घरफिचर्ससंपादकीय : भारत विकसित हो रहा है।

संपादकीय : भारत विकसित हो रहा है।

Subscribe

भारताला गारुडी, दरवेशींचा देश म्हणून सातत्याने हिणवले गेले आहे. ‘विज्ञानापासून कोसो मैल दूर राहणार्‍या भारतातील श्रद्घाळूंना इंग्रजांच्या समपातळीवर येण्यासाठी कित्येक शतके लागतील’, अशी हीन भाषा माईक अँडरसन नावाच्या ब्रिटिश इतिहासकाराने वापरली होती. या देशावर राज्य करणार्‍या इंग्रजांना देशातील बुद्धीमत्तेची कल्पना नव्हती, कारण अँडरसनने भारतीयांना हीन लेखले नव्हेतर या देशातील बुद्धीमत्तेला खालच्या पातळीवर पाहिले होते. आज अँडरसन नसला तरी त्याची भविष्यवाणी बुद्धीमान भारतीयांनी खोटी ठरवली. देशातून ब्रिटिश राजवट नाहीशी होण्याला एक शतकही अद्याप लोटलेले नाही. मात्र, भारताने केवळ ब्रिटनलाच नव्हेतर देशातील अनेक देशांना आज मागे टाकले आहे. विशेषत: अवकाश संशोधन क्षेत्रात तर ब्रिटन भारताच्या जवळही नाही. याचे श्रेय अर्थातच भारतीय अवकाश संशोधन संस्थेला जाते. या संस्थेतील शास्त्रज्ञांनी, मागील काही वर्षांत ‘न भूतो न भविष्यती,’ अशी क्रांती अवकाश संशोधन क्षेत्रात केलेली आहे.
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह १९७५ साली रशियाच्या मदतीने भारताने अवकाशात सोडला होता. त्याचे प्रक्षेपण हे संपूर्ण भारतासाठी गौरवाची गोष्ट होती. मात्र, आर्यभट्ट हा भारताचा उपग्रह जरी असला तरी त्यात भारताचे स्वत:चे असे काहीच नव्हते. तो उपग्रह रशियाच्या मदतीने तयार करण्यात आला होता आणि रशियाच्या प्रक्षेपण यानावरून अंतराळात त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात भारताचे स्वत:चे असे काहीच नसले तरी त्या उपग्रहाने भारतीयांची अवकाश संशोधन क्षेत्रात पाहण्याची दृष्टी बदलली.अवकाश संशोधनात काम करू इच्छिणार्‍यांना नव्या आशा-आकांक्षांची उभारी देण्याचे काम आर्यभट्ट या उपग्रहाने निश्चितच केले. तोपर्यंत भारत अवकाश संशोधन क्षेत्रात प्रवेश करू शकतो का, अशी शंका प्रत्यक्षात भारतीयांनाही होती. दुसरे म्हणजे भारतासारख्या गरीब देशाला असे उपग्रह प्रक्षेपित करणे जमेल का? आणि जमलेच तर त्यासाठी पैसे कुठून आणणार? देशातील जनतेला दोन वेळचे खायला नाही आणि अवकाशात कशाला भरारी मारता,अशी टीका आर्यभट्ट प्रक्षेपित झाला तेव्हा देशातील विरोधी पक्षांनीच केली होती. मात्र, मागील दोन दशकांपासून देशाचा आणि देशातील जनतेचा एकंदरीत अवकाश संशोधन क्षेत्रातील दृष्टीकोन बदलला आहे. अवकाशातील उपग्रहांचा देशांतर्गत दळणवळण, संरक्षण, हवमानाचा अंदाज आणि दूरसंचाराच्यादृष्टीने असलेला उपयोग आज देशातील सर्वसामान्य जनताही जाणते आहे, अशावेळी भारताने अवकाश क्षेत्रात अधिकाधिक यशस्वी संशोधन करण्याकडे प्रत्यक्ष जनतेची आस्था वाढत आहे. त्यादृष्टीने भारताची अवकाश संशोधन संस्था, इस्रोने केलेली कामगिरी ही जगातील अनेक प्रगत राष्ट्रांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. साधारणत: १९८० च्या दशकात इस्रोने भारताचा स्वत:चा अग्नीबाण म्हणजेच पीएसएलव्ही किंवा प्रक्षेपण यान बनवण्याचे काम सुरू केले. हे इस्रोच्यादृष्टीने एक मोठे आव्हान होते, कारण प्रक्षेपण यान तेही कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय बनवणे सोपे नाही. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानासोबतच अनेक वर्षांची कठोर तपश्चर्या आणि भरपूर निधीची आवश्यकता असते. मात्र, कधी सरकारच्या अनास्थेतून मार्ग काढत तर कधी सरकारच्या मदतीने इस्रोने आपले हे काम सुरू ठेवले. डॉ. अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ त्यासाठी अहोरात्र झटत होते. इस्रोने सन १९८० साली, त्यासाठी आवश्यक असे तंत्रज्ञान विकसित करण्याचा तो प्रकल्प सुरू केला. पहिली पीएसएलव्हीची प्रथम प्रक्षेपण चाचणी सन १९८७ मध्ये घेतली गेली, त्यानंतरच्या तीन चाचण्या १९८८, १९९२ आणि सन १९९४ मध्ये घेतल्या. त्याच्या अकार्यान्वयनापूर्वी, २ चाचण्या यशस्वी राहिल्या. त्याचे फलित असे की, भारत उपग्रह प्रक्षेपण यान यशस्वीरित्या अवकाशात पाठवू शकतो, हे सिद्ध झाले. आज भारताने उपग्रह प्रक्षेपण यान क्षेत्रात मोठे कौशल्य प्राप्त केले आहे. भारत केवळ आपलेच नव्हेतर जगभरातील अन्य देशांचे उपग्रहही आपल्या यानातून अवकाशात नेत आहे. इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये ‘इस्रो’ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्वविक्रमाची नोंद केली होती. हे वाहन संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून, इस्रोने बनवले आहे. पीएसएलव्ही हे भूस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ उपग्रह इस्रोने अवकाशात यशस्वीरीत्या पाठवले आहेत. भारत इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात उपग्रह आपल्या प्रक्षेपण यानाच्या मदतीने अवकाशात सोडतो. त्यामुळे अनेक देश आज त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारताकडे रांग लावून बसलेले आहेत. उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्यानंतर इस्रोने मागील काही वर्षांत नव्या अवकाश क्षेत्रात हात घातला. अवकाशात क्षेपणास्त्राचा मारा करून उपग्रह अवकाशातच नष्ट करण्याचे कौशल्य भारताने प्राप्त केले. आगामी कालावधीत हे अवकाश युद्धाचा भाग आहे. यापुढे युद्ध अवकाशात लढली जाणार असे म्हटले जाते. हे कौशल्य जगभरात अमेरिका, रशिया, चीन या देशांकडेच होते. चीनने तर भारताचा एक उपग्रहही याच तंत्रज्ञानाचा वापर करून पाडला असे म्हटले जाते. ते तंत्र भारताने विकसित केले. या तंत्रज्ञानाने भारताला अवकाश संशोधनात एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले. आता तर भारत मानवरहित अवकाश संशोधन मोहिमांची तयारी इस्रोने सुरू केली आहे. त्यासाठी आगामी काळात भारताचे अवकाश स्टेशनही उभारण्याचा विचार इस्रो करत आहे. चांद्रयान-१ मोहिमेच्या यशानंतर चांद्रयान-२ ही मोहीमही हाती घेण्यात आली आहे. लवकरच शुक्र आणि सूर्याची मोहीमही हाती घेण्यात येणार आहे. या सर्व मोहिमा भारताच्या विकासाच्यादृष्टीने आवश्यक आहेत. इंग्रजांना या देशातून हाकलून दिल्यानंतर अवघ्या पाऊणशे वर्षांत भारताने केलेली ही प्रगती, भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलायला लावणारी आहे. तसेच देशातील तरुणांना संशोधन आणि रोजगाराच्या दिशेने उघडलेले नवे दालन आहे. आजही अशा मोहिमा कशासाठी असा सूर देशात उमटतो. मात्र, त्याचा जोर निश्चितच कमी झाला आहे. कारण देशातील सर्वसामान्य जनताही अशा अवकाश मोहिमांचे महत्त्व जाणून आहे. त्यांची ती आपुलकीने चौकशी करताना दिसत आहे. हमारा भारत बदल रहा है। विकसित हो रहा है।

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -