमिका ली मार्विननं केली होती. बर्टनं मात्र त्याआधी बरीच वर्षं हॉलीवूडमध्ये यश मिळवलं होतं.

वालिसकडं आल्यावर त्याची चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी त्याला डेझर्ट फ्यूरी या चित्रपटातील संवाद देण्यात आले होते. तो चाचणीत यशस्वी झाला. पण हा चित्रपट ऑगस्टमध्ये सुरू होणार होता. त्यामुळं त्यानं आधी युनिव्हर्सलचा हेमिंग्वेच्या कथेवर आधारित, हेलिंजर दिग्दर्शन करणार असलेला चित्रपट द किलर्स स्वीकारला. तो पूर्णही झाला. त्यामुळं तोच त्याचा पहिला चित्रपट ठरला. त्याआधीची गोष्ट. चित्रपटातील श्रेयनामावलीसाठी बर्ट लँकेस्टरला नाव कोणतं द्यावं याबाबत विचार चालू होता. प्रत्येकजण काहीतरी सुचवत होता. पण वालिसला कोणतंच पसंतीस येत नव्हतं. नंतर अचानक एका सकाळी हेलिंजरनं फोन करून वालिसला सांगितलं की त्याच्या सेक्रेटरीनं सुचवलंय की आपण बर्टचं तेच नाव वापरू या. वालिसनं ते लगेच मंजूर केलं. हेलिंजर नंतर म्हणाला होता या हॉलीवूडच्या लोकांची डोकी कशी चालतात कोण जाणे! द किलर्स यशस्वी ठरला. आणि नंतर लँकेस्टरची कारकीर्द सुरू झाली.

हा नवा नायक लोकांना एकदम पसंत पडला. त्याचा देखणा चेहरा भरदार शरीययष्टी, रुंद खांदे सारं काही महिलांना भुरळ पाडणारं ठरेल वालिसचा अंदाज अचूक ठरला. त्यामुळंच त्यानं कोणत्याही प्रकारच्या चित्रपटात काम केलं तरी ते चित्रपट कधीच नुकसानीत गेले नाहीत. सुरुवातीस रांगड्या नायकाची भूमिका काही वेळा केल्यानंतर त्यानं ठरवलं की आता आपण वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या. कोणच्याही प्रकारच्या साच्यात अडकायचं नाही. निर्माता म्हणून त्यानं वॉर्नरबरोबर विनोदाची डूब असलेला व्यंगात्मक टिप्पणी करणारा फ्लेम अँड द अ‍ॅरो हा चित्रपट बनवला. (1950) त्यात जुना सहकारी निक क्रॅव्हेटला नायकाच्या मुक्या साथीदाराची भूमिका दिली. प्रेक्षकांना हा प्रकार एकूणच खूप आवडला आणि चित्रपटाला चांगलं यश मिळालं. तेव्हा बर्टनं ठरवलं की, आपण स्वतः या प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि इतरत्र मात्र वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या. निर्माते त्यासाठी तयार होते कारण आता तो स्टार बनला होता आणि त्याच्या नावावर लोक चित्रपट पाहण्यासाठी येत होते. दिवसेंदिवस त्याच्या अभिनयातही सुधारणा होत होती. वालिसबरोबरचा करार संपला होता आणि तो काहीही करायला स्वतंत्र होता.

चाळिशी जवळ आली होती. तरीही तो कितीतरी कमी वयाचा वाटत असे. फ्लेमची कथा कोलंबियानं नामंजूर केली होती. पण वॉर्नरला ती आवडली, तो म्हणाला, हाच चित्रपट आपण प्रथम बनवू या. अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिनहूडचे सेट व इतर सामान त्यासाठी वापरता येईल. अशा प्रकारे तो चित्रपट तयार झाला होता. यात त्यानं डार्डो (द अ‍ॅरो) ही भूमिका केली होती. इटलीवर आक्रमण करणार्‍यांकडून तो नायिकेची सुटका करतो असं त्याचं साधं कथानक होतं. त्याचा एकेकाळी आदर्श असलेल्या फेअरबँक्सप्रमाणं त्यानं सारी साहसी कृत्यं करण्यासाठी या चित्रपटात आपली सारी कौशल्य वापरली. फरक एवढाच होता की फेअरबँक्सनं त्यासाठी डमी वापरला होता. दीर्घ काळानंतर अ‍ॅक्शन हिरो पडद्यावर आला होता.

मात्र बर्ट लँकेस्टरनं मात्र वेगळ्या भूमिकांचा शोध सुरूच ठेवला होता. त्याला नवी आव्हानं हवी होती. त्यानं डार्क सिटी, जिम थॉर्प-ऑल अमेरिकन, कम असे चित्रपट केले. नंतर पुन्हा क्रिम्झन पायरट हा व्यंगपट वॉर्नरच्या साथीनंच बनवला. त्यालाही चांंगलं यश मिळालं. पण म्हणून अनेक प्रस्ताव येऊनही त्यानं त्या प्रकारचे चित्रपट केले नाहीत. उलट फ्रॉम हिअर टु इटर्निटी, अपाचे, व्हेरा क्रूझ, ट्रॅपीझ, गन फाइट अ‍ॅट द ओकश कॉरल, रन सायलेंट रन डीप, डेव्हिल्स टिसायपल, द अनफरगिव्हन, जजमेंट अ‍ॅट न्यूरेंबर्ग, बर्डमॅन ऑफ अल्काट्राझ, द ट्रेन, द स्वीमर, एअरपोर्ट, वाल्डेझ ईज कमिंग, द मिडनाइट मॅन, मोझेस-द लॉ गिव्हर 1900, अशा अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. त्यानं अभिनयासाठी ऑस्कर आणि अनेकदा ऑस्कर नामांकन, न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अ‍ॅवॉर्ड आणि इतरही अनेक बक्षिसे मिळावली. आपल्यालाच मध्यवर्ती भूमिका हवी, आपणच हीरो हवे अशा गोष्टी त्यानं कधी केल्या नाहीत, पण भूमिका काय आहे याचा मात्र तो विचार करत असे आणि ती आवडली की बाकीच्या गोष्टींकडे त्याचं लक्ष नसायचं.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -