घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज ठाकरेंची पक्षबांधणी औटघटकेची नसावी!

राज ठाकरेंची पक्षबांधणी औटघटकेची नसावी!

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता पक्षाच्या भवितव्याबाबत 15 वर्षांनंतरही चर्चाच सुरू आहे. कुणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अचाट शक्ती मनसेत होती. हजारो आंदोलने, महाराष्ट्रभर शेकडोंनी निघालेले मोर्चे, अटकसत्रं, जेलच्या वार्‍या हे सगळे महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला वाटते की, आपला प्रश्न मनसेच सोडवू शकते, यातच मनसेच्या भविष्यातील उष:कालाची बिजं रोवली आहेत. राज ठाकरे यांनी नव्या दमाने पुन्हा राज्यभर पक्षबांधणीला सुरुवात केली आहे, पण स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे कार्यकर्त्यांना बळ द्यावे, त्यात सातत्य ठेवावे लागेल, ती औटघटकेची असून चालणार नाही.

आगामी वर्षात 2022 मध्ये होणार्‍या नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विविध पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे दौरेसुद्धा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन संघटना बांधणीसाठी कंबर कसली आहे. या आठवड्यात राज ठाकरे राज्यातील प्रमुख तीन शहरांच्या दौर्‍यावर असून नाशिक, औरंगाबादचा दौरा आटपून ते पुण्यालाही भेट देतील, असे भरगच्च कार्यक्रम आहेत. या दौर्‍यात पक्षीय आढावा घेण्याबरोबरच नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन राज ठाकरे निवडणुकीचा मास्टरप्लॅन आखण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाच्या शहरांच्या दौर्‍यांचा सपाटा लावला आहे. राज ठाकरेंच्या दौर्‍यांचा मनसेला आगामी निवडणुकीत किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

9 मार्च 2006 रोजी पक्ष स्थापनेच्या मुहुर्तापासून राज ठाकरे हे त्यांच्या सोयीप्रमाणे बैठका घेतात. पक्षबांधणीसाठी वेळ देतात. निवडणुका आल्या की पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न करताना वारंवार दिसतात. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर केवळ काही तासांपुरते आणि लाखोंचे फॉलोअर्स असणारे राज यांचे नेतृत्व ब्रेकिंग न्यूज पुरतेच मर्यादित राहिले हे खेदाने म्हणावे लागेल. कारण केवळ निवडणुकीपुरते जागे झालेले नेतृत्व हे कोणत्याही पक्षाला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी देऊ शकत नाही हा इतिहास आहे. राज ठाकरे यांच्याकडे असलेले वक्तृत्व सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही नेत्याकडे नाही. त्यांच्याकडे असलेली व्यंगचित्रकाराची नजर आसपासच्या कुणाकडेही नाही. एखाद्याची हुबेहुब नक्कल करण्यात कुणीही राज यांचा हात धरू शकत नाही. एका राजकीय नेत्याकडे एवढे सगळे कर्तृत्व असूनही यश का मिळत नाही. मनसेला मतदार का गांभिर्याने घेत नाहीत, याचा सारासार विचार पक्षाच्या नेतृत्वाने म्हणजे मनसे प्रमुख असलेल्या राज यांनाच करावा लागेल. अभी नही तो कभी नही… यानुसार त्यांनी सुरू केलेली पक्षबांधणी दौरा केवळ तीन दिवस, आठवडाभर न ठेवता कार्यकर्त्यांना सलग कार्यक्रम द्यावा लागेल.

- Advertisement -

तर आणि तरच येणार्‍या आगामी निवडणुकांत मनसेची दखल तरी मतदार घेतील. कारण राज यांच्या नेतृत्वावर जो ठसा त्यांच्या काकांनी म्हणजे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उमटवलेला आहे, त्याची प्रचिती निवडणुकांमध्ये येताना दिसत नाही. याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे सातत्याचा अभाव. निवडणुकीपुरते केवळ घरातून बाहेर न पडता शिवसेनाप्रमुखांचा राज्याचा दौरा, गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष दौरा केल्यानंतर 1995 साली आणि 2014 साली युतीची सत्ता महाराष्ट्रात आली होती, हा इतिहास राज यांना ठावूक असणारच. त्यामुळे सातत्य राखत कार्यकर्त्यांची फौज गावागावात पुन्हा उभी केल्यास चमत्कार घडायला वेळ लागणार नाही. कारण राज्यातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार, भाजप-शिवसेनेचे युतीचे सरकार आणि आताचे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार पाहत आणि अनुभवत आहे. एका नव्या विचाराला आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍याला खूप स्कोप असल्याने ती जागा भरून काढण्याची संधी राज यांच्या मनसेला आहे. ती मिळवण्यासाठी राज ठाकरेंना पुढील तीन वर्षे सातत्याने पक्षाला द्यायला हवीत.

राज ठाकरे आपल्या भाषणात नेहमी सांगतात की पराभवाने खचून जायचे नाही. यासाठी ते इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांची उदाहरणे देतात. मात्र यापैकी प्रत्येकाने आपली टीम बांधली होती. त्या टीमवर विश्वास ठेवला होता. मात्र ज्या शिवसेनाप्रमुखांचे राज उदाहरण देतात त्यांच्यासोबत असलेले अष्टप्रधान मंडळ पाहिल्यावर लक्षात येईल की, बाळासाहेबांची संघटनेवर कशी मजबूत पकड होती. सोबत कार्यकर्त्यांची फौज होती आणि कार्यकर्त्यांसाठी नेता दूर नव्हता. राज यांनी आता स्वत:तील सर्व मरगळ दूर लोटून मनसेला भरगच्च कार्यक्रम दिला पाहिजे. ज्या विठ्ठलाला राज मानायचे, त्या विठ्ठलरूपी बाळासाहेबांभोवती बडव्यांची गर्दी जमू लागली तेव्हा माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय… असे सांगत 2005 साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. आज 15 वर्षानंतर राज स्वत: विठ्ठलाच्या रूपात आहेत आणि त्यांनाही बडव्यांनीच घेरले आहे. केवळ चॅनेल्सवर मुलाखती देऊन, खळखट्ट्याक करत सोशल मीडियावर लाइव्ह करून पक्ष वाढणार नाही तर त्यासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकी दिली पाहिजे. राज यांनी थेट जिल्ह्याजिल्ह्यात फोन करून पक्षवाढीची माहिती घेतली पाहिजे.

- Advertisement -

खुशमस्करी आणि केवळ खोटी स्तुती करणार्‍या नेत्यांपासून स्वत:ला दूर ठेवले तर मनसेत असलेली मरगळ दूर होईल. पण त्यासाठी पुढाकार राज ठाकरे यांनीच घ्यायला हवा. कारण मनसेत एकच चेहरा आहे तो म्हणजे राज यांचा. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व पाहता त्यांना प्रसिद्धी चांगली मिळते, पण तेवढ्यावर कोणताही पक्ष उभा राहत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा चेहरा प्रसिद्धी तर मिळवून देतो, पण त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत फारसा फायदा होत नाही. राजकारणात चेहरा दिसावा लागतो. तो नसेल तर तुम्ही मागे पडता. ही प्रत्येक पक्षाची गरज आहे. पक्षाचं अस्तित्व दाखवणं ही मनसेची गरज आहे. त्यामुळे दिवसाचे 24 तासही राज यांना कमी पडायला हवेत. 2024 साली विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी 2022 म्हणजे पुढील तीन ते सहा महिन्यांत महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज यांनी सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे ‘मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा’ असा संकल्प केल्याने लोकसभा निवडणुका हे त्यांचे उद्दिष्ट असता कामा नये. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महापालिका आणि विधानसभा हेच एकमेव ध्येय असायला हवे. कारण 2022 पासून राज ठाकरे यांनी सलग तीन वर्षे स्वत:ला झोकून पक्षवाढ, संघटना बांधणी केली तरच मनसेच्या इंजिनाचा आवाज राज्यात येईल. अन्यथा केवळ सेटलमेंट सेना अशीच दबक्या आवाजातील चर्चा ऐकायला येत राहील.

राज ठाकरे हे पक्ष स्थापना झाल्यानंतर 2006 पासून मागील 15 वर्षे विरोधी बाकावरच आहेत. त्यामुळे कोणताही प्रश्न, समस्या यांचे निराकरण करायचे असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे हे स्वाभाविक आहे. पण त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी राज यांच्या मनसेचा नकळत केवळ वापरच केला हा इतिहास आहे. सुरूवातीला विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मनसे त्यांच्या राजकारणासाठी कशी उपयोगी पडेल याची रणनीती आखून बंद दाराआड चर्चा केल्या. त्या चर्चेतून फायदा राज्यकर्त्यांचा झाला आणि मनसेबाबत संशय अधिकच दाट होत गेला. पक्षाच्या झेंड्यात अनेक रंग घेत सेक्युलॅरिझमकडे कूच केल्यानंतर अचानक झेंड्यात हिंदुत्व, अनेक आंदोलने केली ज्यात टोलमाफीचा विषय, नाणारला ना ना मग स्वयंरोजगाराच्या नावाखाली पाठिंबा, सुरूवातीला मोदींची स्तुती, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ, राहुल गांधींची स्तुती आणि आता काय तर भाजपसोबत जवळकीचे संकेत यासारख्या नागमोडी वळणांमुळेच मनसेच वाढ खुंटली. याचे आत्मपरीक्षण नेता म्हणून राज ठाकरे यांनी करायला हवे.

गेल्या काही महिन्यांत भाजपचे सर्व नेते देवेंद्र फडणवीस, अ‍ॅड. आशिष शेलार, प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या नव्याने बांधलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जावून भेट घेतल्याचे फोटो पाहून मनसे कार्यकर्त्यांना आनंद होत नसेल. भाजप केवळ त्यांच्या फायद्यासाठी राज यांच्या मनसेला जवळ करत असल्याचे सिंधुदुर्गातील, गडचिरोलीतील मनसैनिकांना समजते ती गोष्ट राज यांच्या लक्षात यायला हवी. आतापर्यंत धरसोडपणा केल्यामुळेच राज्यभरात मनसेचे जाळे, लाखांच्या संख्येने कार्यकर्ते असूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ शकले, यासाठी जबाबदार कोण, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना येणार नाही हे माहीत असल्यानेच हिंदुत्वाशी जवळीक असणार्‍या एका तरी ठाकरेला आपल्यासोबत घ्यायला हवे याची रणनीती ठरल्यानेच भाजपच्या नेत्यांना राज यांच्या दर्शनाचा साक्षात्कार झाला आहे. पण राज ठाकरे यांनी आता सर्वांना ठाकरीपणा दाखवल्यास आणि पुढील तीन वर्षे केवळ पक्षवाढ, बैठका, बांधणी केल्यास बाळासाहेबांप्रमाणे विधानसभेवर त्यांच्या पक्षाचा झेंडा फडकवता येईल, हे नक्की.

राज ठाकरे हे सध्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत हे चांगले लक्षण आहे. राज्यात शाखाध्यक्ष नियुक्त करण्यासंदर्भात घोषणा न करता त्याची नीट अंमलबजावणी केली आणि योग्य व्यक्तींना संधी दिली तर निश्चित मनसेला फायदा होईल. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासूनच मनसे आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. गेल्या काही काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्याचंही चित्र दिसलं. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने भाजपला मनसेची गरज असू शकते. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाण्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेच्या मराठी मतदारांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपला मनसेचा फायदा होऊ शकतो. 2009 मध्ये मनसेला मोठे यश मिळाले होते. 13 आमदार निवडून आल्यानंतर ते कायम राखण्यात मनसेला फारसे यश आले नाही. कालांतराने 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत एक आमदार आणि महानगरपालिकांमध्येही मनसेचे संख्याबळ कमी झाले. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर मनसे हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसली. पक्षाच्या वर्धापनदिनी झेंडा बदलून त्याला भगवा रंग देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता पक्षाच्या भवितव्याबाबत 15 वर्षांनंतरही चर्चाच सुरू आहे. कुणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अचाट शक्ती मनसेत होती. हजारो आंदोलने, महाराष्ट्रभर शेकडोंनी निघालेले मोर्चे, अटकसत्रं, जेलच्या वार्‍या, हे सगळे महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला वाटते की, आपला प्रश्न मनसेच सोडवू शकते, त्यातच मनसेच्या भविष्यातील उष:कालाची बिजं रोवली आहेत. त्यामुळे मनसेला शिवसेनेप्रमाणे कात टाकवीच लागेल. उत्कृष्ट वक्तृत्व असणं एवढंच नेतृत्वाला पुरेसं नाही. ज्याला स्वतःला कशाची भीती वाटते तो नेता नेतृत्व करूच शकत नाही. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या स्वतःच्या काही वैचारिक भूमिका होत्या.

मतदारसंघातील जातीपातीचे राजकारण न पाहता बाळासाहेबांनी अनेकांना उमेदवार्‍या दिल्या आणि केवळ हिंदू म्हणून त्यांना निवडून आणायला लावले. राजसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र अजूनही एका राजकीय संक्रमणावस्थेत आहे. महाराष्ट्राचे एकहाती नेतृत्व करण्याची क्षमता फक्त तुमच्यात दिसतेय. त्यासाठी तुम्ही दिवसरात्र लोकांत मिसळायला हवे. त्यांचे सुखदुःख समजून घ्यायला हवे. निवडणुका लढवताना भूमिका निश्चित असायला हव्यात. सत्तेची महत्वाकांक्षा ठेवायला हवी. समाजकारण तर करावेच लागते, पण राजकीय पक्षाचे ध्येय निवडणुका लढणे, त्या जिंकणे, सत्ता मिळवणे हेच असायला हवे. पराभवही होत असतात. पण ते खुल्या मनाने पचवता यायला हवेत. तेव्हा मनसेच्या पक्षबांधणी, दौरे आणि बैठका या औटघटकेच्या नसाव्यात, त्या सलग पुढील किमान तीन वर्षे तरी अशाच सुरू राहाव्यात.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -