घरफिचर्सपावसाळा करोनाला पोषकच

पावसाळा करोनाला पोषकच

Subscribe

जोरदार पावसात रोगराई वाहून जाते, असा दावा सर्वसामान्यपणे होत असतो. याच आधारे करोनाचे विषाणू पावसाच्या पाण्यात वाहून जातील असा सरळसोट निष्कर्ष काढला जातोय, पण गेल्या तीन महिन्यांतील करोनाचा प्रवास, त्याचा बदलता स्वभाव, अन्य विषाणूजन्य आजारांचा अनुभव, पावसाळी हवामान आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील सामाजिक स्थिती अभ्यासली तर पावसाळ्याच्या काळात करोनाचा धोका वाढण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा आला म्हणजे करोना कमजोर होईल आणि आपण बिनधास्त बाहेर फिरू शकू या अविर्भावात कुणी असेल तर त्यांनी सावध व्हावे.

येणार्‍या पावसाळ्यात करोनाची नेमकी भूमिका काय असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जाताहेत. खरंतर करोना हा एक असा आजार बनलाय, ज्यावर कोणताही संशोधक ठोसपणे काही सांगू शकत नाही. तो उष्ण कटीबंधीय प्रदेशात पसरणार नाही, असं सुरुवातीला म्हटलं गेलं, पण हा समजही करोनाने खोडून काढला. त्यानंतर तो हवेतून पसरणार नाही, असा दावा केला गेला, पण जागतिक आरोग्य संघटनेने एक प्रकारचा करोना हवेतूनही पसरू शकतो, असं नमूद केलं. सर्दी, पडसे, खोकला आणि ताप ही प्राथमिक लक्षणं करोनाची असल्याचे सांगितलं गेलं, पण आज आढळून येणार्‍या ९० टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसूनच येत नाहीत. करोनाची बाधा झालेल्या रुग्णाला स्पर्श केल्यास त्यापासून या आजाराचं संक्रमण होणारच, असं सर्वच पातळ्यांवर सांगण्यात आलं.

आता मात्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून करोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचं पुढं आलंय. विशेषत: तीन दिवस जर गंभीर वा सौम्य लक्षणे आढळून आली नाहीत, तर रुग्णाला दहा दिवसांनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाणार आहे. अशा रुग्णांची डिस्चार्ज देण्यापूर्वी नव्याने करोना टेस्ट घेतली जाणार नाही. म्हणजे तो पॉझिटिव्ह असला तरीही त्याला मुक्त केलं जाईल. थोडक्यात काय तर आता करोनाचा खरा स्वभाव पुढे येतोय. खरंतर, प्रत्येक विषाणू हा रंग बदलणार्‍या सरड्यासारखा असतो. आजुबाजूचे वातावरण बघून तो परिस्थितीला समरस होण्यासाठी स्वत:मध्ये बदल करून घेतो. स्वाईन फ्लू केवळ थंडीच्या काळात होतो असं प्रारंभी बोललं गेलं. त्यानंतर मात्र त्याचे रुग्ण पावसाळ्यातही आढळून आले. उन्हाळ्यात स्वाईन फ्लू होणारच नाही असे दावे करणार्‍यांचीही दोन वर्षांपासून बोलती बंद झालीय. दोन वर्षांत स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मे महिन्यादरम्यान आढळून आलेत.

- Advertisement -

पावसाळ्यात करोना विषाणूचा प्रसार होईल का यातही संभ्रम आहे, पण विविध संशोधकांचा अभ्यास आणि त्यांनी व्यक्त केलेलं मत अभ्यासता पावसाळ्यात करोना विषाणूचा प्रसार अधिक वाढण्याची व्यक्त होणारी भीती धोक्याची घंटा वाजवतेय. पावसाळ्यात करोना वाढणार नाही असा ‘सकारात्मक’ विचार करून आपण पायावर धोंडा मारून घेतोय. अनेक जण अशा विचाराने निष्काळजीपणा करू शकतात. त्यातून प्रसार वाढण्याची अधिक शक्यता आहे. आजवरचा अनुभव बघता, कोणत्याही विषाणूचा फैलाव पावसाळ्याच्या काळात अधिक होत असतो. करोनाच्या बाबतीतही असंच काही होऊ शकतं. पावसाळ्यातल्या दमट वातावरणात करोनाचा फैलाव जास्त होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटने (डब्लूएचओ) च्या मते, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार कोव्हिड – १९ पसरवणारा Sars-CoV-2 विषाणू उष्ण आणि दमट, शीत आणि कोरडा अशा सर्वच प्रकारच्या हवामानात पसरू शकतो. त्यामुळे हवामान हा घटक तसा परिणामकारक ठरणारा नाही, पण म्हणून पावसाळ्यात या रोगाचा फैलावच होणार नाही असंही नाही. कडाक्याच्या उन्हामध्ये हा विषाणू तग धरून होता. त्यामुळे पावसाळ्यात त्याचे अस्तित्व नष्ट होईल असं म्हणणं मुर्खपणाचं ठरेल.

करोनाचा प्रादुर्भाव हा दोन पद्धतीने होत असतो. करोना पॉझिटिव्ह रुग्ण शिंकला, खोकला किंवा थुंकला आणि त्यातून उडालेले सुक्ष्म शिंतोडे ज्या व्यक्तीवर उडतील तो पॉझिटिव्ह होतो. या शिंतोड्यांच्या माध्यमातून शरीराबाहेर पडलेला विषाणू ज्यावर पडतो, त्याला कुणाचा स्पर्श झाला तर त्याला करोनाची बाधा होऊ शकते. या प्रकारातील थेट संक्रमणाचा तसा तापमानाशी संबंध नाही, पण सर्दी, खोकल्यासारखे आजार पावसाळ्यात अधिक उद्भवतात हे कोण नाकारणार? पावसाळ्याच्या काळात वातावरणातील बदल, दमटपणा आणि सातत्याने पाण्याशी येणारा संपर्क यामुळे सर्दी, पडसे, खोकल्याचा त्रास वाढतो. आज करोनाच्या बहुसंख्य रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, पण पावसाळ्यात सर्दी, पडसे, खोकला हे आजार डोकं वर काढतात. विशेषत: पावसाळ्यात दमा असणार्‍यांचा आजार बळावतो. त्यामुळे आधीच श्वसनाचा कुठलातरी आजार असणार्‍या लोकांना करोनाची लागण होण्याची शक्यता बळावेल. अशा परिस्थितीत लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्याही वाढणार हे कटू सत्य आहे. अशा रुग्णांमधूनच प्रादुर्भाव वाढतो हेही लक्षात घ्यावं. एखाद्या ठिकाणी पडून असलेला विषाणूचा एखाद्या व्यक्तीला स्पर्श झाला की, त्यातून करोनाची बाधा होऊ शकते. या प्रकारचं संक्रमण हे तापमानाशी संबंधित असतं. विशेषत: आर्द्रतेच्या काळात हा विषाणू अधिक काळ संबंधित जागेवर टिकाव धरू शकतो.

- Advertisement -

पावसाळ्याच्या काळात निसर्गही डॉक्टरांची परीक्षा घेणार आहे. एरवी पावसाळ्यात दमा, श्वसनाचे विकार यांसह वेगवेगळ्या आजारांची रुग्णसंख्या वाढलेली असते हे कुणीही नाकारणार नाही. त्यामुळे यापुढे करोना संशयित रुग्ण आल्यानंतर त्याला इतर कुठल्या आजाराची लक्षणं दिसत आहेत का, हे तपासून त्यादृष्टीने चाचण्या कराव्या लागणार आहेत. पावसाळ्यात दाट लोकवस्त्या आणि विशेषत: झोपडपट्टी भागांची काय अवस्था असते हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे या काळात दाट वस्तीतील प्रत्येक घरात जाऊन तपासण्या करणे जिकरीचे होणार आहे. याशिवाय पावसाळ्याच्या काळात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसीस या साथींच्या आजारांसह कॉलरा, जुलाब आणि कावीळसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. डेंग्यू आणि स्वाईन फ्लू वगळता अन्य आजारांना रुग्णही फारसे गांभीर्याने घेत नाहीत. करोनाकाळात मात्र परिस्थिती वेगळी असेल. कोणताही अन्य आजार झाला तरी संबंधिताला प्रथमत: करोनाचा प्रादुर्भाव झाल्याची भीती वाटेल. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात भीतीग्रस्त रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येईल.

युनिव्हर्सिटी ऑफ डेलवेअर एपिडेमॉलॉजी डिपार्टमेंटच्या संस्थापक आणि शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर होर्ने म्हणतात की, ‘पावसाचं पाणी व्हायरस नष्ट करू शकत नाही. यामुळे व्हायरसचा प्रसार कमी होईल असं म्हणता येणार नाही. नुसते हात पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, साबण लावावाच लागेल.’ मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या ग्लोबल हेल्थ, मेडिसिन अँड एपिडेमिऑलॉजीचे प्राध्यापक आणि डीन प्रा. जॅरेड बॅटेन म्हणतात, ‘एखाद्या पृष्ठभागावर पाऊस पडला तर त्यामुळे करोना डायल्युट होऊ शकतो किंवा वाहून जाऊ शकतो.’ मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, करोनाचे विषाणू १७ दिवसांनंतरही आढळून आले आहेत. त्यामुळे पावसामुळे करोनाचे विषाणू धुवून निघतील असं म्हणणं चुकीचं ठरेल. जगभरातील संशोधक पावसाळ्यात करोनाबाबत आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. आर्द्रतेमुळे करोना विषाणू बरेच दिवस हवेत तरंगू शकतो, असंही काहींनी म्हटलंय. त्यामुळे प्रत्येकानं स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. या काळात शक्य तितके घरात राहावं, पाणी उकळून प्यावं, आपण राहतो त्या परिसराची स्वच्छता ठेवावी, सॅॅनिटायझरचा नित्यनेमाने वापर करावा, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार सेवन करावा, थंड पदार्थ खाणं आणि थंड पेय पिणं टाळावं आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं इतकी साधी काळजी घेतली तरीही करोनाकाळातील पावसाळ्याला आपण पेलू शकतो!

पावसाळा करोनाला पोषकच
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -