घरफिचर्सबॉलिवूडच्या टोळ्या

बॉलिवूडच्या टोळ्या

Subscribe

बॉलिवूडला आपल्या तीर्थरुपांची जहागीर समजून काही स्टारपुत्रांच्या टोळ्या खुलेआम धमक्या देतात, दुसर्‍यांना सिनेमे मिळू नयेत यासाठी आडकाठी आणतात. सध्या ही मक्तेदारी बरीच वाढली आहे. करण जोहरपासून अनुराग कश्यपपर्यंत प्रत्येकाचे काही गट आहेतच. कारण त्याशिवाय तुम्ही इथे सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. टॅलेंटपेक्षा स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची ही वृत्ती अलीकडे फोफावते आहे, जनता कोण स्टार बनविणारी ? आम्ही ज्यांना दाखवू तेच स्टार बनतील ही मग्रुरी पाहायला मिळाली. हीच मग्रुरी आता त्यांना महागात पडणार आहे. जनतेच्या मनात याचविषयी राग आहे, जो आता सर्वत्र दिसतोय. येणार्‍या काळात फिल्म कोण करतंय ही बाब महत्वाची ठरेल, किमान पुढचे काही महिने तरी अनेक स्टार कीड ब्लॅकलिस्टमध्ये जातील. सुशांत-नेपोटीजम आणि करोना या तीनही बाबी बॉलिवूडवर मोठा प्रभाव पाडतील.

आपल्याला राग कधी येतो? जेव्हा काही मनासारखं घडत नाही किंवा जेव्हा आपल्याशी खोटं बोललं जातं. ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास खोटा ठरतो तेव्हा राग येतोच. माणसं गेली की त्यांच्याबद्दल लिहिलं जातं, अशा अनेक गोष्टींचा खुलासा होतो ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देखील नसते. भारतीय सिनेमांचा प्रेक्षक हा चोखंदळ असला तरी भोळा आहे. डोळे बंद करून देवाची भक्ती करावी तसंच तोदेखील इथल्या इंडस्ट्रीची भक्ती करत आलाय. भक्ती हा शब्द मी इथं मुद्दामहून वापरलाय कारण भारतीय प्रेक्षकांनी सिनेमाच्या नावाखाली सगळं काही स्वीकारलं, जे निर्मात्यांनी दाखवलं ते सर्व सत्य मानून त्यांच्यावर, त्यांच्या कलाकृतींवर आणि कलाकारांवर प्रेम केलंय. अगदी देवासारखं त्यांनी सुपरस्टार लोकांना पुजलं आहे, सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. सोशल मीडियाला विषय मिळाला जो अजूनही ट्रेंडिंग आहे, काहींचे चेहरे समोर आले तर काहींनी यातही आपला स्वार्थ शोधला.

असं ऐकण्यात आहे की, सध्या काही न्यूज चॅनेल्सनी मरणावर टेकलेल्या अनेक लोकांचे श्रद्धांजली व्हिडिओ आधीच तयार करून ठेवलेत, ते गेल्यावर धावपळ नको आणि सगळ्यात आधी आपलंच चॅनेल लोकांनी पाहावं यासाठीचा खटाटोप, मरणाचादेखील उत्सव करण्याचा हा नवा प्रकार सध्या अस्तित्वात आला आहे. या सगळ्यांवर लिहीत गेलो तर एखादं पुस्तक तयार होईल एवढं मटेरियल आहे, पण आज लिहिण्याचं कारण जरा वेगळं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर जी गोष्ट सर्वाधिक गाजली ती म्हणजे नेपोटीजम, त्याच्या पोस्ट्स आणि काही इंटरव्यू पाहिल्यावर ही गोष्ट लक्षात येते. नेपोटीजम हा शब्द आपल्यासाठी नवीन नाहीच आणि बॉलिवूडमध्ये तर मुळीच नाही, आधीही या विषयाबद्दल चर्चा झाली होती पण ती मर्यादित…आज सोशल मीडियामुळे या चर्चेला हवा मिळाली आहे आणि ही हवा इंडस्ट्री हादरविण्यासाठी पुरेशी आहे असे सध्या तरी दिसते.

- Advertisement -

नेपोटीजम म्हणजे एखाद्याचा हक्क मारून त्या ठिकाणी आपल्या व्यक्तीला पुढे करणं आणि बॉलिवूड असो किंवा राजकारण भारतात हा प्रकार पूर्वीपासून सुरूच आहे. याबद्दल अनेकवेळा चर्चा झाली, लिहिलं गेलं, पण ते सगळं मर्यादित, मग यावेळी या प्रकरणाला एवढी हवा का मिळाली? भूतकाळात नेपोटीजम विषयी झालेल्या चर्चांना एक मर्यादा होती, ती चर्चादेखील ठरवून घडवली जात होती. पण यावेळी त्या प्रकरणाला हवा मिळण्याचं कारण आहे सोशल मीडिया, भारतीय सिनेरसिकांना बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वच गोष्टी माहिती नसतात, हे सत्य असलं तरी जाणून घेण्याची इच्छा मात्र असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या अशा काही गोष्टी बाहेर येत आहेत ज्यांनी भारतीय प्रेक्षकांना धक्का बसलाय, मी इथे सामान्य भारतीय सिनेमा प्रेक्षकांबद्दल बोलतो आहे, जे सिनेमांवर आणि कलाकारांवर नि:स्वार्थपणे प्रेम करत आले आहेत. सामान्य प्रेक्षकांना धक्का का बसलाय? कारण त्यांना लक्षात आलं की, त्यांचा विश्वासघात झाला आहे. एखाद्या व्यक्तीला सुपरस्टार प्रेक्षक बनवतात, सामान्य तरुणाला स्टार प्रेक्षक बनवतात हा त्यांचा समज होता. पण त्यांना आता समजतंय की, आधी त्यांनी ठरवलं आणि आपण त्यांना फक्त लाईक करून स्टार बनवलं आहे. सामान्यांचा चेहरा म्हणून ज्याला समोर आणलं गेलं तो सामान्यांचा चेहरा नसून कुणाचा तरी मोहरा होता, हीच गोष्ट चाहत्यांना न पटणारी आहे, म्हणून हा रोष उफाळून येतोय. नेपोटीजममुळे पुढे आलेले सर्वच जण याचे शिकार बनलेत. हृतिक रोशनपासून अनन्या पांडेपर्यंत प्रत्येकालाच नेटकर्‍यांनी धारेवर धरलंय.

सोशल मीडियावर अनेक ट्रेंड्स गाजतात आणि गायबदेखील होतात. अगदी काही दिवसांपूर्वी बॉयकॉट चायनाचा हॅशटॅग गाजत होता, पण जेव्हा रेडमीने आपला नवा मोबाईल लाँच केला तेव्हा काही मिनिटात तो विकला गेला. अशावेळी नेपोटीजम विरुद्ध सोशल मीडियावर चाललेली ही मोहीम कुठवर टिकेल असा अनेकांचा प्रश्न होता? इतर ट्रेंड्सप्रमाणे हा ट्रेंड काही दिवसापुरता आहे का ? या ट्रेंडचा भविष्यात येणार्‍या सिनेमांवर काही प्रभाव पडेल का? स्टारकीड आणि ग्रुप बनवून राहणार्‍यांना याचा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न आहेत.आता नेपोटीजम विरुद्धची ही मोहीम किती सिरीयस आहे हे जर ओळखायचे असेल तर एक उदाहरण देतो, ज्या सलमान खानला हिट अँड रन प्रकरणानंतर देखील कुठल्याही चाहत्याने ट्रोल केलं नव्हतं. त्या सलमान खानला जर आता ट्रोल केलं जात असेल आणि शिव्या दिल्या जात असतील तर समजून घ्या की, ही मोहीम सिरीयस आहेच. भारतात सलमान खानसारखे फॅन्स इतर कुठल्याही दुसर्‍या हिंदी अभिनेत्याचे नाहीत. जर त्याला शिव्या बसत असतील तर इतरांची कुठेही गय केली जाणार नाही. आता दुसरा मुद्दा की, भविष्यात येणार्‍या सिनेमांवर याचा काही प्रभाव पडेल का? काही स्टार्स आणि प्रोडक्शन हाऊसला याचा फटका नक्की बसेल. धर्मा, यशराज या प्रोडक्शनसह रणवीर सिंगचा आगामी सिनेमा ‘83’ ला फटका बसू शकतो. रामलीला आणि बेफिक्रे दोन्ही सिनेमांच्या वेळी घडलेलं रामायण आता चव्हाट्यावर आल्याने रणवीरसिंगला ट्रोल केलं गेलंय आणि रणवीर सिंगला अजून सलमान एवढं स्टारडमदेखील नाहीये की, ज्यासाठी लोक थिएटरकडे जातील, बाकी स्टार्सला एवढा फटका बसेल असं सध्या तरी वाटत नाही.

- Advertisement -

बॉलिवूडमधील गटबाजी कुणापासूनदेखील लपलेली नाही, प्रत्येकाचे आपले काही गट आहेत. त्यांचे काही फेव्हरेट अ‍ॅक्टर, अ‍ॅक्ट्रेस, डायरेक्टर आहेत ते त्यांच्यासोबतच काम करतात. आता तर सिंगर्ससुद्धा ठरलेले असतात, जे आपल्या गटात नाही ते दुसर्‍याच्या गटात असतातच आणि नसतील तर त्यांना स्वतःचा गट तयार करावा लागतो, कारण हे लोक तुम्हाला एकटं राहू देत नाहीत. इंडस्ट्रीला आपल्या तीर्थरुपांची जहागीर समजून ते खुलेआम तुम्हाला धमक्या देतात, सिनेमे मिळू नयेत यासाठी प्रयत्न करतात. सध्या ही मक्तेदारी बरीच वाढली आहे. करण जोहरपासून अनुराग कश्यपपर्यंत प्रत्येकाचे काही गट आहेतच. कारण त्याशिवाय तुम्ही इथे सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. टॅलेंटपेक्षा स्वतःला सर्वेसर्वा समजण्याची ही वृत्ती अलीकडे फोफावते आहे, जनता कोण स्टार बनविणारी ? आम्ही ज्यांना दाखवू तेच स्टार बनतील ही मग्रुरी पाहायला मिळाली. हीच मग्रुरी आता त्यांना महागात पडणार आहे. जनतेच्या मनात याचविषयी राग आहे, जो आता सर्वत्र दिसतोय.

येणार्‍या काळात फिल्म कोण करतंय ही बाब महत्वाची ठरेल, किमान पुढचे काही महिने तरी अनेक स्टार कीड ब्लॅकलिस्टमध्ये जातील. सुशांत-नेपोटीजम आणि करोना या तीनही बाबी बॉलिवूडवर मोठा प्रभाव पाडतील. बॉलिवूडचे स्टार्स आणि प्रोडक्शन हाऊसचे पीआर यानंतरच्या काळात महत्वाची भूमिका बजावणार आहेत, एरव्ही देखील पीआर आपल्या विविध ट्रीक्सचा वापर करून इमेज बिल्डिंग किंवा इमेज डॅमेज करत असतातच, पण यानंतरच्या काळात त्यांची भूमिका बदलेल. बॉलीवूडने भाड्यानं घेतलेल्या काही लोकांच्या बोलण्यावर, बॉक्स ऑफिस कलेक्शनवर आणि फुगवून सांगितलेल्या आकड्यांवर लोक सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत, म्हणून त्यांना वेगळं काहीतरी निवडावं लागेल.

बॉलिवूडमध्ये गटबाजी करताना टॅलेंट हा मुद्दा गौण ठरतो. टॅलेंट अनेक लोकांमध्ये असतंच, पण संधी देताना आपल्या मर्जीतला व्यक्तीच स्टार म्हणून निवडला जातो. सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय हे त्याच्यासोबत गेलं, पण सर्व परिस्थिती पाहता आपल्याला सहज अंदाज येईल. एक स्टार म्हणून सुशांत आणि रणवीर दोघेही सारखेच होते, पण दोघांना काम देताना मात्र भेदभाव केला गेला. सिद्धार्थ, वरुण, टायगर,अर्जुन असे चेहरे तुम्हाला वारंवार मीडियात दाखवले जातात. अवॉर्ड शोजमध्ये हे परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतील, पण याउलट बाकी लोक दिसणार नाहीत. कारण काय तर ते या गटातील नाही, या गटबाजीला जबाबदार कोण? एकतर ही सिनेमातली काही ठराविक मंडळी आणि दुसरी म्हणजे या लोकांची पीआर टीम. बॉलिवूड पीआर एजन्सीज नेपोटीजमला हवा देण्याचं काम अनेकवेळा करताना पाहायला मिळतात, कदाचित यासाठीच त्यांना पैसे मोजले जात असावेत. स्टार किडला प्रमोट करण्यासाठी त्यांना सतत चर्चेत ठेवण्यासाठी विविध अफवा उठवल्या जातात. गाजत असलेल्या अभिनेत्रींशी त्यांच्या अफेयरच्या चर्चेला उधाण येते, रिअ‍ॅलिटी शोजमध्ये ते वारंवार दिसतात. उगाच त्यांचा इंटरव्यू घेतला जातो, त्यामध्ये ते कुणा एकाला आपला आदर्श मानतात, मग तोच व्हिडीओ एडिट करून सगळीकडे चालवला जातो आणि फेममध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नेपोटीजमच्या या मोहिमेनंतर डॅमेज झालेली इमेज सुधारण्यासाठी अनेक हत्यारं उपसली जाऊ शकतात, ब्रेकअप, डिप्रेशन, रिलेशन यांच्या माध्यमातून जशी इमेज बनवली गेली, अगदी तसाच काही प्रकार इमेज बिल्डिंगसाठी आणला जाऊ शकतो, कदाचित स्टार कीड तुम्हाला धर्म, समाजसेवा, असे वेगळे विषय हाताळताना दिसू शकतात.

केवळ हिंदी सिनेसृष्टीत ही गटबाजी चालते असं अजिबात नाही, मराठीत देखील हेच चित्र आहे पण जिथं मराठी सिनेमालाच लोकं प्रतिसाद द्यायला मागे पुढे पाहतात. तिथं अशा गोष्टींमध्ये प्रेक्षकांना रस असण्याची शक्यता नसल्याने या बाबी इथे उघड होत नाहीत. सिनेमातील ही गटबाजी नेपोटीजम मधूनच जन्माला येते, पण ही गटबाजी नेपोटीजम पेक्षाही अधिक धोकादायक आहे. या गटबाजीचा कुठेही विरोध होताना दिसत नाही, अस्तित्वात असतानाही कुणी याबद्दल लिहीत नाही, बोलत नाही. कारण यातही अनेकांचे लागेबांधे असतात. येणार्‍या काळात किमान प्रेक्षक तरी ही गोष्ट लक्षात घेतील आणि यांना धडा शिकवेल अशी अपेक्षा आहे. काही व्यक्तींचा मृत्यू आपल्याला धडा देऊन जातो, सुशांतच्या जाण्यामागे कारण काय? हे गूढ असलं तरी त्याच्या जाण्याने अनेक लोक जागे झाले, हेही कमी नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्यालाच जबाबदार ठरवणारे, इंस्टा स्टोरीत माहिती नसताना डिप्रेशन कारण सांगणारे, त्याच्या मृतदेहाचे फोटो वायरल करणारे, घरात घुसून बाईटसाठी ओरडणारे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ज्या प्रकारे सुशांतच्या मृत्यूचा सोहळा केला गेला, तो इतर कुणाच्याही नशिबात येऊ नये. आम्ही सांगू ती पूर्व दिशा, आम्हीच स्टार बनवतो, आम्ही आहोत म्हणून ते मोठे आहेत, चर्चेत आहेत.आम्ही आहोत म्हणून पैसा, फेम आणि सिनेमा आहे. त्यांना आम्ही घडवले आहे. त्यांना एका रात्रीत घरी बसवू शकतो. हा काहींचा माज उतरवला गेला पाहिजेच. ही गटबाजी व्यवसाय म्हणून फायद्याची असेलही कदाचित, पण कला म्हणून मुळीच नाही. ही वृत्ती संपली नाही तर भविष्यात चांगले नट पाहायला मिळणार नाहीत आणि हीच टोळकी अशीच इंडस्ट्री चालवत राहतील.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -