घरफिचर्सपेरा, जगण्याचा..!

पेरा, जगण्याचा..!

Subscribe

पारळ्यातील कांतीलाल मोरे, छबू मोरे, बबन माळी व इतर भिल्ल शेतकरी बांधवाशी चर्चा केली. मुद्दामहून त्यांच्यापुढे, अलीकडे सार्वत्रिक बनत चालेला एक मुद्दा मांडला. म्हटलं, सतरा प्रकारची धान्य कशाला पेरायची. बाजारभाव असलेली व भरघोस उत्पन्न देणारी एक-दोन पिके पेरायची. त्याच्या काढणीची कटकट राहणार नाही न मशागतीचा त्रास. मात्र या निरक्षर असलेल्या शेतकर्‍यांनी या मताला विरोध केला. मिश्रपिके ही कशी महत्वाची आहेत, याबद्दल त्याचं पिढीजात शहाणपण आजही अतिशय महत्वपूर्ण ठरतं. हा जगण्याचा पेरा आहे, पण लक्षात कोण घेतो ?

यंदा काय पेरायचं? गेल्या वर्षी सोयाबीनला मार्केट चांगलं होतं. मशागतीची कटकट नको, पूर्ण वावर तूर पेरवी म्हणतोय. असे संवाद, जून महिन्याच्या सुरुवातीला गावागावातून ऐकायला येतात. शेतात या वर्षी काय पेरायचं हे कसं ठरतं? नेमकं कोण ठरवतं? अर्थात या वर्षी काय पेरायचं हे, त्या-त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती ठरवते. मात्र हे त्याचे किंवा तिचे निर्णय कशाने प्रभावित असतात. मार्केट किंवा बाजार. गेल्या वर्षी कोणत्या पिकाला जास्ती बाजारभाव होता हा एक महत्वाचा मुद्दा असतो. बाजार हे शेतीत काय पेरायचं हे ठरविण्याच्या शेतकर्‍याच्या निर्णयाला प्रभावित करीत असतो. यावर्षी किती व कसा पाऊस असणार हाही मुद्दा तितकाच महत्वाचा असतो. मात्र त्या-त्या वर्षाच्या पावसाचे प्रमाण व स्वरूप याबद्दलचे अभ्यास, अंदाज हे शेतकर्‍यापर्यंत नीटसे पोहचत नाहीत.

- Advertisement -

गावागावातील वेगवेगळ्या जुन्या प्रथा, परंपरा, समज यानुसार पावसाचे अंदाज बांधले जातात. तेलंगाना राज्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथील एक साधू दर वर्षी शेतीत काय पेरायचं याची यादी देतात. या वर्षी कोणते पिके चांगले येणार, भरघोस उत्पन्न देणार, हे त्यांना कळतं असेही, काही लोक दावा करतात. काही लोक फक्त इतकेच सांगतात की, या वर्षी काळं बियाणे पेरू नका. या वर्षी उभे बियाणे जोमात येईल. मग यावरुन शेतकरी अंदाज लावतात की, काळं पेरू नका म्हणजे, उडीद पेरू नये, उभं बियाणे जोमात येईल म्हणजे भात, गहू पेरायचा, असे निर्णय काही शेतकरी घेतात.

पारळ्यातील भिल्ल शेतकर्‍यांचं शहाणपण
पारळा एक छोटेसे गाव. औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात अगदी खडकाळ, डोंगराळ भाग. येथील शेतकर्‍यांना वनहक्क कायद्या अंतर्गत जमिनी मिळाल्या. त्या आधीही ते त्या जमिनीवर शेती करीत होते. मात्र त्यांना त्या जमिनीवर हक्क नव्हता. वनविभागाच्या अधिकार्‍यांपासून चोरून त्यांना शेती कसावी लागायची. मात्र त्यांनी कोरडवाहू, कमी पावसाच्या, खडकाळ भागात तग धरून शेती केली. त्या जमिनीत येतील अशी पिके पेरत राहिले. जवळपास साठ प्रकारची पिके हे शेतकरी घेतात. अनेक वर्षाच्या प्रयोगानंतर त्यांनी कोणकोणते एकमेकांसोबत मिसळून पेरावे याचे काही पद्धती विकसित केल्या आहेत. शेतीत काय पेरावं या निर्णयाला बाजाराने कधीच प्रभावित केलं नव्हतं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वर्षभर जगण्यासाठी त्यांची शेती असायची व आजही हाच त्यांचा, शेतीकडे पाहण्याचा मुख्य मुद्दा आहे.

- Advertisement -

पारळ्यातील कांतीलाल मोरे, छबू मोरे, बबन माळी व इतर भिल्ल शेतकरी बांधवाशी चर्चा केली. मुद्दामहून त्यांच्यापुढे, अलीकडे सार्वत्रिक बनत चालेला एक मुद्दा मांडला. म्हटलं, सतरा प्रकारची धान्य कशाला पेरायची. बाजारभाव असलेली व भरघोस उत्पन्न देणारी एक-दोन पिके पेरायची. त्याच्या काढणीची कटकट राहणार नाही न मशागतीचा त्रास. मात्र या निरक्षर असलेल्या शेतकर्‍यांनी या मताला विरोध केला. मिश्रपिके ही कशी महत्वाची आहेत, याबद्दल त्याचं पिढीजात शहाणपण आजही अतिशय महत्वपूर्ण ठरतं. बाजरी पेरताना त्यात मध, मुग्या म्हणजे लहान मुग, तुरी, सूर्यफूल मिसळावे. रब्बीच्या ज्वारीभवती करडी, तीळ पेरावं. गहू व हरभरर्‍यात मोहरी टाकावी. गेल्या वर्षातील अगदीच कमी पडलेल्या पावसामुळे त्यांचा घुंगर्‍या भुईमुग थोडाही पिकला नाही. मात्र चवळी, मुग्या, मठ, बाजरी हे त्यांना जगण्यासाठी मदतीचे ठरली. पारळ्यातील शेतकरीगटांनी गेल्या पाच वर्षात थोड्याप्रमाणात तरी घेतले गेले अशा पिकांची व बांधावरील खाद्य व लागवड केलेल्या वनस्पतींची यादी केली. ही यादी पन्नाशीच्या वर गेली होती. या भिल्ल बांधवांची शेती व शेतीबद्दलचे शहाणपण किती समृद्ध आहे.

अलीकडेच गावी जाताना ट्रेनमध्ये शेतकर्‍यांशी गप्पा झाल्या. या गप्पा पनवेल-नांदेड ट्रेनच्या जनरल डब्यातील होत्या. इकडच्या-तिकडच्या गप्पा करून झाल्या. मग शेतीच्या मुद्यावर चर्चा सुरू झाली. माझ्या नेहमीचा शोधाचा मुद्दा असतो की बदलती पीक पद्धती व त्याची कारणे काय आहेत. सध्या शेतीत काय पेरलं जातं? दहा वर्षां पूर्वीचे पिकं कोणती होती? हाणमंत काशीनाथ शिरसाठ या कुळखेडा(ता. औसा, जिल्हा लातूर) गावातील शेतकरी, त्याचे अनुभव सांगत होता. दहा वर्षापूर्वी त्यांच्या गावात जवळपास चाळीस प्रकारची पिके घेतली जायची. आज हा आकडा निम्म्याहून खाली आलेला आहे. याची वरवरची कारणे अनेक आहेत. वेगवेगळी भरडधान्य ही त्यांची पीक काढण्याची पद्धती परंपरागत आहे. त्याची साळीतून भगर काढण्याची पद्धती तीच जुनी, उकळ आणि मुसळ हेच आहेत. घरातील महिलांना नाचणी, कोदो, कुटकी, राळ याचं भात करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे सहसा ही पिके टाळण्याकडे कल असतो. मात्र ही भरडधान्य (लिटील मिलेट) प्रकारची धान्य वातावरण बदलात तग धरणारी, कमी पावसात येणारी पिके आहेत. ही पिके शेतीत असतील तर शेतीत या वर्षी काहीच पिकलं नाही असं होणारच नाही.

हाणमंत काशीनाथ शिरसाठ यांनी सांगितलेली त्यांच्या गावातील दहा वर्षापूर्वी घेतली जाणारी पिके ऊस, उडीद, भगर, भादली, सूर्यफूल, जवस, मूग, गहू, हरभरा, बाजरी, मका, मटकी, तूर, अंबाडी, तीळ, काळा तीळ, कारळ, एरंडी, रडई, साळ(कळी, मोहरी), हुलगा(भाकरी, जनावरांना भरडा करायचे), मेथी, मोहरी(राई), ज्वारी, बरू( हिरवळीच खत करायचं), वळी, वाटाणा, मसूर, नाचणी, वाळूक, भुईमूग, मिरची, गावरान पेरा कापूस.

शेतीतील विविधता संपली तसेच काही गावरान वाणंही लुप्त झाली. वडिलांनी साधारण सत्तरी-ऐशीच्या दशकातील एक आठवण सांगितली. एक शेरखंडी नावाची ज्वारीचं वाण होतं. एक शेर पेरलं की एक खंडी ज्वारी पिकायची. पाच किलोची एक पायली. सोळा पायलीच एक मन. शेरखंडी प्रमाणे दगडी, डुकरी, कावळी, पोट्टी असे अनेक ज्वारीचे स्थानिक वाण होते. त्याचे बहुविध गुणवैशिष्ठ्ये होती. ही सर्व वाणे बाजारांनी खाल्ली.

गावागावात हुरडा खाण्याची पद्धत रूढ होती. आजच्या हुरडा पार्टीसारखं एक दोन दिवसाचं नाही. साधारण एक दीड महिना शेतातील विस्तव विझत नव्हता. हुरडा भाजण्यासाठी शेतात, जमिनीतील ढेकळं काढून बनविलेली चूल असायची. चुलीत शेणाच्या गौर्‍या. या गौर्‍या हाताने थापलेल्या नसतात. शिवारात गुर्‍हे चरताना टाकलेलं शेन, वाळून तयार झालेल्या गौर्‍या. यामध्ये हुरडा चांगला भाजला जातो. भाजलेल्या कणसाचे दाने, म्हणजे हुरडा काढण्याची कला असते. गरम कणीस हातावर चोळून हुरडा काढला जातो. हे करणारा माणूस बारदान पोत्यावर बसून हुरडा काढून देत असतो. मग कुटुंबातील लोकं, शेजारी तसेच किंवा गुळासोबत हुरडा मनसोक्त खात असत. ज्वारी पेरतानाच, हुरडा खायचं हे निश्चित असायचं, त्यामुळे बियाणाची निवड करताना तशी केली जायची. घुगर्‍यासाठी, लाह्या बनविण्यासाठी, काद्ब्यासाठी, हुरड्यासाठी असं बहुविध उद्देश ठेऊन पेरणी केली जायची. ज्वारी विकणे हा शेवटचा उद्देश असायचा.

मिश्र पाटा खायला नाही तोटा
पाटा म्हणजे ओळी. मिश्र पाटा म्हणजे, अनेक धान्य एकत्रित मिसळून पेरलेल्या ओळी. अशा ओळी हे धुरा किंवा बांधाच्या कडेला पेरलं जातं. बैलाच्या मदतीने, तिफनीवर जेव्हा पेरलं जायचं, तेव्हा बैलही कुटुंबाचा एक सदस्य असायचा. घरातील सर्व सदस्यासारखे बैलांच्या खान्यापिण्याचा विचार केला जायचा. त्यासाठी हा मिश्र पाटा मोलाचा असायचा. यातील भेंडी, अंबाडी हे शेतातील मुख्य पिकावरील किडी पकडून ठेवण्यासाठी ट्रॅप सारखं काम करतात. काही पिके इतर पिकांना आधार देतात. काही वेलवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठीमुळे मातीमधील नत्र वाढते. जूनमध्ये पाटा पेरलं की, साधारण दीड दोन महिन्यांनी हा पाटा वेगवेगळ्या पद्धतीने उत्पन्न द्यायला सुरु करतो.

कधी भाज्या, कधी खाऊ, कधी जनावरांना चारा असं वर्षभर हा समृद्ध पाटा काही काही देत राहतो. आता हा मिश्र पाटा पद्धत बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांनी लोकांच्या आठवणीतूनही हळूहळू निघून जाईल. तेलंगण सीमेलगत घुळा नावाचे गाव आहे. तेथील शेतकरी नारायण मामा यांनी ट्रॅक्टरने पेरणी सुरू झाल्यापासून मिश्र पाटा व थोड्या थोड्या जागेवर वेगवेगळी पिके घेणे बंद झाल्याचे सांगितले. तिफणीने बैलाच्या मदतीने जेव्हा पेरणी केली जायची तेव्हा हे शक्य व्हायचं. पेरणारा किंवा पेरणारी व्यक्ती ओटी बांधून घेऊन त्यात वेगवेगळी धान्य छोट्या प्रमाणात घेऊन पेरायचा, आता हे अवघड बनले आहे.

मिश्र पाटामधील धान्य
1. मका, 2. मऊ ज्वारी, 3. बाजरी, 4. चवळी, 5. भेंडी, 6. काकडी, 7. शेलनी(काकडीवर्गीय एक प्रकार), 8. वाळूक, 9. दोडका, 10. पारस दोडका(गिलके/चोपड/घोसावळे), 11. दुधी भोपळा, 12. कारले, 13. भादली(तृणधान्य), 14. राळा, 15. गोल्या(ज्वारी), 16. गुंजावाळी(ज्वारी), 16. तूर, 17. मुग, 18. उडीद, 19. कारळ किंवा खुरसणी, 20. हावरी किंवा तीळ, 21. अंबाडी 22. पापडी वाल, 23. चवळी, 24. गवार

वरील धान्यापैकी आपल्याला उपलब्ध होतील ते व तितके धान्य एकत्र करून मिश्र पाटा पेरावा. बांधालगत दोन-चार ओळी मिश्र पाटा ज्यांच्या शेतात आहे, त्यांना खायला काही तोटा नसणार हे मात्र निश्चित. गावात पाट्याचे प्रमाण जसे जसे वाढू लागेल, तसे तसे गावातील कुपोषणाचे प्रमाण हद्दपार होईल. या वर्षी असा उपयुक्त पाटा नक्की पेराल अशी अशा.

आज शेतीत पेरलेलं बहुतांशी धान्य हे आपल्याला कच्चे किंवा घरगुती प्रक्रिया करून खाता येणार नाहीत असे असतात. याचा अर्थ आपलं परावलंबन यामधून निश्चित आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. शेतीत काय पेरायचं हे शेतकर्‍याच्या हाताबाहेर जात आहे. काही भागातील शेती थेट करार पद्धतीने बटाटे लावण्यासाठी करार पद्धतीने दिली जात आहे. मात्र या थेट नियंत्रणाच्या पलीकडेही बाजरभाव, बी बियाणे यांच्या माध्यमातून आपली शेती नियंत्रित केली जात आहे. याविरुद्ध लढा द्यायचा असेल तर मिश्र धान्याची शेती केली पाहिजे. शक्यतो याची खात्री केली पाहिजे की, आपल्याला लागणारं धान्य व भाजीपाला आपल्या शेतात असेल. हे अशक्य नाही. एका मोठ्या लाटेमध्ये आपण हे सर्व करणं सोडलं आहे. शेतीचा अर्थ आणि पद्धत नव्याने ठरवायला हवं.

मोसमी पाऊस उंबरट्यावर आलाय. आठवडाभरात पेरणीची घाई सुरू होईल. हा पेरा कशासाठी करायचा हे पुन्हा एकदा पक्कं करायची गरज आहे. बाजारव्यवस्था चालण्यासाठी किंवा बाजाराच्या आमिषांना बळी पडून पेरणी करणं टाळायला हवं. बाजारभाव लक्षात घेऊन काही पिके घेण्याचे निश्चित करीत असला तरी हरकत नाही, मात्र त्यापूर्वी आपलं अन्न, आपलं आरोग्य, आपलं जीवन यासाठीचं पेरा निश्चित करा. अगदी काही गुंट्यामधील का असेना. घरासाठी लागणारे धान्य, भाजीपाला, काकडी, वाळूक, शेरनी, गाजर सारखं खाऊ, इत्यादीसाठी आधी जागा निश्चित करा. मग उरलेली शेती बाजारासाठी ठेवा. आपला पेरा जगण्यासाठी असायला हवा.

-बसवंत विठाबाई बाबाराव

-(लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -