घरफिचर्ससंपादकीय : आतले आणि बाहेरचे

संपादकीय : आतले आणि बाहेरचे

Subscribe

विंदा करंदीकर यांचा ‘आतले आणि बाहेरचे’नावाचा धडा मराठीच्या पुस्तकातल्या अभ्यासक्रमात एकेकाळी होता. एका प्रवासातील आलेल्या माणसांच्या अनुभवांचे ते मजेशीर वर्णन होते. रेल्वेच्या डब्यातल्या गर्दी, रेटारेटीमुळे आतल्या माणसांना बाहेरची माणसं नकोशी असतात. मात्र, बाहेरची माणसं एकदा का आत आली, की ती आतली होऊन जातात. मग ही माणसंही गाडीत घुसू पाहणार्‍या ‘बाहेरच्यां’ना आत येण्यास मज्जाव करतात. मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या गर्दीतून रोज प्रवास करणार्‍यांना हा अनुभव रोजचा असतो. ‘ये दुनिया एक थर्डक्लास का डब्बा बन चुकी है मेरे भाई…मै बैठ जाता तो आप खडे रहते,’ दिवार चित्रपटातला शशी कपूरचा हा संवाद आणि विंदांचा हा धडा आठवण्याला कारण आहे. राज्याच्या राजकारणात जे ‘इन कमिंग आणि आऊट गोईंग’ सुरू आहे. त्यातून मुंबई आणि पर्यायाने राज्यातलं राजकारणंही लोकलच्या थर्डक्लासच्या डब्यासारखं आतलं आणि बाहेरचं असं झालं आहे. अशा परिस्थितीत जनहित आणि पक्षनिष्ठेची व्याख्या राजकारण्यांकडून सोईस्करपणे बदलणं हा राज्याच्या निवडणुकांआधी होणारा नियम होतो, तर ज्यावेळी नेते किंवा लोकप्रतिनिधींकडून निष्ठा असलेला पक्ष बदलला जातो त्यावेळी जनतेचं हीत आणि विकास हेच त्याचं कारण असतं, तर ज्या पक्षामध्ये ‘बाहेर’च्यांना घेतलं जातं. त्यांच्यासाठी हा ‘विकासासाठी’ घेतलेला निर्णय असतो. येणारे नेहमीच विकासासाठी येणारे येतात आणि जाणारे नेहमीच गद्दारी करून जाणारे असतात, असं हे सगळं ठरलेलं असतं. किती काळजी असते यांना लोकांची, लोकशाहीची ? अशा वेळी पक्षांतरबंदीच्या कायद्याच्या चर्चा देशद्रोही ठरवल्या गेलेल्या असतात. मात्र, आतल्या पक्षातून कोणी बाहेर जात असेल तर याच कायद्याची किती गरज आहे, याची गळाभर ओरड केली जाते. लोकशाहीतल्या जनतेला या राजकारणातील निःस्पृहता, त्याग मुळी दिसतच नाही. त्या ईडी, सीबीआयच्या बागुलबुवाला घाबरायला आपले नेते म्हणजे काय एकाच्या शेतातून दुसर्‍याच्या शेतातल्या कणसांवर बसणारी पाखरं वाटतात काय या लोकांना? मात्र, आपल्या नतद्रष्ट जनतेला ही बाब लक्षातच येत नाही. लोकांसाठी स्वतःचा पक्ष सोडायला समर्पणाची भावना लागते, काय तो त्याग? काय ती निःस्पृह भावना, काय ते समर्पण…त्याचं कौतूक मुळी या इथल्या जनतेला नाही. त्यामुळे इथल्या देशप्रेमी नागरिकांना थेट परदेशात जावसं वाटणं (पाकिस्तानात नाही) स्वाभाविकच आहे. एक दोन दशकांपूर्वी राजकीय प्रगल्भतेच्या दृष्टीने आपण खरंच आजच्या तुलनेत खूपच मागास होतो. एक नेता, एक विचार, एक मार्ग…असलं काही बिनकामाचं त्यावेळी होतं. आता ह्यदयात आणि शरीरात दोन वेगवेगळे विचार ठेवण्याची ‘व्हरायटी’ आपल्याला या आधुनिक जगात माहिती तंत्रज्ञानातून मिळालेली आहे. हा विकास, बदलत्या संकल्पना इथल्या आंधळ्या लोकशाहीला दिसतंच नाही मुळी…उगाच आपलं बघावं तेव्हा लोकप्रतिनिधींच्या चांगुलपणावर संशय घेणं बंद केलं पाहिजे. हा सपशेल देशद्रोह आहेच, सोबतच लोकशाहीचा उपमर्दही आहे. आता कालपरवा केवळ जीवाची मुंबई करायला आलेल्या कर‘नाटका’तल्या पात्रांचं खरं तर आपण कौतूक करायला हवं होतं. कला संस्कृती हा महाराष्ट्राचा वारसा आपण जपायला हवा होता, पण त्यालाही राजकीय दृष्टीने पाहण्याची आपली खोड खरंच आपल्या सांस्कृतीक वारशासाठी धोक्याची आहे. या कर्नाटकी पात्रांच कौतूक करायला जी खिलाडू वृत्ती आणि कलेची जाण लागते. असे कलासक्त लोकनेते आपल्याला लाभलेले असताना आपण मात्र ते ‘आतले की बाहेरचे’ ‘इथले की तिथले’ असे फुटकळ वाद घालत बसलो होतो. बाहेरचे आमच्या शेतात येतात कारण आमच्याकडचं खत कसदार असतं, आता या आधुनिक शेतीकौशल्याची तोंडभरून वाहवा करण्याची आणि आपलं ते चांगलं जगात वाटण्याची आपली हरफनमौला परंपरा जपण्याचं आपल्याला कौतूक मुळी नसतं. आपण त्यातही खत कसदार असतं का जमीन ? असले बाष्कळ प्रश्न विचारून त्यांच्या कृषीप्रेमावर बोट ठेवतो, हा करंटेपणाच असतो. एखाद्या पक्षातील माणसं दुसर्‍या पक्षाकडून फोडली जायला ती काय रिकामी मडकी असतात का? या मडक्यात काठोकाठ विचार भरलेला असतो. हा विचार धर्मनिरपेक्षता, जातीयवाद, धार्मिक कट्टरवाद, प्रांतियवाद, भाषा असा काहीही असू शकतो. मग एकाच प्रकार-विचाराची मडकी कुंभाराकडून एकाच पडवीत ठेवली जातात. त्यात गट पडलेले असतात. नळ असलेली मडकी वेगळी, डेरे वेगळे, रांजणं वेगळी असे हे गट असतात. त्यांना आकार देणार्‍या एकाच कुंभाराशी या मडक्यांना आता काहीही घेणं देणं नसतं. तुम्ही अबोध त्याला गद्दारी म्हणता…अरे पण हा तर सर्वसमावेशक विकास असतो, राजकीय अस्पृश्यता इथल्या घटनेला कधीही मान्य नव्हती. मग आतले बाहेर गेले काय? किंवा बाहेरचे आत आले काय? गाडीतली मोक्याची जागा भरणं महत्त्वाचं. लोकशाहीची बूज राखणार्‍या आणि स्वतःसाठी राबवल्या जाणार्‍या सत्तेची जराही इच्छा नसलेले नेते एकटेच इकडून तिकडे आत-बाहेर करत नाहीत. या लोकशाहीच्या कर्तव्यात ते आपल्या समर्थकांनाही सहभागी करून घेतात. वर या समर्थक आणि कार्यकर्त्यांमुळेच इकडचा मी आता तिकडचा झालो आहे, असं माध्यमांच्या चॅनेलावर, कॅमेर्‍यासमोर साळसूदपणे सांगताही येतं. आपलं जाणं आणि त्यांनी आपल्याला तिथं घेणं, यात दबाव, ब्लॅकमेलिंग असे आमच्या अपरिमित त्यागाचा अवमान करणारे शब्द तुम्हाला सुचतातच कसे? हा रास्त प्रश्न या आतल्या आणि बाहेरच्यांचा असतो. बाहेरचे येतील तेव्हा त्यांनी जुनी पक्षनिष्ठा बाहेरच ठेवावी आणि जाणार्‍यांनी आपली पक्षनिष्ठाही सोबत घेऊन बाहेर जाऊ नये, ही पक्षनिष्ठा गळ्यातल्या पक्षचिन्ह असलेल्या कापडी पट्ट्यासारखी जिथल्या तिथं ठेवता आली पाहिजे. ज्याला ते जमलं त्याला या भरलेल्या गाडीत हक्काची ‘सीट’ मिळेल. मग या पक्षाच्या गाडीत कित्येक वर्षे खाली बसलेल्या किंवा बराच वेळेपासून बसण्यासाठी थोडी जागा मिळेल, या आशेने वाट पाहून थकलेल्या कार्यकर्ता नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रवाशाच्या थकलेल्या चेहर्‍याकडे पाहण्यासाठी आतल्या किंवा बाहेरच्या कोणालाच वेळ नसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -