Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स ममतांचा ‘खेला होबे’

ममतांचा ‘खेला होबे’

संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांना विरोधकच नाही अशा हवेत भाजपाची मंडळी असताना पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एखाद्या जखमी वाघिणीसारखा त्वेषाने जो लढा दिला त्यामुळे बंगालमध्ये तिसर्‍यांदा तृणमूल काँग्रेसने विजयी हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. या निवडणुकीत ‘खेला होबे’ चा नारा दिला होता. ‘खेला होबे’ चा मराठीत अर्थ ‘खेळ होणार’! या निवडणुकीत रणनितीकार प्रशांत किशोर यांनी रणनीती बनवली असली तरी या ‘खेला होबे’ने संपूर्ण निवडणुकीत विलक्षण उत्साह भरला.

Related Story

- Advertisement -

देशभरासाठी आणि जगभरातील राजकीय चिकित्सकांसाठी लक्षवेधी ठरलेल्या प.बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल रविवारी लागलेला आहे. पश्चिम बंगालचा गड आला त्यासाठी ममता बॅनर्जी नावाची जखमी वाघीण कशी लढली यावरच सर्वत्र चर्चा सुरू आहे. नंदिग्राम हा पश्चिम बंगालमधील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. कारण इथून तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुवेंदु अधिकारी यांच्याशी लढत देत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी पाच राज्यांपेक्षा पश्चिम बंगालवर तन-मन- धन अर्पण करून आपले लक्ष केंद्रित केले होते. संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांना विरोधकच नाही अशा हवेत भाजपाची मंडळी असताना पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एखाद्या जखमी वाघिणीसारखा त्वेषाने जो लढा दिला त्यामुळे बंगालमध्ये तिसर्‍यांदा तृणमूल काँग्रेसने विजयी हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. या निवडणुकीत ‘खेला होबे’ चा नारा दिला होता. ‘खेला होबे’ चा मराठीत अर्थ ‘खेळ होणार’! या निवडणुकीत रणनितीकार प्रशांत किशोर यांनी रणनीती बनवली असली तरी या ‘खेला होबे’ने संपूर्ण निवडणुकीत विलक्षण उत्साह भरला. हा उत्साह लाखोंचा जनसमुदाय अनुभवताना हे घोषवाक्य जाहीर सभेत आपल्या तोंडून उद्धृत करणं दस्तुरखुद्द मोदींनाही भाग पडलं. ‘खेला होबे’ हे गाणं तृणमूलचे युवानेते देबांगशू भट्टाचार्य यांनी लिहिलं. त्याच्या शब्द आणि सुरांमुळे ते समाजमाध्यमांवरुन विलक्षण लोकप्रिय ठरलं. एरव्ही इव्हेंट करण्यातच रमणार्‍या पंतप्रधान मोदींच्या करिष्म्याचा बेरंग होण्यात ‘खेला होबे’ची भूमिका मोठी आहे. मोदी-शहा यांच्यासमोर एकांडी शिलेदार असलेल्या ममता बॅनर्जी यांचा निभाव लागणार नाही असं बहुतेकांना वाटत होतं. असा समज होणं स्वाभाविक आहे, कारण भाजपने आपली सारी राजकीय ताकद, केंद्रीय यंत्रणा इतकंच काय पण निवडणूक व्यवस्था ही ममतांना घेरण्यासाठी कामाला लावली होती. अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशी सगळी नेते मंडळी पश्चिम बंगालच्या भागाभागातून ममतांना घेरू पाहत होती. मात्र संघर्षाचे बाळकडू अगदी लहानपणापासूनच घेऊन एक तेजतर्रार प्रादेशिक नेता म्हणून देशाच्या राष्ट्रीय कॅनव्हासवर स्वतःचे स्थान लक्षणीय पध्दतीने बनवणार्‍या ममतांनी या निवडणुकीत कमालच केली. बंगाली मानुष, बंगाली माटी यांना साद घालत ममतांनी भूमिपूत्रांची लढाई अस्मितेसाठी लढल्या. बंगालींना साद घालताना ममता बॅनर्जी यांनी मुस्लीम आणि दलित यांना भाजपला आपल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. बंगालमधील दलितांना भाजप आपला वाटला नाही हेदेखील ममता यांचं यश आणि भाजपचं अपयश आहे हे इथे नमूद करायला हवं. मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि डावे यांच्या मदतीने मतांचे ध्रुवीकरण करण्याची खेळी भाजपने अत्यंत खुबीने खेळली होती. ही खेळी परतवून लावण्यातदेखील ममतांना यश आलं. राष्ट्रीय स्तरावर जी हाराकिरी मोदी यांच्या सरकारमुळे देशवासीयांच्या वाट्याला आलेली आहे ती बंगालमधील जनतेच्या वाट्याला येऊ शकते. शहा-मोदी ही जोडगोळी दलित आणि मुस्लिमांना त्रास देऊ शकते. बंगाली माणसाच्या मनावर बिंबवण्यामध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या थिंक टँकला खूपच छान यशं आलं. नंदिग्राममध्ये ममता यांच्या पायाला दुखापत झाल्यानंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसून अख्खा बंगाल पिंजून काढला. सत्ता आणि पैसा यांच्यासह तयारीत उतरलेल्या भाजपबरोबर दोन हात करणार्‍या ममता यांनी सतत आक्रमक पवित्रा अंगीकारला होता. आणि जेव्हा देशातली सगळी दिग्गज मंडळी आपल्या ‘बंगाली लेकी’वर तुटून पडत आहेत हे लक्षात आल्यानंतर संवेदनशील बंगाली माणसाने ‘माटी आणि मानुष’ ह्यासाठीची लढाई निकराने लढण्यात मर्दुमकी मानली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बाबतीत जी गोष्ट सातार्‍यात घडली तीच गोष्ट नंदिग्राममध्ये जखमी झालेल्या ममतांच्या बाबतीत घडली. सातार्‍यातल्या पोटनिवडणुकीमध्ये धो-धो पावसात भिजत जाहीर सभा घेणार्‍या पवारांना त्यानंतर राज्यभरात आणि देशभरात जो सहानुभूतीपूर्वक पाठिंबा मिळाला, अगदी तसाच सहानुभूतीपूर्वक पाठिंबा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मिळाला. आणि जेव्हा लोक अस्मिता, माती आणि सहानुभूती यांच्यासाठी तुमच्या मागे राहतात तेव्हा काय होतं हे सगळ्या देशाने अनुभवलं.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला तिसर्‍यांदा सत्ता मिळाली आहे. त्याच वेळी 294 संख्याबळाच्या पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे फक्त तीन शिलेदार होते. त्या तीनवरून मोदी-शहांच्या भाजपाने पाऊनशे जागांचा पल्ला गाठला आहे. या यशामुळे भाजपच्या पदरी काहीच पडलं नाही असं समजण्याचं कारण नाही. भाजपने मारलेली मजल ही कौतुकास्पद असली तरी मोदी-शहा हे या कौतुकास्पद यशामुळे सुखावलेले नाहीत. हे कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. मोदी-शहा-नड्डा यांना देशाच्या वेगवेगळ्या भागात असलेले प्रादेशिक पक्ष ठरवून संपवायचे आहेत. पूर्वेकडची राज्ये असो किंवा पश्चिमेकडची, प्रादेशिक पक्ष हे भाजपच्या यशातले रोडे ठरू शकतात, असं सातत्यानं भाजपच्या मंडळींना वाटत असतं आणि त्यानुसारच केंद्रीय भाजपचा कार्यक्रम ठरत असतो. त्या कार्यक्रमाला आजच्या निकालांमुळे खीळ बसलेली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये ममतांनी जसा विजय मिळवला तीच गोष्ट तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या बाबतीत म्हणता येईल. करुणानिधी यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत तिथल्या भूमिपुत्रांसाठी, भाषेसाठी आणि राज्याच्या अस्मितेसाठी सातत्याने दिल्लीबरोबर लढा दिला. खरंतर दक्षिणेतील सगळ्याच नेत्यांबाबत हे आपण म्हणू शकतो. त्यामुळे स्टॅलिन यांनी मिळवलेला विजय प्रादेशिक अस्मिता जपणार्‍या पक्षांचा विजय म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. केरळमध्येदेखील भाजपला छाप पाडता आलेली नाही. डाव्यांचा हा गड आपल्या हाती रहावा असं मोदी-शहांना वाटत असलं तरी ममतांना जमीनदोस्त करण्यात व्यग्र असलेल्या या जोडीने केरळकडे थोडं कमी लक्ष दिलंय. आसाममध्ये सत्ता राखण्यात भाजपने यश मिळवले आहे. 30 जणांच्या पुड्डुचेरीमध्ये भाजप सत्तेजवळ आहे. या निवडणुकांच्या निकालांनी मोदी आणि शहा यांना काही प्रमाणात जमिनीवर आणताना भाषा आणि प्रांतरचनेनं बनलेल्या भारताच्या विविधतेला नखं लावू नये, असा धडा देतानाच कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत केंद्र सरकारच्या डोळ्यात अंजनही टाकलं आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असं सांगून स्वतःचा सदरा झटकणार्‍या भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय संस्था आणि आयोग यांना किती आणि कसं स्वातंत्र्य दिलं आहे हे एव्हाना देशातल्या जनतेला नीट कळून चुकलं आहे. कोरोनाचा झालेला देशभरातला संसर्ग आणि झालेली मनुष्यहानी याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयापासून ते जगभरातल्या माध्यमांनी केंद्र सरकारवर कोरडे ओढले आहेत. त्यातून हे दोघे काही शिकवण घेतात की प्रत्येक गोष्टीचं आणि घटनेचं राजकारण करणार्‍या शहा-मोदी या जोडगोळीने तटस्थ नजरेतून निवडणुकांचे निकाल आणि कोरोना महामारी याकडे बघण्याची वेळ आली आहे. आता राजकीय अजेंड्यापेक्षा कोरोनाचा अजेंडा अधिक जोरकसपणे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी राबवायला हवा. हेही या निवडणुकांनंतर इथे आम्हाला सांगायला हवं. कारण मोदी-शहांच्या राजकीय स्वप्नांसाठी लाखोंच्या सभा झाल्या आणि त्यातून पसरलेल्या कोरोनाने देशभरात रुग्णांना तडफडत ठेवलेच आहे. गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक बळी घेणारी ही महामारी ठरली आहे. मोदी-शहा यांच्या चेल्यांनी आता आपले राजकीय विषय बाजूला ठेवून महामारीवर मात करण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, नाहीतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे’ चा दिलेला मंत्र देशातील इतर राज्यातील जनता हाती घेईल.

- Advertisement -