घरफिचर्समाथेरानची शिवसेना शाखा 33 वर्षांची झाली...

माथेरानची शिवसेना शाखा 33 वर्षांची झाली…

Subscribe

जागतिक पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या गिरिस्थान माथेरानमधील शिवसेनेची शाखा आज आपला 33 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. विविध सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. करोनाचे सावट नसते तर आणखी दणक्यात कार्यक्रम पार पडला असता. आजमितीला रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या ज्या शाखा दबदबा राखून आहेत त्यात माथेरानची शाखा काहीशी सरस आहे. मात्र शाखा स्थापनेच्या पूर्वीपासून, शाखा स्थापन होईपर्यंत ते आजच्या दिवसापर्यंत या शाखेचा प्रवास खडतर आणि प्रतिकूल राहिला आहे. त्यावर मात करीत ही शाखा डौलात पुढे निघत 33 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

देश-विदेशातील पर्यटकांचे माथेरान हे लाडके ठिकाण असले तरी येथे अनेक समस्या आहेत. त्या 33 वर्षांपूर्वीही होत्या. याचवेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन करीत होते. माथेरानमधील त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन, तसेच बाळासाहेबांपासून स्फूर्ती घेत 14-15 तरुणांनी शिवसेनची येथे शाखा स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला. अर्थात त्यावेळी सर्व स्तरांवरून या तरुणांवर कमालीचा दबाव टाकण्यास सुरुवात झाली.

शिवसेनेच्या शाखेमुळे शांत ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये गुंडगिरी फोफावून पर्यटनावर विपरीत परिणाम होईल, अशी ‘पुडी’ सोडण्यात येऊन मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रयोग झाले. माथेरानमधील अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने हॉटेल, तसेच अन्य बड्या व्यावसायिकांनाही तरुणांचे हे ‘वेड’ डोक्यातून काढून टाकण्यासाठी पुढे करण्यात आले. मात्र मागे हटतील ते बाळासाहेबांचे शिवसैनिक कसले? होणारा विरोध तीव्र स्वरुपाचा असला तरी आता माघार नाही, या जिद्दीने तरुण पेटून उठले, त्यांना खालापुरातील ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांची साथ मिळाली आणि माथेरानमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचे निश्चित झाले.

- Advertisement -

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांच्या मुख्य उपस्थितीत 9 जून 1987 मध्ये शिवसेनेची माथेरान शाखा स्थापन झाली. या शाखेच्या पहिल्या प्रमुख पदाचा मान माजी नगरसेवक रघुनाथ कदम यांना मिळाला, परंतु तो तात्पुरता होता. शाखा सुरू झाली तर खरी, आता पुढचा मार्ग अधिक जबाबदारीचा आणि जोखमीचा असल्याने, तसेच ‘एक घाव दोन तुकडे’ ही पक्षाची कार्यपद्धती असल्याने शाखाप्रमुख पदासाठी आक्रमक चेहर्‍याची गरज भासू लागली. त्यातून तरुणांत प्रिय असणारे आणि आक्रमक स्वभावाचे कुमार चौधरी यांचे नाव पुढे आले आणि ते शाखाप्रमुख झाले.

हळूहळू शिवसेना माथेरानच्या जनमानसात रूजू लागली. प्रस्थापितांसाठी हा धक्का होता. भ्रष्टाचार विरोधात आंदोलन, तरुणांना बेरोजगार, मूलभूत गरजांसाठी आंदोलन आणि अन्य सामाजिक कार्य सुरू असताना 1990 च्या सुमारास पक्षाचा माथेरानच्या राजकारणात चंचूप्रवेश झाला. कदाचित हाच शाखेसाठी मैलाचा दगड ठरला. 1990-91 मध्ये पक्षीय राजकारणात शिवसेना प्रवेश झाला आणि त्याची फलश्रुती म्हणजे लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ असलेले शाखाप्रमुख कुमार चौधरी यांच्या गळ्यात माथेरानच्या नगराध्यक्षपदाची माळ पडली. त्यानंतर शहरात शिवसेनेने मागे वळून पाहिलेले नाही. आजही शिवसेनेची एकहाती सत्ता माथेरान नगर परिषदेवर आहे.

- Advertisement -

शाखेचा 33 वा वर्धापन दिन साजरा होत असताना पक्षासाठी सुरुवातीला खस्ता खाणारे कुमार चौधरी हयात नाहीत, परंतु योगायोगाने त्यांचा भाचा चंद्रकांत चौधरी शाखा प्रमुखपदी विराजमान आहेत. उमदे आणि दिलदार, संवेदनशील, तसेच वेळप्रसंगी आक्रमक होणारे हे व्यक्तिमत्व आहे. गेली काही वर्षे त्यांनी येथे राजकारणात किंगमेकरची भूमिका पार पाडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण ही शिकवण त्यांनी मनावर ठसवून घेतली आहे. आपले सामाजिक कार्यही सुरू ठेवण्यासाठी चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या आईच्या, मीरा यांच्या, नावाने एका फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

गेल्या काही दिवसांत फाऊंंडेशनचे काम कौतुकास्पद ठरले आहे. करोनाच्या संकटानंतर माथेरानचा पर्यटन व्यवसाय, पर्यायाने अर्थव्यवस्था कोसळल्यानंतर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना शिवसेना आणि फाऊंडेशनने एकत्रितपणे मोठी मदत केली आहे. अश्वपाल, अन्य कष्टकरी, आजारी रुग्ण यांच्यासाठी ही मदत लाखमोलाची ठरली आहे. निःस्वार्थी भावनेने आणि बहुतेक वेळा पदरमोड करून अडलेल्यांना मदत करणारे चंद्रकांत चौधरी स्थानिक शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्या शब्दाला किंमत दिली जाते. त्यामुळे पक्षाचा येथील वृक्ष दिवसेंदिवस फोफावत आहे.

33 हे वय जसे तरुणाईतील आक्रमकता प्रकट होणारे असते तसे ते चांगल्यापैकी परिपक्वता आलेले असते. त्यामुळे वय वाढत गेले तरी ही परिपक्वता शिवसेनेची शहर आणि परिसरातील पाळेमुळे अधिक घट्ट करणारी ठरणार आहे. त्यामुळेच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. माथेरानला मूलभूत सुविधांप्रमाणेच अन्य सुविधांचा लाभ व्हावा म्हणून चंद्रकांत चौधरी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माथेरानवर विशेष प्रेम असल्याने या सुविधा लवकरच प्राप्त होतील, असा शिवसैनिकांना विश्वास आहे. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन असते. शाखेचा वर्धापन दिन मंगळवारी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होताना माथेरानकरांच्या अडचणींना कायमचा पूर्णविराम मिळेल यासाठी संकल्प सोडला जाईल, याची प्रत्येकाला खात्री आहे. शाखेच्या वर्धापन दिनाला आणि पुढील कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

-दिनेश सुतार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -