Blog: रिया, मीडिया आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली ‘स्त्री’

बॉलीवूडमध्ये तो स्थिरावलेला. तर ती स्ट्रगलर . तो मध्यमवर्गीय कुटुंबातला. तर ती बड्या घरातली. तो दिसायलाही सामान्य पण लोकप्रिय. तर ती बोल्ड अॅड ब्युटीफूल. पण फारशी कोणाला माहित नसलेली. त्याच्यापेक्षा बड्या लोकांबरोबर तिची उठबस जास्त. त्यामुळे पार्ट्या, तर कधी जिममध्ये अनेकवेळा इतरांसारखी त्यांची भेट व्हायची. हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. तो यशाच्या पायऱ्या चढत होता. तर तिची मात्र धडपडच सुरू. अपेक्षित यश मिळत नसल्याने ती भांबावलेली. तर तो तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला. जगासाठी सुशांतच लव्हलाईफ हॅपी असतानाच अचानक टीव्हीवर बातमी झळकते. डिप्रेशनमध्ये असलेल्या सुशांतनं गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या मृत शरीराचे फोटो व्हायरल होतात. घटनास्थळी मिडीया धावते आणि इतके दिवस जगाला गुडीगुडी वाटणारं पडद्याआड असलेलं सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचं संपुष्टात येत असलेलं प्रेमप्रकरण चव्हाट्यावर य़ेतं. रिया जिला या घटनेआधी फार कोणी ओळखतं नव्हतं ती रातोरात फोकस मध्ये येते.

हायप्रोफाईल प्रकरण चिघळतं जातं. सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप केला जातो. त्याचे कुटुंब रियाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं. याप्रकरणात बड्या धेंडांची नाव गुंतल्याच्या चर्चा सुरू होतात. यात एका तरुण राजकीय नेत्याचे नावही येते. विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत येतं आणि य़ेथेच सुशांतचं मृत्यूप्रकरण वेगळ वळण घेत. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात. तो बिहारचा असल्याने एव्हाना या प्रकरणाला राजकिय वळण मिळालेलं असतं. सुशांतच्या मृत्यू निमित्ताने महाराष्ट्र -बिहार ही दोन्ही राज्ये आमने सामने येतात. तर त्याच कुटुंब मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतात. हे प्रकरण बिहार पोलिसांकडे वर्ग करण्याची न्यायालयाला विनंती करतात. सुशांत मृत्यूप्रकरणी रियाला व तिच्या कुटुंबाला जबाबदार ठरवत तिच्यावर १६ गंभीर आरोप लावतात. रियाचं आयुष्य येथेच कलाटणी घेते.

कधीकाळी सुशांतच्या हृदयावर राज्य करणारी रिया गुन्हा सिद्ध होण्याआधीच दोषी ठरते. तिनं त्याला ड्र्गच व्यसन लावण्यापासून त्याचे पैसे उकळल्याचा, काळी जादू केल्याचा आरोप तिच्यावर व तिच्या कुटुंबियांवर होतो. प्रकरण सीबीआयकडे जात. नंतर सुरू होते ती रिया व तिच्या कुटुंबाची परवड. त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी. कधी सीबीआय, कधी ईडी तर ड्रग्जचाही याप्रकरणाशी संबंध असल्याने एनसीबीचं जाळ रिया व तिच्या कुटुंबीयाबरोबरच, त्याच्या स्टाफभोवती आवळत जातं. यादरम्यान, दररोज चौकशीसाठी घर ते सीबीआय, कधी ईडी तर कधी एनसीबीच्या कार्यालयात जाताना रियाचा बाईट मिळवण्यासाठी मिडीयाचा रोज तिच्या घराखाली व तर तिच्याभोवती गराडा पडतोय. धक्काबुक्की करत मिडियावाले तिला प्रश्न विचारून बेजार करताना रोज दिसताहेत. ती मात्र एकही शब्द न बोलता गर्दीतून माग काढत जाते. गेले अनेक दिवस हेच सत्र सुरू आहे.

सुरुवातीला चौकशीला कॉन्फिडन्टली सामोरी जाणारी रिया आता मात्र खचलेली दिसतेय. धक्काबुक्की करणाऱ्या गर्दीकडे रोषाने बघणारी रिया आता त्या गर्दीला निर्ढावली आहे. सुशांत प्रकरणात रिया मुख्य आरोपी जरी असली तरी मिडीयासह सामान्य नागरिक मात्र तिला दोषी ठरवून मोकळे झाले आहेत. यामुळे तिच्याबद्दल जनमाणसांच्या मनात प्रचंड रोष आहे. याचपार्श्वभूमीवर सोशल मिडियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. एका रात्रीचे किती घेतेस असे हिन दर्जाचे प्रश्न विचारून लोक आपल्या मानसिक विकृती शांत करत आहेत.

गर्दीत तिला धक्काबुक्की होत आहे. कोणी शिव्या घालत आहे. तर कोणी गर्दीचा गैरफायदा घेत तिच्याशी अंगलट करण्याचाही प्रयत्न करत आहेत. अनेक नको असलेले स्पर्श झेलत गर्दीतून वाट काढणाऱ्या रियामधली स्त्री कोणालाही दिसेनासी झाली आहे. गुन्हा सिद्ध होण्याआधीच रियानेच सुशांतची हत्या केली असा कांगावा जो तो करत आहेत. परवा एनसीबीच्या चौकशीसाठी जाताना तिला असाच मिडीयाच्या गर्दीचा भयानक अनुभव आला आणि ती रडू लागली. तिचा बांध आता सुटतोय. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाचा काय रोल होता हे लवकरच समोर येईल. पण तोपर्यंत तरी मीडियाने संयम बाळगायला हवा.

याप्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनमुळे तिला अटक करण्यात आली आहे. यापुढील चौकशी व तपास तिच्यासाठी अधिक कठीण ठरणारा असून गुन्हा सिद्ध होईपर्यंत रियाला अनेक परीक्षांमधून जावे लागणार आहे. मात्र, या दरम्यान ती एक स्त्री देखील आहे याचे भान मीडियानेच नाही तर सामान्य जनतेनेही राखायला हवे. एक स्त्री म्हणून हा विचार मनात येतोच.