घरफिचर्सकरूया पर्यावरणाचे संवर्धन

करूया पर्यावरणाचे संवर्धन

Subscribe

पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी. बुद्धीच्या बळावरच मानवाची आदिमानव ते आधुनिक युगातील मानव अशी प्रगती झाली. मानवाच्या प्रगतीमध्ये पृथ्वीवरील पर्यावरणातील जवळपास सर्वच घटकांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, प्रगतीच्या हव्यासासाठी मानवाला या घटकांच्या अस्तित्वाचा विसर पडला. त्यामुळं या घटकांचे पृथ्वीवरील अस्तित्व धोक्यात आले असून, त्यांच्या संरक्षणार्थ व संवर्धनार्थ पर्यावरण दिनाचे विशेष महत्त्व आहे.

१९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सुरुवातीपासूनच मानव प्रगतीसाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहिला. स्वतःची प्रगती होत असताना पर्यावरणातील इतर सजीव, निर्जीव घटकांवर होणार्‍या परिणामांकडे मानवाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

- Advertisement -

औद्योगिकीकरण, कारखानदारी, विविध शोध यामुळे प्रदूषणरूपी राक्षसाने डोके वर काढले. या राक्षसाचा सामना करताना मानवाला आज विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे मानवासह पृथ्वीवरील सर्वच सजीव निर्जीव घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ सारख्या समस्या आज मानवाच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत, पण या परिस्थितीला मानव स्वतःच जबाबदार आहे. त्याची जाणीवही त्याला झाली आहे. जागतिक पर्यावरण दिन आज जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. प्रत्येक नागरिकांच्या मनात पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणे, तसेच यामध्ये संपूर्ण राष्ट्राचे प्रबोधन करणे यासाठी पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. आज विविध विकासकामांसाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे.

परिणामी कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना होणार्‍या वृक्षतोडीवर लगाम लागणे गरजेचे आहे. कारखाने, उद्योगधंद्यांमधून निघणारे सांडपाणी, टाकाऊ माल आज बिनदिक्कत नदी, ओढे, तलावांमध्ये सोडून देण्यात येत आहेत. या मानवी कृतीमुळे जल प्रदूषण तर होतेच, पण त्याहून या पाण्यावर अवलंबून असणार्‍या इतर सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कारखान्यातून निघणारे सांडपाणी, इतर टाकाऊ घटकांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लागणे गरजेचे आहे.

- Advertisement -

कारखान्यांच्या धुरांड्यांमधून निघणारे विषारी वायू हे वायू प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. मात्र, याकडे कानाडोळा केला जातो. परिणामी अशुद्ध हवेचा जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. त्यास आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही माणूस कळत नकळत पर्यावरणाची हानी करत असतो. कचर्‍याचे वर्गीकरण न करणे, रस्त्यात कोठेही कचरा फेकणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अमर्याद वापर करणे, वृक्षतोड यासारख्या मानवाच्या सवयी पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत. तेव्हा पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या सवयीमध्ये बदल करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -