घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराज यांचे हिंदुत्व..!

राज यांचे हिंदुत्व..!

Subscribe

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर बोलताना आक्रमक हिंदुत्वाचा राग आळवला होता. थोडक्यात मनसेची वाटचाल ही शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या मार्गावर सुरू असल्याचे त्यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून स्पष्ट झाले आहे. मनसेची आणि त्यातही विशेषकरून राज ठाकरे यांची जर शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जी एकूण वाटचाल सुरू आहे ती पाहता राज ठाकरे हे 1989 च्या काळात शिवसेनेची भूमिका होती त्या भूमिकेत सध्या शिरल्याचे त्यांच्या एकूणच राजकीय भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वर्गवासानंतर शिवसेनेचे नेतृत्व राज यांच्या तुलनेने मवाळ आणि सौम्य स्वभाव असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुखांची निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना आहे त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्याकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तोडीचे भाषण कौशल्य आहे. राज ठाकरे यांचा किंवा अगदी मनसेचादेखील एकमेव हुकुमी एक्का म्हणजे राज यांचे स्वतःचे भाषण सामर्थ्य होय.

तसेच कोणत्या प्रसंगी त्या राजकीय स्थितीत नेमकी कोणती भूमिका चपखल बसेल याचे पुरेपूर भान आणि अत्यंत उत्तम जाण राज ज्यांच्याकडे उपजतच आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेची स्थापनाच मुळात मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी केली. या स्थापनेच्या वेळी मनसैनिकांनी उत्तर भारतीय आणि बिहारवासीयांविरोधात आंदोलनं केली आणि त्यामुळे मराठी माणसाच्या हृदयामध्ये शिवसेनेबरोबरच तरुण, आक्रमक मराठी चेहरा असलेल्या मनसेला त्यावेळी जनसामान्यांमधून चांगले पाठबळ मिळाले. 2009 मध्ये मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले ते केवळ त्यांच्या आक्रमक मराठीच्या मुद्यावर होय. मात्र, त्यानंतर मनसेची गाडी भरकटली आणि 2014 तसेच 2019 मध्येदेखील अवघ्या एका आमदारावर महाराष्ट्रातील जनतेने राज ठाकरे यांची बोळवण केली. आता कोणत्याही राजकीय संघटनेचे अस्तित्व हे जरी निवडणुकांमधील यश-अपयश यावर अवलंबून असले तरीदेखील निवडणुकांच्या पलीकडेदेखील राजकारणात राजकीय पक्षांसाठी एक स्वतंत्र स्पेस असते आणि नेमकी ही स्पेस महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांनी ताब्यात घेतली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

- Advertisement -

2019 मध्ये अवघा एक आमदार निवडून आल्यानंतर राज ठाकरे आणि एकूणच मनसेची स्थिती ही दिशा भरकटलेल्या जहाजाप्रमाणे झाली होती. अर्थात, उत्तम कॅप्टन तोच असतो की जो भरकटलेल्या जहाजास योग्य दिशा दाखवतो. त्यामुळे साहजिकच राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे मवाळ झालेल्या शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका मनसेच्या खांद्यावर घेतली आहे. मशिदीवरील भोंगे न हटवल्याने मनसैनिक मशिदींसमोर हनुमान चालिसा वाचत आहेत. अर्थात, मनसैनिकांनी जरी हनुमान चालिसा वाचली तरी काही मशिदीवरील भोंगे हे हटणार नाहीत हे राज ठाकरे यांनादेखील माहिती आहे. मात्र शिवसेनेची मवाळ झालेली हिंदुत्ववादी भूमिका राज ठाकरे यांनी हाय जॅक करण्याचे ठरवले असून आक्रमक हिंदुत्वाच्या माध्यमातून मनसेची नवीन मुहूर्तमेढ उभारण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. मात्र असे असले तरीदेखील महाराष्ट्रामध्ये मनसेच्या भूमिकेमुळे हिंदू मुस्लीम समाजामध्ये धार्मिक तेढ उत्पन्न होऊ नये याकरता राज्यातील आघाडी सरकार अधिक सतर्क झाले आहे.

महाविकास आघाडीचे नेते मनसेला भाजपची सी टीम म्हणू लागले आहेत. एकीकडे मनसे आक्रमक हिंदुत्ववादी होत असताना दुसरीकडे भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपला हे पक्के ठाऊक आहे की जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एकत्र लढले तर या तिन्ही पक्षांचा सामना करणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळेच मनसेच्या माध्यमातून शिवसेनेला जेवढे कमजोर करता येईल तेवढे करण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर हे करत असताना राज ठाकरे यांची राजकीय वर्तुळातील आणि जनसामान्यांमध्ये जी एक विशिष्ट प्रतिमा आहे त्या प्रतिमेला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी ही राज यांच्या स्वतःवरच आहे. त्यामुळे त्यांनी मनसेच्या भरकटलेल्या जहाजाला जरूर योग्य दिशेला न्यावे. मात्र हे करत असताना महाराष्ट्राची जी पुरोगामी परंपरा आहे त्याला तडा जाणार नाही याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातातील बाहुले होण्यापेक्षा राज यांनी स्वतः राजा व्हावे अशीच सर्वसामान्य मराठी माणसाची त्यांच्याबाबतची अपेक्षा आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणात जी भूमिका घेतली आणि विचार मांडले त्यात त्यांनी भाजपवर अजिबात टीका केली नाही. भाजपला पोषक आणि पूरक ठरतील, असे विचार त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांना शिवसेना सोडावी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते, त्यासाठीच आपला सगळा अट्टाहास होता हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण जे केले ते पितृवचनासाठी होते, असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. पण शिवसेना ज्या महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे, त्यामुळे आपोआपच त्यांच्या हिंदुत्वाची धार बोथट झालेली आहे, हे म्हणावे लागेल. कारण त्यांना आपल्या सहकारी पक्षांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे शिवसेनेची जागा आता आपोआप राज यांच्याकडे आली आहे.

आगामी काळात शिवसेनेची ताकद कमी करून आपला प्रभाव वाढवायचा असेल तर आपल्याला राज यांचा उपयोग होऊ शकतो, या विचाराने अनेक भाजप नेते राज यांच्या भेटी घेत असतात. राज यांनी सुरुवातीला मराठी माणसाचा विषय घेऊन मनसेची सुरुवात केली. आता ते हळूहळू हिंदुत्वाची शाल पांघरत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वाटचाल अशीच झालेली होती. शिवसेनेने पूर्वी भाजपच्या हिंदुत्वाशी जसे जुळवून घेतले होते, तसाच सेतू आता राज ठाकरे भाजपशी नव्याने बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसले. पण राज यांची आक्रमक भूमिका भाजपला कितपत मानवेल, हाही एक प्रश्न आहेच. कारण राज यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली असली तरी त्यांचा कार्यकर्ता ज्या मराठी मातीतला आहे, त्याला विसरून चालणार नाही, कारण तीच त्यांची खरी ताकद आहे. त्यामुळे भाजपसोबत मैत्री करताना राज यांना आपल्या मूळ भूमिकेशी असलेली बांधिलकी सोडून चालणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -