घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसब घोडे बारा टक्के...!

सब घोडे बारा टक्के…!

Subscribe

एक महत्वाची गोष्ट शिवसेनेकडून आणि या महाविकास आघाडी सरकारचे जन्मदाते शरद पवार यांच्याकडून सातत्याने सांगितली जाते ती म्हणजे या सरकारचे मुख्यमंत्री होण्याची उद्धव ठाकरे यांची मनस्वी इच्छा नव्हती. मात्र शरद पवार यांनीच आग्रह करून त्यांच्या हे गळी उतरवले की, महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेला प्रयोग यशस्वी करायचा असेल आणि हे सरकार पाच वर्षं स्थिर ठेवायचं असेल तर त्याकरिता उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री होण्याची आवश्यकता आहे.

2019 मधील नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतर नाट्यानंतर महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय क्षितिजावरील ज्या काही छोट्या-मोठ्या घडामोडी या सव्वा दोन वर्षांच्या ठाकरे सरकारच्या कालावधीत घडल्या आहेत त्यामुळे केवळ राजकीय क्षेत्रातील मंडळींचे नव्हे अथवा रोजच्या घडामोडी टिपणे व त्याच्याशी संबंधित असणार्‍या माध्यम क्षेत्रातील मंडळींचीच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेचीदेखील चांगलीच करमणूक सुरू आहे. शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या कालच्या बड्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील जनतेचा यापूर्वी महाविकास आघाडी सरकारकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आणि केंद्रात एकहाती सत्ता असलेल्या भाजपसारख्या जबाबदार राष्ट्रीय पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्येदेखील आता बरीच तफावत पडली आहे.

एक महत्वाची गोष्ट शिवसेनेकडून आणि या महाविकास आघाडी सरकारचे जन्मदाते शरद पवार यांच्याकडून सातत्याने सांगितली जाते ती म्हणजे या सरकारचे मुख्यमंत्री होण्याची उद्धव ठाकरे यांची मनस्वी इच्छा नव्हती. मात्र शरद पवार यांनीच आग्रह करून त्यांच्या हे गळी उतरवले की, महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी केलेला प्रयोग यशस्वी करायचा असेल आणि हे सरकार पाच वर्षं स्थिर ठेवायचं असेल तर त्याकरिता उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते मग ते देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, आशिष शेलार असतील या सार्‍यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडलेली नाही. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तर शिवसेना नेत्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या हात धुऊन मागेच लागले आहेत.

- Advertisement -

जणू काही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे मंत्री हे भ्रष्टाचार करण्याव्यतिरिक्त अन्य काहीही करत नाहीत, असे चित्र निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे. राजकारण, सत्ताकारण आणि राजकीय नेत्यांचे एकमेकात अडकलेले गुंते हे लक्षात घेता माध्यम क्षेत्रातील मंडळी याकडे तितकेसे गांभीर्याने पाहत नाहीत. याचे कारण ज्या नारायण राणेंविरोधात किरीट सोमय्या यांनी शंभर कंपन्या असल्याची तक्रार केली होती, तेच नारायण राणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या आरोप, तक्रारी यांना आता काही महत्व राहिलेले नाही. अर्थात यामध्ये केंद्रीय भाजप नेत्यांची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे.

एकीकडे किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या काँग्रेसच्या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि थेट केंद्रात कॅबिनेट मंत्री करायचे तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांना केंद्रीय सुरक्षा दलाचे संरक्षणदेखील पुरवायचे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या राजकीय विरोधकांकडे बघण्याचा केंद्रीय नेत्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे हेदेखील यातून अधोरेखित होते. अर्थात याचा अर्थ महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचा कारभार आलबेल आहे असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. सत्ताकारण, राजकारण म्हटले की दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, वार पलटवार, अंतर्गत हेवेदावे, गटबाजी हे सर्व काही आता सर्वसामान्य जनता चांगलीच समजून आहे.

- Advertisement -

मंगळवारी संजय राऊत यांनी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सरकारच्या काळात महाराष्ट्रात महाआयटीमध्ये जो काही 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला त्याबाबत अद्याप तरी स्वतः फडणवीस यांनी कोणतेही स्पष्टीकरण अथवा खुलासा केलेला नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्र भाजपामधील नेतेमंडळी विरोधकांवर आरोप करत त्यांच्याभोवती संशयाची भूतं नाचवत होती. मात्र संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर हीच संशयाची भुते आता भाजप नेत्यांसमोर नाचवायला सुरुवात केली आहेत. थोडक्यात, आपल्या विरोधकांबाबत प्रसारमाध्यमांतून, सोशल मीडियाच्या माध्यमातून बेछुट आणि बेलगाम आरोप करायचे आणि संशयकल्लोळ निर्माण करायचा ही भाजपची गोबेल्स नीती आता संजय राऊत यांनी भाजपवर वापरायला सुरुवात केली आहे. हे चूक की बरोबर हा आताचा प्रश्न नाही. मात्र यानिमित्ताने महाराष्ट्रासह देशातील लोकांसमोर सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांबाबत जो एक संदेश गेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. प्रख्यात कवी विंदा करंदीकर यांची सब घोडे बारा टक्के अशी एक लोकप्रिय कविता आहे.

महाराष्ट्रातील गेल्या दोन दिवसातील राजकीय स्थितीविषयी ती कविता खूपच काही सांगून जाते…

जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्यामधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जनतेमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच राजकीय प्रतिमेबाबत राज्यातील जनतेत सर्वांमध्येच एक आदराचे स्थान होते हे आदराचे स्थान त्यांच्याबाबतीत कदाचित यापुढेदेखील राहील, मात्र राऊत यांच्या आरोपानंतर फडणीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीकडे बघण्याचा माध्यम प्रतिनिधींचा तसेच सामान्य जनतेचा दृष्टिकोन हा काही प्रमाणात निश्चितच बदलला आहे. 2014 ते 2019 अशा पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सामील होती आणि याच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. याला जरी भाजप कमी गांभीर्याने घेत असली तरी सर्वसामान्य जनता यातून जे काही समजायचे ते समजून चुकली आहे. त्यामुळे शिवसेना असो, अथवा भाजप असो, सब घोडे बारा टक्के, हेच स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -