घरफिचर्सप्रतिसाद ...

प्रतिसाद …

Subscribe

अभयारण्य की भयारण्य?
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात फिरण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी तैनात वन कर्मचार्‍यांच्या मुजोरपणाचा वाईट अनुभव आला. फोटो ओळखपत्र मागितल्यानंतर पॅनकार्ड दिल्यानंतर मोबाईल क्रमांकसुद्धा दिला. त्यानंतर सोबत असलेल्या महिलांचे ओळखपत्र देऊनसुद्धा महिलांचा मोबाईल क्रमांक पाहिजे, असे वन कर्मचारी सांगू लागला, परंतु महिलांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होऊ शकतो म्हणून महिलांनी नंबर देण्यास नकार दिल्यानंतर मुजोर वन कर्मचार्‍यांनी पॅनकार्ड भिरकावून दिले. या ठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक गैरवर्तन करण्यासाठीच येतो, अशी समजूत वन कर्मचार्‍यांनी करून घेतली आहे. त्यामुळे ते मुजोरीने वागत असल्याने पर्यटकांची कुचंबणा होत आहे. याशिवाय त्या ठिकाणी वन कर्मचार्‍यांव्यतिरिक्त तीन-चार तरुण बसलेले आढळून आले. अभयारण्यात फिरण्यास चाललेल्या महिला पर्यटकांवर नजर ठेवणारी टोळीच वन विभागाच्या जोडीला तैनात आहे, असे वाटले. त्यामुळे हे अभयारण्य नव्हे, तर ‘भयारण्य’ झाले आहे, असाच अनुभव येत आहे. इतर पर्यटनस्थळांवर पर्यटकांची नेहमी काळजी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. कर्नाळ्यात मात्र वेगळाच प्रकार घडत आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन मुजोर कर्मचार्‍यांना वठणीवर आणतील, अशी अपेक्षा आहे. -प्रसाद रामचंद्र पाटील, खालापूर, जि. रायगड

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करा
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. बेशिस्त वाहनचालक शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रोडवर विनाहेल्मेट व भरधाव वेगाने दुचाकी चालविताना दिसून येत आहेत. ते सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असून, कोणताही सिग्नल पाळत नाहीत. त्यामुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा मनस्ताप सामान्य नागरिकांना होत आहे. शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत त्यांचे लायसन्स जप्त करावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यामुळे ते पुन्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत. नाशिक शहर सुंदर व शिस्तबध्द राहण्यासाठी सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. -आदेश वानखेडे, विसेमळा, कॉलेज रोड, नाशिक

- Advertisement -

पर्यटकांनी रामकुंड परिसर स्वच्छ ठेवावा
मंदिरांचे शहर म्हणून नाशिक शहराची ओळख देशभर आहे. प्रभू रामचंद्र यांनी लक्ष्मण व सीतासमवेत वनवासातील शेवटची अडीच वर्षे रामकुंड परिसरात घालविली आहेत. त्यामुळे देशभरातून विविध धर्म, जाती, पंथाचे भाविक मोठ्या संख्येने रामकुंड परिसरात दर्शनासाठी येतात. त्यावेळी ते निर्माल्य गोदापात्रात टाकतात व खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर प्लास्टिक पिशव्या कोठेही फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, गोदा प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. पर्यटकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे. पर्यटकांनी निर्माल्य व कचरा कचराकुंडीत टाकल्यास रामकुंड परिसर स्वच्छ व सुंदर राहील. – किरण सोनार, सिन्नर, जि.नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -