घरफिचर्स ‘उद्याच्या सुंदर दिवसांसाठी’

 ‘उद्याच्या सुंदर दिवसांसाठी’

Subscribe

वर्तमान कमालीचे गुंतागुंतीचे व अंगावर येणारे आहे. त्याचे रंग, छटा, विभ्रम मौजमजा, मस्ती, चंगळ, भोग या प्रकारात अधिक मिसळून जातात. शाश्वत, चिरंतन काही या भूतलावर असते यावर अलीकडे विश्वास दुर्मीळ होत चालला. स्थायी ते काय? या न्यायाने भोग-विलासी प्रवृत्तींचा अधिक सुकाळू जाहला. आजच्या वर्तमानाला सहज कवेत घेणे, समजावून घेणे आपलेसे करणे जरा अवघडच झालेय,त्याला कोणी नैतिकतचे पाठ सांगावेत,त्याला कोणी चिरंतन सुसंस्काराचे धडे द्यावेत हा खरा प्रश्नच आहे. ‘खा-प्या-मजा करा’ यातून वाढत जाणारी भोगविलासी वृत्ती बुडापासून सर्वत्र ओरबाडत सुटलीय. निसर्ग, पर्यावरण, नदी, नाले, वृक्ष, पशू, पक्षी नानाविध वन्यजीव हे सर्व भस्मासुर प्रवृत्तीचे भक्ष्य झाले आहे.

उद्याचे काय? हा ‘उद्या’ कोण असतो? तो कोणाचा असतो? कोणासाठी असतो? त्याचे आपले नाते काय? ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ हा निबंधचा विषय असू शकतो? तो कोण लिहिणार? का लिहिणार? कशासाठी लिहिणार? काय? मूल्यसंस्कार! कसले आले मूल्यसंस्कार? ते का करायचे असतात? अर्थात ते बाजारात मिळतात काय? मिळतील तर कसे? ते तर आचरणातून..

कसले आले आचरण अन् चरण..‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात। मात्र ‘प्राणिजात’ नेमका असा विचार करते काय? यांना काही ‘उरु द्यायचे आहे काय? पाणी, पर्यावरण, झाडे, पशू, पक्षी आणि बरेच काही. भूगर्भातील कोळसा खाणीपासून समुद्राच्या पाण्यापर्यंत अबाधित ठेवायचा ‘मूठभरांना’ आपला मालकी हक्क. सूर्य, चंद्र, तारे आणि हे भूमंडल तरी यांच्या मालकी हक्कातून सुटणार काय? कर लो दुनिया मुठ्ठीमे! म्हणत संबध ‘प्राणिजात’ तर ही व्यवस्था गिळंकृत पाहत नसेल.
मोठा भीषण महापूर, महाप्रलय, हिमस्खलन, माळीण, तळीये की आणखी काहीही यांच्यावर का ओरबाडत नसतील संवेदनांचे चर. आम्ही तर साले वाजवू फक्त पाप-पुण्याचे ढोल! कर्मठ कुठले? कसले ‘ग्लोबल वॉर्मिग’ आम्ही कधी ‘ग्लोबल’ होतो. आहो आम्ही तर पारंपरिक, सनातनी, कर्मठ देव्हार्‍या समोर बसून तासनतास घंट्या बडवणारे. ‘भोंगे’ लावून साद घालणारे. काय फरक पडतो वर्तनात ‘अ ते ज्ञ’ सर्व सारखेच. आम्हांला कुठले ‘पंचाग’ शहाणे करु शकले नाही; आपत्तीत माणसं वाचविण्यासाठी. असे हजारो रोजचे दैनंदिन प्रश्न.अनेक बुवा बाबांच्या मठात वाढत चाललेल्या रांगा..आणि रांगा जोडून वाढत गेलेले साम्राज्य यापलिकडे कोणाचे भले झाले? तरी आमच्यासारखे आम्हीच. ‘श्रेष्ठ’ वगैरे या सम हा..!

- Advertisement -

 

अशा वर्तमानात तुम्ही उद्याचा दिवसासाची भाषा कशी बोलणार? कोणत्या शाश्वत गोष्टी सांगणार? कोणत्या मूल्यसंस्कारांच्या बाता झोडणार? चिरंतन सत्य ऐकण्याची हिंमत कोणत्याच काळात नसते. प्रत्येक काळी जग प्रचंड व्यवहारीच वागतेय.‘व्यवहार’ पाहून भाषा बदलते तसे कोषातील ‘शब्द’ आणि ‘नियत’ सुद्धा. इथे फक्त समजतात नफ्यातोट्याची गणिते. व्यवहारी शहाणपणा ही इथल्या जगण्याची पूर्वअट आहे. काळ बदलला तसं बरंच बदललंय. वाहत्या पाण्यासारखा समाज वाहत पुढे गेला तर तो बदल ‘नितळ’ वाटायला लागतो. परंतु नेमके सगळेच गढूळ होत चाललेय. कसे थांबणार? आत कळपात डोकावून पाहिले तर हिंस्रता, नग्नता, दांभिकता,लबाडी, कर्मठता सगळेच ठासून भरलेले.‘लुटालूट ते लयलूट’ हे या काळाचे वर्तन.

- Advertisement -

अशा या व्यवहारी जगात कोणी तरी एक इसम राजकारणात राहूनही या मोहमायेला बळी पडला नसेल हे स्वप्नवत वाटावे असे उदाहरण..आयुष्याची पाच दशकं विधिमंडळात घालविल्यानंतर हा माणूस साध्या एसटीने प्रवास करीत असेल तर हे आश्चर्यच नव्हे काय? अवतीभवती भरमसाठ ओरबाडून साम्राज्यविस्तारात आकंठ बुडालेले लोकं असतानादेखील निस्पृहतेने राजकारण हे सामाजिक सेवेचे साधन व जनसेवा हे ‘साध्य’ असे मानून उभी हयात खर्ची घालविणारे ‘आबा’ म्हणजेच गणपतराव देशमुखांसारखी माणसं कुठे शोधावीत आता?

उद्यासाठी अशी माणसे आणणार कोठून? कशी घडली असतील ही माणसं? हा चिंतनाचा विषय का असू नये?स्वातंत्र्योत्तर पहिल्या पिढीत प्रत्येक क्षेत्रात असे ‘आबा’ आपल्याला हमखास भेटायचे. म्हणून तर ही असंख्य ‘कर्मवीरांची भूमी’ म्हणून परिचित होती. तत्व,सिद्धांत,चारित्र्य आणि निष्काम कर्मयोगावर उभी झालेली पिढी उद्यासाठी कशी घडवणार? सहकार, शिक्षण, कृषी, उद्योग, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आयुष्य समर्पित करुन राष्ट्र उभारणीच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलणार्‍या या माणसांबद्दल आता ऐकावे आणि गप्प बसावे इतकेच. आता अशी माणसं घडतीलच कशी? कोणत्या शाळेत? सैद्धांतिक भूमिका,तत्व वगैरे आता कळणार कोणाला? ना याची चिंता ना सोयरसुतक. कारण अनुभव असा सांगतो की, सिद्धांत, भूमिका ठाशीव असली की माणसं एक सरळ रेषेत आखीवरेखीव जगतात. त्यांच्या आयुष्यात कितीही मोह-मायेचे क्षण अथवा ताणेबाणे आले तरी ते आपल्या भूमिकेशी ठाम राहतात,अर्थात हीच माणसं उदारमतवादी,स्वागतशील मनाचीही असतात. यांना विनाकारण बडेजाव करणे आवडत नाही. ‘संधिसाधूपणा’ यांच्या डोक्यात नसतो. हाती घेतले ते अधिक क्षमतेने उत्तम करणे यांचा स्वभाव. कर्तव्याआड येणार्‍या लोकांची ते फार ‘मुलाहिजा’ ठेवत नाहीत हे अगदीच खरे असले तरी फायदे-तोटे पाहून ‘फासे’ टाकण्याचे उद्योग यांच्या ‘गावी’ नसतात. ते मेहनतीला पर्याय शोधत नाहीत.आणि क्षणभंगुर प्रसिद्धीच्या मोहाला बळी पडत नाहीत. त्यांना क्षणार्धात ‘भुरळ’ पडत नाही. उलट ते प्रत्येक कृती तपासून तिचा अर्थ-अन्वयार्थ लावून निर्णय घेतात. अंगभूत मोकळेपणा यांच्याकडे अधिक असतो. ते बोलताना कधीच हातचा राखून व्यवहार करीत नाही. किंवा समोरच्याच्या पोटात आणि ओठात काय नेमके दडले याचाही यांना तसा लवकर अंदाज येत नाही. त्यातूनच अनेकदा यांची पंचाईत होवून बसते. परंतु ते जगत असतात हयातभर आपल्या सिद्धांत आणि तत्त्वासाठी…अर्थात कालबाह्य तत्व व सिद्धांत घेवून जाणार्‍या माणसांविषयी फार कुतुहल अथवा आपुलकी वाटावे असे काही नसते..पिढीजात कर्मठपणा, शिष्टपणा,आपण इतरांपेक्षा वेगळेच आहोत किंवा अमुकतमुक तमुक खुर्चीवर बसून कार्यभार साधतो म्हणजे जगावेगळे असा समज करून घेणार्‍या विषयीचे हे चिंतन नव्हे! तर ज्यांनी मानवजातीला उपकारक ‘मूल्य’ पदरी बाळगली,जपली पोसली आणि समाजाच्या भल्यासाठी ती मूल्य,सिद्धांत आयुष्यभर प्रवाही केली आपल्या येणार्‍या पिढ्यांना दिशादर्शक म्हणून आचरणातून सिद्ध केली अशा हजारो माणसांबद्दल..आताच्या पिढीला आकर्षण का वाटू नये? हा खरा कळीचा प्रश्न आहे.

या पिढीला ही सगळी ‘अडगळ’ वाटते. भौतिकतेच्या जंजाळात अडकलेल्या नव्या समूहाला अशा माणसांबद्दल फार आपुलकी वाटते, असे दिसत नाही. अगदी त्यांच्याच पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा नीट कळला असेही नाही. थोडे फार अपवाद वजा करता..हाच वारसा उलट ते सरंजामी मानसिकतेतून कथन करतात तेव्हा ‘त्या’ माणसांचे हे ‘दुर्दैव’ असे वाटून जाते. ही पिढी त्या वारशाकडे कोणत्या अर्थाने पाहते याचा अनुभव हा आश्चर्यचकित करणारा असतो. नव्या युगाची भाषा यांनी बोलू नये का? बोललीच पाहिजे परंतु फक्त ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे!’ हेच सरसकट सर्वांच्याच साम्राज्य विस्ताराचे ब्रीद झाले तर या राष्ट्राला नव्याने उभे करण्याचे शिवधनुष्य पेलणार कोण?..नव्या काळाने निर्माण केलेली आव्हाने, व्यवधाने, मूल्यभ्रष्टतेतून ‘माणूस’म्हणून अस्ताकडे होत जाणारा आमचा प्रवास कोण रोखणार?’ रात्रीचे संत झाले, पहाटेचे वैरी, अभंगातून झाडल्या बंदुकीच्या फैरी’ अशी अवस्था असेल, तर हे थांबणार कसे? नीती, मूल्ये अडगळीत पडून मूल्यभ्रष्ट लोकांची बाजारात वाढत जाणारी प्रतिष्ठा पाहून..येणार्‍या पिढ्या काय बोध घेणार? हा खरा प्रश्न आहे?

जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही!

सुरेश भटांनी व्यक्त केलेला हा वेडेपणा ‘उद्याच्या सुंदर दिवसांसाठी’ करायला या काळात कोणाला उसंत नाही हे तितकेच खरे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -