घरफिचर्सनावातच राजकारण आहे!

नावातच राजकारण आहे!

Subscribe

नावात काय आहे, असा प्रश्न शेक्सपीयरने विचारला होता. नाव म्हणजे सर्वस्व. येनकेन प्रकारेन ते झळकावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. स्वत:चं नाव पुढे रेटणारा इतरांच्या नावाचं नामोनिशाण मिटवण्याच्या मागे असतोच असं नाही. भारतीय राजकारणातला पुढचा अध्याय याच नामांतरात दडलाय. याचीच परिणती म्हणजे राजीव गांधी यांचे नाव खेलरत्न पुरस्कारातून काढण्याचा केलेला आगाऊपणा होय. राजीव गांधी यांचे नाव या पुरस्कारासाठी आपसूक आलं असं नाही. देशाप्रति त्यांच्या योगदानातून पुरस्काराला ते नाव देण्यात आलं. पण प्रत्येक ठिकाणी हीच नावं असावीत असं ज्या काँग्रेसला आजवर वाटलं तसं ते भाजपच्या सरकारलाही सोडवत नाहीए. पण त्यासाठी नावं मिटवण्याची आवश्यकता नव्हती. भारतीय पुरूष संघाने आलम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवल्यानंतर तमाम भारतवासीयांचा उर अभिमानाने भरून येणं स्वाभाविक आहे. भारताचे सुपुत्र ध्यानचंद यांनी या खेळासाठी दिलेलं योगदान वादातीत आहे. ध्यानचंद यांचं नाव पुरस्कारासाठी जसं आवश्यक होतं तसं दिलेल्या नावाची पाटी मिटवून टाकणंही शोभा देणारं नव्हतं, हे या सरकारला कोणी तरी सांगण्याची आवश्यकता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटने राजीव गांधी यांचं खेलरत्न पुरस्कारावरचं नाव मिटवता येतं या विश्वासानेच यापुढचं नामांतराचं राजकारण वेग घेईल, हे सांगायला नको. हे करताना क्रीडा क्षेत्राशी राजीव गांधी यांचं योगदान काय असा सवाल केला जात होता. योगदान म्हणून नावं देण्याची परंपरा भारताने पूर्णांशी जपली असं कधी झालं नाही. ज्यांचं सरकार ते देशातील कर्तबगार नेत्यांची नावं त्या त्या ठिकाणी ठेवण्याची प्रथा देशानेही स्वीकारली. यामुळेच जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नावं आली तशी ती अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाळ उपाध्याय यांचीही लागली. खरं तर हा संसदीय निर्णय असतो. जिथे घटनेचा संबंध येतो तिथे दिलेल्या नावांची चर्चा करणं, त्यावर आक्षेप नोंदवणं अभिप्रेत नाही. अशावेळी आपल्याला नको म्हणून नाव काढणं तर अजिबात उचित नाही.

राजीव गांधी यांचं नाव काढण्यापेक्षा नव्या पुरस्काराला जन्म घालणं मोदींच्या सरकारला अजिबात अशक्य नव्हतं. योगदान म्हणून जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा दिल्लीतल्या स्टेडियमला अरुणकुमार जेटली यांचं नाव का देण्यात आलं याचा खुलासा सरकारनेच करायला हवा होता. इतकंच काय अहमदाबादला उभारण्यात आलेल्या स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव काय म्हणून देण्यात आलं? हे सरकारने सांगावं. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न केल्याच्या घोषणेचा वाद निर्माण व्हायचं खरं तर कारण नाही. काँग्रेस पक्षानेही त्यासंबंधी फारसं आडंवेडं घेतलेलं नाही. पण हयात नसलेल्या पंतप्रधानांच्या नावावर जेव्हा फुली मारली जाते तेव्हा हयात असलेल्या पंतप्रधानांच्या नावाचा पुरस्कार कसा काय केला जाऊ शकतो? ध्यानचंद यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान वादातीत आहे. यावर कुठलाच भारतीय शंका उपस्थित करीत नाही. शंका आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवर. भारतीय जनता पक्षाला गांधी घराण्याविषयी असलेले ‘प्रेम’ सर्वश्रुत आहे. या असुयेतूनच गांधी परिवाराची बदनामी करण्याचा एक कलमी कार्यक्रम सत्ताधार्‍यांनी हाती घेतला आहे.

- Advertisement -

राजीव गांधी यांचं नाव पुरस्कारातून दूर करताना ज्या ध्यानचंद यांचं नाव पुढे करण्यात आलं त्या ध्यानचंद यांच्या आजवरच्या क्रीडा कारकिर्दीला सरकारने किती सहकार्य केलं ते एकदा जाहीर केलं पाहिजे. मुष्ठीयोध्दा विजेंद्र सिंग याने तर सरकारच्या हेतूवर संशय व्यक्त करताना कुटिल डावाचा पर्दाफाश केला आहे. हे नामांतर घडवण्यामागे केवळ विकृत द्वेषबुद्धी आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. पंतप्रधानांच्या निर्णयाचं समर्थन करताना राजीव गांधी यांचा खेळांशी काहीही संबंध नव्हता, असं सांगणार्‍यांना अटलजी, जेटली, दीनदयाळ उपाध्याय, सुषमा स्वराज या भाजपाशी संबंधीतांचा ज्या क्षेत्राशी संबंध नाही तिथे नाव कसं दिलं, असा प्रश्न पडत नाही. आक्षेप फक्त राजीव गांधींच्या नावावर. देशातील विविध योजना, संस्था यांना गांधीच काय कुठल्याही एका परिवाराच्या नावाने ओळख देण्याचा पायंडा समर्थनीय नाहीच. पण म्हणून नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारच्या सुडबुध्दीच्या राजकारणाचं अजिबात समर्थन करता येणार नाही. जी मंडळी राजीव गांधी यांचा खेळाशी संबंध नाही असा युक्तीवाद करतात त्यांनी देशातील क्रीडा क्षेत्रातल्या उन्नतीची माहिती घ्यावी. हे सारं निर्माण करण्याची जबाबदारी राजीव गांधींनी पेलून दाखवली. तरीही राजीव गांधींचं नाव पुरस्कारातून दूर करण्यातून कोणाला असुरी आनंद होत असल्यास त्याला रोखता येणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देऊन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देऊन ते पंतप्रधान झाले.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ४० वर्षे काँग्रेसने राज्य केले, त्यामुळे देशाची जी काही अधोगती झाली आहे, ती काँग्रेसमुळे झाली आहे, असाच पवित्रा त्यांनी घेतला. पण स्वातंत्र्यानंतर देशाची विविध क्षेत्रात जी काही प्रगती झाली आहे, ती कुणी केली याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यात क्रीडा क्षेत्रही आले. राजीव गांधी हे नव्या दमाचे आणि आधुनिकदृष्टी असलेले पंतप्रधान होते, त्यांच्या अनेक निर्णयांनी देशाला नवी दिशा मिळाली. पण हे मोदी आणि भाजपवाले लक्षात घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे राजीव गांधींचे नाव पुसून त्यांचे देशासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी असलेले योगदान पुसता येणार नाही. भारतामध्ये लोकशाही शासन प्रणाली आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचे अस्तित्व महत्वाचे आहे. कारण विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येईल. मोदींमुळे भाजपचे अच्छे दिन जरूर आलेले आहेत. पण परिस्थिती बदलत असते. त्यामुळे आज भाजपचे दिवस असतील, तर उद्या काँग्रेसचेसुद्धा अच्छे दिन येऊ शकतात. याचाही विचार व्हायला हवा. भाजप असो किंवा काँग्रेस असो, एकमेकांच्या नेत्यांची नावे देण्यात धन्यता मानण्यापेक्षा संबंधित क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे नाव दिले जाईल, हे पाहिले पाहिजे. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकीय श्रेय घेण्याचा आटापिटा चालत असतो.

- Advertisement -

हॉकीचा खेळ आणि ध्यानचंद यांच्याविषयी या मंडळींना खरोखर तळमळ असेल तर मोदींचं सरकार आल्यापासून ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावं म्हणून होणार्‍या मागणीची दखल या सरकारला का घ्यावीशी वाटली नाही? ज्या ध्यानचंद यांच्या नावाचा आता पुरस्कार केला जातो, त्या ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीच्या मदतीसाठी केलेल्या याचनांचा विचार मोदी सरकारने का केला नाही? हॉकीला प्रायोजक मिळावा, म्हणून सरकारने साधा प्रयत्न केल्याचं दिसत नाही. आणि आता त्याच हॉकीच्या आडून राजीव गांधी यांच्या नावाचा खेळ खेळला गेला, हे अत्यंत घृणास्पद कृत्य होय. अहमदाबादच्या स्टेडियमला स्वत:चं नाव देण्याऐवजी गुजरातशी ऋणानुबंध असलेले सलीम दुराणी, विनू मंकड, इरफान पठाण, पार्थीव पटेल, रतजीत सिंग गायकवाड, दिलीपसिंग यापैकी एका खेळाडूचं नाव पुढे केलं असतं तर मोदींच्या हेतूवर संशय आला नसता. पण या दिग्गजांऐवजी स्वत:चं नाव पुढे करत मोदींनी सार्‍या मर्यादा ओलांडल्या, असंच म्हणता येईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -