घरफिचर्सघनघोर प्रश्नांचा निबिड कोलाहल

घनघोर प्रश्नांचा निबिड कोलाहल

Subscribe

मोबाईलकेंद्री जगणे हा आजच्या काळाचा एक सर्वात भीषण प्रश्न आहे. कौटुंबिक स्तरावर संघर्षाच्या लढाया सुरू झाल्या आहेत. ‘आपल्या संस्कृतीचा किंवा जीवनशैलीचा नैतिक पायाच ठिसूळ झाला’ असे म्हणून कसे चालेल? सुखवादी मूल्येच जीवनमूल्ये होणार असतील तर मग ‘काळ तर मोठा कठीण आला’ असेच म्हणावे लागेल. घनघोर प्रश्नांच्या या निबिड कोलाहलातून आपली सुटका कशी होईल? हा मोठाच प्रश्न आहे.

‘हे माझे युग म्हणजे घनघोर प्रश्नांचा निबिड कोलाहल; जमिनीतून, आकाशातून, दिशांतून, उसळताहेत रुद्र रूप प्रश्न, नागासारखे सळसळत, विजांसारखे कडाडत, गर्जना करीत हिंस्र श्वापदासारखे’

माणसाच्या वर्तमान जगण्याला अधोरेखित करणार्‍या कुसुमाग्रजांच्या ‘प्रश्न’ कवितेतील या काही ओळी. काळ बदलतो. जगण्या वागण्याचे संदर्भ बदलतात. रीतीरिवाज बदलतात. पण प्रश्न काही संपत नाहीत. माणसाच्या जगण्याला लाख प्रश्नांचे सर्वव्यापी भय कायम लगडून असतेच. आपण एका वर्षातून दुसर्‍या वर्षात उडी मारतो. एका शतकातून दुसर्‍या शतकात प्रवेश करतो. हा प्रवेश कुठल्याही प्रयत्नांशिवाय सहज घडतो. आपली इच्छा असो की नसो आपल्याला काळाबरोबर पुढे सरकावेच लागते. अर्थात आपल्या नेणिवेत हे वार्षिक स्थलांतर दडलेले असतेच. प्रत्येक काळाचा एक स्वभावधर्म असतो. म्हणजे हा स्वभावधर्म त्या त्या काळातल्या भौतिक स्थित्यंतरातून आकाराला येत असतो. शिवाय प्रत्येक काळाचे स्वतंत्र विचार आणि सौंदर्यशास्त्र असतेच. व्यवहार आणि नितीचेही काही संकेत रूढ असतात. ज्ञान आणि अनुभवातून माणसांच्या गजबजीला काहीएक अर्थ मिळत जातो. आणि यातूनच समाज नावाची व्यवस्था अधिक ठळक होत जाते.

- Advertisement -

समाज म्हटलं की तो कधीच एकरेषीय वा एकात्म नसतो. म्हणजे विचारांच्या पातळीवर संभ्रमाचे अनेक प्रश्न असतातच. त्या प्रश्नांची सोडवणूक करणारे तत्त्वज्ञानही प्रत्येक काळात असतेच. हे तत्वज्ञान आत्मसात करून आपण आपलं जगणं अधिक उन्नत करत असतो. आता आपण एकविसाव्या शतकाच्या विसाव्या वर्षात प्रवेश केला आहे. मागच्या वर्षाने आपल्या जगण्यावर उमटवलेले व्रण अधिक गडद आहेत हे खरे, पण ते व्रण धूसर करून नव्या वर्षातल्या नव्या आव्हानांना आपण सामोरे जायला सज्ज झालो आहोत. म्हणजे त्याशिवाय अन्य पर्यायही आपल्याकडे नसतोच. आपण आपल्याही नकळत एका मोठ्या अवकाशाशी बांधले जातो. त्या अवकाशात राहूनच आपण आपल्या भाषेला, संस्कृतीला आणि अनुभवातून आलेल्या ज्ञानाला प्रतिसाद देत असतो. अर्थात हे सगळं फार गणितीय पद्धतीने घडतं असंही नाही, पण घडतं हे खरं.

तर हे सगळं तात्विक निरुपन कशासाठी? असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर त्याचं उत्तर हे की कोणत्याही काळातली नवी पिढी ही त्या त्या काळातल्या रूढ संकेतांना ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. याचा अर्थ पारंपरिक मूल्यांवर त्यांची श्रद्धा नसते असं नाही, पण तरीही ते स्वतःचा एक स्वतंत्र रस्ता निर्माण करू पाहतात. बाह्य नैतिक उपदेशांपेक्षा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज त्यांना अधिक जवळचा वाटतो. या आवाजाला कोणतीच दिशा नाही असं आधीच्या पिढीला वाटतं. आणि आपण जे करत आहोत तेच सर्वार्थाने योग्य आहे असं नव्या पिढीचं म्हणणं असतं. पिढीदर पिढी पडत जाणारं वैचारिक अंतर कधीही मिटत नाही. कोणताही समाज याला अपवाद नसतो. विशेषतः आजच्या बदललेल्या सांस्कृतिक जीवनात अनाकलनीय अशी संरचना आकाराला आलेली असताना हे अंतर अधिक वाढत चाललं आहे हे स्पष्ट दिसतं. आणि अशी परिस्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेली समाजमाध्यमाची अनिर्बंध सत्ता किंवा एकाधिकारशाही.

- Advertisement -

मागच्या काही वर्षातलं आपलं जगणं हे माध्यमाधारित झालं आहे. ज्या गतीने सोशल मीडियाचे युजर्स भारतासह जगभरात वाढत आहेत ते पाहता येणारा काळ भावनिकदृष्ठ्या आपल्याला अधिक असंवेदनशील बनवणारा काळ ठरण्याची शक्यता आहे. अलीकडच्या एका ताज्या माहितीनुसार जगभरात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास साडेचारशे कोटीहून अधिक तर इंस्टाग्रामचे 270 कोटीहून अधिक युजर्स आहेत. ही संख्या चक्रावून टाकणारी आहे आणि दिवसेंदिवस यात वाढ होतच आहे. याशिवाय टिकटॉक, युट्युब आणि अन्य अ‍ॅपला मिळणारा प्रतिसादही लक्षणीय आहे. गेल्यावर्षी सुमारे बारा हजार कोटी अ‍ॅप्स इंस्टॉल करण्यात आले आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा आणि किती करावा हा वर्तमानकाळातला एक महत्त्वाचा प्रश्न होऊ पाहत आहे. एखाद्या माध्यमाचा माणसाच्या जगण्यावर, त्याच्या पिढीवर आणि एकूणच काळावर किती प्रभाव पडतो याचे हे एक ताजे उदाहरण आहे. लहान गावापासून ते महानगरापर्यंत या माध्यमाची लोकप्रियता कमालीची वाढत चालली आहे. केवळ तरुण पिढी वा लहान मुलेच या माध्यमाचे लाभार्थी आहेत असे नाही. नव तंत्रज्ञानाने दिलेला हा विळखा आता सुटण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत.

ज्ञान आणि माहितीचं हे नवं क्षेत्र अमर्याद आहे. व्यक्त होण्याचं एक सुलभ माध्यम सहज उपलब्ध झाल्यामुळे सोशल मीडिया कमालीच्या वेगाने विस्तारत चालला आहे. या माध्यमाने काळालाही शरण जायला भाग पडले आहे. अर्थात सोशल मीडिया ही आपली आत्यंतिक गरज आहेच, पण त्याची नकारात्मकताही दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. कलात्मक सौंदर्याचे नवे सर्जन या माध्यमाने उपलब्ध करून दिले. स्वतःचे पंधरा सेकंदाचे टिकटॉक आयुष्य लोकांपुढे मांडण्याची घाई आणि उत्साह पहिला की माणसाच्या अनाकलनीय मनोव्यापाराचा परिचय आपल्याला होतो.

मानवी सभ्यतेच्या इतिहासात आरशाचा शोध हा महत्त्वाचा मानला गेला आहे. केवळ स्वतःला पाहता येणे ही घटना कधीकाळी क्रांतिकारक होती. आता सेल्फिच्या जगात तर आपण स्वतःला हवं तसं मोल्ड करू शकतो. स्वतःपुढेच स्वत:चे प्रेझेन्टेशन करू शकतो. आणि दुसर्‍याला एडीटही करू शकतो. ‘मी कुणीतरी आहे’ ही भावना बळावत गेली की इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा खटाटोप सुरू होतो. लाईक अथवा कॉमेंट्सचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपण अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता आपल्याला नैराश्याच्या खाईत ढकलण्याची शक्यता असते. म्हणून मग लक्ष वेधून घेण्याची कृती अधिक गतिमान होते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी केली जाते. सध्या मोबाईलवर धुमाकूळ घालणारे तरुणांचे टिकटॉक व्हिडीओ पाहिले की याची प्रचिती येते. व्यक्तिगत स्तरावरची आपली एखादी स्वाभाविक कृतीसुद्धा व्हायरल होते. आपली प्रायव्हसी ट्रोल होते. मोबाईलकेंद्री जगणे हा आजच्या काळाचा एक सर्वात भीषण प्रश्न आहे. कौटुंबिक स्तरावर संघर्षाच्या लढाया सुरू झाल्या आहेत. ‘आपल्या संस्कृतीचा किंवा जीवनशैलीचा नैतिक पायाच ठिसूळ झाला’ असे म्हणून कसे चालेल? सुखवादी मूल्येच जीवनमूल्ये होणार असतील तर मग ‘काळ तर मोठा कठीण आला’ असेच म्हणावे लागेल. घनघोर प्रश्नांच्या या निबिड कोलाहलातून आपली सुटका कशी होईल? हा मोठाच प्रश्न आहे.

तर असो या वैश्विक पसार्‍यातल्या अशा असंख्य वर्तमान प्रश्नांचा उच्चार आपण करत राहू. कारण या उच्चारातच आपल्या मानसिक आणि वैचारिक विकासाचा सुप्त इतिहास दडला आहे.

-पी. विठ्ठल

-(लेखक प्रसिद्ध कवी असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आहेत.)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -