घरफिचर्ससंपादकीय : बौद्धिक बेशिस्तीला जॅमर बसवा

संपादकीय : बौद्धिक बेशिस्तीला जॅमर बसवा

Subscribe

नाटकाचा प्रयोग भर रंगात आलेला असतो, मायबाप प्रेक्षकही नाटकात पूर्णत: तद्रुप झालेले असतात आणि मध्येच प्रेक्षागृहातून मोबाईलची रिंग वाजते. अनेकांना ती तातडीने बंदही करता येत नाही. मग ऐन भरात आलेल्या प्रयोगाची रंगत उडते. सार्‍यांचा रसभंग होतो. तोपर्यंत हे महाशय मोबाईलवर बोलण्यासाठी सभागृहातच धावपळ करतात. नाट्यगृहाचे दरवाजे जोरजोरात उघड-बंद करून कलाकारांनाही व्यत्यय आणतात. अशा बेजबाबदार प्रेक्षकांमुळे नाट्यप्रयोगात येणार्‍या व्यत्ययाबाबत विंगेतून नेहमीच नाराजीचा सूर ऐकू येतो.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ प्रयोगात असाच व्यत्यय आला. त्यामुळे अभिनेता सुमीत राघवनने काही वेळासाठी नाट्यप्रयोग थांबवला. जे खरोखरच नाट्यानंद घेण्यासाठी आले होते, त्यांचा विचार करून सुमीतने समजदारीची भूमिका घेत प्रयोग पूर्ण केला. यानंतर सुमीतने केलेली कृती योग्य की अयोग्य यावर चर्चा झडू लागल्या. ‘कितीही गोंधळ असला तरी डोंबारी आपला खेळ करतोच ना. मग तुम्ही नाटक का करू शकत नाहीत’ किंवा ‘प्रेक्षकांच्या जिवावर मोठे होता,’ असा अनाठायी युक्तीवाददेखील यानिमित्तानं काहींनी केला. सुमीतने नाटक थांबवण्याचं कारण देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. ‘आय स्टॅण्ड बाय सुमीत राघवन’ या हॅशटॅगने चळवळही सुरू झाली आहे. त्यातून अनेकविध पर्याय समोर येत आहेत. जेणेकरून नाटक सुरू असताना व्यत्यय येणार नाही.

- Advertisement -

तेंडुलकरांच्या ‘वैर्‍याची रात्र’ या एकांकिकेत स्वत:च्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला चित्रविचित्र प्रेक्षकांनी त्रस्त झालेला लेखक अफलातून दाखवलेला आहे. त्याची आठवण व्हावी असे प्रकार नाट्यचळवळीला बळकटी देणार्‍या मुंबई आणि पुण्यातही वारंवार घडत असतात. अशावेळी संबंधित कलाकारांनी आपापल्या परीने नाराजीदेखील व्यक्त केली आहे. विक्रम गोखले प्रयोग चालू असताना मोबाईल वाजला की नेहमीच थांबतात. वैयक्तिक जॅमर लावून नाटक सुरू करणारे कदाचित ते पहिले कलावंत असावेत. ऐश्वर्या नारकरची भूमिका असलेल्या ‘सोयरे सकळ’ या नाटकाचा प्रयोगदेखील बडबड्या प्रेक्षकांचा त्रास असह्य झाल्यावर थांबवण्यात आला होता. अशा प्रसंगांवेेळी प्रशांत दामले आपल्या मिश्किल स्वभावातून प्रश्न सोडवत असल्याचा अनुभव अनेक नाट्यप्रेमींनी घेतलाय. प्रयोग सुरू असताना एखादं लहान मूल रडत असेल तर त्या नाटकातल्या एखाद्या पात्राचं नाव घेऊन ‘अरे, तू लहान मुलाच्या आवाजात का रडतोयस’ अशी टिप्पणी करतात. म्हणजे आपोआप त्या प्रेक्षकाला कळतं, पण सर्वच कलाकार दामले असतील असं नाही. अनेकांचं अशावेळी लक्ष विचलित होतं.

खरं तर, प्रेक्षागृहातील आवाज रंगमंचापर्यंत पोहचणं हीच लाजीरवाणी बाब आहे.मोबाईल निरक्षरतेतून ही समस्या अधिक ठळकपणे अधोरेखित होतेय. नाटकाला येणार्‍या आजी-अजोबांना मोबाईलची रिंग सायलेंट कशी करावी याचा गंध नसतो. त्यांना कॉल रिसिव्ह कसा करायचा याचंच ‘प्रशिक्षण’ दिलेलं असतं. त्यातून मग असा गोंधळ होतो. ‘नॉक नॉक..’च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याची सूचनाही नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिका सभागृहात नुकतीच मांडली, पण महापालिकांच्या सभागृहात जॅमर लावले म्हणून तेथे मोबाईल कॉल येणं बंद झालं का? तर नाही. बदलत्या तंत्रज्ञानामुळे वेळोवेळी नवीन फ्रिक्वेन्सीचे जॅमर अशा सभागृहांत लावणं गरजेचं असतं, परंतु इतक्या वेळा जॅमर बदलणंही परवडणारं नसतं. ‘छापा-काटा’, ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या दोन नाटकांवेळी नाट्यगृहात जॅमर लावला जात होता, पण फ्रिक्वेन्सीच्या भानगडीत हा प्रयोगही यशस्वी होईलच याची शाश्वती नसते. शिवाय रसिक नाट्यप्रयोगाला येतो म्हणजे, त्याने जगाशी संपर्क तोडूनच टाकावा असंही म्हणता येणार नाही.

- Advertisement -

आपत्कालीन परिस्थितीत प्रेक्षकांना मोबाईल कॉल येणं स्वाभाविक आहे. अशावेळी जॅमर लावलेले असेल तर वेळेवर निरोप न मिळण्यातून अघटीत घडू शकतं. बॅक स्टेज आर्टिस्टला अनेकवेळा महत्त्वाच्या कामांसाठी कॉल येत असतात. म्हणूनच केवळ नाट्यगृहांत जॅमर बसवून हा प्रश्न सुटणार नाही. अर्थात व्यत्यय केवळ मोबाईल संभाषणानेच येतो का? कानगप्पा, चपलांचा आवाज, खाद्यपदार्थांच्या रॅपरचा आवाज आणि अशा अन्य असंख्य बाबींमुळे व्यत्यय येत असतो. पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येऊ नये, हेदेखील विशेष. कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना. काही मंडळी लहान बाळ घेऊन प्रयोगाला येतात… कोंदट आणि अंशत: एसी चालू असलेल्या प्रेक्षागृहात ते बाळ रडायला लागते. मग थोडा वेळ आई आणि बाबांपैकी एक जण दुसरा घेऊन जाईल म्हणून वाट पाहतात. आवाज वाढल्यावर इतर प्रेक्षकांच्या दबावाचा अंदाज घेऊन दोघांपैकी एक जण पोराला घेऊन उठतो. तोपर्यंत सर्वांची १०/१५ मिनिटं वाया गेलेली असतात.

एक वर्ग असाही असतो की, नाटकाच्या उत्कंठावर्धक क्षणावेळीच मोठ्याने भविष्य वर्तवून मोकळा होतो. जसं आता तो तिला मारणार.. ती मेलीच नसेल वगैरे. समोर प्रयोग चालू असताना आपण त्याचा काहीएक मान राखायचा असतो याची जाणच काही प्रेक्षकांना मुळात नसते. ‘पैसे देऊन आलोय’ अशीच उपकाराची भाषा त्यांच्याकडून वापरली जाते. म्हणूनच सभागृहाला नव्हे तर प्रेक्षकांच्या बौध्दिक बेशिस्तीला जॅमर बसवण्याची गरज आहे. रसग्रहण करण्याची मानसिकता प्रेक्षकांची बदलली तरी या प्रश्नाची तीव्रता बर्‍यापैकी कमी होऊ शकते. मायबाप प्रेक्षकांमुळे नाटक चालत असलं, तरी त्यातल्या कलाकारांमुळे तो प्रयोग रंगतो. म्हणूनच आपल्यामुळे नाटकात व्यत्यय येणार नाही याची खबरदारी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे. यात नाट्यगृह प्रशासन काही करू शकत नसलं, तरी प्रेक्षकांनी आपली बांधिलकी जपली पाहिजे. मुळात मल्टिप्लेक्सच्या जमान्यात नाटकाला जिवंत ठेवण्याचं अवघड काम नाट्यकलावंत करत असतात. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी या प्रयत्नांना केवळ दाद नव्हे तर कृतीशील साथ देणं क्रमप्राप्त ठरतं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -