घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगेले बंगले कुणीकडे?

गेले बंगले कुणीकडे?

Subscribe

अन्वय नाईक यांना या जागेवर रिसॉर्ट बांधायचे होते. मात्र, बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी न मिळाल्याने त्यांनी ही घरे पाडून जमिनीचे लेव्हलिंग करून तेथे झाडे लावली. मात्र, या घरांसाठी घरपट्टी सुरूच होती. 2०१४ पर्यंत अन्वय नाईक यांनीच ही घरपट्टी भरली.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटतच चालला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतदेखील गेल्या 4 दिवसांपासून आरोपांच्या फैरी झाडत सुटलेत. मात्र यापैकी एकही नेता ठोस असे पुरावे घेऊन पुढे येत नसल्याने आरोप-प्रत्यारोपाचा हा आभासी फुगा दिवसागणिक फुगतच चालला आहे. या फुग्याला नेमकी टाचणी कधी लागणार वा कोण लावणार? आणि त्यातून कुठकुठली गुपितं बाहेर पडणार हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. सध्या या खेळात बंगले शोधण्याचा नवा टास्क सुरू आहे. एक स्पर्धक हरवलेले बंगले शोधण्यासाठी इरेला पेटलाय तर दुसरा स्पर्धक त्याच्या वाटेत अडथळे आणून त्याला जेरीस आणू पाहतोय.

वृत्तपत्र, टेलिव्हिजन चॅनेल्स, सोशल मीडिया या सार्‍या मोहजाळांचे स्क्रीन सध्या तरी याच विषयाने व्यापून टाकलेत. या बंगल्यांचे कनेक्शन जोडले गेलेय ते थेट हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबियांशी. ठाकरे कुटुंब आणि बंगला यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळेच स्थान आहे. कधीकाळी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याला नव्हतं तितकं महत्व मातोश्री या बंगल्याला होतं. अर्थातच बाळासाहेबांच्या काळात. याच बंगल्यात बसून बाळासाहेबांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला होता म्हणे. याच बंगल्यात कष्टकरी, कामगार, नोकदारांपासून, मोठमोठे भांडवलदार, सेलिब्रिटी आपली गार्‍हाणी घेऊन यायची. इथेच अनेकांचे प्रश्न सोडवले जायचे. याच वास्तूत राजकारण घडायचं आणि बिघडायचंही. काळाच्या ओघाच्या राजकीय समीकरणे बदलली तसे सत्ताकेंद्रानेही स्थान बदलले.

- Advertisement -

तर असं की ठाकरे सरकार सत्तेत असूनही गेल्या दोन वर्षांत मातोश्रीची इतकी चर्चा झाली नसेल, तितकी चर्चा सध्या या हरवलेल्या बंगल्यांची सुरू आहे. आधीच्या बंगल्याचं ठाकरे कनेक्शन सर्वज्ञात असलं, तरी या बंगल्याचं ठाकरे कनेक्शन शोधण्यासाठी वा जोडण्यासाठी एक स्पर्धक सध्या जीवाचा आटापीटा करतोय. त्याचं नाव आहे किरीट सोमय्या. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची गेल्या लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याआधीच शिवसेनेने खाट टाकली होती. तेव्हापासून सोमय्या हातपाय धुवून ठाकरे कुटुंबियांच्या पाठीमागे लागलेत. ही खाट पडण्यामागे असलेल्या अनेक कनेक्शनपैकी एक कनेक्शन हरवलेल्या बंगल्यापर्यंतच जाऊन पोहोचतं.

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबांच्या तथाकथित बेनामी संपत्तीवरून बरेच आरोप केले होते. ठाकरे कुटुंबाला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत अडचणीत आणले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे अलिबागमध्ये 19 बंगले घेतले असून त्याचा त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला नाही असा त्यांचा आरोप होता. हे बंगले कुठल्या पैशांतून आले, असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला होता. गेल्यावर्षी या प्रकरणाचा गाजावाजा झाला असला, तरी तव्यावर तडतडून हे प्रकरण थंडही झालं होतं. पण परवा शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पुणे महापालिकेच्या पायरीची धूळ चाखायला लावल्यानंतर मात्र त्यांच्यातला सुडाग्नी पुन्हा जागृत झाला. पुन्हा बंगल्यांचे प्रकरण उकरून काढत आता ते शिवसैनिकांना अंगावर घेऊ पहात आहेत.

- Advertisement -

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई गावात साडेनऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असून त्याची घरपट्टी रश्मी ठाकरे यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या करत आहेत. या बंगल्यांचा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच घरपट्टी थकीत राहिल्याने रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीकडे माफीनाम्याचे पत्रही दिले होते. हाच मोठा पुरावा असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. तर या जागेवर कुठलेही बंगले नसल्याचे म्हणत कोर्लई गावाच्या सरपंचांनी सोमय्यांचा दावा खोडून काढलाय. ही जमीन अन्वय नाईक यांनी ख्रिश्चन बांधवांकडून खरेदी केली होती. त्यावेळी या वादग्रस्त जमिनीवर प्रत्यक्षात केवळ १1-12 कच्ची घरे होती.

अन्वय नाईक यांना या जागेवर रिसॉर्ट बांधायचे होते. मात्र, बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी न मिळाल्याने त्यांनी ही घरे पाडून जमिनीचे लेव्हलिंग करून तेथे झाडे लावली. मात्र, या घरांसाठी घरपट्टी सुरूच होती. 2०१४ पर्यंत अन्वय नाईक यांनीच ही घरपट्टी भरली. २०१४ ला मनिषा वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी ही जागा विकत घेतली आणि थकीत घरपट्टी भरून २०१९ ला रितसर अर्ज करून जागेची मालकी दोघींच्या नावावर केली. सद्य:स्थितीत या जागेवर एकही घर नसल्याची बाब त्यांनी लक्षात आणून दिल्यावर या ठिकाणी पाहणी करून २०२१ मध्ये ग्रामपंचायतीने ही घरे कागदोपत्री रद्द केल्याचा खुलासा कोर्लई ग्रामपंचायतीने केला.

शांत बसतील ते किरीट सोमय्या कसले? जागेवर बंगले नाही म्हणता? मग हे बंगले गेले कुठे की हरवले? ठाकरे मुख्यमंत्री असताना, त्यांचेच बंगले हरवतात म्हणजे काय? मी स्वत: कोर्लई गावात जावून बंगले शोधणार आहे, असे सांगत सोमय्यांनी पुन्हा शिवसैनिकांना चेतवले. त्यावर शिवसैनिकांनीही त्यांना गावात पाय ठेवू न देण्याचे आव्हान दिले. कोर्लई गावातल्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. वारंवार यासंदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किरीट सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. बहुदा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. त्यांना वेड लागलेय. अशा शब्दांत सोमय्यांना हिणवण्यात आले, तरी सोमय्यांनी अलिबागमध्ये पाय ठेवत बंगले हुडकून काढण्यासाठी रेवदंडा पोलिसांना अर्ज केलाच.

तर दुसरीकडे शिवसैनिकांनी ग्रामपंचायत गोमुत्राने धुवून काढली. पेशाने सीए असलेल्या किरीट सोमय्या यांनी अनेकांच्या आर्थिक कुंडल्या अत्यंत सहजपणे बाहेर काढल्याचा दावा केला असला, तरी ठाकरेंचे हरवलेले बंगले शोधून काढण्याचे काम त्यांच्यासाठी म्हणावं तितकं नक्कीच सोपं नाही. शेवटी काय तर अंगी लागे चोरीचा ठाव तोवरी चोर दिसे साव, जोपर्यंत एखाद्यावर चोरीचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो सावच समजला जातो. सापडला तर चोर नाहीतर बादशहाहून थोर. या प्रकरणात चोर कोण आणि थोर कोण हे लोकांना सहजासहजी कळणे अवघड आहे, कारण राजकारणात सब घोडे बारा टक्के, असेच समीकरण आजवर दिसून आलेले आहे. तोपर्यंत ‘गेला माधव कुणीकडे’, या नाटकाच्या धर्तीवर ‘गेले बंगले कुणीकडे’, हेही राजकीय नाट्य रंगत राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -