घरफिचर्समेल्यावरही जगायचं आहे!

मेल्यावरही जगायचं आहे!

Subscribe

कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तर्‍हा आहे आणि मी आपल्याच तर्‍हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे, असं छातीठोकपणे सांगणार्‍या माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा आज जन्मदिवस. बंडखोर कवी म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर होता.

माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस (१० मे, १९३७ ते २६ मार्च, २०१२) हे मराठी कवी होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. ‘वार्‍याने हलते रान ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. ग्रेस यांचा जन्म १० मे, १९३७ चा नागपूरमधला. त्यांचे वडील लष्करी पेशात होते. त्यांची रसिकता उल्लेखनीय होती. कर्नलबाग या नागपुरातील वस्तीत त्यांचे कुटुंब राहत होते. ग्रेस यांचे प्रारंभीचे जीवन कष्टमय होते. आईच्या अकाली मृत्यूमुळे विस्कळित झालेले घर त्यांना सांभाळावे लागले. नोकरी आणि शिक्षणासाठीही त्यांना झगडावे लागले. डॉ. लीला माटे यांच्याशी विवाह झाल्यानंतर संघर्षाचा काळ कमी होईल, असं वाटत होतं. पण विवाहानंतरही हा संघर्ष सुरूच राहिला. एम.ए. ची परीक्षा जवळ आलेली असताना त्यांना बसचा अपघात झाला. १९६६ मध्ये मराठी विषयातील ना.के. बेहरे सुवर्णपदक जिंकून नागपूर विद्यापीठातून माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस एम.ए. झाले.

- Advertisement -

प्लास्टर लावलेल्या हातांनी त्यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक घेतले. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी अधिव्याख्याता म्हणून काम केले. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात ग्रेस यांनी संपादन केले. मुंबईतील ‘संदर्भ’ या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते. १९७५च्या सालात रामदास भटकळ यांनी रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेचं ‘संदर्भ’ हे xxxxx द्वैमासिक सुरू केले. त्याचे संपादन कवी ग्रेस करत असत. ‘संदर्भ’चे अवघे दहाबारा अंक निघाले. ग्रेस एखादा विषय प्रत्येक कला क्षेत्रातल्या दिग्गजांना देऊन त्यावर त्यांचे टिपण किंवा लेख मागवत असत.

- Advertisement -

१९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण केले. ‘दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी ‘शी इज इन ग्रेस’ असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला. तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत ह्या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही सुरू ठेवली.

‘मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही’ असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी ’दुर्बोधतेची बेसरबिंदी’ या ललितलेखात म्हटलेले आहे. याच लेखात पुढे त्यांनी “आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही,” असेही म्हटले आहे.

इंदूरचे सनदी अधिकारी असलेल्या श्रीनिवास हवालदार यांनी कविवर्य ग्रेस यांच्या प्रातिनिधिक कवितांचे विश्लेषण आणि त्यांना आकळलेले रसग्रहण करून ग्रेस यांच्या कविता ‘दुर्बोध’ आणि ‘आत्मकेंद्रित’ असल्याचा समज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो कितीकांच्या पचनी पडला हा प्रश्नच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -