घरफिचर्सरहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर

रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर

Subscribe

मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले.

चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचा आज स्मृतिदिन. चंद्रकांत चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. त्यांचा जन्म ९ जून १९०६ रोजी झाला. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कादंबर्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्‍या चोरून वाचल्या. ज्या काळात साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांचे आणि ऐतिहासिक चरित्रांचे वाचन हेच शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य समजले जात होते त्या काळात मुखपृष्ठावर पाठीत सुरा खुपसलेला मृतदेह आणि किंचाळणारी स्त्री असली चित्रे असलेली बाबूरावांची पुस्तके चोरूनच वाचली जात.

१९४२ च्या चळवळीत तुरुंगात असताना ‘सामान्य माणसासाठी लिही’ असे बाबूरावांना सांगण्यात आले. सामान्य माणसाकरिता लिहायचे म्हणजे काय हे बाबूरावांना पडलेले कोडे होते. बाबूरावांना नाटकाची आवड होती. एका नाट्यक्लबाचे ते सभासद होते. त्या नाट्यक्लबातून ते एकदा विजयदुर्गकिल्ल्यात गेले आणि परत आल्यावर त्यांनी ‘सतीची समाधी’ नावाची गोष्ट लिहिली; ती अस्नोडकरांच्या ‘करमणूक’मधून प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी बाबूरावांना नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर भेटले. छान गोष्ट आहे, ते म्हणाले. एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली आहे असे म्हणून ते बाबूरावांना नाथ माधव यांच्याकडे घेऊन गेले. नाथ माधवांनी अशाच रहस्यकथा लिही असे सुचवले. बाबूरावांनी मग लेखणी हाती घेतली, ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही.

- Advertisement -

येरवड्याच्या तुरुंगात असताना विसापूरच्या तुरुंगातील काही राजकीय कैद्यांनी लढा देऊन सर्वच तुरुंगांतील राजकीय कैद्यांना वाचनासाठी पुस्तके पाठवावयास शासनाला भाग पाडले. अशा काही पुस्तकांतून एडगर वॅलेस यांची ‘थ्री जस्ट मेन’ ही कथा बाबूराव अर्नाळकर यांच्या हाती पडली आणि सामान्यांसाठी काय लिहायचे ते समजले. बाबूरावांचे स्नेही प्रभू हे रहस्यमाला काढीत असत. १९४२ च्या फेब्रुवारीत बाबूरावांनी लिहिलेली ‘चौकटची राणी’ ही पहिली रहस्यकथा पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. बाबूरावांच्या कथांना पाश्चात्त्य कथांचा आधार असायचा, पण त्या कथांना मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. कथेत कुठेही अश्लीलपण येऊ न देण्याची खबरदारी बाबूराव घेत आणि कथेचा शेवट नेहमी ‘सत्यमेव जयते’ असाच असे. कथेतील प्रसंग वेगळे असले तरी नायक एकच ठेवायचा हे बाबूरावांनी निश्चित केले होते. नायकाचे नाव बाबूरावांना गीता वाचताना सुचले आणि त्यांनी धनंजय हे नाव मुक्रर केले. बाबूरावांचा कथानायक रुबाबदार, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असल्याने वाचकांना त्याच्या गुणविशेषांची, वागण्याची, बोलण्या चालण्याची चांगलीच ओळख असे. अशा या महान रहस्यकथाकाराचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -