घरफिचर्ससीतेचे पोहे

सीतेचे पोहे

Subscribe

कवड्याने रागाच्या भरात बहिणीला म्हणजे सीतेला लाथ मारली. बिच्चारी सीता कोलमडून पडली आणि जागीच गतप्राण झाली पण मरण्यापूर्वी सीतेने आपल्या भावाला म्हणजे कवड्याला मी तर तुझ्यासाठी कष्ट करून पोहे बनवले होते. पण तुझ्या बायकोनेच त्यात खडे टाकले.... .हे ऐकूण कवडा पश्चाताप पावला. त्याने सीते उठ ग उठ म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व फुकट. सीतेचे प्राणपाखरू केव्हाच उडाले होते.

हल्लीच वर्तमानपत्रात वाचले की, एका शाळकरी मुलाने आपल्या वडिलांकडे शैक्षणिक साहित्य मागितले म्हणून वडिलांनी त्या मुलाला रागाने भिंतीवर भिरकावून दिले. त्याबरोबर तो मुलगा कोमात गेला. एका शैक्षणिक साहित्याच्या मागणीची एवढी मोठी किंमत त्या मुलाला नव्हे तर त्या पालकांना भोगावी लागली. वर्तमानपत्रातली ती बातमी वाचून मी सुन्न झालो. एक राग माणसाची तर्‍हा हैवानासारखी करतो. एका क्षणात होत्याच नव्हत होतं. रागापाई कित्येकजण कसे जीव गमावून बसतात. याची अनेक उदाहरणे आपणास ऐकायला, वाचायला मिळतात. त्यादिवशी वर्तमानपत्रात आलेल्या त्या बातमीने मला भूतकाळात नेले. मला आमची आजी आठवली.

लहानपणी आजीकडून अनेक लोककथा ऐकायला मिळायच्या. त्या लोककथेला गावच्या वातावरणाचा संदर्भ असे. त्या लोककथा ऐकायला आम्ही सगळी मुलं आजीभोवती जमा होत असू. त्यादिवशी असेच काही झाले. गावातल्या कोणी वितभर उंचीच्या गवतातून आठ-दहा इंचच्या काड्या असलेले पाने नसलेल्या पण केवळ फुले असलेल्या आठेक काड्या घेऊन आले. आणि खळ्यात चोपाळ्यावर बसून घरातल्या माणसांशी गप्पा ठोकू लागले. आम्हा मुलांचे लक्ष त्या काड्याकडे गेले. अशा प्रकारची वनस्पती किंवा फुलं आम्ही मुलांनी यापूर्वी कधीच बघितली नव्हती. आम्ही त्या काड्या हातात घेऊन बघू लागलो. आमच्यातल्या कोणाच्यातरी विचारण्यावरून त्या व्यक्तीने रे बाबू , या झाड न्हय. हे सीतेचे फॉव ! कोकणात मुख्यपणे तळकोकणात कोणी पोहे असे म्हणतच नाही, पोह्यांना फॉव म्हटले जाते. ते विचित्र नाव एकूण त्या फुलांबद्दल कौतुक वाटू लागलं. आम्ही ती फुलं घेऊन खळ्यात खेळू लागलो. ते दिवस बहुतेक गणपतीचे होते.

- Advertisement -

दुपारच्या वेळी जेवणं आटोपली आणि आम्ही आजीजवळ येऊन बसलो. माझ्या हातात सीतेचे पोहे होते. त्यावर आजीने ही फुलं कोणी दिली विचारलं, आजीच्या प्रश्नाचं मी उत्तर दिले आणि आजीने सीतेच्या पोह्यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही लोककथा तळकोकणात खूप प्रसिद्ध आहे. आजी गोष्ट सांगताना ती त्या पात्रांमध्ये बुडून जायची. सगळे कथेतले भाव तिच्या चेहेर्‍यावर यायचे. आजीची कथा सुरु झाली ती अशी-डोंगराच्या पायथ्याशी एक गाव होत. त्या गावात एक शेतकरी कुटुंब रहात होतं. त्याला कवडा आणि सीता अशी दोन मुलं होती. एकदिवस शेतकरी खूप आजारी पडला आणि मरण पावला. शेतकर्‍याचं मरण सांगताना आजीच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले असत. मरताना त्या शेतकर्‍याने सीतेची जबाबदारी मोठा भाऊ या नात्याने कवड्यांवर सोपवली.

पुढे कवड्याचं लग्न झालं. कवड्याची बायको घरातली सर्व कामे लहान सीतेकडून करून घेत असे. एक दिवस कवडा शेतातली कामे आटोपून घरी आला. त्यादिवशी त्याला पोहे खावेसे वाटले. त्याने बायकोला पोहे करायला सांगितले खरे, पण तिने पोहे करायला टाळाटाळ केली. आपल्या भावाला पोहे खावेसे वाटतात तर त्याला आपण करून द्यावेत म्हणून लहानगी सीता कामाला लागली. पोहे करणे म्हणजे खूप जिकीरीचे काम. भात निवडा, गरम पाण्यात भिजवा, खापरात भाजा, कांडा, पाखडा आणि नंतर हव्या त्या प्रकारचे पोहे बनवता येतात. सीतेने पूर्ण सकाळचा प्रहर राबून पोहे तयार केले. मधल्या काळात कवडा काही कामानिम्मित बाहेर गेला होता.

- Advertisement -

कवड्याच्या बायकोने सीतेने केलेली पळापळ बघितली होती. तिला काही केल्या सीतेने केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळू द्यायचे नव्हते. सीतेने भावासाठी तयार केलेल्या पोह्यात खडे मिसळले. थोड्यावेळाने कवडा आला. सीतेने आपण केलेले पोहे आपल्या भावाला दिले. पोहे खाताना कवड्याला खडे लागले त्याबरोबर कवड्याने रागाने पोहे फेकून दिले. आणि रागाच्या भरात बहिणीला म्हणजे सीतेला लाथ मारली. बिच्चारी सीता कोलमडून पडली आणि जागीच गतप्राण झाली पण मरण्यापूर्वी सीतेने आपल्या भावाला म्हणजे कवड्याला मी तर तुझ्यासाठी कष्ट करून पोहे बनवले होते. पण तुझ्या बायकोनेच त्यात खडे टाकले…. .हे ऐकूण कवडा पश्चाताप पावला. त्याने सीते उठ ग उठ म्हणत तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व फुकट. सीतेचे प्राणपाखरू केव्हाच उडाले होते.

तेव्हापासून कवडा रानोमाळ भटकू लागला. त्या कवड्याचे पुढे पाखरू झाले. कवड्याने भिरकावून दिलेले पोहे सर्वत्र पसरून पावसाळ्यात रुजून आले, त्याचीच पुढे फुले झाली. त्या फुलांनाच मालवणी मुलुखात सीतेचे पोहे म्हणून ओळखतात. मला वाटत सीतेचे पोहे हे एक रूपक असावं. माणसातील राग, लोभ, असूया, इर्षा व्यक्त करण्यासाठी कवड्याच्या रूपाने ती शक्ती दाखवली असावी. या लोककथेचा उल्लेख कवी माधव यांच्या कोकणगीतात आलेला आपणास आढळतो.

शिताबाईच्या गोड हातचे पोहे जे काननी.
रागाने दे बाईलवेडा कवडा भिरकावूनी.
रोपे त्याची बनुनी पसरली नाचत चोहीकडे.
अजुनी पहा या मंडित त्यांनी कोकणचे हे सडे.
इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाही जाहली.
दंतकथासही विस्मृती ज्याची होऊनिया राहिली.

सीतेचे हे पोहे प्राणीसृष्टीत, वनस्पतीसृष्टीत आणि साहित्यातही अजूनही प्रसिध्द आहेत. राग, लोभ, मद, मत्सर, काम आणि मोह हे माणसाचे षड्रिपू. ज्याच्यामुळे मनुष्याची दुर्गती होऊन तो रसातळाला जातो. सीतेचे पोहे नेहमी याच गोष्टीची आठवण करून देत असतात. पण जेव्हा दुसर्‍या बाजूने विचार करू लागतो. तेव्हा कवड्याने भिरकावून दिलेले पोहे मात्र अमर झाले. हाच नियम साहित्याला लागू पडत असेल का ? आरती प्रभू, बाळकृष्ण प्रभुदेसाई, विजय चिंदरकर, गुरुनाथ धुरी यासारखे प्रतिभावान साहित्यिक अल्पायुषी ठरले, पण त्याचं साहित्य काळाच्या प्रवाहात वाहून गेलं नाही. ते टिकून आहे. कदाचित त्याचं लेखन हे काळाबरोबर राहिलं, त्यांनी त्या साहित्याचा विचार आपल्या चक्षुंनी केला.

काळाबरोबर लोप पावणार्‍या गोष्टी या क्षणभंगुर असतात, त्यांना वास्तवाचे भान नसते. सीतेच्या पोह्यांना ही दुसरी बाजू असावी. जी आपल्याला काळाच्या पलीकडे पहायला शिकवते. काळ कोणासाठीच थांबत नसतो, पण जेव्हा आपण चांगलं पहातो, चांगलं ऐकतो, चांगलं वाचतो तेव्हा क्षणभर का होईना काळाचा विसरदेखील पडतो. प्रत्येक लोककथा ही त्या त्या काळाला पोषक विचारधारा देत असते. सीतेच्या पोह्यांनी नेहमीच सीतेने भावाची भूक भागवण्यासाठी केलेल्या कष्टाची आठवण करून दिली. काल मुलाला कडेवर घेऊन भर पावसात डोक्यावर प्लास्टिकची पिशवी घेऊन चाफ्याची फुलं विकताना एक स्त्री बघितली, तिची फुलं कोणी विकत घेतली की, ती स्त्री कमरेवरच्या मुलाकडे बघायची. ही कष्ट करणारी स्त्री कुठतरी त्या सीतेशी आपलं नातं तर सांगू पहात नाही ना ? परिस्थितीने तिला कष्टाची शिकवण दिली, पण हे सर्व ती आपल्या मुलासाठी तर करत असावी. त्या सीतेने भावाची भूक भागवण्यासाठी पोहे बनवण्याचे कष्ट घेतले ते कष्ट फुलाच्या रूपाने अमर राहिले. या माउलीचे कष्ट तिची मुलं जाणून घेऊन पुढे तिला सुख देतील ही आशा ठेवायला काय हरकत आहे. कारण सीतेची फुलं त्या माउलीच्या डोळ्यात फुलली होती….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -