घरफिचर्समायमहानगर ब्लॉगइस्रायल-सौदी अरेबिया मैत्रीपर्व

इस्रायल-सौदी अरेबिया मैत्रीपर्व

Subscribe

तेल सोडून अन्य उद्योग व्यवसाय आपल्याकडे यावेत असे आता सौदीला वाटू लागले आहे. उत्पन्न वाढवायचे तर नवे उद्योग सुरू केले पाहिजेत. वीज निर्मितीसाठी सौरऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा वापर करता येईल का याचा शोध सौदी घेत आहे. आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी आज सौदी अरेबियाला जास्तीत जास्त अमेरिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. पुन्हा आपण कट्टरता सोडून लिबरल झालोय हेही सौदीला दाखवायचे आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या दबावाखाली येत आणि स्वत:ला लिबरल भासवण्यासाठी सौदी अरेबिया आज इस्रायलशी मैत्रीचे मुस्लीम जगतातील टोकाचे म्हटले जाणारे पाऊलही उचलण्यास तयार झाला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मागील रविवारी गुप्तपणे सौदी अरेबियाचा दौरा केला. त्यांनी तिथे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. त्यावेळी सौदीमध्येच असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांची सुद्धा नेतान्याहू यांनी भेट घेतली. इस्रायलच्या कान पब्लिक रेडिओ आणि आर्मी रेडिओने सोमवारी ही माहिती दिली. नेतान्याहू यांचे कार्यालय आणि जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने लगेच यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका इस्रायली वर्तमानपत्रात एव्हिएशन ट्रॅकिंग डाटा प्रसिद्ध झाला. त्यात तेल अविववरुन उड्डाण केलेल्या एका बिझनेस जेटने सौदी अरेबियाच्या नियोम शहरामध्ये लँडिंग केल्याची माहिती देण्यात आली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांची सौदी अरेबियाची भेट ही ऐतिहासिक आहे. या भेटीमुळे आतापर्यंत मुस्लीम देशांनी इस्रायलसोबत जपलेले, पोसलेले शत्रुत्त्व निकालात निघणार आहे किंवा सौदी अरेबियाने आपल्याला इतर मुस्लीम देशांपासून अलग करून घेतले आहे.

पॅलेस्टाईनच्या एका भागात इस्रायल या ज्यूंच्या राष्ट्रनिर्मितीपासून इस्रायल आणि जगभरातील मुस्लीम देशांमध्ये शत्रुत्त्व निर्माण झाले होते. त्यातून इस्रायलवर, त्या देशाला चारही बाजूने घेरलेल्या मुस्लीम राष्ट्रांनी हल्ला केला आहे. तर धर्माच्या नावाखाली पोसल्या गेलेल्या दहशतवादाला इस्रायल कायमचा बळी ठरलेला आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाचा राजपुत्र इस्रायलसोबत मैत्रीसाठी पुढाकार घेतो, ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. अर्थात सौदी अरेबिया हा इतका सहजासहजी इस्रायलच्या मैत्रीसाठी तयार झालेला नाही. त्यामागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण, सौदी अरेबियाची झालेली आर्थिक नाकेबंदी आणि मध्य पूर्व आशियात नव्याने प्रस्तापित होऊ पाहणारा सत्ता केंद्र संघर्ष आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी राजपुत्र सलमान यांची भेट घेतली तेव्हा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो हे सौदी अरेबियामध्येच होते असे सांगितले जाते. राजपुत्र सलमान यांच्या भेटीनंतर नेतान्याहू जातीने पॉम्पियो यांच्या भेटीसाठी गेले असे सांगितले जाते. त्यामुळे अमेरिकेनेच्या पुढाकारानेच सौदी अरेबिया आणि इस्रायल मैत्रीचा अध्याय प्रस्थापित होऊ इच्छितो आहे. सौदी अरेबिया हा मध्य पूर्व आशियातील सत्ता केंद्र राहिला आहे. कुवेत, इराक, लिबिया, सिरिया, येमन आदी राष्ट्रांच्या लष्करामध्ये हस्तक्षेप करून आपल्याला हवे ते सौदी करत होता.

- Advertisement -

१९७९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्य घुसल्यानंतर तिथे इस्लामी मुजाहिद्दिनांनी जावे आणि रशियनांचा पाडाव करावा असा प्रस्ताव आल्यानंतर त्यामागे आर्थिक बळ उभे करण्याचे महत्वाचे काम सौदीनेच केले होते. शिवाय जगभरच्या मुस्लिमांनी अनुसरावे म्हणून धर्मप्रसारासाठी सौदीनेच प्रचंड रकमा उपलब्ध करून दिल्या होत्या. अमेरिकेशी दोस्ती करत जगावर वहाबी तत्वज्ञान लादण्याचे कारस्थान सौदीच करत होता. मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुन्नींचे राज्य असावे म्हणून अमेरिकेला तिथे आक्रमक भूमिका घेण्यासाठी भाग पाडणारा सौदीच होता. लिबिया-इराक-सीरिया-येमेन आदी देशांमध्ये लष्करी ढवळाढवळ करून आपल्याला पाहिजे तो सत्ताधीश आणण्याच्या कारवायांमध्ये सौदीच आकंठ बुडालेला आहे. थोडक्यात काय तर आपण म्हणू ती पूर्व दिशा हा त्याचा खाक्या राहिला आहे. वहाबी तत्वज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे सौदीच्या राजघराण्याने आजवर कोणत्याही धार्मिक-सामाजिक सुधारणा होऊ दिलेल्या नाहीत. तिथे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घाला पडलेला आहे. देशामध्ये संगीत ऐकण्यास आणि खेळ खेळण्यासही परवानगी नाही. पुरुषी वर्चस्वाखाली समाज भरडून निघाला आहे. याचे दुष्परिणाम दिसत असूनही ते आडमुठेपणे नाकारत राहण्यातच आजवर त्यांनी धन्यता मानली आहे. पण आता चित्र हळूहळू बदलत आहे.

वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम राहिली नाही. किंबहुना, ती राहू शकत नाही. २०१४ नंतरच्या तेलाच्या घसरत्या किमतीमुळे सौदी अडचणीत आला आहे. घसरत्या किमतीमुळे अडचणीत आला म्हणण्यापेक्षा अमेरिकेशी केलेल्या संगनमताने सौदीने जे निर्णय घेतले त्यामुळे त्याची परिस्थिती धोकादायक बनली आहे. २००१च्या ट्विन टॉवर हल्ल्यानंतर तेलासाठी मध्य पूर्वेवर अवलंबून न राहण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी घेतला होता. त्यानुसार अमेरिकेने आपल्याच भूमीत असलेले तेल उत्पादन करण्याचा निर्णय घेऊन त्या दिशेने पावले टाकली. आज अमेरिकेकडे त्यामधले सर्वात आधुनिक आणि अधिक क्षमतेचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. इथपर्यंत पोचल्यानंतर अमेरिकेची तेलाची मागणी घटली. म्हणजे तेल आयात करण्याची त्यांना गरज उरली नाही. स्वतःच्या देशामध्ये ते तेलाचे उत्पादन घेतात आणि अधिक आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे त्यांच्या यंत्रणेची कार्यक्षमता अधिक आहे. त्यातून त्यांना कमीतकमी खर्चात तेल बाहेर काढता येते.

- Advertisement -

शिवाय इराण आणि रशिया याना नामोहरम करण्यासाठी अमेरिकेने तेलाचे दर उतरवण्याचे ठरवले आणि त्या ‘कारस्थानात’ सौदीला सामील करून घेतले. दर कमीच राहावेत म्हणून सौदीने उत्पादन घटवायचे नाही असे ठरवण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणून तेलाच्या किमती घसरू लागल्या. २०१४ मध्ये एका बॅरलची किंमत १०२ डॉलर्स होती. हा दर आता अवघ्या ५१ डॉलर्सवर आला आहे. मध्यंतरी तर तो ३६ डॉलर्स एवढा कमी झाला होता. दर घसरू लागले तेव्हा सौदीकडे ७५००० कोटी डॉलर्स गंगाजळी जमा होती. एवढा पैसा खिशात असल्यामुळे आपण दर घटण्याच्या संकटावर सहज मात करू असा त्यांना विश्वास होता. म्हणून सौदीने उत्पादन घटवले नाही. परिणामी त्यांच्याकडे तेलाचा साठा वाढत गेला. कारण मालाला उत्पादनाएवढा उठाव नव्हता.

यामधली काही संकटे तर सौदीने स्वतःच ओढवून घेतली आहेत. त्यामधले पहिले म्हणजे समाजजीवनावर आणि राज्य कारभारावर धर्माचा अतिरेकी प्रभाव. धर्माच्या आधारे राज्य चालवता येत नाही. कर्मठ विचारांनी आजच्या युगामध्ये शासन करता येत नाही. पण सौदीने तर अधिकाधिक कर्मठ वहाबी तत्वज्ञान स्वीकारले आहे. यात करमणूक बसत नाही. खेळ बसत नाहीत. धर्म वगळता अन्य विषयांच्या अभ्यासाला समाजात महत्व नाही. समाजाची अर्धी लोकसंख्या घरामध्ये कोंडून ठेवण्यात आली आहे. कारण महिलांना (तीन क्षेत्र सोडली तर-डॉक्टर-नर्स-शिक्षिका) काम करण्याची परवानगी नाही. महिलांना स्वतंत्रपणे घराबाहेर पडत येत नाही तर त्या कामाला कशा जाणार? गाडी चालवण्याची परवानगी नाही तर त्या कामानिमित्त फिरणार कशा? आणि स्त्रिया काम करत नसल्या तर मध्यम वर्गीय कुटुंबाचे एका पगारात भागणार कसे? भरीस भर म्हणून एकाला चार लग्न करण्याची परवानगी. गर्भपाताला मंजुरी नाही. सौदीची लोकसंख्या १९९० च्या तुलनेमध्ये दुप्पट झाली आहे. त्यात सुद्धा ५० टक्क्यांहून अधिक लोक पंचविशीच्या आतले आहेत. म्हणजेच हाताला काम हवे आहे. दरवर्षी नवे ३ लाख तरुण नोकरी मागत आहेत. आणि ती द्यायला उद्योग नाहीत.

प्रत्येक देशाला जगावर आपले साम्राज्य असावे अशी महत्वाकांक्षा असते. सौदीलाही ती आहे. मुस्लिमांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळांचा ताबेदार म्हणून सौदीच्या राजाला मुस्लीम जगतात एक वेगळे वलय आहे. धर्माच्या नावाने राजाने आवाहन केले तर त्याला प्रतिसाद जगभरच्या मुस्लिमांकडून येतो. भरीस भर म्हणून राजाने जे वहाबी तत्वज्ञान अंगिकारले आहे. त्याच्या प्रचारासाठी राजा सर्व जगभर मुस्लीम विचारवंत पाठवत असतो. त्यांच्या बरोबर पैसाही मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. सौदीमध्ये रोज सुमारे दोन लाख बॅरल तेल निघते. त्या प्रत्येक बॅरल मागे एक डॉलर वहाबी धर्मप्रचारासाठी दान दिला जातो. शिवाय अनेक श्रीमंत लोक आणि प्रत्येक राजपुत्र आपल्या पैशातून दान करतो ते वेगळेच. वहाबी प्रचारामधून जगभरच्या मुस्लिमांकडून राजासाठी मरायलाही तयार असलेले मुजाहिद्दिन मिळत असतात. हीच फौज वापरून सौदीचा राजा मध्य पूर्वेतील अनेक देशामध्ये खास करून जिथे शिया बहुसंख्य आहेत पण सत्ता सुन्नींकडे नाही, अशा देशात ढवळाढवळ करून तिथली सत्ता डळमळीत करून आपल्याला हवा तसा सत्ताधीश तिथे बसवण्याची कामे केली जातात.

तेल सोडून अन्य उद्योग व्यवसाय आपल्याकडे यावेत असे आता सौदीला वाटू लागले आहे. उत्पन्न वाढवायचे तर नवे उद्योग सुरु केले पाहिजेत. वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांचा वापर करता येईल का याचा शोध सौदी घेत आहे. आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी आज सौदी अरेबियाला जास्तीत जास्त अमेरिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. पुन्हा आपण कट्टरता सोडून लिबरल झालोय हेही सौदीला दाखवायचे आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या दबावाखाली येत आणि स्वत:ला लिबरल भासवण्यासाठी सौदी अरेबिया आज इस्रायलशी मैत्रीचे मुस्लीम जगतातील टोकाचे पाऊलही उचलण्यास तयार झाला आहे. नेतान्याहू, राजपुत्र सलमान भेट हे त्याचे प्रतीक आहे. सौदी-इस्रायल मैत्रीचे पर्व आगामी काळात कुठपर्यंत जाते हे उत्सुकतेचे ठरणार आहे. जगाच्या राजकारणावर त्याचे बरे-वाईट परिणाम निश्चित होताना दिसणार आहेत.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -