गीतकार, लेखिका शांता शेळके

शांता शेळके या ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. त्यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी इंदापूर (जि. पुणे) याठिकाणी झाला. खेड, मंचर या परिसरात त्यांचे बालपण व्यतीत झाले. शांताबाईंचे आजोबा (वडिलांचे वडील) अण्णा हे शाळामास्तर होते. शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावे लागले. एकूण ही पाच भावंडे त्यात शांताबाई सगळ्यात मोठ्या. आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचनवेडाचे संस्कार कळत-नकळत शांताबाईंवर होत राहिले.

लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात रूजत गेली. त्यांचे पुढील शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागेत झाले. सुसंस्कृत सुविद्य, अभिजात अशा या शाळेतील वातावरणाचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. १९३८ मध्ये त्या मॅट्रिक झाल्या आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्या. या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला. प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला. हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. १९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम. ए. झाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात शांताबाईंची जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी (१९५६), तोच चंद्रमा (१९७३), गोंदण (१९७५), कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), चित्रगीते (१९९५), पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९८) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मुक्ता (१९४४), गुलमोहोर (१९४९), प्रेमिक (१९५६), काचकमळ (१९६९), सवाष्ण (१९७४), अनुबंध (१९८०), बासरी (१९८२), कविता करणारा कावळा (बालकथासंग्रह, १९८७), सागरिका (बालकथासंग्रह १९९०), हे कथासंग्रह; विझली ज्योत (१९४६), नरराक्षस (१९४८), पुनर्जन्म (१९५०), धर्म (१९७३), ओढ (१९७५), स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर, या त्यांच्या कादंबर्‍या आहेत.

विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांचे पहिले आणि खरे प्रेम राहिले ते कवितेवरच. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्ठ्ये होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (१९८८), कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९१), ग. दि. माडगुळकर पुरस्कार (१९९४) इत्यादी पुरस्कार त्यांना लाभले. अशा या लोकप्रिय लेखिकेचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.