Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स बहुत नाईन्साफी है...

बहुत नाईन्साफी है…

भारतात बलात्कार वगैरेसारख्या अत्यंत नैसर्गिक, स्वाभाविक घटना वारंवार होतात. अहो हा सृष्टीचक्राचाच भाग आहे. तेव्हा विविध पक्षांचे राजकीय नेते काय काय म्हणाले आहेत एकदा उजळणी करू. यामुळे बाकीच्या अनेक असंस्कृत देशांनी भारत हा स्त्री पर्यटकांसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचे घोषित केले.

Related Story

- Advertisement -

स्त्रियांच्या संदर्भात काहीही मोकळे ढाकळेपणाने बोलायचं याला एका महान संस्कृतीची पार्श्वभूमी लागते. आपल्या थोर देशातही ती इतर अनेक इस्लाम पट्ट्यातल्या देशांप्रमाणेच आहे यात वादच नाही. शिवाय अमेरिकेसारख्या केवळ दोनअडीचशे वर्षांची सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या जागतिक महासत्ता असलेल्या राष्ट्राचा ट्रम्पसारखा अध्यक्ष स्त्रियांबद्दल ‘मोकळेपणाने’ बोलतो तर मग महान संस्कृतीत असे मोकळेपणाने बोलणे हे अगदी संस्कृतीचे सार्थकच म्हणावे लागेल.

गरीब बिचार्‍या राम कदम यांच्या एका हसतखेळत केलेल्या वक्तव्यावरून एवढे अकांडतांडव, त्यांच्या राजीनाम्याची मागणी, माफीची मागणी, जोक्स वगैरे करणार्‍या कुणालाही आपल्या थोर संस्कृतीचे, आपल्या राजकीय संस्कृतीचे भान नाही असेच म्हणेन.

- Advertisement -

या ‘मोकळेपणाचा’ एक आढावाच घेऊन टाकू.
नगरवधू किंवा गणिका हा शब्द आपल्या संस्कृतीत पुरुषांचे मनोरंजन करणार्‍या स्त्रियांसाठी वापरला जात असे. त्यालाच समानार्थी असलेला वेश्या हा शब्द वापरून कित्येक राजकारण्यांनी यशस्वी होऊ पाहाणार्‍या स्त्रियांना कसे गौरविले होते, गौरवत असतात. अलिकडेच भाजपच्या दयाशंकर झा यांनी खाजगीत बोलण्याऐवजी चुकून सार्वजनिक ठिकाणी बसपाच्या मायावती वेश्येपेक्षा वाईट आहेत इतकी त्या तिकिटांची विक्री करतात असे म्हटले होते. आता खाजगीत अनेक स्त्रियांचा गौरव असाच प्राकृतात केला जातो. ते शब्द पेपरात छापायचे तर फार वेळा इंग्रजी एक्स हे अक्षर टंकावे लागेल. म्हणून सोडून देऊ.

पण संस्कृतीतले महिलांचे दुय्यम दासीस्थान अनेक राजकारण्यांकडून कधीही विसरले जात नाही हा संस्कृतीचा गौरवच नव्हे काय. आपले महान प्रधानसेवक एकदा बेटीबचावच्या वेळी म्हणाले होते, हजार मुलांमागे आठशे मुली जन्मल्या तर उरलेल्या दोनशेंना बायका कशा मिळणार… बहू हवी असेल तर बेटी वाचवा. असा मोकळेपणा या संस्कृतीलाच शोभेसा आहे. मग ते बांगलादेशच्या अध्यक्षांचा गौरव करताना म्हणाले की, त्या एक स्त्री असूनसुद्धा दहशतवादाचा सामना करीत आहेत. किती हा स्त्रीबद्दलचा काळजीचा भाव… असूनसुद्धा… अहाहा!

- Advertisement -

भारतात बलात्कार वगैरेसारख्या अत्यंत नैसर्गिक, स्वाभाविक घटना वारंवार होतात. अहो हा सृष्टीचक्राचाच भाग आहे. तेव्हा विविध पक्षांचे राजकीय नेते काय काय म्हणाले आहेत एकदा उजळणी करू. यामुळे बाकीच्या अनेक असंस्कृत देशांनी भारत हा स्त्री पर्यटकांसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचे घोषित केले. माननीय जेटलीजी म्हणालेले की, बलात्काराची एखादी बारीकशी घटना घडली तर त्याची जगभर जाहिरात केल्यामुळे पर्यटन क्षेत्राचे करोडो रुपयांचे नुकसान होते. बलात्कार करणार्‍या तरुण मुलांना फाशी द्या, ही क्रूर क्रूर क्रूर मागणी करणार्‍यांना ठाम उत्तर देताना मुलायमसिंगजींच्या मुलायम काळजाने मुलांच्या रक्षणार्थ २०१४ मध्ये मोरादाबादमध्ये हे अमर उद्गार काढले – मुली प्रथम मैत्री करतात. मुलामुलींच्यात मतभेद होतात. मतभेद झाले की मुली रेप झाला म्हणतात. मुलगे मुलगे आहेत शेवटी. चूक होते त्यांच्या हातून. मग काय रेपसाठी फाशी देणार? सरकारने रेपबद्दलचे कायदे बदलले पाहिजेत.

इस्लामिक तत्वांचे शांतताप्रिय पाठीराखे अबू आझमी म्हणाले- बलात्कार झालेल्या स्त्रीला आणि करणाराला दोघांनाही फाशी झाली पाहिजे. कारण स्त्रीने दुसर्‍या पुरुषाबरोबर जाणे हेच इस्लाममध्ये त्याज्य आहे. त्यांच्या मूर्ख मुलाने आणि सुनेनेही त्या बिचार्‍यांवर टीका केली.

संस्कृतीचे प्रेम काही केवळ पु. राजकारण्यांना नसते, ते तर म. राजकारण्यांनाही असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. आशाताई मिरजेताई दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या बलात्काराच्या संदर्भात म्हणाल्या होत्या, स्त्रियांचे कपडे, त्या कशा वागतात, त्या कोणत्यावेळी कुठे असतात या गोष्टीही बलात्काराला कारणीभूत आहेत.

काँग्रेसचे कैलासवासी नेते- ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो बरोबरच म्हणालेले- जब तक महिला तिरछी नजर से नहीं देखेंगी तब तक पुरुष उसे नहीं छेडेगा. भाजपचे बाबुलाल गौर तर मोठेच संस्कृतीप्रेमी होते… रशियन ललनांना धोतर सोडून दाखवण्याचे शिक्षण द्यायला तयार झालेला हा नेता महिलांनी अंगभर कपडे घालावेत म्हणजे बलात्कार होणार नाहीत म्हणून सांगत असे. जीन्स टीशर्ट हे तर भारतीय बायकांनी घालूच नयेत असे त्यांचे ठामच मत होते. काय चूक आहे, काय चूक आहे?

आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते बोत्सा सत्यनारायण निर्भया बलात्कारासंदर्भात म्हणालेले, भारताला मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं म्हणून काही स्त्रियांनी रात्री बेरात्री बाहेर फिरू नये. फारसे प्रवासी नसलेल्या त्या बसमध्ये चढताना तिने विचार करायला हवा होता. ते पुढे असेही म्हणाले की, ही एवढी किरकोळ घटना असूनही सोनियाजी निदर्शकांना भेटायला गेल्या. जी घटना बोत्साजींना किरकोळ वाटली ती सोनिया गांधींना फार मोठी वाटली- हेच मुळात चुकलंय. या सर्वात सर्वात थोर असे विधान केले दीदी ममता बॅनर्जी यांनी. बलात्कार का होतात याची फार गहिरी मीमांसा केली दीदींनी. पूर्वी स्त्रीपुरुष हातात हातही घालत नसतं. पालक ओरडायचे. आता सगळंच मुक्त झालंय. मुक्त व्यवस्था, मुक्त पर्याय. बलात्कार होणार नाहीत तर काय होणार… शिवाय ही माध्यमं दोनचार किरकोळ बलात्कारांच्या घटनांवर केवढा ओरडाआरडा करतात. सगळीकडे निगेटिव्ह चित्र जातं.

पहा बलात्काराचं सांस्कृतिक भान स्त्रीपुरुष सर्वपक्षीय, सर्वलिंगी राजकारण्यांना आहे. आणि यातच आपल्या देशाची सांस्कृतिक शक्ती आहे.

स्त्रीच्या सौंदर्याचे तर राजकारणी किती मोठे पूजक, भोक्ते, उपभोक्ते… आपण जाणतोच. राजकारणात फक्त शहरातल्या आकर्षक स्त्रिया येऊ शकतात, गांवढळ अनाकर्षक स्त्रियांना त्यात जागा नाही हे मा. मुलायमसिंगांनी ठणकावून सांगितलेले ग्रामीण स्त्रियांना.गोव्याच्या लक्ष्मीकांत पार्सेकरांनी मुख्यमंत्रीपदावर असताना स्त्रियांना सांगितले होते की, सूर्यतापापासून आपली चामडी वाचवा. ती काळी पडणार नाही याची काळजी घ्या. राजकारण्यांनी चामडी वाचवायला सांगणे किती महत्त्वाचे आहे पहा.

दारूच्या ब्रॅन्ड्सना स्त्रियांची नावे द्या, विक्री वाढेल असे सुचवणारे महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन किती रसिक आहेत याची काहीतरी दाद घेणे ही या संस्कृतीत वाढलेल्या स्त्रियांची नैतिक जबाबदारी होती. पण आजकाल स्त्रिया नैतिक जबाबदार्‍या पार पाडत नाहीतच…स्त्रियांची स्वातंत्र्याची योग्यताच नाही. हे अगदी साधेसे सांस्कृतिक सत्य आहे. आणि त्या दृष्टीने त्यांची लग्ने बालपणीच लावून द्यावी असे हरयाणवी नेते ओमप्रकाशजी चौटाला म्हणाले. अखिल खाप पंचायतीची मागणी त्यांनी योग्य ठरवली. आपल्या नै का संस्कृतिच्या मर्दानी झाशीवाली रामतीर्थकर हेच सांगत फिरतात सगळीकडे…

सिने-टीव्ही पडद्यावर प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्यांप्रमाणेच अभिनेत्रींना राजकारणात आणून देशाचा फायदा करून दिल्यानंतर त्यातल्या विशेषतः अभिनेत्रींना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवश्यक कार्य आपले राजकीय नेते करतात. लोकही करतात. समाजवादी पक्षाचे माजी नेते नरेंद्र अग्रवाल जया बच्चनला बॉलिवुडची डान्सिंग गर्ल, फिल्मों में नाचनेवाली म्हणाले, पूर्वीचे सेनेचे आणि आता काँग्रेसचे महान नेते संजय निरुपम स्मृती इराणीला ठुमके लगानेवाली म्हणाले. जयललिताच्या चारित्र्यावर तर सतत शिंतोडाभिषेक करायचे लोक. गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी जया बच्चनला आसामवरील चर्चेत आठवण करून दिली की हा गंभीर विषय आहे- फिल्मी नाही. आवश्यकच आहे हे सारे. बिचारे सगळे नंतर माफीही मागून टाकतात. आपली सांस्कृतिक जबाबदारी सांभाळताना बिचार्‍यांना कितीवेळा माफी मागावी लागते, स्पष्टीकरणं द्यावी लागतात. मागतात. देतात.

महिलांसाठी संसदेत आरक्षण नकोच मुळी. कारण त्याचा फायदा खेड्यातील अनाकर्षक स्त्रियांना न मिळता शहरी, बड्या घरच्या स्त्रियांना मिळेल आणि आमची पोरं संसदेत शीळ घालू लागतील असे म्हणणार्‍या मुलायम सिंगांनी संस्कृतीची जपणूकच केली नाही का.

आपले नुकतेच निवृत्त झालेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा बेटा अभिजीत मुखर्जी निर्भया बलात्कारासंदर्भातल्या निदर्शनांवेळी म्हणालेला की, या सगळ्या रस्त्यावर उतरून निदर्शन करणार्‍या रंगवलेल्या ओठांच्या, काहीतरी बिघडलेल्या बायका आहेत. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. मुख्तार अब्बास नक्वी काका म्हणाले, या पावडर लावलेल्या, ओठ रंगवलेल्या बाया मुंबईत जी काही निदर्शनं करीत आहेत त्यामुळे देशाला धोका आहे… बसपाचे राजपाल सैनी म्हणाले, बायकांना मोबाईल फोन्स देऊ नयेत. काय उपयोग करतात त्या मोबाईलचा. त्यांच्या कामांत काहीही उपयोग नसतो मोबाईलचा. माझ्या आईकडे, बायकोकडे कधीही मोबाईल नव्हते काय बिघडलं?एकंदरीत आकर्षक दिसणे, मोबाईल वापरणे, कलावंत असणे, यशस्वी असणे, निर्भय असणे… या सर्व गोष्टी आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. त्यामुळे सर्व विचारपंथांचे अनेक राजकारणी त्यासाठी आपला जीव बिचारे पाखडत असतात.स्त्रियांबद्दल थोडे विनोदाने बोलणे, त्यांच्या अंगप्रत्यंगदर्शनाचा आनंद घेणे, त्यांना पळवणे, त्यांच्यावर संधी असलीच- त्यांनी दिली तर बलात्कार करणे, त्यांच्या योनीचे उल्लेख जातायेता करणे ही आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि पृष्ठभूमीही आहे. या सर्व डीजेच्या नादात एक बिचारा राम कदम मुलांसाठी मुली पळवायला मदत करायचं म्हणेल तर त्याच्यावर एवढी टीका…

बहूत नाइन्साफी है…

****
ता.क.
हा उपरोध आहे असे लिहून वाचकांचा अपमान करायचा नाही. पण लिहावे लागते. कारण उपरोध न समजून तंडायला सुरुवात केल्याची उदाहरणे अनुभवली आहेत. या सर्व पुरुषप्रधान संस्कृतीच्या चिखलराड वाटेवर स्त्रियांना ही लांच्छने सोसावी लागतात याचे अतीव दुःख आणि संताप आहेच.

मुग्धा कर्णिक

- Advertisement -