घरफिचर्सपाणथळ जागा : सर्वाधिक दुर्लक्षित परिसंस्था

पाणथळ जागा : सर्वाधिक दुर्लक्षित परिसंस्था

Subscribe

पाणथळ जागा ह्या जंगलापेक्षा तिप्पट वेगाने नष्ट होत आहेत. आज गावागावात चित्र बदलते आहे. शहरात तर असे बदल झपाट्याने होताना दिसत आहेत. अशा बदलांना अनेकदा विकास झाला असं म्हणण्यात येते. शहरात अशी तळी आता खूपच दुर्मीळ झाली आहेत. बांधकाम व्यावसायिक अशा जागांवर लक्ष ठेवून असतात. दुसरीकडे सामान्य लोकही याबाबतीत पुरेसे जागरूक नाहीत. आपल्याला पाणथळ जागा ह्या फक्त सांडपाणी सोडायला, कचरा, जुने कपडे, चपला बूट फेकण्याची जागा वाटतात. ह्यापलीकडे यांचा विचार करणारे लोक खूप मोजकेच दिसतील.

जवळपास सर्वच गावात व शहरात एखादं तळं असतं. काही ठिकाणी ते डबके म्हणता येईल इतके छोटे, तर काही ठिकाणी साधारण शंभर मीटर इतका परिघ असलेलं. असे पाणी साठलेले ठिकाणे असतात. छोट्या छोट्या नाल्यातून, घळीतून त्यात पावसाचे पाणी जमत असते. यातील काही तळी हंगामी, काही बारमाही पाणी असणारी असतात. हंगामी असणारं तळ उन्हाळ्यात पोरांना खेळाचे मैदान म्हणून कामी येतं. ह्या पाणथळ जागेत फक्त पाणीच साचलेलं असते असं नाही. तळ्याच्या काठाकाठानी बेशार्मी(आयपोमिया), थोडेसं पुढे अक्कलकराचे छोटे छोटे रोपे, दोन तीन प्रकारचे लव्हाळे, थोडंसं नागरमोथा, हळदी कुंकूचे टवटवीत फुलं, कुरडू किंवा शंकरोबाच्या फुलाचे काही तुरे असे अनेक वनस्पती एकमेकांच्या संगतीत डोलत असतात. जवळच सुंदर पांढर्‍या फुलाच्या चित्रकाचे एखादे झुडूप असते. ह्या वनस्पती बरोबरच पाण्यात शांत बसलेला बगळा दिसेल.

- Advertisement -

बेशर्मीच्या फांदीवर किंवा करंजीच्या झाडावर एखादा खंड्या (पक्षी) पाण्यातील हालचालीवर लक्ष ठेवून बसलेला दिसेल. काठावर शेपटी हलवत बसलेला धोबी पक्षी आपला सहज लक्ष वेधून घेतो. वेडा राघू किड्यांवर ताव मारत हवेत गिरक्या घेताना आपल्या नजरेस पडणार नाही असे होतच नाही. सोबतच आकशात इकडे तिकडे उडत, पिंगा घालणारे चतुर व विना(ड्रॅगन फ्लाय व डॅम्सन फ्लाय) दिसतीलच. अधिक निरीक्षण केल्यास पाण्यातून डोके वर करणारी बेडकं दिसतील. बेशर्मीच्या पानावर कासवासारखा दिसणारा सुंदर ढाल किडा (बिटल) दिसेल. जवळपासच्या जनावरांच्या शेणाचे गोळे पाठीवर घेऊन जाणारा शेणकिडाही दिसेलच.

पाणथळ जागेवरील ह्या सर्व पक्षी, किडी, वनस्पती यांचे पाण्याभवती एक नातं तयार झालेलं असते. हे पाण्याचं तळं गावातील असेल तर तिथं गावातील महिला कपडे धूत असतात. एका वेगळ्या काठावर शेतकरी आपले जनावरे धूत असतो. मोठ्या प्रमाणत डिटर्जन आणि साबणाच्या वापराच्या ह्या अलीकडील काळाच्या आधीपर्यंत कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे या पाणथळ जागांसाठी निरुपद्रवी बाबी होत्या. आजही मैलापाणी सोडणे व कारखान्यातील प्रक्रिया न केलेलं पाणी तळ्यात, नदीत सोडणे यांच्या तुलनेत ह्या बाबी नाही म्हणता येईल इतक्याच घातक आहेत. मात्र टीव्ही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्र यातून ह्या गावातील सामान्य लोकांनाच खलनायक म्हणून उभे केले जाते. या तळ्याचे एक काठ असे सुरक्षित ठेवलं जाते जिथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी आणलं जाते. असं हे सतत चालणार्‍या घडामोडींनी सक्रिय तळं बहुतेकांनी पाहिलेलं असणार. ह्या तळ्याचे महत्त्व वरवर दिसणार्‍या वापराच्याही खूप जास्तीचे असते. गाव आणि शहरात तळ्याचे काम हे मानवी शरीरातील फुफ्फुसारखे असते. गावाला एक चैतन्य आणण्याचे काम ह्या पाणथळ जगामुळे होत असते.

- Advertisement -

शहरं व महानगरांच्या बाबतीत पाणथळ जागा ह्या तर खूप मोलाच्या असतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. भूजलाची पातळी वाढते. ओढ्यांचे व नद्यांचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवतात, पूर परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी ह्या तळ्यांची भूमिका महत्त्वाची असते. मासे आणि इतर जलचर यांना राहण्यासाठी वसतीस्थान पाणथळ जागामधून तयार होते. यामध्ये असलेली वनस्पती आणि जलचरांची विविधता हीदेखील खूप मोलाची भूमिका निभावत असते. थोडी मोठी पाणथळ जागा असेल तर त्यातून मासेमारी व वेगवेगळ्या खाद्य वनस्पती घेतल्या जातात. कैक औषधी वनस्पतीही या पाणथळ जागांमधून मिळत असतात. द मिलेनियम इकोसिस्टिम असेसमेंट (२००५) च्या अभ्यासानुसार असे अनुमान काढले गेले होते की, पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी ७ टक्के जागा ह्या पाणथळ जागांनी व्यापली आहेत. ह्या पाणथळ जागा एकूण ४५ टक्के नैसर्गिक उत्पादन आणि पर्यावरणीय सेवा पुरवतात. जगभरात दीड ते तीन अब्ज लोक पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आणि अन्न तसेच उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाणथळ जागांवर अवलंबून आहेत. या नैसर्गिक संपत्तींचे वार्षिक अंदाजित मूल्य वीस ट्रिलियन डॉलर इतके आहे. इतके फायदे असूनही पाणथळाच्या जागांना उद्योग, शेती आणि रहिवासाच्या वापरासाठीच्या कारणासाठी म्हणून नष्ट करण्यात येत आहेत.

पाणथळ जागा ह्या जंगलापेक्षा तिप्पट वेगाने नष्ट होत आहेत. आज गावागावात चित्र बदलते आहे. शहरात तर असे बदल झपाट्याने होताना दिसत आहेत. अशा बदलांना अनेकदा विकास झाला असं म्हणण्यात येते. शहरात अशी तळी आता खूपच दुर्मीळ झाली आहेत. बांधकाम व्यावसायिक अशा जागांवर लक्ष ठेवून असतात. दुसरीकडे सामान्य लोकही ह्याबाबतीत पुरेसे जागरूक नाहीत. आपल्याला पाणथळ जागा ह्या फक्त सांडपाणी सोडायला, कचरा, जुने कपडे, चपला बूट फेकण्याची जागा वाटतात. ह्यापलीकडे यांचा विचार करणारे लोक खूप मोजकेच दिसतील. त्यांचाही आवाज इतका मर्यादित असतो की, ते शहराच्या कर्त्या-धर्त्या म्हणवल्या जाणार्‍या लोकांपर्यंत पोहचत नाहीत. ह्यात दुसरी बाब ही आहे की, हे करते-धरते लोक असा आवाज ऐकायचेच नाही हे आधीपासूनच ठरवलेलं असतं.

२ फेब्रुवारी १९७१ रोजी इराण येथील ‘रामसर’ या ठिकाणी जगातील काही देश एकत्र आले आणि त्यांनी पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी एक करार केला. त्याला ‘रामसर करार’ म्हणून ओळखले जाते. ‘रामसर करारा’अंतर्गत सध्या १६८ देश एकत्र येऊन २१७७ पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. दर वर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक ‘पाणथळ जागा’ दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पाणथळ जागांच्या संबंधी एखाद्या महत्वपूर्ण विषयावर भर देऊन वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. गेल्या वर्षी शाश्वत शहराच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागांचे महत्त्व काय आहे ह्यावर चर्चा, परिसंवाद व वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. यंदाच्या वर्षी होणार्‍या ‘जागतिक पाणथळ जागा दिवसच्या’ निमित्ताने हवामान बदल रोखण्यासाठी ह्या पाणथळ जागा कशा महत्त्वपूर्ण आहेत ह्यावर आधारित उपक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र असे दिवस साजरा करण्याची प्रथा ही काही विशिष्ट पर्यावरण प्रेमी गट, संस्था यांच्या पुढाकारातून व त्यांच्याच वर्तुळापुरती मर्यादित असतात.

वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग व संबंधित संस्था ह्यांना असे दिवस साजरे करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून जारी केले जातात. ह्या विभागाची गाव व वार्ड पातळीवरील यंत्रणा औपचारिकता पूर्ण करण्यासाठी काहीतरी छोटेमोठे उप्रकम करून त्याचे अहवाल सादर करीत असतात. पर्यावरणाच्या संबंधी जवळपास वीस एक तरी दिन विशेष आहेत. जसे, पाणी दिवस, चिमणी दिवस, वन्यजीव सप्ताह, वसुंधरा दिवस, जैवविविधता दिवस, पर्यावरण दिवस, नदी दिवस, इत्यादी. हे सर्व दिवस जवळपास सारख्याच पद्धतीने साजरा केले जातात. त्या-त्या दिवसानिमित्त छापलेला बॅनर जर कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाजूला केला तर सर्व दिवस सारखे वाटतील. गेल्या वर्षी पुणे महानगरपालिकेतर्फे जे जागतिक पाणथळ जागा दिवस साजरा करण्यात आले त्यात, कात्रज प्राणी उद्यानात भाषणाचे कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यात पर्यावरणाचे महत्त्व गायले गेले. मात्र महानगरपालिकेतर्फे जे दर वर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो त्यामध्ये पुण्यातील पाणथळ जागांचा साधा आढावादेखील घेतला गेला नाही.

हवा प्रदूषण आपल्याला लगेच जाणवू शकते. नष्ट होणारे जंगल आपल्याला दिसू शकते. प्रदूषित पाणी आपण पिऊ शकत नाही म्हणून हेही आपण पाहू शकतो. नष्ट होणार्‍या पाणथळ जागांचे परिणाम उशिरा समोर येतील. भारतातील काही प्रमुख शहरांना ह्याचे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहेत. चेन्नईमध्ये आलेल्या पुराच्या अनेक कारणांमध्ये तेथील नाहीसे झालेल्या पाणथळ जागांचा वाटा मोठा आहे. लोकांना राहायला जागा हवीय, घरं बंधायचीत, कारखाना उभारायचा, शेती करायचीय तर मग अशा पाणथळ जागांचे बळी दिले जातात. मात्र त्यातून होणारे परिणाम हे नंतर कोण दोषी आहे हे न पाहता सर्वांच्याच वाट्याला येतात. आलेला महापूर जात, धर्म, वय, लिंग किंवा कृती बघून घरात शिरत नाही. म्हणून अशा पाणथळ जागा सुरक्षित राखणे ही सामूहिक जबाबदारी बनते. अनेकदा सामूहिक असलेली बाब कुणाचीही जबाबदारी राहत नाही. त्यामुळे त्या-त्या गावातील, शहरातील नागरी समाज, अशासकीय संस्था ह्यांनी मिळून ह्याबद्दलचे सार्वजनिक धोरण सुनिश्चित करणे गरजेचे आहे. एक वेळ बहुविध झाडे लावून जंगल उभे करणे शक्य होऊ शकेल, मात्र नष्ट झालेल्या पाणथळ जागा पुन्हा परत येणार नाहीत.

पाणथळ जागा:
जमिनीवरील पाण्याच्या जागा. ज्यात छोट्या हंगामी तळी, मोठी बारमाही तळे, धरण, झरे, ओढे, नदी, खारफुटी जंगल, जमिनीलगतचा समुद्राचा काही भाग, यांचा समावेश होतो. भाताची खाचरे हीदेखील पाणथळ जगामध्येच गणली जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -