घरफिचर्सप्यार किया तो डरना क्या !

प्यार किया तो डरना क्या !

Subscribe

भीती दाखवणार्‍या शिक्षकापासून ते सत्ताधीशांपर्यंत सारेच आतून प्रचंड असुरक्षित असतात. पोकळ असतात. डॉल्फ हिटलर याच असुरक्षिततेने पछाडला होता. त्याच्यासारख्या हुकूमशहांना भीती होती ती प्रेमाची. लोक परस्परांवर प्रेम करू लागले आणि सामंजस्याने राहू लागले तर आपण काय करायचं. याची त्यांना चिंता वाटते. त्यामुळे या ना त्या प्रकारे भीती दाखवून लोकांना प्रेमासारख्या भावनेपासून दूर ठेवणं, त्यांना निर्भय न बनू देणं हाच तर यांचा डाव असतो.

हायस्कूलला असताना नवे सर शिकवायला आले तेव्हा ते किती ग्रेट आहेत, हे सांगताना काहीजण म्हणायचे, ‘सर स्टाफरूमजवळ जरी असले तरी दहावीच्या वर्गातली मुलं चळाचळा कापतात.’(स्टाफरुम ते वर्ग जवळपास २००-२५० मीटरचं अंतर होतं.) मुलं सरांना घाबरतात, सरांच्या ‘कंट्रोल’ मध्ये आहेत आणि म्हणून सर थोर आहेत, असा त्या वाक्यात दडलेला अर्थ होता. मुलं आपल्याला घाबरतात, याचं कौतुक का वाटावं, असा प्रश्न मला पडायचा. किंबहुना, कुणी आपल्याला बोलण्यासाठी, भेटायला घाबरत असेल तर ही गोष्ट अभिमानाची तर नाहीच; उलट आपल्याविषयीची नकारात्मक गोष्ट आहे. कुणालाही सहज आपल्या मनातली गोष्ट शेअर करता आली पाहिजे, तर सर मॅडम काय कुठल्याही दोन व्यक्तींमधलं नातं अधिक सुंदर असू शकतं; पण भीतीचा वापर केल्याशिवाय आपला वचक कसा बसणार, अशी चिंता अनेक गुरुजनांना असते. काही पालकही सांगतात शिक्षकांना, याला बिनधास्त झोडपा, सुतासारखा सरळ झाला पाहिजे. शिक्षा किंवा आमिष याच जणू मानवी प्रगतीच्या प्रेरणा आहेत, असंच अनेकांना वाटत असतं.

इटालियन विचारवंत मॅकियाव्हली याने ‘प्रिन्स’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथात त्याने राजाने कसं वागावं, याविषयी उपदेश केला आहे. त्याच्या मते, राजाची लोकांना भीती वाटली पाहिजे. लोक घाबरले तर ते राजाच्या नियंत्रणात राहतील. कारण नागरिकांना सुरक्षित जगणं हवं असतं वगैरे. त्यामुळे शोलेतल्या डायलॉगच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पन्नास पन्नास मैल दूर कुठलंही मूल रडू लागलं की आई म्हणते, बेटा झोप, ‘गब्बर सिंग’ येईल. इतरांना आपली भीती वाटली की आपल्यालाही सत्ता गाजवल्यासारखं वाटतं आणि सत्ता गाजवण्याची अपरंपार इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. पोलीस अनेकदा काही कारण नसताना रस्त्यावर बसलेल्या जोडप्यांना फटके लगावतात. हातात दंडुका असला की तो चालवल्याशिवाय सत्तेचा ‘फील’ येत नाही.

- Advertisement -

राज्यकर्त्यांनाही असंच वाटत असतं म्हणून तर ते जंगलातली झाडं वाचावीत म्हणून शांततापूर्ण मार्गांनी आंदोलन करणार्‍यांसोबत ‘आरे’रावी करत त्यांना अटक करतात. म्हणून तर ते झुंडबळी जाऊ नयेत म्हणून साधं पत्र लिहिणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे संकेत देतात. कोणावर बदनामी केल्याचं बालंट येतं तर कधी जीव वाचवणार्‍या डॉक्टरलाच गजाआड केलं जातं. तत्वानुसार चालणार्‍या न्यायाधीशाला संपवलं जातं. कुण्या चॅनलवरून तथ्य पोहोचू नये म्हणून त्यावर बंदी आणली जाते. दाबून ठेवलेलं सत्य उघड करणार्‍या अधिकार्‍याला जन्मठेप दिली जाते. दंगेधोपे घडवून आणून विशिष्ट समूहाला ‘धडा’ शिकवला जातो आणि भीती दाखवून गप्प केलं जातं. सिनेमे बॅन होतात. पुस्तकं बाळगणारे नक्षलवादी ठरवले जातात. विवेकवाद्यांच्या हत्या होतात तर नव्यानं बोलू पाहणार्‍यांच्या ओठांना बंदुकीच्या नळीतील गरम हवा अनुभवायला भाग पाडलं जातं. कधी कुणाच्या घरावर धाड टाकली जाते तर कुणाला ईडीचा धाक दाखवला जातो. सीबीआयचे अधिकारी गेटवरून उड्या मारुन हव्या त्या दिशेने धावू लागतात. काहीजण त्या आधीच स्वतःचं राज्यकर्त्यांना साष्टांग नमस्कार करत ‘मेगाभरतीत’ सामील होतात. त्यांच्याच सुरात ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ म्हणू लागतात. पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम अनेकांना असतो. पाठीवरती हात ठेवून ‘लढ’ नव्हे तर ‘हात जोड’ असं म्हणणारेच भवताली असतात. सगळ्याच्या मुळाशी असते भीती. राज्यकर्ते/ सत्ताधीश या ना त्या भाषेत भीतीचा अनुवाद करून सांगत असतात. त्या सार्‍याचा एका शब्दात अर्थ असतो-डरो !

भीती दाखवणार्‍या शिक्षकापासून ते सत्ताधीशांपर्यंत सारेच आतून प्रचंड असुरक्षित असतात. पोकळ असतात. डॉल्फ हिटलर याच असुरक्षिततेने पछाडला होता. त्याच्यासारख्या हुकूमशहांना भीती होती ती प्रेमाची. लोक परस्परांवर प्रेम करू लागले आणि सामंजस्याने राहू लागले तर आपण काय करायचं. लोकांनी प्रेम करता कामा नये. प्रेमाला बॅन करा, असं कसं म्हणणार? त्यामुळे या ना त्या प्रकारे भीती दाखवून लोकांना प्रेमासारख्या भावनेपासून दूर ठेवणं, त्यांना निर्भय न बनू देणं हाच तर यांचा डाव असतो. म्हणून तर टागोर ‘चित्त जिथे भीतीशून्य’ अशा राष्ट्राची कल्पना करत होते. भीतीला तडीपार केल्याशिवाय तडीपार केलेल्या गुंडांना आणि त्यांच्या प्रवृत्तीला सामोरे जाता येत नाही. भीती व्यक्तीसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे. एकदा हे भिणं सोडून दिलं की राज्यकर्ते अस्वस्थ होतात. गोरख पांडे या कवीने एका कवितेत म्हटलं आहे-

- Advertisement -

वे डरते हैं
किस चीज से डरते हैं वे
तमाम धन-दौलत
गोला-बारूद पुलिस-फौज के बावजूद ?
वे डरते हैं
कि एक दिन
निहत्थे और गरीब लोग
उनसे डरना
बंद कर देंगे

बॉलिवूडच्या गाण्यांनी आपल्याला केव्हाच सांगितलं आहे- ‘प्यार किया तो डरना क्या!’ त्यामुळे ज्यांचं मानवतेवर, संविधानावर प्रेम आहे त्याने/तिने हुकूमशाहीला घाबरण्याचं मुळी कारणच काय! कर नाही त्याला डर कशाला आणि डर के आगेच तर जीत है, त्यामुळे या भीतीला ओलांडून सीमोल्लंघन करणं गरजेचं. हातावर पैसे ठेवून आपल्यालाच मत द्या, नायतर बघून घेतो म्हणणार्‍या गावगुंड किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्वयंसेवकांना निर्भीडपणे तोंड देऊन परिवर्तनाकरता मत देता आलं तर ते खरं स्वातंत्र्य. लाठ्याकाठ्यांना आणि बंदुकीच्या गोळ्यांना निडरपणे सामोरे जाणार्‍या राष्ट्रपित्या महात्मा गांधींच्या देशात प्रत्येकाच्या मनामनात भीतीनं घर केलेलं आहे हे दुर्दैवी आहे. तिला ‘चले जाव’ सांगायला हवं आणि भिंतीला कान नव्हे अख्खं शरीरच असलं तरीही सत्य बोलताना आणि शाश्वत मूल्यांवर मनापासून प्रेम करताना भीतीला दूर लोटायला हवं. निर्भय बनण्याचा नवा सर्जक अर्थ आपल्याला गवसला तर प्रेमही थोडं आकळू शकतं. आणि प्रेमाशिवाय जगणं आहे काय ! तेरी आंखो के सिवा रक्खा क्या है !

श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -