‘थलायवा’चा सन्मान !

संपादकीय

गेली पाचहून अधिक दशके आपल्या दमदार आणि कसदार अभिनयासह बॉलीवुडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणार्‍या ‘थलायवा’ फेम रजनीकांत अर्थात शिवाजीराव गायकवाड यांना यंदाचा केंद्र सरकारचा 51 वा दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. खर्‍या अर्थाने अखंड संघर्ष करत राहिलेल्या एका मराठी आणि त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्याचा हा खराखुरा सन्मान आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यामुळेच दाक्षिणात्य राज्याबरोबरच देशातीलच नव्हे तर जगभरातील मराठी चित्रपट रसिकांना रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याच्या वृत्तानेच आनंद चेहर्‍यावरून ओसंडून वाहू लागला आहे. कारण त्यांचे मूळ हे मराठी मातीत आहे. सुरुवातीच्या काळात बस कंडक्टर म्हणून काम करणार्‍या या मराठी माणसाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जे देवत्व प्राप्त केले आहे त्याचा आपल्या सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांत हे सुपरस्टार आहेत. त्याचे चित्रपट प्रदर्शित होणे हा रजनीच्या चाहत्यांसाठी विशेषत: दाक्षिणात्य लोकांसाठी मग ते जगात कुठेही असोत त्यांच्यासाठी तो एक जंगी उत्सव असतो. ज्या दिवशी त्यांच्या चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा वाजंत्रीच्या तालावर त्यांच्या रजनीकांत यांच्या फोटोची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या फोटोला देवाप्रमाणे दुग्धाभिषेक करण्यात येतो.

चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणार्‍या कलाकाराला प्रत्येक वर्षी केंद्र सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात येते. काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करून रजनीकांत यांना केंद्र सरकारतर्फे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांच्याबाबत त्यांच्या भावना अत्यंत मोकळेपणाने व्यक्त करताना जे म्हटले आहे ते अत्यंत समर्पक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की, प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय वैविध्यपूर्ण भूमिका आणि प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजेच रजनीकांत थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळेच त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

तर या पुरस्काराची घोषणा करणारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय चित्रपट सृष्टीतील महान अभिनेता निर्माता पटकथालेखक म्हणून रजनीकांत यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा होताच जगभरातून रजनीकांत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आणि सोशल मीडियावरही रजनीकांत हा हॅश टॅग कालपासूनच जोरदार ट्रेंडिंगमध्ये राहिला. शिवाजी द बॉस, बिल्ला डॉन , थलायवा अशा एकाहून एक सरस ठरलेल्या आपल्या हटके अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अव्वल स्थानी पोचलेल्या रजनीकांत यांनीही अत्यंत नम्रपणाने या पुरस्काराच्या घोषणेचे स्वागत करत दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्कारासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्व चाहत्यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानतो तसेच हा पुरस्कार माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या सगळ्यांना मी समर्पित करत आहे, अशा शब्दात त्यांनी सर्वांचेच आभार मानले आहेत.

रजनीकांत म्हणजेच अर्थात शिवाजीराव गायकवाड यांचा जन्म जरी दक्षिणेतील बंगलोरचा असला तरी त्याचे मूळ गाव हे महाराष्ट्रातील जेजुरी जवळचे कडेपठार आहे. त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे साधे पोलीस कॉन्स्टेबल होते. रजनीकांतचा जन्म, बालपण आणि शिक्षण हे बेंगलोरमध्ये झाले. एका अर्थाने बेंगलोर ही त्यांची खरीखुरी कर्मभूमीच. बॉलिवूडचा सुपरस्टार बनलेल्या रजनीकांत यांनी त्यांच्या उमद्या वयामध्ये सुतार कामापासून अंगावर पडेल ते काम एकेकाळी केले होते. अर्थात बेंगलोरमधील रामकृष्ण मठामध्ये त्यांच्यातील कलाकाराला स्वतःमधील सुप्त गुण प्रकट करण्याची सर्व प्रथम संधी मिळाली. आणि या आणायचे मिळालेल्या संधीचे हटके, दटके आणि चटकदार अभिनय करत रजनीकांत यांनी सोने करून दाखवले. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या घोषणेनंतर रजनीकांत यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया त्यामुळेच खूप बोलकी आहे.

रजनीकांत म्हणतात, माझ्यातील अभिनय गुण ओळखून नट बनण्यासाठी प्रोत्साहन देणारा माझा बसचालक सहकारी आणि मित्र राजबहादुर यांचे मी आभार मानतो. आमची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्यासाठी त्याग करणारा माझा भाऊ सत्यनारायणराव गायकवाड तसेच मला रजनीकांत बनवणारे माझे गुरु के. बालचंदर यांचेही मी आभार मानतो. बॉलिवूडचे सुपरस्टार झाल्यानंतरही रजनीकांत यांनी गरिबीची आणि गरिबांची जाणीव कायम ठेवली त्यामुळेच केंद्र सरकारने दिलेला हा पुरस्कार खर्‍या अर्थाने सर्वोच्च ठरत आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये केवळ हिंदीच नव्हे तर कन्नड तेलुगू बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्येही रजनीकांत यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सुरुवातीच्या काळात खलनायकी भूमिका केल्यानंतर केवळ स्वतःमधील अभिनय क्षमतेच्या बळावर शिवाजीराव गायकवाड हे दी सुपरस्टार रजनीकांत झाले. जगभरात सर्वाधिक चाहता असलेला कलाकार म्हणून रजनीकांत यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. एक कसलेला अभिनेता आपल्या केवळ अभिनय क्षमतेच्या जोरावर आणि प्रचंड कष्ट संघर्षाने मेहनतीच्या बळावर सुपर स्टारपर्यंत कशी मजल मारू शकतो याचे रजनीकांत हे एक जिवंत उदाहरण म्हणता येईल.

त्यामुळेच रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यावर शंका उपस्थित करणारे महाभाग हे फारच संकुचित वृत्तीचे ठरतात. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने मतदानाच्या चार-पाच दिवस आधी केंद्र सरकारने ही घोषणा करून तामिळनाडूतील जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची टीका या पुरस्काराच्या निमित्ताने केली जात आहे. यानिमित्ताने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कुडमुड्या पत्रकारांचे कान टोचले हे एकापरीने बरेच झाले. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीची संबंधित आहे आणि रजनीकांत हे गेली पन्नास वर्षे या क्षेत्रात अखंड कार्यरत आहेत. त्यामुळे नाहक रजनीकांत यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारले पाहिजेत, असा जो संताप प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला योग्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. दक्षिणेकडच्या राज्यामध्ये भाजपला अजून पाय रोवता आलेले नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तिथे संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होत असतात. त्याचा सामना करत संघ आपल्या विचारांचा विस्तार करत आहे. पण तरीही संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला त्या राज्यांमध्ये अजूनही हवा तसा जम बसविता आलेला नाही. त्यामुळे अलीकडे ई श्रीधरन यांना भाजपकडून केरळमधील पक्षाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळेच रजनीकांत यांना भाजपची सत्ता असलेल्या केंद्र सरकारकडून चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला, त्यामुळे काही जणांकडून शंका उपस्थित करण्यात आली. पण रजनीकांत यांची सिनेक्षेत्रातील उंची आणि कर्तबगारी आणि त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष पाहतात त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार हा यथोचित आहे, असे मानायला हरकत नाही. त्याला राजकीय चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. कारण थलायवा हा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी आहे, हे रजनीकांत यांनी आपल्या बर्‍याच चित्रपटांमधून दाखवून दिले आहे.