घरफिचर्ससोशल मीडियाचा उत्पादक उपयोग !

सोशल मीडियाचा उत्पादक उपयोग !

Subscribe

सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालता येणार नाहीत. कारण हा एक मूलभूत अधिकार आहे. परंतु सोशल मीडियाचा वापर कसा करायचा किंवा कोणत्या कामासाठी करायचा याची माहिती आपण देऊ शकतो. फोटोज, व्हिडिओ किंवा पोस्ट करणे यापलीकडे याचा वापर करता येतो. हे लक्षात आणून द्यावे लागेल. जसे की तंत्रज्ञानाचे युग हे जाहिरातबाजीचे अर्थात मार्केटिंगचे युग आहे. आपण सोशल मीडियाद्वारे आपल्याजवळील वस्तूंची(प्रोडक्ट) जाहिरात करू शकतो.

मागच्याच आठवड्यात दोन घटना निदर्शनास आल्या ज्या सोशल मीडियाशी निगडित होत्या. पहिली घटना अशी की, पाच मित्रांनी एकत्र येऊन त्यांच्यातील एका मित्राचा प्रेयसीसोबत असतानाचा एक व्हिडिओ काढला. त्याच्याशी संपर्क करून त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. पाच लाख रुपये दिले तर ठिक अन्यथा आम्ही हा व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड करू. भीतीपोटी त्याने त्यांना सुरुवातीला 50 हजार रुपये जमा करून दिले. पुन्हा त्या लोकांनी पैशाची मागणी केली व सोबतच धमकी दिली की, बाकीचे साडेचार लाख रुपये जर दिले नाही तर आम्ही दोन दिवसात हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करतोय. एवढे पैसे आपल्याकडून देणे शक्य नाही, हे त्यावेळी तरुणाला समजले आणि त्याने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. परिणामी धमकी देणार्‍यांच्या विरोधात सायबर गुन्हा नोंदवण्यात आला….

दुसरी एक घटना की, दोन वर्षांपासून एक मित्र आणि मैत्रीण म्हणून फेसबुकवर भेटलेले दोघे. खूप जवळ आले. फेसबूकपासूनचा प्रवास इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप टिक टॉकपर्यंत पोहोचला एकमेकांना सर्व अपडेट्स कळवणे, वेळ मिळेल तशा गप्पा, ईमोजी पाठवणे, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे आणि सहजपणे मनातलं व्यक्त होणे. हे सर्व चालत असताना एके दिवशी त्याने तिला एक संदेश पाठवला. जो तिच्या मनाविरुद्ध होता. अर्थातच तिने नकार दिला, काही सोशल अ‍ॅपवर ब्लॉक सुद्धा केले. पण त्याने दिलेली धमकी तिला मानसिक त्रास देत होती. माझी इच्छा पूर्ण नाही केली तर आपल्यात झालेल्या संवाद, तू पाठवलेले फोटो, तुझ्या घरच्यांना वगैरे दाखवतो… या त्रासाने कंटाळून तिने मैत्रिणीशी सल्लामसलत करून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. आज त्या तरुणावर सायबर गुन्हेगारी खटला सुरू आहे.

- Advertisement -

या दोन्ही घटनांवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चर्चा केली. अशांना शिक्षा झालीच पाहिजे, यांना सोशल मीडियापासून दूर ठेवावे, अशा लोकांसोबत मैत्री करू नये, किंवा या लोकांना प्रेम करायला दुसरीकडे एकांत मिळाला नाही का ..? असे प्रश्नसुद्धा केले. काहींनी सल्ले पण दिले. आता ही झाली सोशल मिडियावरची चर्चा. पण ज्यांच्या सोबत ही घटना घडली. त्यांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, याचा विचार मात्र कुणीच केला नाही. किंवा असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तयार का होतात याचाही विचार केला गेला नाही. प्रत्येक जण आम्ही करू तेच योग्य असाच समज घेऊन व्यक्त होत आहेत. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत सोशल मीडियाने आपले जाळे निर्माण केले आहे. या जाळ्यात अनेक जण अडकत चालले आहेत. एकीकडे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे आपणच म्हणतो.

पण परिस्थितीचा वेगळा फायदा उचलणारे महाभाग येथे वाईट प्रवृत्तीला जन्म देत आहेत. हे तितकेच खरे.. सोशल अ‍ॅप तयार करत असताना निर्माण करणार्‍याने हाच विचार केला असेल की, आपण तयार करत असलेले अ‍ॅप एक माध्यम म्हणून वापरले गेले पाहिजे, यावर सर्वांनी एकत्र येऊन संवाद साधला पाहिजे, किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून याचा योग्य प्रकारे वापर केला गेला पाहिजे. पण आज घडीला वापरात असलेले विविध सोशल मीडियाचे अ‍ॅप एका वेगळ्या वळणावर येऊन थांबले आहेत. गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची धोक्याची घंटा येथे वाजत आहे. आता प्रश्न उद्भवतो तो हा की दोष कुणाला द्यायचा…? सोशल मीडिया संस्थापक लोकांना.. की वापर करणार्‍या तरूणाईला… याचे उत्तर देणे थोडे अवघड आहे. कारण गेल्या दशकभरात सोशल मीडिया वापरणार्‍यांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ झाली. त्यासोबतच काही वाईट गोष्टी येत आहेत, पण गुन्हेगारी थांबवता येते हेही तितकेच सत्य आहे.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालता येणार नाहीत. कारण हा एक मूलभूत अधिकार आहे. परंतु सोशल मीडियाचा वापर कसा करायचा किंवा कोणत्या कामासाठी करायचा याची माहिती आपण देऊ शकतो. फोटोज, व्हिडिओ किंवा पोस्ट करणे यापलीकडे याचा वापर करता येतो. हे लक्षात आणून द्यावे लागेल. जसे की तंत्रज्ञानाचे युग हे जाहिरातबाजीचे अर्थात मार्केटिंगचे युग आहे. आपण सोशल मीडियाद्वारे आपल्याजवळील वस्तूंची(प्रोडक्ट) जाहिरात करू शकतो. छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून ते अनेक मोठ्या वस्तूंपर्यंत आपण याद्वारे आपल्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. हस्तकला व्यवसाय, लघुउद्योग, पशुपालन गृहपयोगी वस्तू, दैनंदिन आहार पद्धती याविषयीची माहिती, योगाभ्यास, ऑनलाईन क्लासेस इत्यादी या आणि अशा अनेक व्यवसायाला येथे चालना मिळू शकते. याकडे सोशल मीडिया वापरत असलेल्या युवकांनी सकारात्मक दृष्टीनं बघावं. अर्थात काही तरुण सोशल मीडियाकडे व्यवसाय वाढीचे माध्यम म्हणून पाहतात. तुम्ही फक्त जाहिरात करा, ग्राहक तुमच्या समोर उभा आहे.

आज प्रत्येकाजवळ एक विशिष्ट कला आहे. समाजात या कलेचा आदर करणारे लोकही आहेत. अशा युवकांनी आपली कला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे केला तर त्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल. मागच्याच आठवड्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बाबा जॅक्सन नावाचा तरुण जो मायकल जॅक्सन सारखे हुबेहूब नृत्य करतो. त्याने स्वतःचा एक व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड केला व आठवड्यातला मोस्ट व्हायरल व्हिडिओ म्हणून इतर समाज माध्यमांवरसुद्धा त्याला प्रसिद्धी मिळाली. बॉलिवूडमधल्या बर्‍याच कलाकारांनी त्याचा तो व्हिडिओ शेअर केला.

सोबतच त्याला त्यातून पैसे मिळाले. सोशल मीडिया हे फक्त टाइमपास करण्याचे साधन नाही. तर अर्थार्जनाचे साधन म्हणून स्वीकारले पाहिजे. अनेक लोक आपले नातेवाईक, मित्र-मैत्रीण, सेलिब्रिटी, व शिक्षक सोशल मीडियावर आहेत म्हणून स्वतः त्याचा वापर करतात. त्यांच्या पोस्ट लाईक, शेअर, तसेच त्यांना फॉलो करतात. एका अर्थाने करमणूक म्हणून त्याकडे पाहतात. यात काही युवक असेही आहेत की जे वर्तमानपत्र वाचणे, बातम्या ऐकणे, पुस्तक डाऊनलोड करून वाचणे, विविध अभ्यासक्रमाची माहिती जमा करणे यासाठी देखील वापर करतात. पण याचे प्रमाण कमी आहे हेही मान्य केले पाहिजे. कोणतीही गोष्ट आपल्याकडे आल्यानंतर त्याची निश्चित दिशा आपल्याला ठरवता आली पाहिजे. सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापले आहे. प्रत्येक जण आज आपली वेगळी ओळख शोधू पाहत आहे. ती ओळख यातून त्यांना मिळत आहे. जो योग्य निवड करतो तो अपयशी होत नाही. अयोग्य निवड केल्यानंतर मात्र त्याचे परिणाम वाईट असतात. सोशल मीडिया वापरताना संस्काराची समज आली आणि नैतिकता जोपासली तर आपण आनंदी राहतोच. सोबतच इतरांना आनंदी ठेवू शकतो. इतरांच्या खाजगी जीवन जगण्याच्या अधिकारात लुडबूड न करता त्यांना मुक्तपणे जगू देऊयात. सोबतच वाईट गोष्टी घडत असतील तर लॉग आऊटचा पर्याय दिलेलाच आहे.

-धम्मपाल जाधव

एक प्रतिक्रिया

  1. “Social mediacha utpadak upayog” ha lekh khupach abhyaspurn hota tri aapan lekhakacha mobile number aani email jar paper var samparkasathi deta aala tr bagha

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -