बप्पीच्या संगीत लहरी…कभी अलविदा ना कहना!

‘आँगन की कली’ चित्रपटासाठी, ‘सैंया बिना घर सूना...सूना...’ हे गाणं लता मंगेशकर यांनी बप्पीसाठी गायलं होतं, त्यानंतर कैफी आझमींसाठी, ‘नन्हा सा पंछी रे तू...बहुत बडा पिंजरा तेरा...’ हे ‘टुटे खिलौ’ने सिनेमातलं गाणं किशोरच्या आवाजात बप्पीचं असल्याचं आता नव्याने सांगावं लागेल. या शिवाय आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है....’ हे ‘ऐतबार’मधलं गझलवजा गाणं खूपच मनस्वी होतं. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना...’ हे किशोर कुमार यांच्या आवाजातील बप्पीने संगीत दिलेलं गाणं अजरामर झालं. बप्पीच्या संगीत लहरी अशाच अजरामर राहतील.

भारतात डिस्को, पॉप, रॅप असं बरंच काही बप्पीनं केलं म्हणण्यापेक्षा युरोप अमेरिकेतून त्यानं ते इथं आणलं हेच खरं. अमेरिकेतल्या ‘बी.जी’च्या बिट्स गाण्यांच्या रेकॉर्ड ‘डिस्क’चा ‘डिस्को’ बनवून बप्पीनंच भारतात आणला. केवळ आवाजाशी संबंधित अमेरिकेतल्या नाईट क्लबमध्ये वाजणार्‍या बिट्स रेकॉर्ड डिस्कला बप्पीनं डिस्कोमध्ये रुपांतरित केलं आणि त्याला थिरकणारं नृत्य बहाल केलं. आजही डिस्को ही ऐकण्याची नाही तर नाचण्याची कला असल्याचा भ्रम पुढे कायम करण्यात आणि ही संकल्पना बदण्यात एकमेव बप्पीच्या संगिताचाच वाटा होता. अमेरिकेतला डिस्को हा सिनेमाचा विषय असू शकतो, हे ऐंशीच्या दशकात बप्पीनं मिथुनच्या साथीने दाखवलं आणि यशस्वीही केलं. डिस्को डान्सर, त्यानंतर आलेला ‘डान्स डान्स’, ‘डान्सर’ ‘रॉक डान्सर’ अशी अनेक उदाहरणं झाली. 1982 मध्ये आलेल्या कुमार गौरवच्या ‘स्टार’वरही बप्पीच्या सिनेमांचा परिणाम होता. नाझिया हुसैनचं ‘बूम बूम……’ हे रती अग्निहोत्रीवर चित्रीत झालेलं गाणं बप्पीनेच केलं असावं, असा भ्रम त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीत पसरला होता.

अमेरिकेतल्या नाईट क्लबमध्ये ड्रमसेटवर वेगवान बिट्स डिस्कमधून वाजवले जात, त्याला डिस्को म्हटलं जाई, बप्पीनं या डिस्कोचं पहिल्यांदा फ्युजन केलं आणि त्याला हिंदी सिनेसंगीताची जोड दिली. मिथुनच्या डिस्को डान्सरमध्ये ‘आय एम डिस्को डान्सर…’ गाण्यात मिथुन डिस्कोचं स्पेलिंग स्पष्ट करून सांगतो, ज्यात ‘डि से होता है डान्स’, ‘आय से होता है आयटम’, ‘एस से होता है सिंगर’, ‘सी से होता है कोरस’ आणि ‘ओ से ऑर्क्रेंस्ट्रा…’ हे विश्लेषण बप्पी लहरीने या सिनेमासाठी केलं होतं. याच सिनेमातलं ‘जीमी जीमी जीमी&. आजा आजा आजा…’ हे त्याचं गाणं डान्स सम्राट मायकल जॅक्सनला आवडल्याचं त्यानं भारत भेटीत बप्पीला सांगितलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर मायकल जॅक्सन आल्यावर बप्पीची ओळख बाळासाहेबांनी मायकलला करून दिली. त्यावेळी ‘आय एम अ‍ॅन इंडियन मायकल जॅक्सन’ असं बप्पी मायकलला म्हणाल्याची कथा नंतरच्या काळात सिने नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. बप्पीच्या नावानं अनेक कथा बॉलिवूडमध्ये पसरवल्या गेल्या होत्या.

बप्पीला सोनं, लॉकेट्स, चेन परिधान करण्याची भारी हौस होती, एका सिनेपार्टीत संवादाचा बादशहा राजकुमारनं त्याला आता फक्त मंगळसूत्र घालायचं बाकी ठेवलंस बप्पी, असा टोमणा मारल्याची कथाही पसरली होती. ‘झोपडी में चारपाई, बांगो…बांगो, मौसम है गाने का….आवो बादशहा, कोई यहाँ आहा नाचे नाचे…’ किंवा तशाच टाईपमधल्या मिथुनच्या नृत्यकौशल्यावरच्या गाण्यांचं वादळ बप्पीनं आणलं होतंच. त्याआधी प्रकाश मेहरांच्या ‘नमक हलाल’साठी बप्पीनं हिंदी पडद्यावरचं सर्वात दीर्घ असलेलं बारा मिनिटांचं गाणं संगीतबद्ध केलं होतं. या गाण्यात एकाच वेळेस तीन प्रकार त्याने हाताळले होते. ‘के पग घुंगरू बांध मिरा नाची थी…’ किशोरच्या आवाजातल्या या कृष्ण भजनातले शब्द त्याने थेट ड्रमसेटवर डिस्कोत वाजवले.

त्यासाठी त्याने रॅपचा पहिल्यांदाच वापर केला, नमक हलालमध्ये हे रॅप अमिताभ गाणार होता. किशोरला हे बप्पीनं सांगितलं नव्हतं, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दाखल झाल्यावर किशोरने अमिताभला तिथं पाहिलं, बप्पी आपल्याकडून या गाण्याचा फक्त मुखडा गाऊन घेणार असून मध्ये अमिताभ रॅपमध्ये ‘गोंधळ’ घालणार असल्यानं किशोर नाराज झाला, पण बप्पीनं पुढं याच गाण्यात ‘सारेगमपधनीसा’…संगीत सरगमचा असा काही चपखल वापर केला की किशोरची नाराजी आनंदात बदलली..त्यावेळी किशोर बप्पीला म्हणाला, तू मला तानसेन समजतोस का…इतकं कठीण सरगम माझ्याकडून गाऊन घेतोस, किशोर बप्पीचा मामा लागत असल्याने भाच्याचं केलेलं हे कौतुक होतं.

बप्पीनं ऐशीचं दशक गाजवलंच, ज्यात डिस्को डान्सर बप्पीचा सर्वोच्च आविष्कार होता. ‘मुर्गय्या’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मिथुन, कलात्मक, समांतर सिनेमातून थेट व्यावसायिक सिनेमांचा पहिला डान्सिंग स्टार झाला, त्यात बप्पीचा मोलाचा वाटा होता. बप्पीनं बंगाली सिनेमांसाठी संगीत दिलं तेव्हा त्याच्या संगीताला बंगालच्या मातीचा गंध होता, दक्षिणेकडे तो ‘नैनो में सपना’ या गाण्यात साऊथचा संगीतकार झाला, मराठीत बप्पीनं संगीत दिल्याचं उदाहरण नाही, पण ऐशीच्या दशकातल्याच आनंद शिंदेंचा ‘जवा नवीन पोपट हा…त्यानं पहलाज निहलानीच्या हिंदी ‘पाप की दुनिया’ चित्रपटासाठी ‘मै तेरा तोता…’ म्हणत पळवून नेल्याचा आरोप त्याच्यावर झाला. ‘यार बिना चैन कहा रे…’, तुम्हारा प्यार चाहिए…मुझे जीने के लिए…मंझिले अपनी जगह है…या गाण्यातील वेदना बप्पीने अजरामर केली. ‘साहेब’मध्ये ‘क्या खबर क्या पता…क्या खुशी है गम है क्या…’ या गाण्यातली किडनी विकलेल्या फुटबॉलपटू अनिल कपूरची हतबल वेदना त्याने या गाण्यात अशी काही ओतली की आजही हे गाणं हिंदी पडद्यावरच्या ट्रॅजेडी गाण्यांच्या पहिल्या रांगेत यावं.

सत्तर ऐंशीच्या दशकात हिंदी सिनेपडद्यावरच्या संगीतात एक चक्रव्यूव्ह होतं. त्याच्या चार मजबूत बाजू होत्या, एका दिशेला शंकर जयकिशन, दुसर्‍या बाजूस एस.डी आणि आर.डी बर्मन हे बापलेक, तिसरी बाजू सांभाळली होती कल्याणजी आनंदजीने तर चौथ्या दिशेला लक्ष्मीकांत प्यारेलाल, ओ. पी. नय्यर अशी भक्कम तटबंदी भेदणं शक्य नव्हतं. या सर्वच संगीतकारांनी स्वतःचं स्थान आपल्या वैविद्यांनी मजबूत केलं होतं.

संगीताच्या या मैदानात बप्पी तसा नवखा असला तरी किरकोळ मानला जाणारा, पण अनुभवी होता. वयाच्या अकराव्या वर्षी बप्पीनं पहिलं गाणं कम्पोज केलं. त्याआधी बप्पी वयाच्या पाचव्या वर्षीच तबला वादक बनला होता. त्याचं पहिलं गाणं त्याच्या वडिलांनीच बंगालीत गायलं, लता मंगेशकर यांनी बंगालीमध्ये जी काही गाणी गायली त्यातील बहुतेक गाणी बप्पीच्या वडिलांनी संगीतबद्ध केलेली होती. वयाच्या सतराव्या वर्षी ‘दादू’ नावाच्या बंगाली चित्रपटासाठी बप्पीनं पहिल्यांदा संगीत दिलं, हे वर्ष होतं 1970. त्यानंतर दुसर्‍याच वर्षी १९७१ मध्ये ‘नन्हा शिकारी’ या हिंदी सिनेमातील गाणी बप्पीनं संगीतबद्ध केली. या दोन्ही चित्रपटांना तिकिटबारीवर यश मिळालं नाही, पण बप्पी लाहिरीचं संगीत सुरू झालं होतं. अजून बरंच काही होतं, जे त्याच्या हार्मोनियममध्ये गिटार आणि ड्रमसेटमध्ये दडून होतं आणि बाहेर यायचं होतं.

आरडी बर्मनच्या ताब्यात गेलेला सुपरहिट ‘जख्म’ त्याने मोठ्या मनाने आणि विश्वासाने बप्पी लहरीकडे संगीत करण्यासाठी सोपवला. बप्पीने त्या संधीचं सोनं केलं, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातमे…किंवा दिल में होली जल रही है….’ ही गाणी अजरामर झाली. संगीतातील नावीन्याचा शोध बप्पीने कायम ठेवला, हे एकच कारण होतं, ज्यामुळे बप्पी लहरी हा बप्पी लाहिरी झाला. के.सी. बोकाडिया आणि के. बापय्या यांच्या सिनेमातून एका वर्षी सलग बारा सुपरहिट संगीत सिनेमे देण्याचा रेकॉर्ड बप्पीच्या नावावर आहे. यातील बहुतेक सिनेमे जितेंद्र श्रीदेवीचे होते. या सिनेमांना तिकिटबारीवर यश मिळवण्यात बप्पीच्या संगिताचा मोठा वाटा होताच.

लता, आशा, उषा या बहिणींनी बप्पीसाठी गाणी गायलीच, या शिवाय सत्तरच्या दशकात मन्ना डेंच्या संगीत स्वरांनाही बप्पीनं बंगाली हिंदी गाण्यांसाठी संगीतबद्ध केलं. बप्पीकडे असं काय होतं, जे इतर तत्कालीन आघाडीच्या संगीतकारांच्या तुलनेत वेगळं होतं. तो नावीन्याचा शोध घेत होता, संगितात प्रयोग आणि नावीन्याचा शोध घेण्यात आर.डी. बर्मनने मास्टरी कमावली होती. अशा परिस्थितीत या नावीन्यातूनही नवं शोधण्याचं आव्हान बप्पीपुढे होतं. आर.डी. ची अनेक गाणी बप्पीकडे त्यातील नावीन्यामुळेच गेल्याचं म्हटलं जातं. आरडी म्हणजे मेलडी आणि बप्पी म्हणजे बिट्स असा संघर्ष त्या काळात हिंदी पडद्यावरच्या संगितात सुरू झाला होता.

नव्वदच्या दशकात नदीम श्रवण, ए. आर. रेहमान, विजू शाह, अनु मलिक, जतीन ललित, निखील विनय अशा अनेक संगीतकारांनी बप्पीकडून बरंच काही शिकता आल्याचं स्पष्ट केलं. महेश भट्टनं ‘लहू के दो रंग’साठी पहिल्यांदा बप्पीला कमर्शियल सिनेमासाठी ब्रेक दिला. त्यातलं चाहिए थोडा प्यार…थोडा प्यार चाहिए….हे गाणं आजही वाजवलं, ऐकलं जातं. बप्पीनं 50 वर्षे चित्रपट संगीत क्षेत्रात घालवली. यात शेकडो गाण्यांना त्यानं संगीत दिलं. प्यार मांगा है तुमीसे, माना हो तुम बेहद हंसी, अशी अविट गोड गाणी बप्पीने दिली. यातील अनेक सिनेमे बॉक्स ऑफीसवर कोसळले, पण त्याचं संगीत नेहमीच वाजत गाजत राहिलं. आजही वाजतंय, अगदी कालपरवा रिलिज झालेल्या जवळपास सात चित्रपटांमध्येही ‘तुने मारी एन्ट्री…(गुंडे) मधलं गाणं असो किंवा ताकी ताकी, तम्मा तम्मा बांगो बांगो हे आजही चित्रपटात रिमिक्स करून वाजत राहिलंय.

बप्पीला ग्रॅमीसह अनेक पुरस्कार मिळाले, ट्रॉफी, गोल्डन डिस्कने त्याच्या दिवाणखान्यांची शान वाढली, मात्र ‘चलते चलते’ सिनेमातील संगीतासाठी त्याला फिल्मफेअरचा एकमेव पुरस्कार मिळाला. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना…’ हे ते किशोरचं अजरामर गाणं होतं. बप्पी लाहिरी या नावाने संगीतसागरात छेडलेल्या तरंग लहरी कायम संगीतप्रेमींना याद राहतील एवढ मात्र नक्की…