घरफिचर्सविवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज

विवाहपूर्व समुपदेशन काळाची गरज

Subscribe

संसारात अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अजून एक कळीची भूमिका बजावत असतो तो घटक म्हणजे पती-पत्नीचे लैंगिक संबंध. लैंगिक सुखाच्या कल्पनेत जर दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाला तर परिस्थिती फारच विचित्र होते. लैंगिक संबंधाचा नाजूक धागा जुळला नाही तर विवाह टिकवणे फारच क्लेशकारक होते. विशेषत: स्त्रियांना. अशा सर्व मुद्यांचा साकल्याने विचार केल्यावर लक्षात येते ते विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व. ही संकल्पना आता पाश्चात्य राहिलेली नाही. व्यक्ती म्हणून असणार्‍या अधिकारांबद्दल स्त्रियांमध्ये जाणीव निर्माण झाल्यामुळे विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

प्रज्ञा एक उच्च शिक्षित तरुणी. एका नामांकित कॉलेजातील प्राध्यापिका. माझ्यासमोर येऊन बराचवेळ बसली होती. स्वत:तच हरवल्यासारखी. अखेरीस बोलू लागली. काय सांगू तेच समजत नाहीये. महिला समस्या वाटेल का, याचीच मला शंका वाटतेय. मी तिला हळुहळू विश्वासात घेतल्यावर ती मोकळेपणाने सांगू लागली. लग्न होऊन दहाच महिने झाले होते, पण ते दहा वर्षांसारखे वाटत होते. नवरा चांगला शिकलेला आणि घरही सधन. वरवर पाहता काहीच प्रश्न नव्हता, पण त्याला स्वत:चे असे मतच नाही. प्रत्येक गोष्टीत आई-बाबा म्हणतील ते प्रमाण. नवी नवरी म्हणून प्रज्ञाने खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला, तडजोडी केल्या. घरात मोठ्याने बोलायचे नाही. नवरा व घरची मंडळी जेवेपर्यंत डायनिंग टेबलजवळ तिष्ठत उभे रहायचे-अशी निरर्थक बंधने. स्वयंपाक अगदी विशिष्ट वेळेतच झाला पाहिजे यावर कटाक्ष आणि वर कॉलेजची पूर्णवेळ नोकरी. या सर्वांचा प्रचंड मानसिक ताण वाढत गेला. नवर्‍याला सांगावं तर त्याचे एकच म्हणणे आई-बाबा म्हणतील तसंच तुला वागावे लागेल.

मी तर त्यांना सोडून राहू शकत नाही. घरातले सर्व जण कायम गप्प-गप्प, एकमेकांशी काही चर्चा नाही, संवाद नाही. सासुबाईंचे मोजकेच बोलणे, तेही प्रज्ञाच्या कामाबद्दल नकारात्मक ताशेरेच. अगदी नकोसे होऊन प्रज्ञा माहेरी

- Advertisement -

निघून आली होती. तिथून तिने नवर्‍याला फोन केला तर त्याचे म्हणणे, तुला काय त्रास आहे? कोणी मारझोड करतंय का की तुझी उपासमार करतंय? मी तुला काही त्रास देतोय का? पण तुला नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय?

प्रज्ञाच्या माहेरच्या घरचे वेगळेच चित्र होते. आई गृहिणी होती. नोकरीला जाताना प्रज्ञाचा डबा आईच बनवून द्यायची. प्रज्ञा घरकामात आईला वरची मदत करायची. त्यामुळे घरकामाचा ताण तिने अनुभवला नव्हता. घरी आल्यावर

- Advertisement -

कॉलेजातल्या गमती जमती, निरनिराळे प्रसंग आई-बाबांना सांगायची. त्यावर तिघांच्या चर्चा व्हायच्या. गप्पा गोष्टी करत सर्व जण एकत्र जेवायचे. सासरी गेल्यावर मात्र हे एकमेकांशी बोलणे, एकमेकांचे ऐकणे बंदच झाले होते. नवर्‍यालाही तिच्या गप्पा-गोष्टीत रस वाटायचा नाही. घरात इतकी माणसे होती, पण तिला एकटं-एकटं वाटायचं. शिवाय तिच्या माहेरी जाण्याबद्दलही ते नाराज असायचे. मी प्रज्ञाला विचारलं, लग्नापूर्वी तुला त्यांच्या घरातलं वातावरण माहीत नव्हतं का? वधू-वर सूचक मंडळातून लग्न जमवलं. लग्न ठरवताना जी बोलणी झाली त्यावरून कुटुंब अगदी व्यवस्थित वाटलं-तिचं उत्तर. विवाहपूर्व समुपदेशन केलं होतं तुम्ही दोघांनी? त्यावर प्रश्नार्थक नजरेनंच ती म्हणाली, विवाहपूर्व समुपदेशन? नाही. तशी गरज असते का? दुसरी निशा तिची ही अशीच कहाणी.

निशा व तिचा नवरा फेसबूकवर भेटले होते. लग्नापूर्वी दोघे प्रत्यक्षही भेटले. करिअर, कुटुंबाच्या जबाबदार्‍या, दोघांची पार्श्वभूमी यावर बोलणंही झालं. दोघांनी परस्परांबद्दल संमती दर्शवल्यावर मग घरातील मंडळींना विवाहाच्या प्रस्तावावर विचार केला व लग्न ठरवले. लग्न झाले आणि लवकरच निशाच्या लक्षात आले की आपली निवड चुकली. नवर्‍याने भेटीच्या वेळी दाखवलेले रूप व प्रत्यक्षातले त्याचे वागणे खूपच फरक होता. लैंगिक संबंधाबाबत त्याच्या कल्पना ऐकून तिला धक्काच बसला. निशाला मी विचारले, लग्नापूर्वी जेव्हा तुम्ही भेटला व करिअर, पैसे, घर, कुटुंबाच्या जबाबदार्‍या या सर्व बाबींवर चर्चा केल्या, तेव्हा लैंगिक संबंधाबद्दल तुमचे काहीच बोलणे झाले नाही? यावर तिने नकारार्थी मान हलवली. पुन्हा तोच प्रश्न मी निशालाही विचारला, विवाहपूर्व समुपदेशनाची गरज नाही का वाटली तुला? त्यावर तिचं उत्तर होतं, आता वाटतंय विवाहपूर्व समुपदेशन करायला हवं होतं.

मनीष केंद्रात आला तेव्हा तो फारच अस्वस्थ होता. त्याच्याविरुद्ध पत्नीने महिला समुपदेशन केंद्रात तक्रार केल्याचे समजल्यावर त्याला धक्का बसला होता. वास्तविक दोघांचा प्रेमविवाह होता. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना ओळखत होते, पण लग्नानंतर त्यांचं बिनसू लागलं. त्याच्या पत्नीला रश्मीला त्याच्या आई व बहिणीबरोबर रहायचं नव्हतं. फक्त दोघांचा स्वतंत्र संसार तिला हवा होता. लग्नानंतर एकत्र कुटुंबात रहायचं आहे याची पूर्वकल्पना तिला होती, पण लग्नानंतर मात्र तिच्या मनाने वेगळे राहण्याचा ध्यास घेतला व रोज त्यावरून वाद होऊ लागले. मनीषच्या मते ती मुद्दाम त्याच्या मनाविरुद्ध वागू लागली. आक्रस्ताळेपणा करू लागली, आई साधे सरळ काही बोलले तरी त्याला टोमणे मानू लागली. असंच शेवटी एक दिवस ती सासरचं घर सोडून सरळ माहेरी निघून गेली. विवाहपूर्व समुपदेशनाची तुम्हाला गरज भासली नाही का, असे मनिषला मी विचारले तेव्हा पाच वर्षांची जवळीक असल्यामुळे रश्मीला आपण चांगले ओळखत होतो व म्हणून तशी गरज वाटली नाही, असे मनीषचेही म्हणणे. आजच्या तरुण पिढीची ही तीन प्रातिनिधीक उदाहरणे.

वरवर पाहता सर्व काही व्यवस्थित असूनही त्यांच्या लग्नाचे, संसाराचे रसायन का बरे बिघडावे? विवाहबद्ध होणार्‍या दोन स्वतंत्र व्यक्ती असतात, त्यांची आपापली मतं, विचार, दृष्टीकोन, भविष्याबद्दलच्या कल्पना, स्वप्नं असतात. अनेकदा एकमेकांचं सामाजिक, कौटुंबिक वातावरण एकाच साच्यातलं नसतं याचं भान ठेवलं न गेल्यामुळे त्यांची मते जुळत नाहीत. समाधान हरवून जाऊन घर्षण होऊ लागतो आणि पुढे ठिणगीही पेटते. दोघेही आपापल्या परीने चांगल्या व्यक्ती असतात तरी लग्नाबाबत खोलवर विचार न केल्याने हे घडते. वधू-वर अनुरुप आहेत की नाहीत हे ठरवायचे कसे तर त्यासाठी निकष असतात ते फक्त घर, शिक्षण, पगार याबाबतचे तेही जाती-धर्माच्या-पोटजातीच्या चौकटीत हे सांगायला नकोच. तिथे दोघांच्या व्यक्तिमत्वाची ओळख एकमेकांना असण्याची सर्वप्रथम गरज आहे, एकमेकांना जाणून घेतल्यावर एकमेकांबद्दल आदर असण्याची आवश्यकता आहे हे कुणाच्या गावी ही नसते. परिणाम व्हायचा तोच होतो. वरवरच्या गोष्टी पाहून लग्न ठरते. कपडे, दागिने, हॉल, जेवण, मेकअप, हनिमून पॅकेज, हीच असते लग्नाची तयारी. या बाबींवर यथेच्छ चर्चा, वाद, विवादही होतात.

शेवटी व्यवहार ठरतात आणि लग्न होते. लग्न करणार्‍या दोन व्यक्तिचा सहभाग इतका कमी असल्यामुळे कदाचित आपल्याकडे आपण म्हणतो. माझे लग्न झाले. मी लग्न केलं असं म्हणत नाही. वधू-वर या लग्नाच्या सावळ्या गोंधळात जणू काही आपली ‘कर्त्यांची’ भूमिका गमावून बसतात. इतर बाबतीत आधुनिकतेची झूल घालून वावरणारे आपण लग्नाबाबत पक्के परंपरावादी असतो. गेले ते दिवस जेव्हा मुलींची लग्न फार लहान वयात होत असत. (अजूनही खेड्यात व शहरी गरिबांमध्ये 18 वर्षे व्हायच्या आत मुलींना उजवलं जातं.) वय लहान असल्यामुळे मुलींना मारून मुटकुन सासरच्या साच्यात बसवलं जात असे, पण आता मध्यमवर्गीय शहरी मुली शिकताहेत, पायावर उभ्या राहताहेत. तोपर्यंत पंचविशी येतेच. स्वत:ची अशी विचारसरणी, तत्त्वं, मूल्य, जगण्याची शैली अंगवळणी पडलेल्या सवयी घट्ट झालेल्या असतात. ही प्रक्रिया तरुण-तरुणी दोघांच्या बाबतीत घडते. फरक एवढाच असतो की, लग्नानंतर संपूर्ण बदल होणार असतो तो विवाहित तरुणीच्या बाबतीत.

तिला नवीन मुशीत फिट व्हायचे असते, आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला मुरड घालायची असते. ही आपल्या कुटुंबव्यवस्थेची नव्या नवरीकडून अपेक्षा नव्हे आग्रहच असतो. जर एकत्र येणार्‍या या दोन व्यक्तिमत्वांमध्ये व कौटुंबिक वातावरणामध्ये प्रमाणापेक्षा अधिक तफावत असेल तर त्याचा ताणतणाव नव्या नवरीलाच सहन करावा लागतो. सासूने हे तिच्या तरुणपणी (अथवा किशोरवयात) सहन केलेले असते. नवरीवर पडलेल्या ताणाबद्दल तिला काही वावगे वाटत नाही. सुनेला

समजून घेण्याचा प्रयत्न तर पुढचा. नवरा वेगळ्याच जगात जगत असतो. दुसर्‍यांच्या घरी जाऊन राहणे, तिथली बारीक सारीक जबाबदारी पेलणे, सर्वांच्या हिमतीला उभे राहणे, सेवेत थोडीसुद्धा कसूर होऊ न देणे या सर्वांची सुतराम कल्पना त्यास नसते. तो आपली आई, आजी, काकी, मामी या समस्त माहिला वर्गाला हसतमुखाने सेवा करताना पाहत असतो. त्यामुळे तोही आपल्या नवरीला काय होतंय हे समजण्याच्या मनस्थितीत नसतो आणि अशा वेळी तिला सर्वात महत्त्वाचा असतो त्याचा आधार, भावनिक आधार ‘सगळं जग विरुद्ध गेलं तरी चालेल, नवरा आहे ना आपला’ असं म्हणून आनंदाने संसाराचा गाडा ओढणार्‍या महिला काही कमी नाहीत आपल्या समाजात.

अशा सर्व गुंतागुंतीच्या प्रकरणात अजून एक कळीची भूमिका बजावत असतो तो घटक म्हणजे पती-पत्नींचे लैंगिक संबंध. लैंगिक सुखाच्या कल्पनेत जर दोघांमध्ये विसंवाद निर्माण झाला तर परिस्थिती फारच विचित्र होते. लैंगिक संबंधाचा नाजुक धागा जुळला नाही तर विवाह टिकवणे फारच क्लेशकारक होते. विशेषत: स्त्रियांना. अशा सर्व मुद्यांचा साकल्याने विचार केल्यावर लक्षात येते ते विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व. ही संकल्पना आता पाश्चात्य राहिलेली नाही. व्यक्ती म्हणून असणार्‍या अधिकारांबद्दल स्त्रियांमध्ये जाणीव निर्माण झाल्यामुळे विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मार्गदर्शन करण्यासाठी शहरांमध्ये कौटुंबिक समुपदेशन, मानसशास्त्रज्ञ,मानसोपचार उपलब्ध आहेत. वेळीच त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले तर पुढील अपेक्षाभंग टळू शकतो. लग्नाबाबत एकमेकांच्या अपेक्षा वास्तववादी असाव्यात, भावनिक, बौद्धिक शारीरिक साहचर्य जोपसण्याची भूमिका असावी, दोघांच्या वैयक्तिक अशा विशेष जबाबदार्‍या स्पष्ट मांडल्या जाव्यात यासाठी असे समुपदेशन सहाय्यभूत ठरू शकते.

आपली तत्त्वं, मतं, दृष्टीकोन, आर्थिक नियोजनाबाबतची भूमिका, लैंगिक संबंध व सुखाबाबतच्या कल्पना, पालकत्वाबाबतच्या संकल्पना घरकामाबद्दलच्या भावना, निर्णय घेण्याची पद्धत, एकमेकांसोबत घालवण्याचा वेळ, राग आला तर तो हाताळण्याची पद्धत, एकंदरीत स्वभाव अशा एक ना अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करण्याची उत्तम संधी समुपदेशनाच्या प्रक्रियेत दोघांना मिळते. आपल्या पूर्वायुष्यातील कोणत्याही बाबी न लपवता समुपदेशकाशी बोलणे आवश्यक असते. त्यामुळे समुपदेशकाला समोरच्या व्यक्तिला समजून घेण्यास मदत होते.

समुपदेशन म्हणजे तरी काय? समोरील व्यक्तिला समजून घेऊन उपदेशमार्ग दर्शन करणे, सुयोग्य पर्याय समोर ठेवणे. शिवाय गुप्तता राखणे हे समुपदेशकाचे महत्त्वाचे कर्तव्य असते, त्यामुळे तशी भीती मनात न ठेवता तरुण

तरुणींना एकटे अथवा एकमेकांसमोर समुपदेशकाशी बोलणे सहज शक्य होते. एकमेकांना समजून घेण्याची पद्धतही दोघांना ग्रहण करता येते. तज्ज्ञ व्यक्ती समुपदेशनानंतर त्यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसर संबंधित व्यक्ती एकमेकांना

अनुरूप आहेत की त्यांचे जमणे अवघड आहे याचा आडाखा बांधू शकतात. हे वेळीच कळल्यास पुढे होणारा मनस्ताप टळू शकतो. बिलकुल पटत नसलेल्या व्यक्तिबरोबर जन्मभर, रडत-रडत जगण्याबाबत वेळीच सावधान करणारे विवाहपूर्व समुपदेशन आजच्या घडीला अत्यंत समयोचित आहे. स्त्रियांना दुय्यम मानण्याची आपल्यात खोलवर रुजलेली मनोवृत्ती बदलण्याची वेळ आता आलेली आहे. एकमेकांना सुयोग्य जोडीदार मिळाला तर जीवनाचा प्रवास सुखकरच होईल. त्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनासाठी करावयाची थोडी गुंतवणूक व थोडा वेळ वावगा नाहीच तर अत्यंत उचित आहे, नाही का? तरुणीला आत्मभान देण्याचे व तरुणाला संवेदनशील बनविण्याचे संयुक्त कार्य करणारी समुपदेशन प्रक्रिया ही कार्यशाळाच आहे.

-क्षमा सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -