घरफिचर्सक्लेयर अंडरवूड ते सर्सी लॅनिस्टर : स्त्रीत्वाचा प्रवास

क्लेयर अंडरवूड ते सर्सी लॅनिस्टर : स्त्रीत्वाचा प्रवास

Subscribe

आपल्या महत्वाकांक्षेसाठी काहीही करू शकणारा फ्रँक अंडरवूड हा राजकारणातील हुशार नेता असा आपल्याला वाटतो पण तेच त्याची बायको किंवा एक स्त्री करते तेव्हा ती आपल्याला दुष्ट, चेटकीण वगैरे वाटायला लागते. ह्यावर बर्‍याच लोकांशी चर्चा केल्यावर हे ध्यानात आलं की अजूनही बाई म्हटलं की एक विशिष्ट चौकट आपल्या सगळ्यांच्या डोक्यात फिट्ट आहे. चूक - बरोबर हे दोघांसाठी वेगळं कसं असू शकतं हा प्रश्न मला पडतो. समानता म्हणजे दोघांसाठी एकच नियम. पुरुष आहे म्हणून अमुक एक वागणं चालेल पण स्त्रीला हे शोभतं का? हे जे आपण करतो ते रास्त आहे का? जेंडर पलीकडे जाऊन माणुसकीची, जगण्याची मूल्य असावीत.

‘हाऊस ऑफ कार्ड्स’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रचंड लोकप्रिय मालिका. तसं पाहता ह्या दोन अतिशय वेगळ्या धर्तीवर बेतलेल्या टीव्ही सिरीज. मायकल डॉब्स् यांच्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ह्या पुस्तकावर आणि ह्याच नावाने १९९० साली ब्रिटिश सिरीजवर ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ टीव्ही सिरीज आधारलेली आहे तर जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘साँग्स ऑफ आईस अँड फायर’ ह्या पुस्तकावर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आधारलेली आहे. ह्यात साधर्म्य असं काही असलं तर दोन स्त्री पात्रांच्या व्यक्तिरेखेचं. हाऊस ऑफ कार्ड्समध्ये अमेरिकेचा प्रेसिडेंट बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणार्‍या फ्रँक अंडरवूडची बायको ‘क्लेयर अंडरवूड’ आणि दुसरी म्हणजे गेम ऑफ थ्रोन्समधील किंग रॉबर्ट जो आयर्न थ्रोनवर विराजमान आहे त्याची बायको आणि लॅनिस्टर घराण्याची मशाल हाती घेतलेली ‘सर्सी लॅनिस्टर’.

तसं पाहायला गेलं तर सर्सी आणि क्लेयर ह्या अतिशय वेगळ्या आहेत एकमेकींपासून.. समान धागा असेल तर एकच तो म्हणजे सत्तेची भूक आणि स्वतःच्या असण्यावर प्रचंड विश्वास. ह्या दोन्हीही बायका आपापल्या जागी कजाग, धूर्त, निष्ठुर आणि डिव्हिलिश अशा आहेत. सर्सी ही खूपशी अमानवी आणि मार्टिन यांच्या इतर पात्रांसारखी टोकाची असल्याने तिथेही प्रेक्षक म्हणून आपण फार लवकर लेबल लावून मोकळं होतो. पण रॉबिन राईटची क्लेयर मात्र अवाक करून जाते. ‘हाऊस ऑफ कार्ड्स ‘चा नुकताच आलेला सहावा सिझन पाहावा तो क्लेयरच्या मेटामॉर्फोसिससाठी.

- Advertisement -

क्लेयर अंडरवूड ते क्लेयर हेल ह्या तिच्या प्रवासासाठी. प्रेसिडेंटची बायको ते स्वतः प्रेसिडेंट बनण्याचा तिचा प्रवास एक स्त्री म्हणून थक्क करणारा आहे. तिचं कॅरॅक्टर हे अतिशय संयमित, हुशार, क्रूर आणि अत्यंत चलाख असं दाखवलं आहे. एक बाई म्हणून आपण जी चौकट आपल्या मनात बनवलेली असते त्या चौकटीला छेद देणारी क्लेयर म्हणून आपल्याला आवडतेही आणि आवडत नाहीही. आपल्या महत्वाकांक्षेसाठी काहीही करू शकणारा फ्रँक अंडरवूड हा राजकारणातील हुशार नेता असा आपल्याला वाटतो पण तेच त्याची बायको किंवा एक स्त्री करते तेव्हा ती आपल्याला दुष्ट, चेटकीण वगैरे वाटायला लागते.

ह्यावर बर्‍याच लोकांशी चर्चा केल्यावर हे ध्यानात आलं की अजूनही बाई म्हटलं की एक विशिष्ट चौकट आपल्या सगळ्यांच्या डोक्यात फिट्ट आहे. चूक बरोबर हे दोघांसाठी वेगळं कसं असू शकतं हा प्रश्न मला पडतो. समानता म्हणजे दोघांसाठी एकच नियम. पुरुष आहे म्हणून अमुक एक वागणं चालेल पण स्त्रीला हे शोभतं का? हे जे आपण करतो ते रास्त आहे का? जेंडर पलीकडे जाऊन माणुसकीची, जगण्याची मूल्य असावीत. एक विशिष्ट जेंडरचा म्हणून त्याची मूल्य वेगळी हवी ही जी सक्ती आहे , विचारधारा आहे ती योग्य आहे का? बाई म्हणजे सोज्वळ, देवी, माता, भगिनी, पत्नी ह्यापलीकडे काही असतं की नाही? आणि असल्यास मग धूर्त, चलाख, चारित्र्यहीन वगैरे वगैरे.. इतकंच..

- Advertisement -

ह्यावर चर्चा करताना काही गोष्टी जाणवल्या. आजही आपण बायकांकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहत असतोच. कधी कळत तर कधी नकळत. एकतर स्त्री सीता असते वा शूर्पनखा, झाशीची राणी असते नाहीतर सावित्री, देवी असते नाहीतर राक्षसीण. त्यातही महत्वाकांक्षी स्त्री किंवा करिअरला प्राधान्य देणारी स्त्री अथवा हुशार, कर्तृत्ववान स्त्री अश्या विविध लेबलांखाली ज्या स्त्रियांना आपण बसवतो त्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सहसा फार संकुचित असतो. कामाच्या ठिकाणी तर स्त्रियांना त्यांच्या हुशारीवर, ज्ञानावर आणि कष्टामुळे चांगली पोझिशन मिळू शकते ह्यावर कितीतरी पुरुषांचा आणि काही अंशी स्त्रियांचा देखील विश्वास नसतो. त्या त्यांचं बाईपण वापरून वर पोहोचल्या असणार असं सर्रास बोलले जातं.

‘गरीब गाय’ किंवा ‘स्लट/बिच’ ही विशेषणं म्हणजे समाजाने स्त्रीच्या थोबाडीत मारून तू तुझ्या मर्यादेत राहा असं म्हणण्यासारखं आहे. दोन्हीही टोकाची संबोधनं. स्त्रीच्या बाबतीत का बरं इतकं जजमेंटल होतात लोकं? एकतर तिला आधार द्या नाहीतर मग तिचे पंख छाटा.. तिला स्वतःची अक्कल आहे , डोकं आहे , मतं आहेत. आज बायका पेटून उठण्यामागचं मागचं एक कारण त्यांना कधी प्रत्यक्षरित्या तर कधी प्रत्यक्षपणे दाबून ठेवलं गेलं हे सुद्धा आहे. स्त्री हुशार असली, कर्तृत्ववान असली म्हणजे मग तिला कोणतंच सो कॉल्ड एथिक्स नसतात, ती कोणत्याही थराला जाऊ शकते हा जो मोठा गैरसमज घेऊन जगणारा एक वर्ग आहे त्यांनी स्वतःला तपासून बघायला हवंय.

मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम एम्लिमेंटेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या २०११-२०१२ च्या सर्वेनुसार भारतात बायकांचा वर्कफोर्स पार्टीसिपेशन रेट हा केवळ २५.५१ टक्के इतका आहे. २०१७ सालापर्यंत केंद्रीय परिषदेच्या मंत्रिमंडळात स्त्रियांचं प्रमाण १२ टक्के इतकं आहे. १६व्या लोकसभेत संपूर्ण सदस्यांपैकी १२ टक्के महिला होत्या. ( ५३४ पैकी ६४). हे सगळे आकडे बघता आणि त्याची इतर देशातील आकडेवारीही तुलना करता आपण अजूनही स्त्रीला तिच्या बाईपणापलीकडे बघू शकतो का यावर विचार करायला हवाय.

तसं पाहायला गेलं तर नुसतीच आकडेवारी लिंगसमानता दर्शवते असं नाही पण निदान आपण कुठे चाललो आहोत, याचा एक इंडिकेटर म्हणून हे आकडे नक्कीच उपयोगी पडतात. कागदावर आकडेवारी कितीही असली तरी मूळ वागताना आपण कसे वागतो आहोत हे आपल्याच हातात असतं ना? दृष्टिकोनातील सूक्ष्म बदलसुद्धा मानसिकता आणि एकूणच आपलं वागणं बदलू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने सुरवात जर आपल्यापासून केली तर चित्र नक्कीच बदलू शकतं. दोघांसाठी जगणं अधिक सकस आणि सहज बनू शकतं. स्त्रीच्या, हुशारीवर, कामावर, कर्तृत्वावर, कष्टावर विश्वास ठेऊन जेव्हा समाज तिच्याकडे बघेल तेव्हा तो समाज प्रगतीच्या वाटेवर खर्‍या अर्थाने चालायला लागेल.

सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -