घरफिचर्सस्त्री कलाकाराचा पहिला चेहरा - कमलाबाई रघुनाथराव तथा कमला कामत

स्त्री कलाकाराचा पहिला चेहरा – कमलाबाई रघुनाथराव तथा कमला कामत

Subscribe

कमला कामत या लहानगीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. ‘मोहिनी भस्मासूर’ या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंना निवडण्यात आलं. त्यांच्या निवडीने भारतीय चित्रपटसृष्टीला पहिल्या स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला.

आज मराठी, हिंदी आणि इतर भारतीय भाषांमधील चित्रपट, नाटक यांमध्ये स्त्री कलाकार मध्यवर्ती भूमिका निभावताना सहज दिसतात, पण स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांनी चित्रपट, नाटक यांमध्ये काम करणे तुच्छ मानले जायचे. किंबहूना त्यांना चित्रपट, संगीत नाटकांमध्ये काम करण्यापासून रोखले जायचे. स्वातंत्र्यपूर्व भारतात चित्रपटांपूर्वी संगीत नाटकांची चलती होती, पण स्त्रियांना नाटकांमध्ये काम करण्यापासून रोखले गेल्याने स्त्री पात्रांची उणीव भासायची. त्यामुळे त्याकाळी पुरुषांनाच स्त्रियांच्या भूमिकासुद्धा कराव्या लागत. याच काळात १९१३ मध्ये भारतात चित्रपट युगाची सुरुवात झाली. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या बोलपटाने भारतात चित्रपट निर्मितीचा प्रारंभ झाला. चित्रपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळके यांनी बोलपटांसह मूकपटांच्या निर्मितीकडेसुद्धा लक्ष दिलं. आपल्या आगामी चित्रपटांमधील स्त्री पात्रं ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतावर दादासाहेब फाळके ठाम होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत या लहानगीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. ‘मोहिनी भस्मासूर’ या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंना निवडण्यात आलं. त्यांच्या निवडीने भारतीय चित्रपटसृष्टीला पहिल्या स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे याच चित्रपटातील पार्वतीच्या भूमिकेसाठी कमलाबाईंच्या आई दुर्गा कामत यांचीसुद्धा निवड झाली. ‘मोहिनी भस्मासूर’ मधील भूमिकेने कमलाबाईंनी आपल्या अभिनयातून चित्रपटप्रेमींना मोहिनी घातली. त्यांच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत झाले आणि तेथून पुढे कमलाबाईंचा अभिनयाचा आलेख चढताच राहिला. भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई कामत ओळखल्या जातात. प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले व प्रसिद्ध तबला वादक लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले यांच्या त्या आई होत. त्याचप्रमाणे आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या त्या आजी.
६ सप्टेंबर १९०१ रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म तसा कलाप्रेमी कुटुंबातला. कमलाबाई या दुर्गाबाई कामत आणि मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील प्राध्यापक आनंद नानोसकर यांच्या कन्या होत. कमलाबाईंचे वडील उत्तम कीर्तनकार होते, तर आई दुर्गाबाई कामत यांना सतार वादनाची आवड होती. त्यामुळे कानावर पडणारे सुरेल, मंजूळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. यादरम्यान घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून कमलाबाईंनी मेळा आणि जत्रांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. याच मेळ्याच्या माध्यमातून कमलाबाईंनी संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे गिरवले. याचा फायदा कमलाबाईंना पुढे मूकपट तसेच संगीत नाटकांमधील अभिनयासाठी झाला. स्वतःची नाटक कंपनी, शेतीवाडी, घरदार अशा तालेवार गोखले घराण्यातील रघुनाथ यांच्याशी कमलाबाईंचा विवाह झाला. २० व्या शतकाच्या आरंभी भारतात चित्रपट निर्मितीला प्रारंभ झाला. मात्र, चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. दरम्यान, संगीत नाटकांतील महत्त्वपूर्ण किर्लोस्कर कंपनी बंद पडल्याने कमलाबाई कामत यांचे पती रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली. त्यामुळे रंगभूमीवर पुढे गद्य नाटकं सादर होऊ लागली. या नाटकांमध्ये कमलाबाईंनी भूमिका साकारल्या. यादरम्यान वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षीच अल्पशा आजाराने रघुनाथराव गोखले यांचे निधन झाले. कमलाबाईंना तीन अपत्ये होती. मधुसूदन उर्फ लालजी, चंद्रकांत आणि सूर्यकांत. रघुनाथरावांच्या निधनानंतर नाटक कंपनी चालवणे अशक्य झाले. परिणामी कंपनी बंद पडली. मात्र, या बिकट परिस्थितीचा सामना करण्याची जिद्द कमलाबाईंनी दाखवली. या कठीण काळात खचून न जाता कमलाबाई वेगवेगळ्या नाटक कंपन्यांकडे कामे मिळवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आई दुर्गाबाईंसह तीन मुलं, दीर रामभाऊ यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. कामाच्या शोधात असताना एके दिवशी त्यांना मिरजेच्या तवन्नापा चिवटे यांच्या मनोहर स्त्री संगीत मंडळी या कंपनीत काम मिळालं. सौंदर्य, आवाज, अभिनय आणि संगीत या सर्वच बाबतीत प्रविण असलेल्या कमलाबाईंना स्त्री नाटक कंपनीत पुरुष पात्रांच्या भूमिका पदरी पडल्या. कमलाबाईंनी ‘मानापमान’ मधील धैर्यधर, ‘संशयकल्लोळ’ मध्ये अश्विन शेठ, ‘सौभद्र’ मध्ये कृष्ण या प्रमुख पुरुष भूमिका शिताफीने रंगवल्या. पुरुषांनी स्त्रियांची भूमिका पार पाडण्याच्या त्या काळात प्रवाहाच्या विरुद्ध जात स्त्री कलाकाराने पुरुष पात्र रंगवणे धैर्याची बाब होती. रंगभूमीवर पुरुष पात्र साकारण्याबरोबरच कमलाबाईंनी विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करून दिला. तब्बल २०० हून अधिक नाटकं, मूकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ हून अधिक चित्रपटांमध्ये कमलाबाईंनी साकारलेल्या सर्वच भूमिकांमुळे त्या चित्रपट, नाटक रसिकांच्या कायमच लक्षात राहतात. जवळपास ४० वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते कमलाबाईंचा सत्कार करण्यात आला. आपल्या अभिनयाच्या कलेने रंगभूमीसह चित्रपटात अष्टपैलू कामगिरी बजावलेल्या कमलाबाई गोखले यांनी १८ मे १९९७ रोजी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -