घरफिचर्सलिंगभाव आणि सत्तासंबंध

लिंगभाव आणि सत्तासंबंध

Subscribe

लिंगभावा’ची (म्हणजेच जेंडरची) चर्चा करताना पुरुषत्वाचे आणि स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण, त्या गुणांचे प्रकटीकरण आणि त्यातील उतरंड याबद्दलही बोलावे लागते. ‘हळवेपणा’, ‘लाजाळूपणा’, ‘नमते घेणे’, ‘सेवा करणे’, ‘आदेशांचे पालन करणे’ हे स्त्रीत्वाचे तर ‘कठोरपणा’, ‘आक्रमकपणा’, ‘पुढाकार घेणे’, ‘आदेश देणे’ हे पुरुषत्वाचे गुण मानले जातात. पुरुषत्वाचे गुण प्रथम आणि स्त्रीत्वाचे दुय्यम दर्जाचे अशी क्रमवारी असते. त्यामुळे स्त्रीने पुरुषत्वाचे गुण प्रदर्शित केले तर थोड्या नाराजीने किंवा नाराजीशिवाय, कधी विरोधासहीत का होईना, स्वीकारले जाण्याची शक्यता असते. उदा. ‘सैराट’मधली आर्ची. अर्थात, ते सातत्याने वा कायम स्वीकारले जाईल, असे नाही. आर्ची बुलेट, ट्रॅक्टर चालवू शकते कारण तिला ‘वरची’ जात फायदा देते. ती जे सहज करू शकते, ते दलित, ओबीसी, मुस्लीम, आदिवासी मुलगी सहजासहजी करू शकणार नाही. आर्चीच्या घरी ही सारी साधने सहज उपलब्ध आहेत, जी इतरांकडे असतीलच याची खात्री नाही.

एखादा पुरुष स्त्रीत्वाचे मानले गेलेले गुण प्रदर्शित करत असेल तर ते मात्र अजिबातच स्वीकारले जाणार नाही. त्याच्यावर हिंसा होण्याची शक्यता अधिक. परंतु, दैनंदिन व्यवहारांमध्ये एकच व्यक्ती काही वेळा पुरुषत्वाचे गुण प्रदर्शित करते तर काही वेळा स्त्रीत्वाचे. उदा. महाविद्यालयात मदतनीसाचे काम करणारा पुरुष प्राचार्यांसमोर अतिशय अदबीने चहा नेऊन ठेवेल! कप टेबलावर आदळणार नाही, याची तो काळजी घेई!. त्यांच्यासमोर नम्रपणे उभा राहील आणि आदेशांचे पालन करेल. याचे कारण काय? उत्तर आहे, ‘सत्ता’. मदतनीसापेक्षा प्राचार्यांची सत्ता जास्त असते म्हणून मदतनीस स्त्रीत्वाचे गुण प्रदर्शित करतो तर प्राचार्य पुरुषत्वाचे! मग प्राचार्य महिला असेल तरीही!! हाच मदतनीस घरी आपल्या बायकोला चहा करून अदबीने नेऊन देईल का? नाही. कारण बायकोपेक्षा त्याची सत्ता जास्त असणार. त्यामुळे, प्राचार्यांबद्दलचा राग तो बायकोवरही काढू शकेल! म्हणजेच, प्राचार्यांच्या तुलनेत मदतनीसाची सत्ता कमी पण त्याच्या बायकोच्या तुलनेत त्याची सत्ता जास्त! प्राचार्यांसमोर तो स्त्रीत्वाचे गुण दर्शवेल तर बायकोसमोर पुरुषत्वाचे! प्राचार्य संस्थेच्या अध्यक्षांसमोर स्त्रीत्वाचे गुण दर्शवतील! एखाद्या मध्यमवर्गीय घरातील स्त्री त्यांच्याकडे घरकामगार म्हणून येणाऱ्या स्त्रीसमोर पुरुषत्वाचे गुण तर घरकामगार स्त्री मालकिणीसमोर स्त्रीत्वाचे गुण दर्शवेल. म्हणजेच, सत्तेत असताना व्यक्ती पुरुषत्वाच्या गुणांचे प्रदर्शन करते तर सत्ताविहीन असताना स्त्रीत्वाच्या. मग ती व्यक्ती कोणत्याही लिंगाची का असेना!

- Advertisement -

समजा, एखाद्या कुटुंबात ७४, ४८ आणि २१ अशा वयाचे, पिता, पुत्र आणि त्याचा पुत्र असे तीन पुरुष असतील तर त्यांची सत्ता सारखीच नसेल. सर्वाधिक वयाचा पुरुष अजूनही कारभारात लक्ष घालण्याइतका सक्षम असेल तर त्याच्याकडे जास्त सत्ता असेल. मात्र, तो थकलेला असेल अथवा आजारपण किंवा कोणत्याही कारणाने तो कारभारात लक्ष घालू शकत नसेल तर सत्तेची सूत्रे त्याच्या मुलाकडे असतील. तिघांमध्ये २१ वर्षाच्या पुरुषाकडे कमी सत्ता असेल. त्याच घरात ६९ वर्षांची सासू, तिची ४४ वर्षांची सून आणि त्या सुनेची १९ वर्षांची मुलगी अशा तीन स्त्रिया असतील तर या तिघींचीही सत्ता वेगवेगळी असेल. तीन पुरुषांना असलेल्या सत्तेबाबत जो तर्क आधी मांडला तोच या तिन्ही स्त्रियांच्या बाबतीतही लागू असेल. म्हणजेच पुरुषस्त्रियांमध्ये, पुरुषापुरुषांमध्ये आणि स्त्रियास्त्रियांमध्येही सत्तेच्या उतरंडी असतील. अर्थातच, पुरुषांची सत्ता स्त्रियांच्या तुलनेत जास्त असेल. त्यामुळे या तीन पुरुषांपैकी कोणीही पुरुष तिघींपैकी कोणाही स्त्रीला ‘प्यायला पाणी आण’, ‘चहा कर’, ‘जेवायला वाढ’ असे म्हणू शकेल. अनेकदा हे म्हणण्याची वेळ येत नाही आणि स्त्रिया न सांगताच या साऱ्या गोष्टी करत असतात कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या लिंगभाव भूमिका आत्मसात करतात. आपल्यापेक्षा सत्तेने कमी असलेल्यांवर वर्चस्व गाजवणे, अंकुश ठेवणे, प्रसंगी अपमान करणे ही मानवी प्रवृत्ती असते. मग ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष की ट्रान्सजेंडर! (पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सत्ता कमी आणि त्यांच्या तुलनेत ट्रान्सजेंडर व्यक्तीची सत्ता सर्वात कमी असेल) कारण या विषम व्यवस्थेत सत्ता गाजवणे किंवा गाजवून घेणे एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला माहिती असतात. समानतेवर आधारित नातेसंबंध असू शकतात, याची जाणीवच आपल्याला नसते. तशी उदाहरणेही आपल्यासमोर नसतात.

लिंगभाव व्यवस्थेत पुरुषांना ते केवळ पुरुष आहेत या एकमेव कारणाने सत्ता प्राप्त होते. स्त्रियांना मात्र सत्ता मिळण्यासाठी काही अटी असतात. उदा. एखाद्या कुटुंबात दोन मुलगे असलेली, तीन मुली असलेली आणि मूलबाळ नसलेली अशा तिघी जावा असतील तर सर्वाधिक मान मुलग्यांच्या आईला आणि त्या खालोखाल मुलींच्या आईला असेल. सर्वात शेवटच्या स्थानी मूलबाळ नसलेली स्त्री असेल. जी स्त्री नवऱ्याचा मार न खाता त्याच्यापासून स्वतंत्र राहील तिचे स्थान ‘नांदत्या’ स्त्रीपेक्षा खालचे असेल. नवरा जिवंत असलेलीला मंगल कार्यात मान तर विधवेचे दर्शनही ‘अशुभ’ (?) अशीही उतरंड असेल!! बायको जिवंत आहे की नाही यावर मात्र पुरुषाचा मान अवलंबून असत नाही. स्त्री सासूच्या (अर्थात सुनेची) भूमिकेत गेली की तिची सत्ता वाढते पण जावयावर मात्र सत्ता गाजवता येत नाही! लग्नात मुलाच्या बापाचा तोरा चालतो तर मुलीचा बाप ‘बापुडवाणा’ असू शकतो!!

- Advertisement -

ही गुंतागुंत समजून घेतली की लिंगभावाच्या रचनेचा खेळ ‘स्त्रिया विरुद्ध पुरुष’ असा नसून तो मुख्यत: सत्तेचा आहे, हे लक्षात येते. ही सत्ता ठरवण्यात, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, मूल असणेनसणे आणि त्याबरोबरीनेच जात, धर्म, पद इ. बाबीही महत्त्वाच्या ठरतात.

  • मिलिंद चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -