घरफिचर्सविजय सामन्यातला आणि जीवनातला

विजय सामन्यातला आणि जीवनातला

Subscribe

एस्केप टु व्हिक्टरी

फुटबॉलपटूंचा उत्साह आणि सामना जिंकण्याची त्यांची जिद्द पाहताना नकळत आपणही त्यांच्यासारखाच विचार करू लागतो. त्यामुळे त्यांचा पलायनाचा बेत यशस्वी होऊन त्यांची सुटका व्हायलाच हवी असे वाटायला लागते. जर्मन नाझी अधिकार्‍यांचा क्रूरपणा आणि स्थितप्रज्ञताही त्यांच्याबद्दल चीड आणते आणि तेच अभिनेत्यांचे आणि दिग्दर्शकाचे ‘एस्केप टु व्हिक्टरी’ या चित्रपटातील कौशल्य आहे.

सगळीकडे फुटबॉलचा हंगाम सुरू झाला आहे. वातावरण फुटबॉलमय झाले आहे. विश्वचषक फुटबॉलचे पात्रता फेरीचे सामने भारतही खेळतोय. त्यामुळे सर्वांना फुटबॉलबाबत उत्सुकता वाटू लागली आहे. भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी! फुटबॉलचाच सामना मध्यवर्ती असणारा एक चित्रपट होता, ‘एस्केप टु व्हिक्टरी’ हा युद्धपट. त्यामध्ये फुटबॉल सामन्याचा सुरेख वापर करून घेण्यात आला होता. अमेरिकन दिग्दर्शक जॉन ह्यूस्टन यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. जर्मनीच्या ताब्यातील दोस्त राष्ट्रांच्या युद्धकैद्यांनी केलेल्या पलायनाबाबतचा, 1981 मध्ये आलेला हा चित्रपट कित्येकांना आजही आठवत असेल. जर्मनीच्या तुरुंगातील युद्धकैदी आणि जर्मन संघ यांच्यात प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आलेला असतो आणि त्यानंतर जे काय घडते, त्याची उत्कंठा प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवते. या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून पाहात होते. कारण त्यात प्रमुख कलाकारांबरोबर सर्वश्रेष्ठांत समावेश असलेले पेले, बॉबी मूर, वेर्नर रॉथ वगैरे ख्यातनाम फुटबॉलपटूही होते.

- Advertisement -

जर्मनीच्या कैदेतील दोस्त राष्ट्रांच्या कैद्यांंच्या संघाला फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचे इंग्लिश कॅप्टन जॉन कॉल्बी, हा वेस्ट हॅम संघाकडून त्याला खेळलेला व्यावसायिक फुटबॉलपटू मान्य करतो. प्रशिक्षणानंतर कैद्यांचा प्रदर्शनीय सामना जर्मन संघाबरोबर होणार असतो. पण हा जर्मन प्रचाराच्या खटाटोपाचा -प्रॉपगंडाचा भाग आहे, हे कॉल्बीला उमगते. कॉल्बी संघाचा कर्णधार, व्यवस्थापकही आहे. तोच संघाची निवड करतो. दुसरा युद्धकैदी रॉबर्ट हॅच, अमेरिकन आहे. तो कॅनेडियन लष्करातील आहे. प्रथम त्याची निवड कैद्यांच्या संघात केली जात नाही, पण तो कॉल्बीची मनधरणी करतो. अखेर कॉल्बी त्याला संघाचा प्रशिक्षक-ट्रेनर-म्हणून नियुक्त करतो. हॅचला हे हवे असते, कारण त्याला सामन्याच्या आधारेच कैदेतून निसटून जाण्याच्या योजनेनुसार संघाबरोबरच राहणे गरजेचे असते.

कॉल्बीचे वरिष्ठदेखील त्याला या सामन्याचा कैदेतून निसटण्यासाठी उपयोग करून घे, म्हणून त्याला सारखा त्याला आग्रह करत असतात, पण तो मात्र त्यांना सतत नकार देतो. त्याला भीती वाटत असते की, यात सर्व खेळाडू मारले जातील. दरम्यान, हॅचही स्वतंत्रपणे निसटून जाण्याच्या प्रयत्नाची आखणी करत असतो. कॉल्बीचे वरिष्ठ हॅचला मदत करण्याचे मान्य करतात. परंतु त्यांची अट असते की, त्याने सुटका करून घेतल्यावर पॅरिसला जाऊन फ्रान्समध्ये जर्मनीविरुद्ध काम करणार्‍या गटाला भेटावे. त्यांनी फुटबॉलपटूंना निसटून जाण्यासाठी मदत करण्याचा आग्रह धरावा.

- Advertisement -

हॅच छावणीतून निसटून जाण्यात यशस्वी होऊन पॅरिसला जातो. तेथे जर्मनीविरोधी गटाला भेटतो. त्यांना हा बेत धोक्याचा वाटतो. पण जेव्हा कळते की, हा सामना कोलंबस स्टेडियम येथे होणार आहे, तेव्हा ते खेळाडूंच्या स्नानगृहापासून पॅरिसच्या मैलावाहक यंत्रणेच्या भुयाराचा वापर करून निसटण्याची योजना तयार करतात. नंतर ते हॅचला तू पुन्हा पकडला जा, म्हणजे तुला ही योजना कैद्यांच्या छावणीतील ब्रिटिश अधिकार्‍यांना आणि कैदी खेळाडूंना सांगता येईल, हे पटवून देतात.
हॅच खरोखरच पकडला जातो, परंतु आता कैदेत असताना त्याला सर्वांबरोबर नाही, तर एकांतवासात ठेवण्यात येते. अर्थातच कैद्यांना आपल्या नियोजित सुटकेच्या योजनेची आखणी झाली आहे का नाही, हे समजत नाही. त्यामुळे कॉल्बी जर्मनांना मला हॅच मदतीला हवा आहे, शिवाय तो आमचा राखीव गोलरक्षकही आहे आणि आमच्या गोलरक्षकाचा हात दुखावलेला आहे, असे सांगतो. तेवढ्यासाठी त्याला खरोखरच मूळ गोलरक्षकाचा हात मोडावा लागतो. कारण जर्मनांना हॅचला संघात धाडण्याआधी पुरावा हवा असतो. हॅच संघात सामील होतो. अखेर युद्धकैदी छावणीतून सामना खेळण्यापुरते बाहेर पडतील. त्यांना सामन्यानंतर पुन्हा छावणीत पाठवण्यात येईल, असे ठरते.

जर्मनविरोधी गटाचे भुयाराची खोदाई करणारे खेळाडूंच्या स्नानगृहापर्यंत पोहोचतात. मध्यंतराच्या वेळातच हॅच निसटण्यासाठी निघतो, पण बाकीचे त्याला आपण 4-1 अशा पिछाडीवर असलो, तरी हा सामना जिंकू शकतो असे सांगून थांबायचा आग्रह करतात. सामन्याचे अधिकारी अतिशय पक्षपाती असल्यामुळे जर्मन खेळाडू मुद्दामच प्रतिस्पर्ध्यांना जखमी करतात. सामन्याचे अधिकारी पक्षपाती असल्यामुळे जर्मनांना शिक्षा करत नाहीत. अखेर लुइस फानार्र्डिस, कार्लोस रे आणि टेरी ब्रॅण्डी यांच्या कमालीच्या प्रयत्नांमुळे सामना बरोबरीत सुटतो. गोलरक्षक म्हणून हॅच चांगल्या कामगिरीने अनेकदा बचाव करतो, शेवटी तो पेनल्टी किकही थोपवतो. सामना 4-4 बरोबरीत संपतो. पण आधी दोस्त कैद्यांच्या संघाचा एक गोल विनाकारण चुकीचा दिलेला असतो त्यामुळे ते 5-4 असे विजयी होतात, असे प्रेक्षक समजतात. त्यांना हॅचने गोल अडवल्यानंतर प्रेक्षकांनी मोठमोठ्यांदा विजय विजय असा जल्लोष केल्यामुळे झालेल्या गोंधळाचा फायदा कैद्यांना घ्यायचा असतो. त्यांचा तो बेत यशस्वी होतो.

चित्रपटाचा काळ हा युद्धाच्या सुरुवातीलाच जर्मनीने फ्रान्सवर ताबा मिळवल्यानंतरचा, साधारण 1941-42 चा आहे. त्यामुळे कॉर्पोरल लुइस-हा त्रिनिदादचा दाखवण्यात आला आहे. कारण त्याची भूमिका ब्राझीलच्या पेलेने केली असली, तरी ब्राझील त्यावेळी युद्धात सामील झाला नव्हता. (तो 1943-44 मध्ये दोस्तांच्या फौजांत सामील झाला.) त्याचप्रमाणे अर्जेंटिनाचा ओस्वाल्डो याने केलेली कार्लोस रे ही व्यक्तिरेखा कोणत्याही देशाची दाखवण्यात आलेली नाही. कारण अर्जेंटिना युद्धात तटस्थ होता. या दोघांबरोबर इतरही अनेक व्यावसायिक फुटबॉलपटू यात होते. बॉबी मूर हा टेरी ब्रँडीच्या भूमिकेत होता. इंग्लंडच्या विश्वचषक फुटबॉल विजेत्या संघातील प्रख्यात गोलरक्षक गॉर्डन बँक्स आणि अ‍ॅलन थॅचर यांनी प्रत्यक्ष भूमिका केली नाही, तरी त्यांनी हॅचच्या गोलरक्षणाच्या प्रसंगांसाठी खूप मदत केली. सामन्याचे चित्रण एवढे सुरेख झाले होते की, ‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड’ने या सामन्याचे चित्रण जेरी फिशर याने दुसर्‍या युनिटचे दिग्दर्शक रॉबर्ट रिगर यांच्या मदतीने अगदी अप्रतिम केले आहे, असे म्हटले होते. प्रत्यक्ष सामन्याच्या चित्रीकरणाच्या वेळी केविन बीटलने मायकेल केन आणि पॉल कूपरने सिल्वेस्टर स्टॅलन यांचे डमी म्हणून काम केले.

जॉन कॉल्बीची भूमिका मायकेल केनने तर रॉबर्ट हॅचची सिल्वेस्टर स्टॅलनने प्रभावी केली आहे. पलायनाबाबतचे त्यांचे मतभेद आणि वाद, कॉल्बीचा जरासा हट्टी स्वभाव, तर कार्लोस रेने आपले म्हणणे त्याला पटवून देण्यासाठी केलेली खटपट, हे सारे प्रसंग बघताना आता पुढे काय, याबाबतची उत्सुकता वाढत राहते. फुटबॉलपटूंचा उत्साह आणि सामना जिंकण्याची त्यांची जिद्द पाहताना नकळत आपणही त्यांच्यासारखाच विचार करू लागतो. त्यामुळे त्यांचा पलायनाचा बेत यशस्वी होऊन त्यांची सुटका व्हायलाच हवी असे वाटायला लागते. जर्मन नाझी अधिकार्‍यांचा क्रूरपणा आणि स्थितप्रज्ञताही त्यांच्याबद्दल चीड आणते आणि तेच अभिनेत्यांचे आणि दिग्दर्शकाचे कौशल्य आहे.

कॉल्बी खेळाडूंना शिकवत असतो आणि ते एकाग्रतेने ऐकत असतात. डावपेचाचा वापर कसा करायचा हे सांगताना तो फळ्यावर आकृती काढून त्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या जागा दाखवतो. चेंडू तुमच्याकडे आला तर सहकार्‍याकडे पास देऊन तो सोपवायचा त्याने आणखी पुढच्याकडे आणि शेवटी प्रतिस्पर्ध्यावर गोल होईल, असे तो त्यावर रेघा मारून सांगतो. सर्वजण एकाग्रतेने बघत असतात. नंतर कॉल्बी त्यांना विचारतो की, कुणाला काही सांगायचंय का? तेव्हा लुइस (पेले) फळ्यापाशी जाऊन त्याला आपण कशा प्रकारे गोल करू हेे दाखवतो आणि ते बघताना आपल्याला हसू तर येतेच, पण थक्क व्हायला होते. कारण तो कुणालाही पास न देता आपण मध्ये येणार्‍या खेळाडूंना चकवून चेंडू कसा पुढे नेऊ, हे नागमोडी रेघांच्या सहाय्याने दाखवतो. ते पाहून सर्वजण चाट होतात. आपल्यालाही जाणवते की फक्त पेलेच हे करू शकतो!

भुयार खणून ते खेळाडूंच्या स्नानगृहापर्यंत कसे येते, खेळाडूंवर दडपण कसे असते, त्यांना एकीकडे पलायनाची उत्कंठा लागलेली असतेच, पण त्याचबरोबर खर्‍याखुर्‍या खेळाडूंप्रमाणे ते सामना अर्धवट सोडायला, कसा नकार देतात, हे सारे चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांच्या जल्लोशाचा फायदा घेऊन ते जर्मन संघातील खेळाडूंना स्नानगृहात कोंडून ठेवतात, स्नानगृहाबाहेर त्यांनी काढून ठेवलेले जर्मनांचे कपडे घालूनच मोटारीत बसण्यासाठी बाहेर येतात. या वेशांतरामुळे त्यांच्याबाबत युद्धकैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुणाही पहारेकर्‍याला संशय येत नाही. हे युद्धकैदी मग जर्मन संघाला नेण्यासाठी आलेल्या मोटारीतून कसे पसार होतात, हे पाहताना त्या खेळाडूंवर या सार्‍या करामती करताना किती अडपण आली असेल, हे आपल्यालाही जाणवते आणि त्यांचा पलायनाचा बेत यशस्वी हाताच आपणही सुटकेचा निश्वास सोडतो, यातच सारे काही आले.

आता हे सारे खरेच झाले का, असे कसे होऊ शकेल, अशा शंकाही कुणाच्या मनात येतील. त्यांच्यासाठी सांगायला हवे की, ही कथा एका वास्तवावर आधारलेली आहे. जर्मन फौजांनी ज्यावेळी युक्रेनचा ताबा घेतला होता, तेव्हा अशा प्रकारचा सामना झाला होता आणि त्यात एफ.सी. डायनॅमो कीव्हने जर्मन सैनिक संघाचा पराभव केला होता. एका आख्यायिकेप्रमाणे जर्मन संघ पराभूत झाल्यानंतर सर्व युक्रेनियन खेळाडूंना ठार करण्यात आले होते. म्हणून या सामन्याला ‘डेथ मॅच’ असे नाव पडले होते. यातील सत्याचा भाग असा की युक्रेनियन संघाने एक सामना नाही, तर सामन्यांची मालिकाच खेळली होती. त्या मालिकेतील प्रत्येक सामन्यात ते विजयी झाले होते. त्यानंतर त्या खेळाडूंना गेस्टॅपोंनी पुन्हा कैदखान्यात टाकले. चार युके्रनियन खेळाडूंना जर्मनांनी ठार केले, हे खरे आहे, पण हा प्रकार ते सामने संपल्यानंतर खूप दिवसांनी झाला होता. यावर हंगेरीमध्ये एक चित्रपट 1961 मध्ये निर्माण करण्यात आला होता. त्याचे नाव इंग्रजीत ‘टू हाफ-टाइम्स इन हेल’ असे होते. त्यावरूनच हा चित्रपट तयार केला गेला.असे हे विजयी पलायन, तेही फुटबॉल सामन्याचा आधार घेऊन! कितीदाही पाहिला तरी कंटाळा येत नाही. फुटबॉलप्रेमींसाठी तर हा चित्रपट ही मेजवानी आहेच, पण इतरांनाही त्यामुळे खेळाची गोडी वाटू लागेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -