Eco friendly bappa Competition
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग करण थापर आणि फाळणी वेदना स्मरण !

करण थापर आणि फाळणी वेदना स्मरण !

Subscribe

फाळणी वेदना स्मरणदिन जाहीर करून त्या आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच का जाग्या कराव्या लागल्या, याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कशासाठी अशा जखमांची खपली काढली जाते? यातून सत्ताधारी भाजपला काय साध्य करायचं आहे? हे सांगणार्‍या एका लेखामुळे हे सारं चर्चीलं जाऊ लागलं आहे. मोदींच्या या कृतीची विरोधी पक्षांनी तर केलीच पण विभाजनावेळी या दंगलीत भरडून निघालेल्या मुस्लिमांच्या प्रतिनिधींनीही निर्भत्सना केली आहे. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांच्या एका लेखाचा हा प्रपंच होता. तसे करण थापर हे पंतप्रधान मोदींचे खास मित्र समजले जातात.

१९४७ च्या भीषण दंगलीचे कवित्व कमी होण्याऐवजी ते अधिकच वाढत चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केव्हा काय सुचेल आणि ते कधी अंमलात आणतील याचा कोणालाही भरोसा राहिलेला नाही. १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर पाकिस्तानच्या फाळणीवेळी झालेल्या नरसंहाराची आठवण पंतप्रधानांंना यावी आणि त्यांनी या दिवसाला फाळणी वेदना स्मरण दिन, म्हणून जाहीर करावं, हा योगायोग मुळीच नाही. अशी क्लुप्ती पंतप्रधान म्हणून मोदींनाच जमू शकते. घोषणा होऊन पंधरा दिवसांचा अवधी गेल्यावर हे उकरून काढण्याची आवश्यकता काय, असं कोणालाही वाटू शकतं. त्याला कारण तसंच आहे. फाळणी वेदना स्मरणदिनाच्या आठवणी मोदींना आताच का जाग्या कराव्या लागल्या, या उत्तरात हे सारं दडलं आहे.

कशासाठी अशा जखमांची खपली काढली जाते? यातून सत्ताधारी भाजपला काय साध्य करायचं आहे? हे सांगणार्‍या एका लेखामुळे हे सारं चर्चीलं जाऊ लागलं आहे. मोदींच्या या कृतीची विरोधी पक्षांनी तर केलीच पण विभाजनावेळी या दंगलीत भरडून निघालेल्या मुस्लिमांच्या प्रतिनिधींनीही निर्भत्सना केली आहे. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांच्या एका लेखाचा हा प्रपंच होता. तसे करण थापर हे पंतप्रधान मोदींचे सख्खे मित्र समजले जातात. तसं स्वत: मोदींनीच जाहीर केलं होतं. गुजरातचे मुख्यमंत्री असताना थापर यांनी मोदींची २००७ मध्ये घेतलेल्या एका मुलाखतीपासून करण आणि मोदी यांच्यातील गोडवा सारं जग ओळखून आहे. गुजरात नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर थापर यांनी मोदींची घेतलेली ही मुलाखत प्रचंड गाजली. जगभर या मुलाखतीची प्रचंड चर्चा झाली आणि होत आहे. आजवरच्या सडेतोड अशा मोजक्या मुलाखतींमध्ये मोदींच्या थापर यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा समावेश केला जातो.

- Advertisement -

या मुलाखतीत मोदींना मध्येच पाण्याची तहान लागते आणि आपली मैत्री अबाधित ठेवत ते मुलाखतीच्या सेटवरून काढता पाय घेतात. मैत्री अबाधित ठेवण्याचा मोदींचा तो शब्द आता खोटा ठरू लागलाय की काय असं वाटू लागलं आहे. मोदींना अडचणीत आणणार्‍या इतर ज्येष्ठ पत्रकारांमध्ये करण थापर यांचं नाव आहे. आता नव्याने करण यांच्या लेखांना सेंसॉर केलं जाऊ लागल्याने याची खात्रीच पटू लागली आहे. गेल्या आठवड्यात करण थापर यांनी एशियन एज या वर्तमानपत्रासाठी एक लेख लिहिला होता. तसं पंधरा दिवसांनी एक याप्रमाणे थापर या वर्तमानपत्रासाठी लिखाण करत असतात. आजवर त्यांनी लिहिलेल्या लेखांना कोणी वादग्रस्त ठरवलं नव्हतं. वास्तवाला धरून लिखाण असल्याने करण यांच्या लेखांना विशेष महत्व आहे. जगभर त्यांच्या लेखांची विशेष चर्चा होत असते. असं वास्तव सर्वांनाच पटतं असं नाही. तोलामोलाच्या कोणाही पत्रकाराचं लिखाण सेंसॉर होऊ लागलं की यामागची गोम कळू लागते. करण यांच्या वाट्याला असंच काहीसं येऊ लागलं आहे. करण यांनी या वर्तमानपत्रात ‘हॉरर ऑफ १९४७ पार्टिशन सिलेक्टीव्ह रिमेंबर्स’ या मथळ्याखाली लेख लिहिला होता.

फाळणी वेदना स्मरणदिनाच्या मोदींच्या होर्‍यामागचं कारण कोणाला कळणार नाही? कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला मुस्लिमांपासून दूर करण्याचा तो कुटिल डाव लक्षात यायला कोणाला वेळ लागला नाही. करण थापर यांच्या नजरेतून हा डाव निसटणं कदापि शक्य नव्हतं. करण यांनी या घोषणेचा मागोवा घेतला आणि मोदींचं गणित बिघडलं. खरं तर जुन्या जखमांच्या खपला कधीच काढू नयेत, हे जागतिक तत्व भारताच्या पंतप्रधानांनी पाळायला हवं होतं. पण ज्यांना अशा गोष्टींचं राजकारणच करायचं असतं त्यांना हे सांगणार कोण? समाजमनावर परिणाम करणार्‍या अशा गोष्टींची आठवण पुन:पुन्हा नको म्हणून जगातल्या बहुतांश देशांनी त्या आठवणी विविध दिवसांची स्मृती पाळून आदर्श निर्माण केला आहे. सर्वधर्मसमभाव राखला जावा हा त्यामागचा शुध्द हेतू. समाजात वितुष्ट निर्माण करतील अशा ज्वलंत आठवणी आहे तिथेच ठेवून सर्वांना एकाच माळेत आणण्याचा हा उदात्त मार्ग या देशांनी अवलंबला आणि भारताने मात्र त्यावर बोळा फिरवला. ज्या घोषणेचा मोदींनी पुकार केला त्या दंगलीत मुस्लिमांचा र्‍हास प्रचंड वेदनादायी होता, हे करण यांनी दाखवून दिलं. आता अशा आठवणी उजाळायच्या आणि काँग्रेसला बदनाम करायचं षङ्यंत्र रचायचं. याला करणसारख्या पत्रकारांनी आव्हान द्यावं, हे मोदींना पटणारं नव्हतं.

- Advertisement -

भारतात असा स्मरणदिन पाळून देशाच्या पंतप्रधानांनी सर्वधर्म समभाव निकालात काढण्याच्या केलेल्या कृतीवर थापर यांचा या लेखात प्रहार होता. थापर यांच्या या लेखात देशाच्या विभाजनातील वास्तव पुढे आलं आहे. एकट्या जम्मूमध्ये सुमारे पाच लाख मुस्लिमांना जीव गमवावा लागला. हे होण्याची कारणं थापर यांच्या लेखात स्पष्टपणे नमूद होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जम्मू बहुतांश मुस्लिमबहूल प्रदेश होता. या दंगलीच्या दाहानंतर पाच लाखांवर झालेले मृत्यू पाहून जम्मूतील मुस्लिमांनी काश्मीरमध्ये पलायन केलं आणि जम्मू हिंदूबहूल झालं. अशा घटनेचं निमित्त करत पंतप्रधानांनी बलिदानाचं राजकारण केलं, असा थापर यांच्या लेखाचा विषय होता. हा लेख छपाईला जाता जाता तो रोखण्याचे आदेश निघाले आणि सरकारला हायसं झालं. पुन्हा जनसंपर्क मंत्रालय कामी आलं. खरं तर थापर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू पत्रकार असताना असं होणं हे मोदींच्या एकूणच कृतीचा पराभव होय. ज्या गोष्टींची आपल्या लेखात महात्मा गांधींनी, अर्जुनप्पा दुराई, सूचना आयोगाचे प्रमुख वजाहत हबीबुल्ला यांनी दखल घेतली. त्याच लेखांचा संदर्भ करण आणि टाईम्सने घेतला. असं असताना थापर यांचा लेख न छापता आजही मोदींसाठी कुठल्याही थराला माध्यमं जाऊ शकतात, हे दाखवून दिलं आहे.

हे एकट्या थापर यांच्याबाबत झालं असं मानण्याचं कारण नाही. याआधी अनेक पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला गेला आहे. थापर हे यातलं एक स्वतंत्र प्रकरण म्हणता येईल. प्रसुनकुमार बाजपेयी, अभिसार शर्मा, राजदीप सरदेसाई, आशुतोष अशा असंख्य पत्रकारांना मोदींच्या मीडियाबाजीने घरी बसवलं आहे. आता करण थापर यांची पाळी आली आहे. करण हे मोदींच्या विश्वासातील म्हणायचे तर त्यांचा संबंधित लेख छापण्याने खूप काही मोदींवर फरक पडला असता असं नाही. सोशल मीडियाच्या जांजाळात खर्‍याचं खरंपण कळायला वेळ लागत नाही. थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून मोदींचा खरा चेहरा तेव्हा जगापुढे आला होता.

थापर यांना याची आठवण आता करून दिली जात असल्यास नवल नाही. थापर यांच्या एकाही मुलाखतीला जाऊ नका, असा सल्ला तेव्हा स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, संभीत पात्रा यांनी दिला होता. हा सल्ला आता उलट्या दिशेने काम करू लागला आहे, असंच म्हणावं लागतं. भारताच्या फाळणीच्या वेळी जो काही हिंसाचार झाला, त्यावेळी उभय बाजूंचा लोकांना मोठ्या संख्येने जीव गमवावे लागले. अन्याय अत्याचाराची परिसीमा गाठली गेली. त्या भयंकर आठवणी आहेत. त्या आठवणी जागवण्यात आता कुणालाही स्वारस्य नाही. कारण तो काळ आठवून आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील, अशातला भाग नाही. अलीकडच्या काळात जुन्या वेदनांना उजाळा देऊन त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रघात सुरू झालेला आहे. या वेदनांच्या आठवणी दरवर्षी जाग्या करून त्यातून भारतीय एकतेत भर पडणार आहे का, याचा विचार झाला पाहिजे.

कारण मोदी जर त्याचा भाजपसाठी वापर करणार असतील तर काँग्रेसही काही गप्प बसणार नाही. त्यामुळे त्यात सामान्य माणूसच पेटवला जातो, आणि फरडला जातो. मुळात नेत्यांच्या विचारसरणींच्या वादातूनच अखंड भारताची फाळणी झाली. फाळणी करणारे नेते सुरक्षित राहिले, पण त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात लाखो हिंदू-मुस्लीम ठार झाले. पण त्याचे राजकीय नेत्यांना त्यावेळी सोयरसुतक नव्हते आणि आजही नाही. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे सरकार किंवा नेते अशा वेदनांना जागे करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते आपल्या हिताचे आहे की नाही, त्याचा सामान्य जनतेने विचार करण्याची गरज असते. कारण निवडणुकीच्या राजकारणात नेते मंडळी जनतेचा कडीपत्त्यासारखा वापर करतात, अर्क शोषून घेतल्यावर काढून फेकून देतात. त्याचा या भारतातील सर्व धर्मांच्या जनतेने विचार करायला हवा. कारण आपल्याला पेटवणारे आपल्या मरणावर आणि सरणावर त्यांच्या राजकीय पोळ्या शेकत असतात.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -