Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग संयमातून लोकप्रियतेकडे!

संयमातून लोकप्रियतेकडे!

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मंगळवारी 27 जुलै रोजी वयाची साठी पार करत आहेत. स्वतःच्या प्रेमात पडून प्रतिमेपेक्षा उत्कट दिसण्याचा अजिबात अविर्भाव न करता आपण आहोत तसे लोकांना सामोरे जाणारे हे नेतृत्व आहे. या जगात सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो आणि आपण तसे आहोत, असा कोणी दावा करत असेल तो लोकांना नाही तर स्वतःला आधी फसवत असतो. जगभरातील सर्वच हुकूमशहा नेतृत्व तर आपण स्वतःसाठी नाही तर माझ्या जनतेसाठी जगतोय, असे सांगतात तेव्हा ते एकप्रकारे लोकांच्या हक्कांवर गदा आणत असतात. त्यांना सर्व अधिकार आपल्या हाती हवे असतात. आपली रेष मोठी करताना इतरांची रेष पुसून टाकताना त्यांचा प्रवास हा लोकशाही मूल्यांना नख लावणारा असतो. रात्रीचा दिवस करून राज्यकारभार हाकतोय असा आव आणणारे नेतृत्व हे आधी आपल्या प्रेमात असते. माझ्याशिवाय दुसरे कोणी मोठे नाही, असा त्यांचा प्रवास आपल्या सोबत्यांनाच नव्हे तर ते ज्या जनतेवर राज्य करतात त्यांच्यासाठीसुद्धा खूप त्रासाचा ठरतो.

या सर्व बाबींचा विचार करता उद्धव यांचे नेतेपद आपली वेगळी ओळख सांगणारे आहे. म्हणूनच ‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील प्रमुख 13 राज्यांत नुकत्याच घेतलेल्या सर्वेक्षणात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले होते. राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून उद्धव यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेले हे सर्वेक्षण शिवसेनेला बळ देणारे होते. ‘उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 49 टक्के मतदारांनी नोंदवले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर दुसर्‍या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत. त्यांच्या कामगिरीला 44 टक्के सकारात्मक मते मिळाली आहेत. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसर्‍या स्थानी राहून 40 टक्के मते त्यांच्या पारड्यात पडली आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तेलंगण, बिहार, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, गोवा आणि हरयाणा या 13 राज्यांत हे सर्वेक्षण घेण्यात आले. यात एकूण 17 हजार 500 मतदारांची मते जाणून घेण्यात आली, हे विशेष! या सर्वेक्षणाचा निकाल पुन्हा देण्याची गरज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्‍या आणि शाहू, फुले, आंबडेकर यांचे विचार घेऊन पुढे जाणार्‍या महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या एका संयमी नेतृत्वाची गरज होती. गेल्या दोन वर्षांत कोरोना, वादळे, अतिवृष्टी आणि पुरांनी राज्याला एकामागून एक हादरे बसत असताना हे नेतृत्व कधी गडबडून गेलेले दिसले नाही. मुख्य म्हणजे वास्तवापासून फारकत घेत आश्वासनांचे मायाजाल कधी उद्धव यांनी तयार केले नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार, आता केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे हे सारेजण सकाळी, दुपारी, संध्याकाळी पत्रकार परिषदा घेत, टीव्हीवर सतत स्वतःचे चेहरे दाखवत उद्धव यांच्यावर घणाघाती टीका करत असताना उद्धव यांनी कधीही आपला संयम सोडला नाही. आज यामुळेच दारातून आज हे नेतृत्व घराघरात जात लोकप्रिय झाले आहे.

प्रस्थापित राजकारणातील विरळा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांची आज ओळख झाली आहे. प्रचंड पाठीराखे असलेले, वाक्चातुर्यात तरबेज, धूर्त-कावेबाज, वलयांकित, सभामैदान मारणारे, गप्पांच्या फडापासून सर्वच मैफलींत रंगणारे ही नेहमीच जनाधार असलेल्या मोठ्या नेत्याची लक्षणे समजली जातात. उद्धव ठाकरे मात्र या लक्षणांपासून थोडे फटकूनच वागणारे. पण जेव्हा-जेव्हा त्यांच्या कुवतीबद्दल शंका घेतली गेली, त्या-त्या वेळी आपली क्षमता सिद्ध करणारा नेता अशी त्यांची ओळख आज संपूर्ण देशाला झाली आहे. प्रचंड लोकसंग्रह व जनाधार असलेल्या नेत्यांचा शिवसेना हा पक्ष. त्यांचे शिरोमणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. पण, बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव यांचे नाव पुढे येईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाच्या राजकारणात शांत स्वभाव व मवाळ वागणूक असलेल्या उद्धव यांना रसही नव्हता. ‘मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं. मी इथे मनापासून आलो नाही. ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलीय’, हे उद्धव यांनी अनेकदा सांगितले आहे. पण त्याबरोबरच ‘एकदा जबाबदारी स्वीकारली की मात्र मी मागे फिरत नाही. मी स्वत:ला कमी पडू देत नाही’, हे त्यांनी केवळ बोलून नव्हे, तर आज करून दाखवले आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांतही उद्धव यांनी कधी भाजपशी खांद्याला खांदा लावून तर कधी संघर्ष करून शिवसेनेला तारलेही आणि वाढवलेही.

- Advertisement -

समोर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यासारखे मातब्बर नेते असूनही उद्धव ठाकरे यांनी संघर्षाची वेळ येताच शिवसेनेचे एकहाती नेतृत्व केले व कार्यकर्त्यांमध्ये जोशही भरला. शांतपणे सर्व प्रतिकूलता सहन करीत संधीची प्रतीक्षा करायची आणि ती दृष्टीपथात येताच सर्वस्व पणाला लावून यश मिळवायचे, हीच उद्धव यांची विजयनीती आहे. शिवसेनेकडे आलेले मुख्यमंत्रीपद याचेच फळ. आमदार, खासदारांपेक्षा पक्षीय काम करणार्‍यांना उद्धव यांनी नेहमीच महत्वाचे स्थान दिले. याशिवाय नेत्यांची नवी पिढी तयार करतानाही त्यांनी बाळासाहेबांच्या काळातील नेत्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले. यामुळेच उद्धव यांची पक्षावरील पकड कधी सैलही झाली नाही आणि मोठमोठ्या आव्हानांमध्येही शिवसेना टिकून वाढत राहिली. उद्धव ठाकरे हे एक छायाचित्रकार आणि मनस्वी कलावंत. सुरुवातीच्या काळात राजकारणाच्या धबडग्यापासून दूर असलेलं व्यक्तिमत्व. ते सक्रिय राजकारणात येतील, शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेचं नेतृत्व करतील, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही शिवसेनेला एकसंध ठेवतील, संसदीय राजकारणात येतील आणि थेट मुख्यमंत्री होतील…यापैकी कुठलाही अंदाज कोणी कधी बांधला नसेल. पण तो आता इतिहास आहे. हे सगळे अंदाज उद्धव ठाकरे यांनी चुकवले आहेत.

उद्धव यांची राजकीय वाटचाल ही सतत परीक्षेला बसणार्‍या एखाद्या विद्यार्थ्यासारखी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रं उद्धव यांच्या हाती दिली आणि ही परीक्षा सुरू झाली. ती आजही सुरू आहे. विरोधकांकडून आणि अधूनमधून आपल्याच माणसांकडून प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर होत असतो. यातील काही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी कायमचे निकाली काढले आहेत. त्यातील ठळक प्रश्न म्हणजे नेतृत्वाचा. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेत्याचा मुलगा म्हणून त्यांच्यावर कायम दबाव राहिला. आजही त्यांच्यावर टीका करताना विरोधक अनेकदा त्यांची तुलना बाळासाहेबांशी करतात, यावरून हा दबाव लक्षात यावा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले गेले. उद्धव यांच्या नेतृत्वाखाली झालेली महापालिकेपासून ते लोकसभेची प्रत्येक निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वाची कसोटी म्हणूनच पाहिली गेली.

अनेक नेते सोडून गेले. राज ठाकरे यांनी नवा पक्ष काढून शिवसेनेला व पर्यायाने उद्धव यांना आव्हान दिले. उद्धव यांनी ही सगळी आव्हानं परतवून लावली. आपल्या स्वभावाला साजेसं शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं. शिवसेना टिकवलीच नाही तर वाढवली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीचं नवं पर्व आता सुरू झालं आहे. त्याचबरोबर शिवसेनेची वाटचालही वेगळ्या दिशेने होत आहे. मात्र त्यांची परीक्षा संपलेली नाही. मातोश्री आणि वर्षाच्या पलीकडे महाराष्ट्राचा मोठा पसारा असून चांदा ते बांद्यापर्यंत पसरलेल्या या आडव्या उभ्या राज्याचे खूप मोठे प्रश्न आहेत. हे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांनी आधी मंत्रालयात मुक्काम ठोकला पाहिजे. मुख्य म्हणजे सनदी अधिकार्‍यांवर विसंबून न राहता निर्णय घ्यायला हवेत. उपमुख्यमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधी आणि जनतेला भेटून तेच या राज्याचे अप्रत्यक्ष मुख्यमंत्री वाटत असतील तर हा समज आता त्यांनी दूर करायला हवा. पावणे दोन वर्षांचा त्यांचा कारभार हा परीक्षा घेणारा होता, त्यात ते पास झाले असले तरी आता पुढे त्यांना आणखी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. कारण कोरोनानंतरचे जग हे खूप आव्हानात्मक असेल.

- Advertisement -