घरफिचर्सअस्वस्थ भोवताल

अस्वस्थ भोवताल

Subscribe

मधु मंगेश कर्णिक यांनी वास्तव रेखाटताना अनेक छोट्या छोट्या घटनासुद्धा अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत की आज समाजात हे प्रसंग जागोजागी दिसून येतात. मुतारीत काढलेली चित्रे, बिभत्स सिनेमे आणि वासनाधीन नजरा या समाजाच्या विकृतीचे दर्शन घडवतात. लेखकाने मात्र या सर्व समस्या समोर मांडताना कधीच पकड कुठेच ढळू दिली नाही, तर या समस्या निर्माण होताना वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून वाचक अस्वस्थ होतो आणि त्याच्या मनात या झोपडपट्टीतील भयाण वास्तवाची कुठेतरी जाणीव निर्माण होते.

मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी म्हणजे मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणार्‍या माणसांचे, त्यांच्या वृत्तीचे, राहणीमानाचे वास्तव दर्शन घडवणारी कादंबरी. लेखकाच्या मुंबईच्या वास्तव्यामध्ये तीन वर्षे ते माहीममध्ये राहिले. त्यामुळेच कादंबरीतील सर्व वातावरण वास्तववादी करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. त्या काळातील त्यांची निरीक्षणे, त्यांना असणारे सामाजिक भान आणि माहीमच्या झोपडपट्टीच्या वातावरणातील भणंग घटनांचा मागोवा घेत लेखक आणि कादंबरीचे आव्हान खूप ताकदीने पेलले आहे असे म्हणायला हरकत नाही. चांगल्या घटना किंवा सकारात्मक घटनांचा मागोवा घेत लेखन करणे जितके सहज आणि सोपे असते तितकेच अशा उध्वस्त जीवनाचा मागोवा घेत त्यातील बारकावे टिपत लेखन करणे फार कठीण. पण मधु मंगेश कर्णिक यांनी विविध पात्रांच्या, घटनांच्या माध्यमातून माहीमच्या झोपडपट्टीतील यातनामय जीवनाचे शब्दचित्रण अशा पद्धतीने वर्णन केले आहे की वाचकांच्या डोळ्यासमोर तो भयान नरक उभा राहतो.

झोपडपट्टीतील वास्तव चित्रण रेखाटताना त्यातील लोकांचे दारिद्य्र, बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, चंगळवादीपणा, उध्वस्त कुटुंबव्यवस्था, अनैतिक शरीरसंबंध, रोगराई आणि या सर्वातून आजचा दिवस जगण्यासाठीची धडपड मनाला अस्वस्थ करते. त्या झोपडपट्टीत माणूस आहे, पण तो माणूसपणा हरवलेला. सुरज, दादूमिंया, गंगा यासारखी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच चिखलातील कमळं सोडली तर संपूर्ण झोपडपट्टीरूप तलावच गलिच्छ, मलीन झालेला आहे. तिथे फक्त पोटाची आणि शरीराची भूक सोडली तर जगण्याला दुसरा कुठलाही अर्थ नाही. एक मात्र आहे, तिथे जाती धर्माला थारा नाही. तिथे बोलतो तो पैसा. हा पैसा येतो कुठून?.. तर चोरी, मारामारी, जुगार, मटका यासारख्या अवैद्य धंद्यातून. त्यामुळे त्यांच्या जगण्याला लौकिकार्थाने सुसंस्काराची कुठलीच जाणीव नाही. नाती-गोती, प्रेम, आपुलकी या पलीकडे जावून हा नरक नुसता पाशवी अत्याचारी बनला आहे. आपल्या बहिणीला वेश्याव्यवसाय करायला लावणारा भाऊ, स्वतःच्या बहिणीवर अत्याचार करणारा भाऊ, आपल्या आईला विकणारा मुलगा, बायकोला ठार करून मेहुणीबरोबर पळून जाणारा नवरा हे सर्व लेखकाने इतक्या हळुवारपणे लिहिले आहे की समोरच्याच्या मनाचा बांध फुटतो.

- Advertisement -

या माहीमच्या खाडीत जेव्हा रस्ता करण्यासाठी आलेल्या मोजणीदाराला सरजू या सर्वांची कल्पना देतो तेव्हा मोजणीदार म्हणतो.

सगळ्या दुनियेत तसंच आहे म्हातार्‍या.
दुनियेमध्ये असलं तरीही त्यापेक्षा अजब …. सरजू मोजणीदाराला सांगतो.
हे जे आजोबा आहेत ते लेखकाने शब्दचित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो भावनिक गुंतागुंत निर्माण करतो.

- Advertisement -

हा पंचात्तर पावसाळे पाहिलेला सरजू माहीमच्या झोपडपट्टीच्या सुरुवातीच्या दिवसापासूनचा साक्षीदार आहे. माहीमच्या या झोपडपट्टीतील बदललेले दिवस त्याने पाहिले आहेत, त्यामुळे त्याला हा बदल आता नकोसा झाला आहे. मूल्यहीन झालेला हा समाज त्याला पाहवत नाही आणि वाटतं….
दर्याला तुफान व्हावं आणि खाडीतली वस्ती वाहून जावी.

सरजूने स्वतःच्या नीतीमध्ये कधीच बदल केला नाही, पण आज या झोपडपट्टीत नीतिमत्ता हरवलेली पाहताना तो कित्येक वेळा वेड्यासारखा वागतो. लेखकांनी सर्वच वाईट नाही हे दाखवण्याचा प्रयत्न त्या व्यक्तिरेखांमधून केला आहे. मुंबई कुणालाच उपाशी ठेवत नाही, या एका वाक्यावर देशभरातील अनेक तरुण या महानगराचे सदस्य होतात, पण त्यांच्या मूलभूत गरजा जेव्हा भागविल्या जात नाहीत तेव्हा त्यांना झोपडपट्टीचाच आधार घ्यावा लागतो. कसे का असेना, पण डोक्यावर छप्पर मिळते म्हणून देशभरातून येणारे अनेक लोक या झोपडपट्ट्यांचा विस्तार करत आहेत. अपुरे शिक्षण आणि मोठी स्वप्ने घेऊन आलेली ही माणसे जेव्हा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा मात्र चोरी, मटका, जुगार, दारू आणि त्यासारखी व्यसने यातून सात दिवस ढकलत असतात. त्यातच शरीराची भूक जिथे भागेल तिथे भागवली जाते आणि त्यातून तीन दगडांचा संसार कधीच उभा राहत नाही. यातूनच पुढे गुन्हेगारी, दादागिरी, टोळीयुद्ध, परस्परातील वर्चस्व सिद्ध करून दाखवताना दिवसाढवळ्या खून पाडले जातात. पण कधीतरी गरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरजू झगडतो तेव्हा त्यालाच मारझोड सहन करावी लागते.

मधु मंगेश कर्णिक यांनी वास्तव रेखाटताना अनेक छोट्या छोट्या घटनासुद्धा अशा पद्धतीने मांडलेल्या आहेत की आज समाजात हे प्रसंग जागोजागी दिसून येतात. मुतारीत काढलेली चित्रे, बिभत्स सिनेमे आणि वासनाधीन नजरा या समाजाच्या विकृतीचे दर्शन घडवतात. लेखकाने मात्र या सर्व समस्या समोर मांडताना कधीच पकड कुठेच ढळू दिली नाही, तर या समस्या निर्माण होताना वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून वाचक अस्वस्थ होतो आणि त्याच्या मनात या झोपडपट्टीतील भयाण वास्तवाची कुठेतरी जाणीव निर्माण होते.

झोपडपट्टीवाले झोपडपट्टी ही शहराचा भाग मानत असले तरी शहर मात्र झोपडपट्टीला नेहमीच दुर्लक्षित करते. शहरी लोक मात्र आपल्या प्रगतीसाठी रस्ते, रेल्वे, विमाने, मेट्रो, गाड्या, मॉल आधुनिक साधनांशी जोडून घेताना झोपडपट्टीवर आक्रमण करू पाहतात. शहरवासीयांना झोपडपट्टीतील तुंबलेली गटारे, गलिच्छ वस्त्या, दुर्गंधी याची जाणीवसुद्धा नसते. त्यामुळेच झोपडपट्टीतील लोकांना आपण शहराचा भाग आहोत हे कळत नसल्यामुळे ते उपेक्षितांचे जिणे जगत असतात. लेखकाने जणू काही हे गावकुसाबाहेरचं जगणं इतक्या आत्मीयतेने मांडलं आहे की झोपडपट्टीच्या समस्या वाचकांना जाणवून देण्याचा कळत-नकळत प्रयत्नच आहे असे वाटते.

या झोपडपट्टीवासीयांचा शहराशी संबंध येतो तो फार तर चोरी, कामधंदा, स्त्रियांसाठी घरकाम आणि फार-फार तर शरीरविक्री यासाठी. लेखकांनी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन प्रतीक म्हणून वापरली आहे. या पाईपलाईनचा उपयोग शहर आणि झोपडपट्टी या दोन्हीला होतो. पण शहरवासीयांना त्याचा काहीही फरक पडत नाही. जरी ती पाईपलाईन झोपडपट्टीमधून गेलेली असेल तर त्यावर वर्चस्व हे शहरातील लोकांचेच आहे. याचाच अर्थ त्या झोपडपट्टीवरसुद्धा वर्चस्व या शहराचे आहे. म्हणूनच जेव्हा प्रगतीच्या नावाखाली हायवे तयार करण्याची वेळ आली तेव्हा गाजर दाखवत त्यांच्या झोपडपट्टीवर नांगर फिरवला गेला. लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी अनेक पात्रांमधून वास्तव दर्शन घडवले आहे. त्यामध्ये सरजू, गंगा, दादूमिया ही जुनी पण तत्त्वनिष्ठ माणसे. पण याउलट मनूच्या सांगण्यावरून स्वतःच्या लहान बहिणीवर अत्याचार करणारा भिका, कोळीचा मोरक्या शामा, काशीराम, रतन यासारखी पात्रे आपल्या अवतीभोवती वावरतात असे वाटते.

अशा अनेक गोष्टी पात्रे घटना मधु मंगेश कर्णिक यांनी माहीमच्या खाडीतून जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोरोना महामारीच्या या काळात अशा झोपडपट्ट्यांची अवस्था काय असेल हे अस्वस्थ करणारे आहे. जेव्हा माहीमची खाडी वाचनात येते तेव्हा आपण जिथे आहोत तिथून तो भयाण नरक लेखकाच्या शब्दातून आपल्या डोळ्यासमोर फेर धरू लागतो आणि मनाला जागृत करत अस्वस्थ करून सोडतो.

-सौ मनीषा रवींद्र पाटील
-महाजनी नगर.कलमठ
-ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग
-(शिवाजी मेमोरियल जुनियर कॉलेज येथे शिक्षिका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -